.
 
ताजा अंक

शताब्दी राष्ट्रगीताची
१४ ऑगस्ट २०११


राष्ट्रगीत शताब्दी विशेषांक
शताब्दी राष्ट्रगीताची...

शंभर वर्षांपूर्वी द्रष्टे कवी रवींद्रनाथ ठाकूर यांनी कॉंग"ेसच्या अधिवेशनात "जन-गण-मन' हे गीत सादर केलं. तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल की या गीताला स्वतंत्र भारताचं "राष्ट्रगीत' होण्याचं भाग्य लाभणार आहे. त्या गीताचं हे शताब्दी वर्ष! रवींद्रनाथांचं भाग्य असं की, भारताच्या शेजारी राष्ट्रांनी बांग्लादेश आणि श्रीलंकेनंही "राष्ट्रगीत' म्हणून रवींद्रनाथांच्या रचनांची निवड केली.
कोणत्याही देशाच्या राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाला तेथील नागरिकांच्या हृदयात एक खास जागा असते. कारण ते गीत म्हणजे त्यांच्या देशाचं गौरवगान असतं आणि तो ध्वज ही त्यांच्या मातृभूची विजयपताका असते. या प्रतिमांभोवती खूप हृद्य भावना एकवटलेल्या असतात. "हजारो देशभक्तांच्या असामान्य धैर्यामुळे, अतुलनीय त्यागामुळे - समर्पणामुळे आज स्वतंत्र देशाचे नागरिक होण्याचं भाग्य लाभलं', या जाणीवेतून आलेली कृतज्ञता असते. म्हणूनच राष्ट्रगीत गाताना किंवा आकाशात डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना या पूर्वसुरींबद्दलच्या कृतज्ञभावनेने, कोणत्याही संवेदनशील नागरिकाचा ऊर भरून येतो, कंठ दाटून येतो.
आपल्या राष्ट्रगीताच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपण भारतीय खूप भाग्यशाली आहोत. स्वातंत्र्याच्या प्रेरक इतिहासाशी संबंधित असलेल्या दोन गीतांना आपण "राष्ट्रगीत' आणि "राष्ट्रीय गीत' म्हणून सन्मानित केलं आहे. "जन-गण-मन' या रवींद्रनाथांच्या निर्मितीला त्यांच्या हृदयात वसत असलेल्या जाज्वल्य देशभक्तीचं आवरण आहे आणि स्वातंत्र्य आंदोलनाचा वन्ही चेतवणाऱ्या बंकिमचंद्रांच्या "वंदे मातरम्‌'ला तर मंत्राचं सामर्थ्य लाभलेलं आहे. राष्ट्रगीत "जन-गण-मन' आणि राष्ट्रीय गीत "वंदे मातरम्‌' या दोघांनाही प्रेरक स्वातंत्र्यलढ्याची पार्श्र्वभूमी आहे, स्वातंत्र्याची आस भारतीयांच्या मनात तेवती ठेवण्यात दोन्ही गीतांचं योगदान मोलाचं आहे.
म्हणूनच "जन-गण-मन'च्या शताब्दीचं औचित्य साधून या दोन्ही गीतांच्या निर्मितीच्या इतिहासाबरोबरच स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न या अंकातून केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्या महाराष्ट्राचं वर्णन "सामाजिक कार्यकर्त्यांचं मोहोळ' अशा सार्थ शब्दांत करीत त्या आपल्या राज्यानं, 1857 ते 1947 या सुमारे 90 वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या कालखंडात काय योगदान दिलं तेही संक्षिप्तपणे वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न अंकातून केला आहे.
हा 90 वर्षांचा पट विविध लेखांतून उलगडताना महाराष्ट्र हे केवळ सामाजिक कार्यकर्त्यांचं मोहोळ नाही तर देशभक्तांचं, क"ांतिकारकांचंही मोहोळ आहे याची जाणीव होते आणि या तपोभूमीत आपण जन्मल्याचा आनंद होतो. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राचं एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील स्वातंत्र्यलढ्यातही अपूर्व योगदान आहे याचा साक्षात्कार, अभिमानाबरोबरच जबाबदारीचं भान जागवतो.
सुमारे 150 वर्षं इंग"जांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या या देशाला स्वातंत्र्य नेमकं कोणामुळे, कोणत्या लढ्यामुळे, कोणाच्या नेतृत्वामुळे मिळालं असे विनाकारण वाद निर्माण करणारे प्रश्न विचारण्याचा "रिकामा छंद' आपल्याकडील बऱ्याच मंडळींना असतो. खरं तर हा सामूहिक लढा होता, विविध भागांतून पुढे आलेल्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली तो लढला गेला. तो कधी सनदशीर मार्गाने असेल तर कधी क्रांतिकार्याच्या माध्यमातून असेल, तर कधी अहिंसेचा-सत्याग"हाचा पुरस्कार करीत, तर कधी व्यवस्थेच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारत लढला गेला असेल. मार्ग आणि पद्धती भले वेगळ्या असतील, पण त्या सर्वांच्या मनी जागणारी मातृभूच्या स्वातंत्र्याची आस सारखीच होती. त्यात काही कमीअधिक नव्हतं, हे सर्वात महत्त्वाचं आहे.
एकाच वेळी अंगावर शहारे आणि रोमांच उभ्या करणाऱ्या या कथा आहेत...सगळ्याच विजयगाथा नसतील...पण या देशभक्तांच्या मनात "रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल' हा आशावाद त्यांनी जागा ठेवला आणि लढण्याचा हुरूप कमी होऊ दिला नाही हेही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
स्वातंंत्र्याच्या साठीचा उंबरा ओलांडलेल्या आणि जगातला सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या देशाचा अगदी अलीकडेच घडलेला हा स्वातंंत्र्य प्राप्तीचा इतिहास....ते मिळवण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या, आयुष्याचा होम करणाऱ्या अनेक ज्ञात-अज्ञात वीरांचा-वीरांगनांचा हा इतिहास.. "त्या सर्वांनी जे आपल्या हाती दिलंय ते सांभाळण्याचं आणि आपल्या मातृभूला परमवैभवाप्रत नेण्याचं काम आपण करतो आहोत का?'...आपण प्रत्येकानेच या प्रश्नाचा उच्चार स्वत:शी करायला हवा आणि त्याची उत्तरं शोधण्यासाठी कृतिशील प्रयत्नही करायला हवेत..आज आपल्याकडे बोलघेवड्या नेत्यांची अजिबात कमतरता नाही, उणीव आहे ती कर्तृत्ववान नेत्यांची आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या निष्ठावान अनुयायांचीही! अंकातून केलेलं इतिहासाचं स्मरण हे औटघटकेचा उत्साह देणारं ठरू नये, ही प्रांजळ इच्छाही हा अंक करण्यामागे आहे.
मंत्राचं सामर्थ्य असलेल्या या गीतांनी आपल्या मनातील राष्ट्रप्रेमाचा वन्ही पुन्हा चेतवण्याचं काम करावं आणि आपल्या कृतीतून देशभक्तीचे नवे आविष्कार साऱ्या जगासमोर यावेत हीच शुभेच्छा!