.
 
चालू अंक
साहित्य संमेलन विशेष
२६ डिसेंबर २०१०

संपादकीय
शब्दांचा हा खेळ मांडला...

शब्द... संवादाचं, भाव अभिव्यक्तीचं प्रभावी माध्यम. उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात ज्या टप्प्यावर माणसाला तोंडातून उमटणाऱ्या ध्वनींना अर्थपूर्ण शब्दांचं रूप देता आलं तो टप्पा म्हणजे त्याच्या प्रगतीपथावरचं महत्त्वपूर्ण वळण होतं.या शब्दांनी बोलीभाषांना जन्म दिला. माणसामाणसांमध्ये संवादाचे पूल उभारणाऱ्या बोलीभाषेनं, जन्मदात्या आईएवढा माणसाला लळा लावला... "मायबोली' हा मातृभाषेसाठी असलेला पर्यायी शब्द, व्यक्तीचं त्याच्या भाषेशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं अधोरेखित करतो.
आजच्या पिढीच्या हाती जो भाषेचा समृद्ध वारसा सोपवला गेला आहे त्याचा इथवरचा प्रवास हा विविध रूपात झाला आहे. वेदकाळापासून पिढ्यान् पिढ्या जपलं गेलेलं मौखिक वाङ्मय हे त्याचं अतिप्राचीन रूप... वाङ्मयाचं हे श्राव्य रूप... आणि श्राव्य रूपामुळेच त्याच्या निर्दोष उच्चारणाला अतिशय महत्त्व प्राप्त झालं...शब्दांतून मौखिक भाषेची निर्मिती झाली आणि निर्माण झालेलं वाङ्मय चिरकाल टिकावं या गरजेतून लिपीचा जन्म झाला.लिपीमुळे वाङ्मय लिखित स्वरूपात आणणं शक्य झालं.या लिखित वाङ्मयामुळे, बोलीभाषांपेक्षा वेगळी व्याकरणाच्या चौकटीत बंदिस्त असलेली प्रमाण भाषा अस्तित्वात आली.
प्राचीन काळात भूर्जपत्रावर लिहिलं गेलेलं साहित्य हे लिखित स्वरूपातलं आद्य वाङ्मय...त्यानंतर आलेल्या छपाईच्या तंत्रज्ञानामुळे मर्यादित समूहापर्यंत पोचलेल्या वाङ्मयाचं, त्यातल्या ज्ञानाचं लोकशाहीकरण झालं. ते सर्वांसाठी खुलं झालं. ग"ंथनिर्मितीत वाढ झाली ती याच बदलामुळे. वाङ्मयाचा प्रवाह रुंदावला. दैनिकांसह विविध प्रकारची नियतकालिकं आणि पुस्तकं यांनी माणसाचं विचारविश्र्व, अनुभव विश्र्व समृद्ध केलं. माणसाला प्रगल्भ केलं.
त्यानंतर झंझावातासारखी माणसाच्या आयुष्यात प्रवेशली ती इंटरनेटची मोहमयी दुनिया. या नव्या माध्यमामुळे "हे विश्र्वचि माझे घर' झाल्याचा भास होऊ लागला.मौखिक वाङ्मयापासून सुरू झालेला साहित्य निर्मितीचा प्रवास आज इंटरनेटच्या जाळ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.या नव्या माध्यमानं माणसाला "ब्लॉग'च्या रुपात विचार अभिव्यक्तीचं एक नवं दालन खुलं करुन दिलं आहे.
भावभावनांची अभिव्यक्ती, ज्ञानग"हण आणि अर्थार्जन या तीनही मूलभूत गोष्टींसाठी भाषा ही आधारभूत आहे. काही शतकांपूर्वीपर्यंत मातृभाषेच्या मदतीने माणसाचे जीवन व्यवहार सुरळीत चालू होते. झपाट्याने झालेल्या सामाजिक स्थित्यंतराचा पहिला फटका बसला तो मातृभाषेला... ज्ञानग"हण आणि अर्थार्जन यासाठी परकीय भाषा गरजेची वाटू लागली. मायबोली ही फक्त भाव अभिव्यक्तीचं माध्यम उरली. आणि माणूस मातृभाषेपासून दूर जायला लागला. उदरभरणासाठी हा बदल अत्यावश्यक वाटला..."मराठी असे आमुची मायबोली, परि ती आज राजभाषा नसे' अशी परिस्थिती निर्माण झाली.
