खोटे बोला पण रेटून बोला, या सूत्राचा वापर करण्यात कॉंग्रेसच पक्षाचा हात कुणीच धरू शकत नाही. प्रकरण कुठलेही असो, भरपूर खोटे बोलायचे आणि वेळ मारून न्यायची, या तंत्रात कॉंग्रेसला गेल्या 60 वर्षात जणू कौशल्यच प्राप्त झाले आहे. भोपाळ विषारी वायू दुर्घटनेबाबत अर्जुनसिंहांनी नुकतेच आपले मौन सोडले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना "मौत का सौदागर' असे संबोधणाऱ्या कॉंग्रेसची भोेपाळ दुर्घटनेबाबत बाहेर आलेल्या माहितीमुळे गोची झाली आहे. केंद्रात राजीव गांधीच्या नेतृत्वाखालील सरकार असताना झालेली ही दुर्घटना व त्यानंतर 25 वर्षानंतरही न्यायापासून वंचितच राहिलेली दुर्घटनाग्रस्त जनता यामुळे कॉंग्रेसचा भ्रष्ट चेहरा लोकांसमोर आला आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांना मात्र त्याचे काहीच वाटत नाही. राजीव गांधी यांना भोेपाळ वायुगळती दुर्घटनेच्या पापापासून कसे दूर ठेवता येईल, यासाठीची सगळी धावपळ कॉंग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी चालविली आहे. राज्यसभेत नुकत्याच झालेल्या चर्चेच्या निमित्ताने "मौनीबाबा' अर्जुनसिंहांनी जे तारे तोडले ते केवळ त्यांच्या खोटेपणाची साक्ष देणारे ठरले आहेत. आपल्या निवेदनात अजुर्नसिंग यांनी म्हटले आहे की, राजीव गांधी यांना या घटनेने खूप धक्का बसला होता. दुर्घटनेनंतर चाललेल्या मदतकार्याबाबत दररोज अहवाल कळविण्यास त्यांनी आपल्याला सांगितले होते. या दुर्घटनेमुळे व्यथित होऊन मी राजीनामा देण्याची तयारीसुद्दा दाखविली होती; परंतु राजीव गांधीयांनी ती मान्य केली नाही, हे सांगायलासुद्धा अजुर्नसिंह विसरले नाहीत. अर्जुनसिंहाचे वय आज 80 आहे. 1996 नंतर झालेल्या कुठल्याही लोकसभा निवडणुकीत ते जिंकू शकलेले नाहीत. राज्यसभेच्या माध्यमातून ते दिल्लीत पोहोचले आहेत. शरीर साथ देत नसल्याने त्यांचे मंत्रीपदही गेले आहे. तरीसुद्धा अजुर्र्नसिंह यांना पुन्हा राज्यसभेत जाण्याचा मोह आवरता आला नाही. अशा अर्जुनसिंहांनी राजीनामा दिला होता आणि तो स्वीकारला गेला नाही. अशा अर्जुनसिंहांच्या या वक्तव्यावर विश्र्वास ठेवणे अशक्य आहे. "ऑल इंडिया इंदिरा कॉंग्रेस' हा अजुर्नसिंहांचा फसलेला प्रयोग ज्यांना माहीत आहे ती मंडळी सत्तालोलुप अजुर्नसिंहांच्या राजीनाम्याच्या विधानावर कधीच विश्र्वास ठेवणार नाहीत. आपल्या विधानात अर्जुनसिहांनी बरेचसे तारे तोडले आहेत. ते म्हणतात, ऍण्डरसनच्या उद्धटपणामुळे मी चक्रावून गेलो. माझ्याच आदेशनुसार ऍण्डरसनला अटक करायला गेलेल्या अधिकाऱ्यांना त्याने विचारले की, "मला घ्यायला मुख्यमंत्री का आले नाहीत?' इतकी मोठी दुर्घटना होऊन ऍण्डरसन जर खरेच इतका उद्धट वागला असेल तर दिल्लीत त्याचे हात कोठपर्यंत पोहोचले होते याचा अंदाज येऊ शकतो. शेवटी अर्जुनसिंहानी अप्रत्यक्षपणे तत्कालिन गृहमंत्री नरसिंहराव यांच्यावर झालेल्या गोष्टींचे खापर फोडले. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची मात्र समाधानकारक उत्तरे त्यांना देता आली नाही. राजीव गांधी यांना सर्व गोष्टी माहीत होत्या तर पंतप्रधानांचा विरोध असताना गृहमंत्र्यांच्या मूक संमतीने ऍण्डरसनला देशाबाहेर जाऊ कसे दिले गेले? हा विरोधी पक्षाचा मुख्य प्रश्न होता.
