.
 
चालू अंक
एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा!
२६ सप्टेंबर २०१०
संपादकीय        
युवराजांच्या हट्टासाठी !

काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या समर्थनासाठी राहुल गांधी यांनी कोलकाता येथे पत्रकार परिषद घेतली. ओमरला आपण अजून एक संधी दिली पाहिजे, असा सूर युवराज राहुल यांनी आळविला आहे. काश्मीरमधील फुटीरगटांच्या कारवायांना पायबंद घालण्यात ओमर अब्दुल्ला यांना सपशेल अपयश आल्याचे जगजाहीर आहे. ओमरचे सरकार बरखास्त करून टाकावे अशी मागणीदेखील विरोधी पक्षाने केली आहे. बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. सुरक्षा दल व पोलीस यांना मारहाण करणाऱ्या फुुटीरवाद्यांची छायाचित्रे वर्तमानपत्रात छापून येत आहेत. एका ठिकाणी तर केवळ कमरेवरचे वस्त्र शाबूत ठेवून हाकलून देण्यात आलेल्या पोलिसाचे छायाचित्र छापून आले होते. काश्मीरचे सरकार आणि त्यांना पाठिंबा देणारे राहुल गांधी यांचे केंद्र सरकार यांची अवस्थाही त्या पोलिसांसारखीच झाली आहे. राहुल गांधी जे बोलतील ते कॉंग्रेससाठी "ब्रम्हवाक्य' असणार हे जाहीर आहे. राहुलच काय पण गांधी घराण्यातील प्रत्येक बाळाचे लाड कॉंग्रेसकडून असेच पुरविले गेले आहेत. नेहरूंच्या काळात इंदिरा गांधींचे लाड पुरविले गेले. इंदिरा गांधींच्या काळात संजय व नंतर राजीव गांधी यांचेही असेच लाड पुरविले गेले.
भारत संघराज्य स्थापित करण्यासाठी सरदार पटेलांनी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या तंत्रांचा वापर करून काश्मीर व्यतिरिक्त अन्य संस्थानांचे भविष्यातील सगळेच प्रश्न मोठ्या कौशल्याने सोडवून टाकले. केवळ भूभाग नेहरूंनी आपल्याकडे घेतला आणि तो भारतासाठी आज सतत ठसठसणारा घाव झाला आहे. काश्मीर प्रश्नामुळे कॉंग्रेस चालविणाऱ्या गांधी परिवारातील सदस्यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन वारंवार घडत आले आहे. गांधी-नेहरू घराण्याचा वारसा सांगणारे राहुल गांधी या परंपरेपासून अलिप्त कसे राहू शकतील? ओमर अब्दुल्लांसाठी अभय मागून त्यांनी आपल्या कॉंग्रेसी धोरणाचे दर्शन घडविले आहे. सध्या राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका प्रचारात गुतंले आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांच्या केशपूर येथील एका रॅली दरम्यान मोहद रफिक नावाच्या एका व्यक्तीने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. मोहद यांचे स्वागत स्वत: राहुल गांधी यांनी जाहीरपणे केले. पश्चिम बंगालमधील जुने कार्यकर्ते राहुल यांच्या या कृतीमुळे बरेच नाराज झाले आहेत. मोहदच्या विरोधात खून व तत्सम 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी एका सभेमध्ये अशाच प्रकारे राहुल गांधी यांच्या व्यासपीठावर नक्षलवादी नेते विराजमान झाल्याचे आरोप भाजपाकडून करण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या या कृतीचे कॉंग्रेसकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही.
