.
 
चालू अंक
संमेलनाआधीच वादाची नांदी!
१९ सप्टेंबर २०१०

संपादकीय
रंग रंग कोणता?

"रंग रंग कोणता?' नावाचा एक खेळ लहान मुले खेळतात. एखाद्याने रंगाचे नाव उच्चारायचे आणि बाकी सर्वांनी त्या रंगाच्या वस्तू जाऊन पकडायच्या. ज्याला त्या रंगाची वस्तू सापडणार नाही, तो बाद. केंद्रातून "भगवा दहशतवाद' असे ओरडले की राज्यातली सगळी मंडळी लगेचच त्या रंगाचे दहशतवादी शोधायला सुरुवात करतात. या खेळाची मजा अशी की अन्य कुठल्याही रंगाला स्पर्श करायचा नाही. तमाम हिंदूविरोधी मंडळींनी आता हा खेळ खेळायला सुरुवात केली आहे. पुण्याच्या "जर्मन बेकरी'त झालेल्या बॉम्बस्फोटामागे "इंडियन मुजाहिद्दीन' या गटाचा सदस्य असलेल्या मिर्झा हिमायत बेग याला पुण्यामध्ये तर त्याचा दुसरा साथीदार शेख लालबाबा मोहम्मद हुसेन ऊर्फ बिलाल याला दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यामध्ये अटक केली आहे. स्फोटाचे ठिकाण जर्मन बेकरीच का हे ठरविण्यापासून बॉम्ब तिथवर नेऊन पोहोचविण्यात व स्फोट घडवून आणण्यात हिमायतचा हात असल्याचे आढळून आले आहे. बिलालच्या घरातून दोन किलो आरडीएक्स, सीमकार्डस्‌, "लष्कर-ए-तोयबा'चे छापील साहित्य, पेनड्राइव्ह अशा प्रकारचे साहित्य सापडले आहे. दहशतवादी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे जिहादी दहशतवादाचा अजून एक चेहरा समोर आला आहे. दहशतवादी कारवायांचे धागेदोरे आता लातूरच्या उद्‌गीरसारख्या दूरगावात जाऊन पोहोचले आहेत.
"जर्मन बेकरी'त बॉम्बस्फोट झाल्यानंतर महाराष्ट्रातील गृहमंत्रालयाच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना "हिंदू दहशतवाद्यां'चा या स्फोटात हात असू शकतो, असे विधान केले होते. त्याचाच परिणाम म्हणून काही वर्तमानपत्रांनी तशा आशयाची बातमी देखील प्रकाशित केली होती. "हिंदू दहशतवादी' ही कल्पना वास्तवात रुजविण्यासाठी कॉंग्रेस, डावे आणि हिंदूविरोधी शक्तींनी आपली कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री चिदंबरम यांनी देखील आपल्या देशात "भगवा दहशतवाद' अस्तित्वात असल्याचे सूतोवाच केले होते. यानंतर त्यांच्यावर भरपूर टीकाही झाली. मुळात स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवायचे आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना निरनिराळ्या रंगात वाटायचे, ही नवी परंपरा युपीएच्या काळात सुरू झाली आहे. दोन धर्मातले भांडण म्हणजेच एका धर्माची एकगठ्ठा मते हे समीकरण कॉंग्रेस व तत्सम पक्षांनी नेहमीच अवलंबिलेले आहे. मुस्लीम मतांसाठी चालविलेला हा खेळ खरोखरच एक दिवस देशाच्या मुळावर उठणार आहे. सरकारी पातळीवरून "भगवा दहशतवाद' हा शब्द वारंवार उच्चारला जात आहे परंतु "हिरवा' किंवा "जिहादी इस्लामी दहशतवाद' असा शब्दप्रयोग चुकूनही केला जात नाही. उलट एखादी जिहादी दहशतवादातून प्रेरित घटना घडली, एखाद्या दहशतवादी मुसलमानाला अटक झाली की लगेचच दहशतवादाला रंग नसतो, जात नसते, अशी मुक्ताफळे उधळली जातात.
