रशियात पुतिनविरोधी बातम्या येत असतानाच अचानक एका नव्या वादाला सुरुवात झाली. रशियामधील एका स्थानिक न्यायालयात एका माथेफिरू व्यक्तिने भगवद्गीता हे हिंसक साहित्य असल्याने गीतेवर रशियामध्ये बंदी घालावी अशी मागणी केली. याबाबतची सुनावणी संपून निर्णयाची वेळ जसजशी जवळ आली तसा भारतातल्या प्रसारमाध्यमांनी हा विषय तापवायला सुरुवात केली. लोकपाल बिलावरून सरकार आधीच अडचणीत असताना ऐनवेळी हा विषयदेखील चर्चेला आला. श्री श्री रविशंकर यांनी गीतेला राष्ट्रीय गं्र्रथ म्हणून जाहीर करावे अशी मागणी केली आहे. सरकारने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह धरतानाच मुलायम सिंग यादव, लालू यादव ही मंडळी अत्यंत आक्रमकपणे सरकारला प्रश्न विचारू लागली. खरे तर भगवद्गीता, रामायण, राम मंदिर असे विषय आले की ही मंडळी सदैव काँग्रेसच्या सूरात सूर मिसळून सेक्युलॅरिझमचे पोवाडे गाऊ लागतात. मात्र इथे मामला थोडा निराळा आहे. भगवान कृष्ण हा यादव, म्हणजेच लालू आणि मुलायम ज्यांच्या मतांवर लोकसभेत पोहोचले आहेत त्या जातीचा. त्यामुळे या मंडळींना भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानापेक्षा आपल्या जातीच्या मतांचीच चिंता अधिक.
काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश सरकारने शालेय अभ्यासक्रमात नैतिक शिक्षणाच्या विषयात भगवद्गीता शिकवण्याचा प्रस्ताव आणला होता. साऱ्या विश्वाला तत्त्वज्ञानाचे सार सांगणाऱ्या गीतेची शिकवण अभ्यासक्रमात आणण्याच्या निर्णयात खरे तर काहीच गैर नव्हते. मात्र इथेही काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा दिसला होता. काँग्रेसी पंडित व विचारवंतांनी केवळ मध्य प्रदेश सरकार करीत आहे म्हणून या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. भगवद्गीतेशी संबंधित या घटना पाहिल्या की, भारताशी संबंधित असलेल्या जातीय, धार्मिक आणि राष्ट्रीय या तिन्ही विषयांचा तपशीलवार विचार व चर्चा होणे आवश्यक आहे हे जाणवते. भारताची एकंदरीत जडणघडण ही सांस्कृतिक आहे. हिंदू नावाची संस्कृती, धर्म म्हणून नव्हे तर एक सुसंस्कृत व सहिष्णु जीवनशैली म्हणून जगभर पसरली. हिंदू संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी तिच्या पाईकांना लढाया, फसवणुकीतून किंवा बळजबरीने केलेली धर्मांतरणे अशा बाबींची गरज भासली नाही. आपल्या सांस्कृतिक संचिताच्या आधारावर व सर्वसमावेशक स्वभावामुळे हिंदू संस्कृतीचा प्रभाव जगभर निर्माण झाला. या घटकांमुळेच अर्वाचीन काळापासून राष्ट्र म्हणून भारताचे एक स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व निर्माण झाले आहे. भारताची धार्मिक आधारावर फाळणी होऊन पाकिस्तान, बांगलादेश यांची निर्मिती झाली, एकेकाळी आशियावर असलेला हिंदू संस्कृ तीचा अंमल कमी होऊनही आजही भारताचे ते सांस्कृ तिक व्यक्तिमत्त्व कायम आहे. कधी शंकराचार्य कधी विवेकानंद या आणि अशा अनेक विचारवंतांनी भारताच्या सांस्कृतिक दूताची भूमिका जगभर फिरून पार पाडली. अगदी आजच्या काळात बोलायचे तर इस्कॉन, श्री श्री रविशंकर, रामदेव बाबा व अन्य अनेक मंडळी याच सांस्कृतिक संचिताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. गांधी, नेहरू, टिळकच नव्हे तर अनेक परदेशी विचारवंतांनीसुध्दा भारताच्या या वेगळेपणावर भाष्य केले आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींनासुध्दा अपवादात्मक प्रसंगी का होईना याच आशयाचे विचार काँग्रेसच्या अधिवेशनात मांडावे लागले होते. 16 जानेवारी 1999 रोजी, 24 अकबर रोड या ठिकाणी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीने आपल्या बैठकीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक ठराव संमत केला होता. सेक्युलॅरिझम म्हणजे काय हे सांगताना सोनिया म्हणतात, 'हिंदूंमुळे भारत सेक्युलर आहे. 'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति' या तत्त्वानुसार व या तत्त्वज्ञानामुळेच ही जीवनपध्दती विकसित झाली आहे.' सोनियाजींच्या तोंडून ही वाक्ये ऐकून थोडेसे आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. काँग्रेसलासुध्दा या वास्तवालाच अधोरेखित करावे लागले होते.
