गेले 2 महिने मुस्लीम राष्ट्रांमधे चाललेल्या उलथापालथीने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक वर्षं निरंकुश सत्ता उपभोगणाऱ्या तिथल्या जुलुमी हुकूमशहांना वठणीवर आणण्याच्या इराद्याने सर्वसामान्य जनता अक्षरश: रस्त्यावर उतरली आणि त्यांनी आपल्या एकजुटीची ताकद दाखवून दिली. जुलुमी राजसत्तेच्या विरोधातल्या, इजिप्तपासून सुरू झालेल्या या वणव्याचं लोण पाहता पाहता अन्य मुस्लीम राष्ट्रांपर्यंत पोहचलं. या सर्वच ठिकाणच्या लढ्यांचं जाणवण्याजोगं वैशिष्ट्य म्हणजे त्यामधला मुस्लीम स्त्रियांचा लक्षणीय सहभाग! शतकानुशतकं अन्याय-अत्याचार निमूट सहन करणारी ही "परदानशीन' स्त्री देशाची एक नागरीक या नात्याने न्याय मागण्यासाठी पुरुषाच्या बरोबरीने लढ्यात उतरली आणि जगाचे डोळे विस्फारले गेले...या सहभागानेे अनेक प्रश्नांना जन्म दिला. आज देशासाठी रस्त्यावर उतरलेली ही स्त्री, तिने "बाई' म्हणून जे आतापर्यंत सोसलंय त्याचाही जाब विचारायला उद्या पुढे येईल का?...आणि तशी जर ती पुढे आली तर आज या लढ्यात तिच्याबरोबर असलेला तिचा देशबांधव त्यावेळी कुठे असेल? तो देईल तिला साथ...आजच्यासारखी? की सत्तापालटाचं ईप्सित साध्य झाल्यावर ती पुन्हा जाईल आपल्या अंधाऱ्या जगात परत? की सामूहिक लढ्यातून न्याय मिळतो याचा अनुभव घेतल्यावर, आजवर चिरडली गेलेली तिची स्वातंत्र्याची आकांक्षा तिला तिच्या जुन्या जगात स्वस्थ बसू देणार नाही? कसा असेल या मुस्लीम बाईचा "उद्या'? उगवेल का स्वातंत्र्याची पहाट तिच्या आयुष्यात...आजचे लढे त्याची "नांदी' ठरतील का?..आज तरी या प्रश्नांची नेमकी उत्तरं देता येणार नाहीत. मुळात या प्रश्नांना उत्तरं असतील का याचाही आता अंदाज बांधता येणं अवघड आहे. पण एक नक्की की या लढ्याच्या निमित्ताने या महिलांकडे आज साऱ्या जगाचं लक्ष वेधलं गेलंय. त्यांच्याकडे बघणाऱ्या साऱ्यांच्या नजरेत या धाडसाबद्दल कौतुक आहे . "माणूस' म्हणून जगण्याचा त्यांचा आजवर डावलला गेलेला हक्क या निमित्ताने त्यांना मिळावा ही सदिच्छाही अनेकांच्या मनात आहे.
अर्थात्, या देशांतल्या सर्वचजणी ओठ घट्ट मिटून सहन करीत राहिल्या नाहीत. अन्याय-अत्याचाराच्या धबडग्यातही त्यांच्यातलं तेजाचं स्फुल्लिंग धगधगतं राहिलं आणि त्यातून चळवळी उभ्या राहिल्या. स्त्रीच्या विविध हक्कांसाठीच्या चळवळी.. इथल्या बाईचं आत्मभान जागृत करणाऱ्या चळवळी..तिच्यातल्या "स्व'त्वावर आणि "सत्वा'वर जमलेली शतकानुशतकांची राख झटकून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चळवळी. त्यांची संख्या मर्यादित खरी पण त्यातून मिळालेल्या धैर्यानेच का आज या महिलांना लढ्यात उतरण्याची स्फूर्ती दिली असेल? स्वत:साठी, स्वत:च्या बाईपणाच्या हक्कासाठी आवाज उठवणं फारसं नसेल जमलं त्यांना आजवर...पण या
चळवळींनीच त्यांच्या मनात देशासाठी लढायची उर्मी जागवली असेल का?...असेलही कदाचित! ...म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यातील काही चळवळींचा आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या महिलांच्या आयुष्याचा आढावा वाचकांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न...आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, इराण या देशात राहणारी आपल्यासारखीच हाडामांसाची बनलेली "बाई' आजही काय भोगते आहे आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांना कोणत्या दिव्याला सामोरं जावं लागतंय याची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न.
शतकभरापूर्वी, उद्योगक्षेत्रात महिला कामगारांना मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीविरुद्ध जो एकत्रितरित्या पहिल्यांदा आवाज उठवला गेला...त्या लढ्याची आठवण म्हणजे "जागतिक महिला दिन'...पण आजतरी या जगातल्या सर्व स्त्रिया शोषणमुक्त झाल्याहेत का?...जग ही फार दूरची गोष्ट झाली तुमच्याआमच्या बाजूला वावरणारी स्त्री खरंच शोषणमुक्त झाली आहे का? वर्तमानपत्रं आणि प्रसारमाध्यमं तिच्या शोषणाच्या रोज नवनवीन कहाण्या सांगताहेत. "महिला दिना'चा सोहळा गल्लोगल्ली करणाऱ्या आणि द्रष्ट्या समाजसुधारकांची "पंढरी' समजल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात स्त्रीभ्रूणहत्येचं वाढलेलं प्रमाण, तिच्या शोषणाच्या शोधलेल्या नवनवीन तऱ्हा हे सारं कशाचं द्योतक आहे? हे वास्तव बदलायचं असेल तर "आपल्याबाहेरच्या' जगाचा कानोसा घ्यायला हवा. घट्ट मिटून घेतलेली मनाची-घराची कवाडं उघडायला हवीत आणि विधायक बदलासाठी "मी' जे करू शकेन त्या दिशेने कृतीही करायला हवी. यालाच "जागतिक महिला दिन' साजरा करणं म्हणतात. नाहीतर उत्सवप्रिय भारतीय मानसिकतेला आधुनिक जगाने पुरवलेला एक नवा सण इतकंच त्याचं महत्त्व राहील. असं होऊ न देण्यासाठी आपल्यापासूनच बदलाची सुरुवात करायला हवी.
याचा अर्थ आजूबाजूचं वातावरण अगदी निराश करणारं आहे ,असा अजिबात नाही. घरच्यांच्या आणि समाजाच्या प्रोत्साहक पाठिंब्यामुळे अनेक जणी यशाची नवी शिखरं पादाक्रांत करताहेत. त्यापैकी पर्यावरण क्षेत्रात, पशुवैद्यक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या पंचकन्यांची ओळख या अंकात करून दिली आहे. आपल्या कार्यकर्तृृत्वाने त्या लोकांच्या कौतुकाचा विषय होताहेत. आपल्या व्यक्तिगत समृद्धीत समाजातल्या दुर्बलांनाही भागीदार करून घेताहेत. स्त्री शक्तीची ही प्रेरक रूपं आपल्यासमोर उलगडून दाखवण्यामागचा हेतू हा की, विधायक कामात सहप्रवासी होण्याची आपल्यातही प्रेरणा जागावी आणि "जागतिक महिला दिन' खऱ्या अर्थाने साजरा करण्यातला आनंद मिळावा.
|