पर्यटन... अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत उच्चभ्रूपर्यंत मर्यादित असलेली ही हौस आता अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. पूर्वीच्या काळी तुलनेने मोठं कुटुंब आणि या कुटुंबाची आर्थिक गरज भागवू शकेल अशी तुटपुंजी आर्थिक मिळकत यामुळे पर्यटन म्हणजे निवृत्तीनंतर करायची हौस असाच बहुतेकांचा दृष्टिकोन असे...एखादा आप्त-मित्र सहकुटुंब दूरवरचा प्रवास करून आला की या मंडळींचे अनुभव ऐकणं हीदेखील एक पर्वणी असे.
"केल्याने देशाटन, पंडीत मैत्री, सभेत संचार
मनुजा चातुर्य येतसे फार'
माणूस जाणता, प्रगल्भ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ते सांगणाऱ्या या काव्यपंक्ती. त्यात सुचविलेल्या नंतरच्या दोन गोष्टींशी मराठी मध्यमवर्गीय माणसाची ओळख होती, पण "शहाणं' होण्यासाठी पर्यटन करायचं हे आतापर्यंत त्याच्या आर्थिक आवाक्याबाहेरचं काम होतं. शिवाय प्रवासाला निघायचं ते सहकुटुंब सहपरिवार...जोडीने किंवा मोजक्याच माणसांनी नाही, हेही मनात पक्कं असे. आपल्या कुटुंबवत्सलतेचाच तो एक आविष्कार होता.
मात्र काळाच्या ओघात समाजात बरेच बदल झाले. कुटुंबांचा संकोच झाला, आय.टी.सारख्या गलेलठ्ठ पगारांच्या नोकऱ्यांमुळे सुशिक्षित मध्यमवर्गीय माणसाच्या खिशात अगदी तरुण वयातच मनाजोगता पैसा खेळू लागला. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने जग जवळ यायला लागलं. त्यामुळे आताआतापर्यंत खूप लांबचा अन् वेळखाऊ वाटणारा प्रवास आता सहज-सोपा वाटू लागला. हातात असलेल्या पैशामुळे फिरावं, जग पहावं अशी सत्यात येऊ शकणारी स्वप्नं तो पाहू लागला. "फिरायचं ते सहकुटुंब सहपरिवार' हा विचारही काळानुरूप बदलला. आपलं छोटंसं कुटुंब घेऊन किंवा जमल्यास दोघांनीच फिरावं आणि मुलांना एखाद्या ट्रॅव्हल कंपनीबरोबर स्वतंत्रपणे पाठवावं इथपर्यंत विचारात बदल झाला. बदललेल्या परिस्थितीत तो स्वाभाविकही होता.
मात्र हाताशी मनाजोगता पैसा येतानाच एक गोष्ट मात्र हिरावून घेतली गेली, ती म्हणजे वेळ. पूर्वी पैसा दुर्मिळ होता, आता "फावला वेळ' हीच दुर्मिळ गोष्ट होऊन बसली. कामाचा व्याप आणि कामाचे तास इतके वाढले की विश्रांतीसाठी किंवा कुटुंबियांबरोबर चार घटका निवांतपणे घालविण्यासाठीही वेळ काढणे अवघड होऊन बसलं. सलग आठ-पंधरा दिवस सुट्टी मिळणं ही केवळ अवघडच नाही तर अशक्यच गोष्ट वाटायला लागली... अतिशयोक्त खरं, पण आजच्या तरुणाईचं तर हेच वास्तव आहे.
अतिशय ताणलेल्या अशा या वेळापत्रकामुळे लोक सुट्टीची किती आतुरतेने वाट पाहत असतात, याचं चित्रण करणारं एक अतिशय सुंदर क्लिपिंग मध्यंतरी इंटरनेटवर पाहिलं होतं. संध्याकाळच्या रम्य वेळी विस्तीर्ण अशा समुद्रकिनाऱ्यावरून अतिशय आनंदाने बागडत, टुण टुण उड्या मारत आपल्या घराच्या दिशेने चाललेला पेंग्विनचा समूह सुरुवातीला दिसतो... त्याचा अर्थ काय असा विचार करत असतानाच एक वाक्य दिसतं.. Monday again….. .. या वाक्यानंतर, "विकेंड संस्कृती' अंगवळणी पडलेल्यांना यावर अधिक स्पष्टीकरणाची गरजच भासत नाही. ते आनंदी पेंग्विन म्हणजे आपलं प्रतिरुप आहे, हे पाहणाऱ्याच्या लगेच लक्षात येतं आणि चेहऱ्यावर हसू पसरतं...पण खरी गंमत तर पुढच्या काही सेकंदातच त्या छोट्या पडद्यावर अवतरते. कोवळ्या उन्हाने सोनेरी झालेला समुद्रकिनारा आणि इतक्या प्रस सकाळीही पाय ओढत, अगदी सरपटत पुढे सरकणारे कंटाळवाण्या चेहऱ्याचे पेंग्विन्स दिसतात...आपण काही तर्क करण्याआधीच वाक्य येतं.. चिविरू रसरळि... या वाक्यानंतर वेगळं काही बोलायची गरजच राहात नाही..क्लीप पाहणाऱ्याला त्या पेंग्विनच्या कंटाळवाण्या चेहऱ्यात आपला चेहरा दिसायला लागतो...आणि आधीपेक्षाही जास्त हसू फुटतं.
क्लीप गंमतीची खरी, पण आजच्या अतिव्यस्त अशा जीवनशैलीवर अतिशय मार्मिक भाष्य करणारी आहे आणि म्हणून आनंद देतानाच ती अंतर्मुखही करते. अर्थात या धावपळीच्या रूटीनवरही लोकांनी एक चांगला पर्याय शोधून काढला तो "विकेंड टूरिझम'चा. काही वर्षांपूर्वीपर्यंत पाश्र्चात्यांचं "फॅड' समजली गेलेली ही संकल्पना आज आपल्याकडच्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय वर्गाची गरज होऊन बसली आहे.... सोमवार ते शुक"वार घड्याळाच्या काट्यावर चालणारी आजची पिढी शनिवार-रविवार या जोडसुट्टीकडे डोळे लावून असते...शरीर-मनाला सुखावणारी, नवा उत्साह बहाल करणारी सुट्टी जास्तीत जास्त "सत्कारणी' लावण्याकडे त्यांचा कल असतो आणि अशा "डेस्टीनेशन'च्या ते शोधात असतात..."विकेंड टुरिझम'मुळे पर्यटन ही मोठ्या सुट्ट्यांमध्ये करायची चैन राहिली नसून, पर्यटन हा बारमाही ऋतू झाला आहे. अनेक ट्रॅव्हल कंपन्याही आजच्या ग"ाहकाची गरज लक्षात घेऊन त्याला "टूर डिझाईन' करून देतात. हाच विचार करून आमच्या वाचकांसाठी विशेषांक घेऊन आलो आहोत. मात्र फिरण्याचा आनंद मिळवत असतानाच हे फिरणं आपल्याला अनुभवसमृद्ध, विचारसमृद्ध कसं करेल याचा विचार करून काही पर्यटन स्थळं सुचविली आहेत.
आपलं दोन दिवसांचं पर्यटन अधिक आनंददायी, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक अनुभवसमृद्ध करण्यास हा विशेषांक मदत करो हीच अपेक्षा!
|