बाळासाहेब देवरस म्हणत त्याप्रमाणे, भारतातील लोकशाही व सेक्युलॅरिझम यांसारखी मूल्ये जर टिकायची असतील तर हिंदू संघटन गरजेचे आहे. या एकमेकांना पूरक व आवश्यक गोष्टी आहेत. हिंदू या संकल्पनेचे तीन भाग आहेत. जातिभेद, जन्माधारित चातुरर््वण्य व त्यातून जन्मणारी सामाजिक व सांस्कृतिक भिन्नता. ही भिन्नताच एकेकाळी हिंदू समाजाचा अविभाज्य घटक होती. पण त्यातून हिंदू समाज बाहेर पडला. विविध धार्मिक कर्मकांड हेही हिंदू धर्माचे अंग होते आणि त्याचे अवडंबरही मोठया प्रमाणावर माजलेले आपण पाहिले. हे अवडंबर माजण्याचे खरे कारण म्हणजे हिंदू विचार व संस्कृतीची व्यापक जीवनदृष्टी समजावून देण्याचे कोणतेही प्रयत्न शालेय, महाविद्यालयीन अथवा शासकीय स्तरावरून झाले नाहीत. वस्तुत: हे राष्ट्रीय कार्य आहे, धार्मिक नाही. गीतेसारख्या ग्रंथांच्या माध्यमातून हिंदू तत्त्वज्ञान जसजसे समजत जाईल तसतसा हिंदू धर्मातला अवडंबराचा भाग कमी होत जाईल. ज्ञानेश्वरीने हेच तत्त्वज्ञान वारकऱ्यांमध्ये रुजविले. कोणतेही अवडंबर न माजविता ईश्वरभक्तीचा आणि जीवन जगण्याचा सन्मार्ग ज्ञानेश्वरीने वारकऱ्यांना दाखविला. इतके लोक एकत्र येऊनही गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचे समाजमन प्रभावित करीत वारी अव्याहतपणे चालू आहे. वारी हे हिंदू तत्त्वज्ञानाचे एक कृतीरूप मानावे लागेल. वास्तविक हा गीतेच्या तत्त्वज्ञानाचा आविष्कार आहे. तथाकथित विचारवंत आणि सेक्युलॅरिस्ट यांचा ज्या प्रकारचा जाच आज गीतेचे समर्थन करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे, तसाच जाच ज्ञानेश्वरांनाही सहन करावा लागला होता. अशा मंडळींना विचारांनी गोष्टी समजावून सांगणे शक्य नसते. अशावेळी चमत्कारच कामी येतात. आपल्या विद्वत्तेच्या आधारावर ज्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचे अमृत सोप्या आणि रसाळ भाषेत सर्वसामान्यांपर्यंत आणून पोहोचविले. त्या ज्ञानेश्वरांनासुध्दा भिंत चालविणे, रेडयामुखी वेद वदविणे असे चमत्कार दाखवावे लागले होते. गीतेच्या समर्थनार्थ जगभरातून उभा राहणारा जनसमर्थनाचा चमत्कारच गीतेला विरोध करणाऱ्यांना गप्प करू शकेल.
|