जगभरात जिहादी दहशतवाद्यांनी थैमान मांडले आहे.  जगातल्या सर्व घटना या इस्लामविरोधी असून त्यांचा बदला घेण्यासाठीच जमेल त्या मार्गाने दहशतवादी कारवाया चालल्या आहेत. सौदी अरबामधून या मंडळींना पैसा मिळतो, हे देखील उघड आहे. परंतु त्यांचा दहशतवाद धर्मनिरपेक्ष आहे. 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमागे दाऊदचा हात आहे, हे उघड झाल्यानंतर हे केवळ गुन्हेगारी कृत्य नसून हा धार्मिक उन्माद आहे, हे कळायलाही आपल्याला बराच वेळ जावा लागला होता. अमेरिकेच्या "9/11' नंतर ओसामा बिन लादेन एकदम प्रकाशात आला आणि जिहादी कारवाया करणाऱ्या इस्लामी दहशतवाद्यांचे जाळे जगभर कसे पसरले आहे, याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली. मुसलमानांवरील ज्या तथाकथित अत्याचारांच्या सुरस कथा या दहशतवाद्यांकडून सांगितल्या जात होत्या, त्याच्या मुळाशी शोध घेत गेलेल्या डॅनियल पर्ल या बि"टिश पत्रकाराचा दहशतवाद्यांकडून शिरच्छेद करण्यात आला. "9/11' ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधून जो काय घ्यायचा होता तो बोध अमेरिकन आणि अन्य युरोपीय राष्ट्रांनी घेतला आणि आपल्या देशाची व नागरिकांची रक्षा करण्याचे प्रतिबंधात्मक उपाय केले. दहशतवादाच्या बाबतीत "झिरो टॉलरन्स'ची भूमिका स्वीकारून युरोपीय राष्ट्रे दहशतवादाचा सामना करीत आहेत. यामुळेच "9/11' नंतर अमेरिकेवर दुसरा दहशतवादी हल्ला होऊ शकला नाही.
आपल्याकडे मात्र दहशतवादी हल्ले होतच आहेत. अफझल गुरू, अजमल कसाब यासारखे दहशतवादी त्या त्या ठिकाणच्या कॉंग्रेस सरकारांनी दत्तकच घेतले आहेत. डाव्यांचे केरळमधील सरकार मदानीसार"या दहशतवाद्याला अटकच करू इच्छित नव्हती. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तो भगवा आहे का? हे तपासण्यासाठी आधी काही मंडळी प्रयत्न करतात. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारे राजकीय नेते, त्यांना खूष करू पाहणारे अधिकारी यांनी हे षड्‌यंत्र चालविले आहे. देशात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजावर दहशतवादाचा ठप्पा लावून त्यांना आपला सर्वधर्मसमभावाचा बुरखा अबाधित ठेवायचा आहे. समझौता एक्स्प्रेस विस्फोट, अजमेर दर्गा, मक्का मशीद स्फोट यासार"या स्फोटाच्या प्राथमिक तपासण्यांमध्ये ज्या गोष्टी निष्प झाल्या त्यापासून ही तपास यंत्रणाच अचानक फारकत घेऊ लागल्याचे दिसून येते. या सर्व प्रकरणांमध्ये "इंडियन मुजाहिद्दीन' व सफदर नागौरीसार"या लोकांना अटकही झाली आहे. "समझौता स्फोट'प्रकरणी तर सरकारने पाकिस्तान व अमेरिकेला पुरावेदेखील सादर केले आहेत. आता या साऱ्या प्रकरणांच्या भोवती संशयाचे निराळे वातावरण उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू दहशतवाद ही संकल्पना कॉंग्रेसला काही करून रुजवायची आहे. जेणे करून जिहादी दहशतवादाच्या विरोधात हळूहळू लोकांमध्ये निर्माण होणारा जनक्षोभ जर का उद्या उसळला तर त्याविरोधात हिंदू दहशतवादाचे शस्त्र वापरता येईल, असा हा कॉग्रेसी डाव आहे.