.
 
ताजा अंक

दिंडी चालली चालली
१७ जुलै २०११


संपादकीय
अवघा रंग एक झाला...

"पंढरीची वारी आहे माझे घरी । आणीक न करी तीर्थव्रत । अशा शब्दांत तुकारामांनी वारीची थोरवी वर्णिली आहे. पंढरी...पंढरपूर....खरं तर पुंडलिकपूर...भक्तश्रेष्ठ पुंडलिकाच्या परमभक्तीची निशाणी...जिथे त्याचा विठुराया त्याच्या विनवणीवरून, केवळ त्याच्यासाठीच नाही तर तिथवर येणार्‍या सर्व भक्तजनांसाठी-त्यांचा उद्धार करण्यासाठी युगानुयुगे कर कटेवरी ठेवून उभा आहे.
विठ्ठल हे ईश्र्वराचं लेकुरवाळं रूप...ज्या रूपात भक्तांनी ईश्र्वराला अधिक आपलंसं केलं असं रूप! आपल्या कौटुंबिक आधीव्याधी विसरून त्याच्या नामस्मरणात दंग झाले. सर्व जातिभेद, पंथभेद त्याच्या दाराशी लयाला गेले. महाराष्ट्रातल्या अठरापगड जातींनी त्याला आपलंसं केलं. इतकंच नाही तर त्याची भक्ती करताकरता हे सारे भक्तजन एकमेकांच्या जवळ आले, परस्परांच्या सुखदु:खांशी एकरूप झाले. ही सहजपणे होणारी समाजाची घुसळण गेली कित्येक वर्षंअव्याहत चालू आहे ....पिढ्यांमागून पिढ्या!
"ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस' असं आपण म्हणतो खरं, पण वारकरी संप्रदायाच्या प्रवर्तकाचा मान जातो तो भक्तश्रेष्ठ पुंडलिकाकडे. तोच पुंडलिक, ज्याने मात्यापित्यांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून दारी आलेल्या साक्षात्‌ परमेश्र्वरालाही काही काळ नि:संकोच तिष्ठत ठेवलेे... भक्ताच्या भेटीसाठी विटेवर तिष्ठत उभ्या परमेश्र्वराने आपल्या या भक्ताला प्रस होऊन वर दिला तोही काय तर... भक्तांच्या भेटीसाठी 28 युगं असाच कर कटेवरी ठेऊन विटेवर उभा राहीन असा! असा विलक्षण वर मागणारा भक्त आणि तो पुरविणारा परमेश्वर...निरलस भक्ती हा ईश्र्वरापर्यंत पोहोचायचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, हा संदेश पिढ्यान्‌पिढ्या पोचविणारा हा प्रसंग! पुंडलिकाचं परमभक्त हेच रूप इथल्या जनमानसावर इतकं ठसलेलं आहे की हा पुंडलिक तपाचरण करणारा एक श्रेष्ठ ऋषी होता ही ओळखही काळाच्या ओघात मिटून गेली आहे. जातपात, पंथोपपंथ या साऱ्यांना दूर ठेवत, "माणूस' सहजपणे एकत्र करण्याची ताकद असलेली विठ्ठलाची वारी सुरू केली ती पुंडलिकानं. त्याचं हे "थोरपण' ओळखून नंतरच्या सर्वच संतांनी त्याला आदराने लवून प्रणिपात केला आहे. "वैकुंठीचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलिक । अशा शब्दांत तुकारामांनी त्याचं श्रेष्ठत्व सांगितलं आहे. या वारकरी संप्रदायाला तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान दिलं ते ज्ञानदेवांनी आणि त्यावर कळस चढवला तो तुकारामांनी.
अत्यंत प्रतिकूल अशा कालखंडात हिंदू परंपरा, संस्कृती टिकविण्याचं मोलाचं काम या वारकरी संप्रदायानं केलं आहे. इसवी सन आठव्या शतकापासून झालेल्या परकीय आक्रमणांनी या देशाचं भावजीवन आणि सांस्कृतिक जीवन उद्‌ध्वस्त करून टाकलं होतं. या आक"मणाच्या कालखंडात इथलं सत्त्व, परंपरा तग धरून राहिली ती केवळ या वारकरी संप्रदायामुळे. अद्वैत तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या या संप्रदायाने, उचनीच हा परंपरागत रुढीवाद मोडून काढून अवघ्या भक्तांना