.
 
ताजा अंक

खरे बोलण्याची सेक्युलर शिक्षा
१३ फेब्रुवारी २०११


संपादकीय
तुका म्हणे ऐशा नरा; मोजूनी माराव्या पैजारा

"रोजनामा राष्ट्रीय सहारा'चे संपादक अजीज बर्नी यांनी आपल्या जातीयवादी लेखनाविषयी जाहीर माफी मागितली. 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यामागे इस्रायली गुप्तचर संस्था "मोसाद', सीआयए आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा हात असल्याचा आरोप बर्नी यांनी आपल्या "शहिद - ए - वतन हेमंत करकरे को सलाम' या विशेषांकातून केला आहे. या आरोपात काहीच तथ्य नाही याची कल्पना सगळ्यांनाच होती. परंतु बर्नी व त्यांच्यासार"या अनेक विद्वानांना असे साक्षात्कार अनेकदा होत असतात. बर्नींसार"या लोकांचे काय करायचे, याचे तुकाराम महाराजांनी उत्तम विवेचन बऱ्याच आधी करून ठेवले आहे. "तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा' इतक्या स्पष्ट शब्दात तुकाराम महाराज सांगतात. सामाजिक कार्यकर्ते विनय जोशी व ऍड. प्रशांत मग्गू यांनी या पैजारा मारण्याचे काम उत्तमरित्या केले आहे. त्यांनी सनदशीर मार्गाने दिलेल्या या लढ्याबद्दल या दोघांचेही कौतुक व अभिनंदन केले पाहिजे. सध्या आपला देश "ऐशा नरां'नी भरून गेला आहे. त्यामुळे त्यांना पैजाराही तितक्याच माराव्या लागतील.
हा मुद्दा केवळ बर्नींपुरता मर्यादित नाही. मध्य प्रदेशच्या जनतेने पुरते नाकारलेल्या आणि संघद्वेषाने पछाडलेल्या दिग्विजय सिंगांसार"या मंडळींनी असे अनेक बर्नी देशभर पोसले आहेत. आपला विषारी अजेंडा देशभर राबविताना त्यांना कशाचेही भान राहात नाही. बर्नींच्या अशा लिखाणासाठी त्याची कॉंग्रेसने कशी आणि कुठे कुठे सोय लावली होती, हे पाहणे रंजक ठरेल. बर्नी यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर वर्णी लावण्यासाठी दिग्विजयसिंग व विलासराव देशमुख प्रयत्नशील होते.
जगभरात कुठेही दहशतवादी घटना घडली की, मूळ घटनेपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी वावटळी उठवायच्या हा काही मुस्लीम विचारवंतांचा फायदेशीर धंदा झाला आहे. या मंडळींना पाठिंबा देण्यासाठी दिग्विजय सिंगांसारखे लोक आहेतच. हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी आपल्या पतीला कुठल्याही हिंदू दहशतवाद्यांकडून धोका नव्हता, हे वारंवार सांगूनसुद्धा दिग्विजय सिंग आपला दुष्प्रचार थांबवायला तयार नाहीत. 26/11 च्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मु"यमंत्री व केंद्रीय मंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांनाही हेमंत करकरेंची हत्या हिंदुत्वावाद्यांकडून करण्यात आल्याचे दिवास्वप्न पडले होते. महाराष्ट्र पोलीस दलात आयजी पदावर काम केलेल्या एस.एम. मुश्रिफ यांनी अशाच प्रकारे "हू किल्ड्‌ करकरे' हे पुस्तक लिहून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला आहे.
इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्यांच्या चित्रफिती पॅलेस्टाईनकडून प्रकाशित केल्या जात असतात. मागे एकदा या व्हिडिओमागचे वास्तव सांगणाऱ्या, संपादित न केल्या गेलेल्या चित्रफिती प्रकाशित झाल्या होत्या. अशा प्रकारच्या चित्रफिती बनवून देण्याची एक उद्योग यंत्रणाच पॅलेस्टाईनमध्ये उभी राहिली आहे. हॉलिवुड किंवा बॉलिवुडच्या धर्तीवर या सिनेइंडस्ट्रीला पॉलिवुड म्हटले जाते. पॉलिवुडची चित्रफित पहाताना एखाद्या शहरावर किंवा गावावर होत असलेला लष्करी हल्ला दाखविला जातो. बंदुकीच्या गोळ्यांचा बेछूट आवाज येत असतो. बॉम्ब पडतात. लोक खाली पडतात. बंदुका मात्र दिसत नाहीत. संपादित न केलेल्या या चित्रफितीमध्ये एका दृश्यात जखमी होऊन पडलेले लोक उठून दुसऱ्या दृश्यात सहभागी होण्यासाठी पळत जातात. यातला मजेशीर प्रकार सोडला तर जगभरात वातावरण गढूळ करण्यासाठी व संबंधित देशातील सुरक्षा यंत्रणांबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी ही मंडळी कसे पद्धतशीर प्रयत्न करीत असतात, हे लक्षात येईल. जगभर पसरलेल्या या विषवल्लीची पाळेमुळे भारतातही रुजू लागली आहेत. बर्नी, अंतुले, मुश्रिफ या याच श्रृंखलेतील कड्या आहेत.
भारतात हे राजकारण पसरविण्यासाठी मुस्लीम लांगूलचालनाचा वसा घेतलेली कॉंग्रेसच जबाबदार आहे. आपल्या मतांच्या राजकारणासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणारी कॉंग्रेस देशाच्या मुळावर उठली आहे. शाहबानो, रामजन्मभूमी यांसारख्या विषयात मुस्लिमांचे लाड करणारी कॉंग्रेस हे लाड देशविरोधी झाले तरीही स्वत:ला आवरायला तयार नाही. दहशतवादासार"या संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या समस्येतही कॉंग्रेसला भगव्या दहशतवादाचे राजकारण करायचे आहे. अफजल गुरूला फाशी द्यायची नाही. कसाबचे लाड चालू ठेवायचे आणि आणि मतांच्या राजकारणासाठी मुसलमानांना वापरून घ्यायचे हाच कॉंग्रेसच्या राजकारणाचा पाया आहे. "मुस्लीम फॉर डेमॉक्रसी' या संस्थेचे जावेद आनंद यांनी बर्नी प्रकरणावर दिलेली प्रतिकि"या विचार करायला लावणारी आहे. जावेद आनंद म्हणतात, "जेव्हा बर्नी यांना 26/11 च्या हल्ल्यामागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात दिसला तेव्हाच त्यांनी आपली पत्रकारितेतील विश्र्वासार्हता गमावली होती.' कॉंग्रेसच्या मुस्लीमधार्जिण्या राजकारणाचा अजून एक पदर म्हणजे कॉंग्रेसने आजतागायत कधीच मुसलमानांमधील सुधारक नेत्यांना पाठिंबा दिलेला नाही. देशद्रोही लिखाण करायला, "इस्लाम खतरे में' ची बांग देऊन मुसलमानांची माथी भडकविणाऱ्या मंडळींनाच कॉंग्रेसने सदैव साथ दिली आहे.