अष्टपादी पॉल व स्पेन हे फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेचे दोन विजेते आहेत. चांगल्या खेळाबद्दल व युरोपियन चषक जिंकण्याची कामगिरी करणार्या स्पेनला आजवर फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा कधी भावली नाही. या स्पर्धेत प्रथमच स्पेनचा संघ अंतिम फेरीत पोचला एवढेच नव्हे तर त्या संघाने विश्वचषकही जिंकला. भल्या भल्या क‘ीडातज्ज्ञांनीही जे भाकीत केले नव्हते, ते बिचारे प्रत्येक स्पर्धेतील नेहमीचे चर्चेतील कलाकार, ब‘ाझील, अर्जेंटिना, जर्मनी, इटली अगदी फ‘ान्स, इंग्लंड यांची चर्चा करीत राहिले व ब‘ाझील व अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामन्यांची स्वप्ने पाहत राहिले. फुटबॉलच्या जागतिक क‘मवारीत दुसर्या क‘मांकावर असलेल्या स्पेनला या चर्चेत कोणी गिनतही नव्हते. त्यातच पहिल्याच सामन्यात स्वित्झर्लंडकडून पराभूत झालेल्या स्पेनने बादफेरी गाठली तरी खूप झाले असेच त्यांचे मत होते. पण याचवेळी जर्मनीमधल्या पॉल नावाच्या ऑक्टोपसला मात्र या स्पर्धेत काय घडणार याचा शंभर टक्के बरोबर अंदाज होता. शेकडो क‘ीडातज्ज्ञ, हजारो कॉम्प्युटर्स, त्यांचे अंदाज व्यक्त करण्याचे विविध फॉर्म्युले, जगभरात पसरलेले लाखोे सट्टेबाज यांना जो अंदाज आला नाही तो आपल्या आठ पायांनी डोके खाजवणार्या ऑक्टोपसला मात्र आला. त्यानंतर मात्र ऑक्टोपसची ही अक्कल पायातली की डोक्यातली यावर जगभर स्वत:ला तज्ज्ञ म्हणवणार्यांची डोकेफोड चालू आहे. (या ऑक्टोपसने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आजीवन आचार्य स्वामी नरेंद्र महाराज दाभोळकर यांनाही एक नवी डोकेदुखी दिली आहे.)
पुण्यातल्या वेधशाळेच्या कार्यालयाचे नाव सिमला ऑफिस आहे. पुण्यातल्या कार्यालयाचे नाव सिमला ऑफिस म्हणून कसे पडले याची कथा सांगितली जाते. सिमल्यामधल्या एका इंग‘ज अधिकार्याने आपल्या घरी संध्याकाळच्या वेळी मोठा मेजवानीचा बेत आखला होता. असे म्हणतात की त्याच्या बग्गीच्या चालकाने त्याला म्हटले की माझ्या शेजारी राहणार्या कुंभाराला मी मेजवानीबद्दल बोललो असताना तो म्हणाला की आज संध्याकाळी मोठा पाऊस पडणार आहे तेव्हा तुझ्या साहेबांची मेजवानी कशी होणार? त्यावेळी स्वच्छ सूर्यप्रकाश होता. त्या इंग‘ज अधिकार्याने लगेच तेथील वेधशाळेला फोन लावला तेव्हा वेधशाळेतील अधिकार्यांनी सांगितले, साहेब कोणतीही काळजी करू नका, आज संध्याकाळी पाऊस नक्की पडत नाही. परंतु त्या संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला व त्याची मेजवानी त्यात वाहून गेली. परंतु आपल्या बग्गी चालकाच्या शेजारी राहणार्या कुंभाराने एवढा अंदाज कसा बरोबर सांगितला याबद्दल त्या अधिकार्याला कोडे पडले आणि तो त्या कुंभाराकडे गेला. कुंभार त्याला म्हणाला की माझा मडकी वाळवण्याचा धंदाच पावसाच्या अंदाजावर अवलंबून असल्याने रोज सकाळी मी माझ्या गाढवाला अंदाज विचारतो, त्यांनी आडवी मान हलवली तर पाऊस पडणार नाही, उभी हलवली तर नक्की पडणार व जोरात उभी हलवली तर मुसळधार पडणार हा अंदाज मी बांधतो. शून्याचा व अनेक कितीतरी शोध प्रथम भारतात लागले तसा पॉलचा आद्यपिताही भारतातीलच.