एकाच व्यासपीठावर आणण्याचं महत्कार्य अविरतपणे केलं. आपल्या धर्मात सांगितलेली शाश्र्वत जीवनमूल्यं सामान्य माणसापर्यंत संक"मित केली. जात-पात कोणतीही असो, विठ्‌ठलाच्या दारी सगळे सारखेच आहेत आणि सात्विक भाव जागृत झालेला कोणत्याही जातीचा वारकरी साक्षात पांडुरंगाला आपलंसं करू शकतो, असा विश्र्वास सामान्य माणसाच्या मनात निर्माण करण्याचं कार्य या संप्रदायानं केलं. गृहस्थाश्रम आणि त्यामागून येणारी विहित कर्मं यांचा त्याग न करताही केवळ नामस्मरण आणि संकीर्तनाने भक्ती करता येते हे पटवून दिलं.
संतांनी घालून दिलेल्या या वाटेवरून आजही विठ्ठलभक्तांची वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रात असं एकही गाव नसेल की जिथे वारीची परंपरा नाही... विठ्ठलदर्शनाची आस उराशी बाळगून मैलोन्‌मैलाची वाट हसत तुडविणारे वारकरी आजही आहेत. समोर आलेल्या अनोळखी वारकऱ्याला त्याचं नाव, गाव, जात न पुसताही "माऊली' अशी साद घालत उराउरी भेटणारे वारकरी आजही आहेत. त्यांची विठुमाऊली कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आलिंगन देईल अशी निर्मळ श्रद्धा, दृढ विश्र्वास त्यामागे आहे. "न लगे मुक्ती, धन, संपदा' हा विचार जगणारे हे वारकरी...जगण्यातलं साधेपण झपाट्याने लयाला जात असलेल्या आजच्या जगात ते टिकवून ठेवणारे आणि सहजपणे हा वारसा पुढच्या पिढीच्या हाती सोपविणारे!
या साध्याभोळ्या वारकऱ्यांबरोबरच पंढरीची वाट चालताहेत सर्व संतांच्या गावोगावांहून आलेल्या पाल"या! भागवत धर्म उज्ज्वल करणारे हे सर्व संत, त्यांच्यातलेच एक होऊन विठुरायाच्या दर्शनाला निघाले आहेत, अशी त्यांची श्रद्धा आहे. या पाल"यांबरोबर पंढरीच्या वाटेवर चालणं, मुक्कामी पोहोचेपर्यंत होणाऱ्या सर्व प्रकारच्या सोहळ्यांत तनमनाने सहभागी होणं यात त्यांचं सुख सामावलेलं आहे.
जग बदलतंय...खेड्यांची शहरं होण्याची प्रकि"या फार झपाट्याने सुरू आहे. मात्र या सगळ्या वावटळीत "वारी'सारखी परंपरा आपलं सत्त्व आजही टिकवून आहे. "मी, माझं, मला' असा मंत्र जपणाऱ्या आजच्या जगात कौटुंबिक-व्यक्तिगत लाभहानीची जराही पर्वा न करता वर्षातले काही महिने हा वारकरी विठुरायाच्या चरणी अर्पण करतो आहे. आजच्या "इंडिया'त "भारत' जिवंत आहे तो त्यांच्या रूपात.
मात्र या "भारता'ला हळूहळू असामंजस्याचं ग"हण लागतंय की काय अशी काळजी वाटू लागली आहे. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा सदाशिवनगर इथं होण्याची जुनी परंपरा मोडली गेली ती मानापनाच्या प्रसंगामुळे. हा सोहळा "याचि देही, याचि डोळा' अनुभवण्यासाठी उत्सुक असलेल्या भक्तजनांचा हिरमोड झाला. या वादात कोण चूक व कोण बरोबर, हा मुद्दा तूर्तास दूर ठेवू. पण ज्या संतांच्या पायवाटेवरून शतकानुशतकं हे वारकरी चालले आहेत, ज्यांचा उपदेश आचरणात आणताहेत त्या संतांपैकी संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी "अहंकाराचा वारा न लागो राजसा...' हे मागणे परमेश्वराकडे मागितले होते. व्यक्तिगत अहंकारापेक्षा आपले कर्तव्य अधिक महत्त्वाचे मानण्याचा उपदेश त्यामागे होता. या उपदेशाच्या विस्मरणाचं गालबोट वारीला लागलं, असं आज खेदाने म्हणावं लागतंय.