अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषणादरम्यान लोकपाल विधेयकासंदर्भात जे मुद्दे मांडले त्यावर संसदेने चर्चा करून ते विचारार्थ संसदेच्या स्थायी समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. अण्णा हजारेंचे आंदोलन त्यांना अटक करून दडपून टाकू पाहणाऱ्या व त्यांच्याशी चर्चा करायलाही नाखूष असलेल्या सरकारला संसदेबाहेरच्या आंदोलनाची केवळ दखलच घेणे भाग पडले असे नव्हे तर एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला बंदूक लावून तिच्याकडून आपल्याला हवी तशी कृती करून घ्यावी तशी सरकारची अवस्था झाली. अण्णांनी उपोषण सोडावे म्हणून त्यांच्यापेक्षा सरकारलाच घाई अधिक झाली. या विजयाला अण्णांनी अर्धा विजय असल्याचे म्हटले.
अण्णांचे आंदोलन अनेक अर्थांनी मागील सर्व आंदोलनांपेक्षा वेगळे आहे. ज्या जनआंदोलनांनी राष्ट्रीय स्तरावर परिणाम घडविला त्यातील हे तिसरे आंदोलन. पहिले जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांतीचे आंदोलन, श्रीराममन्मभूमीचे आंदोलन व अण्णा हजारेंचे आंदोलन. यापैकी पहिल्या दोन्ही आंदोलनांना लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला असला तरी त्या आंदोलनांमागे राजकीय पक्षांच्या संघटनांचे पाठबळ होते. त्यामुळे अशी आंदोलने दीर्घकाळ चालण्याकरिता जी कार्यपद्धती लागते ती या संघटनांकडे होती. परंतु अण्णा हजारेंच्या आंदोलनामागे कोणतीही संघटित शक्ती नव्हती, जी होती ती उत्स्फूर्त जनभावनेतून निर्माण झाली होती. त्यामुळे ते आंदोलन एखाद्या वणव्याप्रमाणे पेटत गेले व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे त्यांना वारा पुरविण्याचे काम करीत राहिली. त्यामुळे कोंडीत पकडल्या गेलेल्या सरकारने या आंदोलनापुढे तात्पुरती शरणागती पत्करली. अण्णांना याची कल्पना असल्याने त्यांनी हा विजय अर्धा विजय असल्याचे म्हटले आहे.परंतु हा केवळ अर्धा विजय नाही तर तो विजय पुरा मिळूनही तो अर्धवटच राहील. याचे कारण अण्णांच्या आंदोलनाची ज्या म. गांधींच्या आंदोलनाशी तुलना केली जाते त्या आंदोनात व या आंदोलनातील एक महत्त्वाचा फरक म्हणजे आंदोलनाबरोबरच गांधीजी आपल्याभोवती सहकाऱ्यांचा संचही उभा करीत असत. किंबहुना कोणतेही आंदोलन हे त्यांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची, संघटना व्यापक करण्याची, त्याच्या जनाधाराचा विस्तार करण्याची एक संधी असे. त्यामुळे परिवर्तनासाठी आंदोलन करीत असताना आपल्या विचारधारेच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी नेतृत्वाची उभारणीही त्यातून होई. कम्युनिस्ट, जनसंघ, समाजवादी अशा सर्व पक्षांनी आपापल्या विचारसरणीच्या आधारावर आंदोलने केली. त्याला यश येऊन काही ठिकाणी त्यांना सत्ताही मिळाली, परंतु लोकांमध्ये त्यांना आपल्या पक्षाबद्दल विश्र्वास निर्माण करता आला नाही. त्याबद्दल आलेले नैराश्य हे अण्णांच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश देण्यास कारणीभूत ठरले.
