.
 
ताजा अंक

साठमारीचा दुसरा अंक
२२ मे २०११



संपादकीय
एक पाऊल पुढचे

शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची चर्चा जानेवारी 2011 पासून सुरू झाली. रामदास आठवले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला 25 जानेवारी रोजी गेले होते. म्हणायला ही सदिच्छा भेट होती, परंतु या भेटीत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचा विषय काढला. या विषयावर दलित समाजात गेले पाच महिने भरपूर चर्चा झाली. सम"ाट, लोकनायक इत्यादी वृत्तपत्रांतून दलित समाजातील सर्वांनी आपापली मते व्यक्त केली. सर्वसाधारणपणे बहुतेकांचे मत शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती व्हावी असे होते. समाजामध्ये अशा प्रकारची चर्चा घडवून आणण्याचे श्रेय रामदास आठवले यांना द्यायला पाहिजे. युतीचा निर्णय करून त्यांनी तो दलित समाजावर लादला नाही. आपल्या अनुयायांना त्यांनी विश्वासात घेतले. त्यांचे विचार जाणून घेतले आणि युतीला सर्वांची अनुकूलता आहे हे लक्षात आल्यानंतर, आघाडी सरकारविरुद्धच्या आंदोलनाकरिता 12 मे रोजी शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा केली. दलितांतील सर्व नेते या निर्णयाच्या बाजूने आहेत असे म्हणण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपली वेगळी चूल मांडलेली आहे. तथापी दलित जनता मात्र बहुसं"येने रामदास आठवले यांच्या मागे उभी आहे. जनप्रवाहाविरुद्ध कोणत्याही नेत्याला जात येत नाही असे असल्याने अन्य दलित नेतेदेखील युतीच्या बाजूने होण्यास फारशी अडचण येईल असे वाटत नाही.
औरंगाबाद येथे प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत गोपीनाथ मुंडे यांनी देखील शिवसेना-भाजपा युतीने आणखी मित्रपक्ष जोडण्याचा पुरस्कार केला होता. त्यांनी "मनसे'लाही सोबत घेण्याचे सूतोवाच केले होते. सध्या मनसे, शिवशक्ती-भीमशक्ती युतीत नाही. शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीने महाराष्ट्रात महाशक्तीचा उदय झालेला आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे वारे पहाता मनसेला देखील आज ना उद्या या युतीचा विचार करावा लागेल.
शिवशक्ती आणि भीमशक्ती युती आंदोलनापुरती होत असली तरी त्यापुढेही ही युती राहावी. युतीचा विषय नवीन नाही. अनेक वर्षे युतीचे आवाहन शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी केलेले आहे. तेव्हा युती झाली नाही आणि ती आताच का होत आहे याच्या कारणांचादेखील विचार केला पाहिजे. "कॉंग"ेस हे जळते घर आहे, त्यात सामील होऊ नका, आपली झोपडी शाबूत ठेवा' असे डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेले असले तरी वेगवेगळ्या मोहांना बळी पडून अनेक दलित नेते कॉंग्रेसबरोबर गेले. त्यांना सत्तेची पदे मिळाली आणि सत्तेचे लाभही मिळाले. यामुळे "शासनकर्ती जमात बना' हे डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात आले नाही. दलितांवरील अन्याय अत्याचारांच्या घटना कमी झाल्या नाहीत. खैरलांजीसारखी प्रकरणे घडत राहिली. समाज परिवर्तनासाठी सत्ता परिवर्तन आवश्यक आहे आणि सत्ता परिवर्तन दलित, शोषित, पिडीत, वंचित वर्गाच्या एकजुटीतूनच झाले पाहिजे असा डॉ. बाबासाहेबांचा विचार होता. तो विचार फक्त कागदावरच राहिला. "हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे,' असे भोळ्याभाबड्या लोकांना चकविणारी वाक्ये वारंवार उच्चारून कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची प्रतिकृती राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी महाराष्ट्रात सत्ता उपभोगली. जातवादी आणि जातीय राजकारण केले. दीनदुबळ्या गरीब लोकांना छळण्याचे आणि पिडण्याचे राजकारण केले. त्यांच्याच राजवटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले, महागाई आकाशाला भिडली, शिक्षणांचे बाजारीकरण झाले, अत्यंत कष्टाने शिकलेल्या वंचित वर्गातील तरुणांना नोकऱ्या नाहीत, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहेच. ग्रामीण भागात 14-15 तास वीज गायब असते. फुले, शाहू आणि आंबेडकरांना असले राज्य अपेक्षित नव्हते. महाराष्ट्रात एकाच जातीच्या मंडळींनी सत्तेवर मक्तेदारी मिळवली आहे. या जमातीतील लोक शिक्षण सम्राट आहेत, साखर सम्राट आहेत आणि भ्रष्टाचार सम्राट आहेत. फुले, शाहू, आंबेडकरांचे सतत नाव घेऊन आणि त्यांची जपमाळ ओढून आपल्याला ठकविण्यात आले आहे हे सामान्य माणसाच्या लक्षात येऊ लागले आहे. म्हणून अशा लबाड लोकांची साथ सोडून शिवशक्तीचा अनुभव घेण्याचे रामदास आठवले आणि त्यांना समर्थन देणाऱ्या जनतेने ठरविले आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीकडे सर्व समाजाचे फार बारकाईने लक्ष राहिल. सर्व समाजाची या युतीला अनुकूलता आहे, सर्व सामान्य माणसाला मनापासून परिवर्तन हवे आहे. या जनतेच्या विश्वासाची दखल तिन्ही नेत्यांनी घ्यायला पाहिजे.
शिवशक्तीचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि भाजपावर दलित जनतेने विश्वास टाकला आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही यांची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कुणी काही म्हणत असले तरी राजकारणातील युती राजकीय फायद्यासाठीच केली जाते. राजकारणाची ती वास्तविकता असते. राजकीय कोंडी फोडण्याच्या दृष्टीने या युतीचा उपयोग होईल. तसाच महाराष्ट्रातील सामाजिक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने या युतीचा उपयोग होईल. दलित जनतेने विश्वास टाकला आहे याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आज दलित-वंचित वर्गातील जनतेला राष्ट्रजीवनाच्या सर्व अंगात सहभागिता हवी आहे. बरोबरीचे स्थान हवे आहे. त्यांना कुणाची दया नको आहे. सहानुभूती नको आहे. कॉंग"ेस आणि राष्ट्रवादीने दलितांशी युती करून फक्त त्यांचा वापर केला. दयेची भीक त्यांच्या पदरात टाकली. शिवसेना आणि भाजपा नेत्यांची मनोभूमिका दलितांचा वापर करण्याची नसावी. हे आपल्या समाजाचे अंग आहेत. आपले बांधव आहेत असे मानून व्यवहार करावा लागेल. युतीची कसोटी जागा वाटपाच्या प्रश्नावर होईल. तेव्हा शिवसेना आणि भाजपा नेत्यांना मन मोठे करावे लागेल. लवचिकता ठेवावी लागेल आणि सामाजिक न्यायाची भूमिका घ्यावी लागेल. हे लिहिणे सोपे आहे प्रत्यक्षात आणणे अवघड काम आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रबोधन करावे लागेल. सर्व समाजाची राष्ट्रीय एकजूट करून सर्व समाजात समान राजकीय आकांक्षा, समान सामाजिक आकांक्षा निर्माण करणे ही या काळाची सर्वात मोठी गरज आहे. या गरजेच्या पूर्तीच्या दिशेने शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणे हे एक पाऊल आहे असे आमचे मत आहे.