खरे तर अर्जुनसिहांचे स्पष्टीकरण अनेक प्रश्नच उपस्थित करून गेले. आपल्या अधिकाऱ्यांनी ऍण्डरसनला जामीन कसा मिळवून दिला? सरकारी विमानातून ऍण्डरसन कसा निघून गेला? मी राजीव गांधींना सगळ्या प्रकाराची कल्पना दिली तेव्हा त्यांनी ऍण्डरसनबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे राजीव गांधी यांना ऍण्डरसन प्रकरणी दोषी मानता येणार नाही, असा दावा अर्जुनसिंगांनी केला.
दुसरीकडे, सध्याचे गृहमंत्री पी. चिदंमबरम यांनी तर लोकसभेत भोपाळ दुर्घटनेबद्दल एखाद्या महान संताप्रमाणे पवित्रा घेतला. आपल्या निवेदनात गृहमंत्री म्हणाले की, भोपाळ दुर्घटनेबाबत आपण सगळेच दोषी आहोत. जे झाले. ते झाले आता वेळ चुका सुधारण्याची आहे. भोपाळ दुर्घटनेतून पोळून निघालेल्यांची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. कॉंग्रेसच्या या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिका किती हास्यास्पद आहेत हे आपल्या लक्षात येईल. कुठल्याही मुद्द्याचे राजकीयीकरण कसे करायचे, हे आपण कॉंग्रेसकडून शिकले पाहिजे.
या दोन्ही नेत्यांची अगतिकता जगजाहीर आहे. कारण या घटनेसंदर्भात राजीव गांधीच आरोपीच्या पिंजऱ्यात सापडले आहेत. ज्या राजीव गांधीयांना इतके दिवस देशासाठी शहीद झालेल्या इंदिरा गांधी यांचा सुपुत्र म्हणून गौरविले त्याच राजीव गांधींना आज कॉंग्रेस भोपाळ दुर्घटनेला जबाबदार कसे मानणार? उरले नरसिंहराव. नरसिंहराव जिवंत असतानाच त्यांचा कसा पाणउतारा झाला ते साऱ्या जगाला ठाऊक आहे. राव परिवारातले कुणीही त्यांनंतर कॉंग्रेसच्या राजकारणात पडले नाही. त्यामुळे राव यांच्या माथ्यावर सारे खापर फोडून मोकळे होणे सोयीचे आहे. कॉंग्रेसपक्षामधला सत्तासंघर्ष नेहमी क्रमांक दोन वर कोण असेल यासाठी असतो. कारण क्रमांक 1 ची जागा गांधी-नेहरू परिवारातील व्यक्तीसाठी राखीव असते. या परिवारांशिवाय देश चालूच शकत नाही. असे कॉंग्रेसलाच नव्हे; तर या देशातील अनेक बुद्धिवंताना वाटते. त्यामुळे क्रमांक दोनवर येण्यासाठी क्रमांक 1 वर असलेल्या गांधी परिवारातील प्रत्येकाचा असा आंधळा-पांगळा बचाव करणे कॉंग्रेसजनांचे परमकर्तव्य आहे. त्यामुळे मुद्दा बोफोर्सचा असो किंवा भोपाळचा, राजीव गांधी त्यात दोषी असूच शकत नाहीत.
|