हे ऐकल्यानंतर संतापलेल्या त्या इंग‘ज अधिकार्याने एखाद्या गुन्हेगाराला काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी त्याप्रमाणे सिमला ऑफिसची पुण्याला रवानगी केली. पुणेरी टोमणे ऐकून तरी त्या कार्यालयात सुधारणा होईल अशी त्याला भाबडी आशा वाटली असावी, पण ते खातेही पुणेकरांच्या वरचढ निघाले व इंग‘जकाळच्या अनेक खात्यांच्या कामाची आपण स्वातंत्र्यानंतर वाट लावली असली तरी हवामान खात्याची मात्र उलटा अंदाज व्यक्त करण्याची परंपरा आपण प्रामाणिकपणे जपली आहे.
मानवी बुद्धीवर अहंकाराधिष्ठित विज्ञानबुद्धीने प्रभाव गाजवण्यापूर्वी, परमेश्वराने आपल्याप्रमाणेच जगातील सर्व प्राणिमात्र, वनस्पती यांना शहाणपण व जाणिवा कमी-जास्त प्रमाणात वाटल्या आहेत यावर माणसाचा विश्वास होता व त्यामुळे घरातील पालीच्या चुकचुकण्यापासून घराबाहेरच्या कावळ्याच्या कावकावीपर्यंत परिसरातील प्रत्येक घटनेचा अर्थ लावण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु वैज्ञानिक क‘ांतीनंतर जगातील प्रत्येक सत्य हे प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकते व केवळ मानवी बुद्धीच त्याचे आकलन करू शकते यावरचा त्याचा विश्वास एवढा वाढला की परिसर तर सोडाच, त्याच्या स्वत:मधेच विद्यमान असणार्या व तर्क आणि बुद्धीच्या पलीकडे जाणार्या सहाव्या इंद्रियाची शक्ती त्याला अनोळखी झाली. सर्वेक्षणे, माहिती, विश्लेषणे, निष्कर्ष, तर्कवाद, उपयुक्ततावाद या पलीकडे स्वअनुभूतीचे एक जग अस्तित्वात आहे याचा त्याला विसर पडला. यातून त्याच्या जीवनात व्यवस्थात्मक यांत्रिकता तर आलीच पण त्याहीपेक्षा ज्या गृहितावर निश्चिततेचे अंदाज बांधले होते ती गृहितेच प्रश्नचिन्हे निर्माण करू लागली तेव्हा मानवी सृजनशीलतेने नवी साधने शोधायला सुरुवात केली. आपण ज्यावर प्रेम करावे व त्याने आपल्याशी एकनिष्ठ राहावे अशी माणसे मिळणे अवघड झाले तेव्हा पाळीव प्राणी त्याला अधिक जवळचे वाटू लागले. मानवी बुद्धीच्या सीमिततेची त्याला जाणीव होऊ लागली तेव्हा आपल्या भोवतालच्या परिसरातील प्राणी-वनस्पतींचे शहाणपण त्याचे लक्ष वेधू लागले. तार्किक विश्लेषणाच्या जंगलातील सत्याचा शोध जेव्हा त्याची मृगजळाप्रमाणे फसवणूक करू लागला तेव्हा अनुभूतीचे सत्य त्याला अधिक परिचित वाटू लागले. त्यामुळे पंचतारांकित रुग्णालयासमोरच तसेच पंचतारांकित नाडीपरीक्षा वैद्याचा दवाखानाही उभा राहू लागला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बौद्धिक दादागिरीला तो बळी पडेनासा झाला. जर सूक्ष्मपणाने पाहिले तर पॉल नावाच्या ऑक्टोपसने केवळ एक स्पर्धाच गाजविली नाही तर एका नव्या पर्वाच्या प्रारंभाची भूपाळी म्हटली आहे. ती जाणत्यांना जेवढ्या लवकर समजेल तेवढी त्यातली बुवाबाजी कमी होईल. |