सरकार आज अण्णांच्या समोर नमलेले दिसले तरी तो सरकारचा बहाणा आहे. ज्या राजकीय संस्कृतीतून कॉंग्रेस पक्षाच्या संस्कृतीच्या मानसिकतेची घडण झालेली आहे तिचे दर्शन नुकत्याच झालेल्या काही घटनाक्रमांवरून दिसत आहे. ज्या रामदेवबाबांना विमानतळावर भेटायला केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी रांग लावली त्या रामदेबाबांनी त्यांचा खेळ खेळण्यास नकार दिल्याबरोबर त्यांच्याविरुद्ध एका पाठोपाठ एक खटले दाखल करण्याचा सरकारने सपाटा लावला आहे. आंदोलन करण्यापूर्वी रामदेवबाबांच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यास राजकीय नेत्यांना उत्साहाचे भरते येई, पण आता त्यांना कायद्याच्या कोंडीत पकडून वाकविण्याचा खेळ सुरू झाला आहे. अण्णांचे आंदोलन संपताच प्रशांतभूषण यांची सीडी खरी असल्याचे दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले व केजरीवाल यांच्यावरही नऊ लाख रुपयांच्या आयकराची नोटीस बजावण्यात आली. याच अंकात जगनमोहन रेड्डी यांच्यावरील एक लेख प्रकाशित केला आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या नावे जो भ्रष्टाचार आहे तो त्यांचे वडील राजशेखर रेड्डी हे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री असतानाच केला गेलेला आहे. परंतु ते जोवर कॉंग्रेसमध्ये होते, सोनिया गांधींचे एकनिष्ठ सेवक असल्याचे दाखवित होते तोवर त्या भ्रष्टाचारात कॉंग्रेसला अडचण नव्हती. परंतु ते जेव्हा कॉंग्रेसला आव्हान देऊ लागले तेव्हा मात्र कॉंग्रेसने त्यांच्याविरुद्ध कारवाईला सुरुवात केली. कॉंग्रेसने आजवर जे भ्रष्टाचाराचे, मतपेढीचे, दांभिकतेचे राजकारण केले त्याची अत्यंत विषारी फळे आज अनुभवायला मिळत आहेत. राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्यांना फाशी देऊ नये असा ठराव तामिळनाडूची विधानसभा करते, हा ठराव पुरेसा नाही म्हणून त्याच्या शिक्षेला वीस वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची सुटका करावी असा ठराव करण्याची मागणी करुणानिधी करतात, याच धर्तीवर अफजलगुरूच्या सुटकेचा ठराव जम्मू काश्मीर विधानसभेने का करू नये? असा प्रश्न ओमर अब्दुल्ला विचारतात, ही सर्व किडलेल्या राजकीय प्रवृत्तींची लक्षणे आहेत. याला कोणी सत्तेच्या खेळातील चाणक्यनीती म्हणत असेल तर त्याला हे सांगितले पाहिजे की चाणक्याने आपली नीती परकीय राजवटीच्या विरोधात वापरण्यासाठी सांगितली होती. सध्या भारतात चीन, पाकिस्तानबरोबर गांधीनीती आणि आपल्या देशातील विरोधकांविरुद्ध चाणक्यनीती वापरली जात आहे.
त्यामुळे आजचा भ्रष्टाचार हा आजच्या राजकीय संस्कृतीचा एक भाग आहे व तो दूर करायचा असेल तर प्रचलित राजकीय नेतृत्व दूर करावे लागेल. परंतु अण्णांच्यापाशी अशा नेतृत्वाची फळी नाही. अण्णांच्या प्रत्येक आंदोलनातील सहकारी वेगळे होते. ते तसे का घडले याच्या चर्चेत जाण्याचे हे स्थळ नव्हे. पण अशी फळी अण्णांच्याजवळ नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेला सर्वात जवळचा पर्याय स्पष्ट करण्याची निर्भयता त्यांनी दाखविली पाहिजे. जयप्रकाश नारायणांनी ती दाखविली होती. परंतु स्वत:ला सेक्युलर ठरविण्याच्या अभिनिवेशात अण्णांनी आपल्याला अशा शक्तींपासून अलिप्त ठेवले तर हा विजय केवळ अर्धाच रहाणार नाही, तर पूर्ण मिळाला तरी अर्धवट राहील.
|