अर्थार्जनासाठी मराठी उपयोगाची नाही असा एक चुकीचा समज आहे.मराठी पत्रकारितेबरोबरच मराठीवर उत्तम प्रभुत्व असणाऱ्या लेखकांनाही आज अनेक क्षेत्रात मागणी आहे. नाट्य-चित्रपट-दूरचित्रवाणी मालिकांसारखी क्षेत्रं तर आहेतच; शिवाय अतिशय प्रभावी असं जाहिरातीचं क्षेत्रही आहे.तसंच ज्ञानभाषा म्हणून मराठीला दर्जा मिळवून द्यायचा असेल तर विविध अभ्यासविषयांवर प्रभुत्व असलेल्या आणि मराठीसह किमान एका भाषेवर प्रभुत्व असलेल्या भाषांतरकारांचीही भविष्यात नितांत गरज असणार आहे.अर्थार्जन करता येऊ शकेल याची ही वानगीदाखल उदाहरण झाली.यात भरही घालता येईल
साहित्य संमेलन म्हणजे मराठी माणसाच्या उत्सवप्रिय मानसिकतेचा उदात्त अविष्कार! ज्या वाङ्मयाने माणसाला समृद्ध केलं, त्या वाङ्मयाबद्दलची आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे साहित्य संमेलन. वाङ्मयनिर्मिती जगभर होत असते, पण भाषेचा उत्सव साजरा होण्याचं भाग्य फक्त मराठीचं. सर्जनशील, प्रतिभावंत लेखक, विविध साहित्यकृती आणि संवेदनशील, सुजाण वाचक या त्रयीची भेट होण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे साहित्य संमेलन. असं संमेलन भरवण्याची अनोखी कल्पना शतकापूर्वी ज्यांना सुचली त्यांना सलाम करायला हवा. या संमेलनांनी वाचक - लेखकांमध्ये अकृत्रिम जिव्हाळा निर्माण केला, नातं निर्माण केलं. ग्रंथव्यवहारामध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या दोन्ही घटकांमध्ये विचारांचं आदान प्रदान होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ संमेलनाच्या रुपात तयार झालं...
संमेलनासारखा अनोखा उत्सव आयोजित करुन ज्या मातृभाषेचं आपण कौतुक करतो, त्या भाषेला ज्ञानभाषेचा, व्यवहारभाषेचा दर्जा पुन्हा आणून देणं हे आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे. संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग एका महत्त्वाच्या विषयावरील विचारमंथनासाठी करण्याची आज गरज आहे.
"साहित्य संमेलन हा एक आनंदोत्सव आहे, असे प्रश्न सोडविण्याचं ते ठिकाण नाही,'असा एक मतप्रवाह आहे...पण संमेलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो साहित्यप्रेमींपुढे, साहित्यिकांपुढे हा विषय मांडण्याची एक संधी आहे... ती साधायला हवी...लगेच या विषयावर तोडगा निघणार नाही, पण त्या दिशेने विचार प्रकि"या सुरू व्हायला तरी मदत होईल.
ठाणे इथं होणाऱ्या 84 व्या साहित्य संमेलनात तरूण वर्ग मोठ्या सं"येने सहभागी होण्यासाठी, जाणीवपूर्वक काही वेगळे संमेलनपूर्व उपक्रम योजले गेले. हे या संमेलनाचं एक वैशिष्ट्य आहे. महाकवी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरनगरीत भरणाऱ्या या संमेलनात भाषेच्या सद्यस्थितीविषयीही विचारमंथन व्हावं इतकीच अपेक्षा!