राहुल गांधी नावाचा मसिहाच आपला देश चालवू शकतो यावर कॉंग्रेस व हाच विचार करणारे बुद्धिवंत हळूहळू ठाम होत चालले आहे. राहुल गांधींनी केलेली प्रत्येक चूक, ही चूक नसून त्याला साक्षात्काराची वलये कशी लावता येतील यामागे कॉंग्रेस लागली आहे. मागे मुंबईत ज्यावेळी राहुल गांधींचा प्रवास झाला त्यावेळी त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का (कॉंग्रेससाठी सुखद) देत लोकलने प्रवास केला होता. लोकलने प्रवास करणे म्हणजे काय दिव्य ते मुंबईकरांनाच माहीत. पण राहुल गांधींनी ते दिव्य पार करून दाखविले. प्रसारमाध्यमांनीही राहुल गांधींचे कौतुक केले. काही ठिकाणी राहुल गांधी महिलांच्या डोक्यावरचे ओझे वाहून नेतात. काही ठिकाणी पाणी भरून देतात. गेल्या पास वर्षांहून अधिक काळ या देशात राहुल गांधी यांच्या पणजोबांनी, आजीने वडिलांनी आणि आईनेसुद्धा याच देशात राज्य केले आहे. पण हे मूलभूत प्रश्न इतके दिवस का सुटू शकले नाहीत याचे उत्तर राहुल गांधीच काय पण त्यांचा कॉंग्रेस पक्षही देणार नाहीत. मुंबईत राहुल गांधींनी लोकल प्रवास केल्यानंतर योगायोगाने मुंबईत लोकलचालकांचा संप झाला होता. लोकलने प्रवास करणाऱ्या मंडळींचे अतोनात हाल झाले. मात्र या संपावर तोडगा काढण्यासाठी आपण मुंबईत पोहचावे, असे राहुल गांधींना मुळीच वाटले नाही. कॉंग्रेस राहुल गांधींना उद्याचा पंतप्रधान बनवू पाहत आहे. लोकशाही व्यवस्थेत असे स्वप्न पाहण्यास कुणाचीही हरकत नसावी. कॉंग्रेसने सत्तेतील आणि पक्षातील निर्णायक पद गांधी घराण्यासाठी राखीव ठेवलेले असल्यामुळे प्रश्नच नाही. परंतु राज्याभिषेकापूर्वी ज्या प्रकारचे  प्रशिक्षण देण्याकरिता या देशाचा जो वापर केला जात आहे, तो मात्र अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधींच्या शिकण्याची किंमत देशाला चुकवायला लागता कामा नये. शाहबानो प्रकरण, भोपाळ विषारी वायू दुर्घटना अशा निर्णायक प्रसंगी राजीव गांधींनी घेतलेले निर्णय देशाच्या मुळावरच उठले होते. मोदींना "मौत का सौदागर' म्हणणाऱ्या सोनियांनी ऍण्डरसन कसा पळाला, हे कधीच देशाला सांगितलेले नाही.
अशांत काश्मीरचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी लष्कराचे मनोबल खच्ची करून कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे का, हे राहुल गांधींनी उघडपणे सांगावे. अब्दुल्ला घराणे वर्षानुवर्षे काश्मीरला गोचिडीसारखे चिकटलेले आहे. आज चाललेले दंगे, निदर्शने हे पोलीस, राज्य राखीव दल विरुद्ध निदर्शनकारी असे आहे. यात लष्कराचा काहीच संबध नाही. आपली अब्रू  वाचविण्यासाठी ओमर अब्दुलांनी लष्कराचे अधिकार कमी करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. यातून अशांत काश्मीर लष्करामुळेच अशांत आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्याचा ओमर यांचा प्रयत्न आहे. ओमर अब्दुल्लांची पाठराखण करून राहुल गांधी याच भूमिकेला पाठिंबा देत आहेत. काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी राहुल गांधींनी सरळ मैदानात उतरावे. प्रश्नांना सरळ सामोरे जावे. आपल्या मित्राचे मु"यमंत्रीपद वाचविण्यासाठी काश्मिरी जनतेचा बळी देऊ नये. कॉंग्रेसला राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान बनवायचे आहे, हे उघड आहे. परंतु त्यांच्या अपरिपक्वतेची किंमत देशाला चुकवायला लागू नये, एवढेच पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.