अण्णांनी पुकारलेलं जन आंदोलन एका निर्णायक वळणावर येऊन थांबलं आहे. या आंदोलनाला देशाच्या कानाकोपर्यातून आणि समाजाच्या विविध स्तरांतून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा अण्णांच्या नेतृत्वक्षमतेवर यशाची लखलखीत मोहोर उमटवणारा आहे. वरकरणी सामान्य भासणारा माणूस "अहिंसात्मक' मार्गाने किती असामान्य कृती करू शकतो, सत्ताधारी आणि विरोधक यांच्या नाकात कसा दम आणू शकतो याचं दर्शन प्रसारमाध्यमांच्या कृपेने सर्व जगाला अहोरात्र घडत होतं. अण्णा या आंदोलनाचे सर्वार्थाने नायक होते...वय-शरीर-मृत्युची पर्वा न करता प्रत्यक्ष रणभूमीवर उतरलेला नायक. जनतेच्या हृदयातलं स्फुल्लींग चेतवण्यासाठी स्वत:ला पणाला लावणारा नायक...जी घोषणा केली ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ येऊन ठेपल्यावर क्षणाचाही विलंब न करता कृती करणारा नायक! त्यामुळेच, पोकळ बढाया मारणारा हा नेता नाही याचा साक्षात्कार जनतेला घडला आणि जनता हलून गेली. भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरलेल्या या समाजात प्राणांची धुगधुगी होती याची जाणीव अण्णांनी करून दिली.
रक्तपात न घडवता, सनदशीर मार्गांचा अवलंब करून आपले न्याय्य हक्क मिळवता येतात...गरज असते ती प्रखर इच्छाशक्तीची आणि अभेद्य चिवटपणाची. ही सगळी पुस्तकात शोभणारी "सुभाषितं' आहेत, वास्तवाशी त्याचा काही संबंध नाही अशा समजुतीत जगणार्या माणसांना अण्णांनी ती प्रत्यक्षात आणून दाखवली आणि म्हणूनच करोडो भारतवासी "त्यांचे' झाले. विशेषत: या देशातला युवा वर्ग.. जो नुसत्या पोपटपंचीवर विश्र्वास ठेवत नाही, त्याला कृती "दिसावी' लागते असा वर्ग...एरव्ही आपल्या करिअरच्या नादात आणि इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटलेला वर्ग! पण हे जे "आंदोलन' चालू आहे ते उद्याच्या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणजेच पर्यायाने "त्यांच्या' भारतासाठी हे त्यांच्या लक्षात आलं...म्हणूनच अण्णांनी मारलेली हाक आणि मैदानात आघाडीवर प्रत्यक्ष त्यांचं "असणं' या गोष्टी तरुणांच्या काळजाला भिडल्या आणि "आत्मकेंद्रिततेतून' त्यांना बाहेर काढत्या झाल्या. कृतीतला सच्चेपणा दिसला की आजचा तरुण एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचं नेतृत्वही एकमुखाने आणि खुल्या दिलाने मान्य करतो याची प्रचिती या आंदोलनाने आली.
ज्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून अण्णांनी आपल्या सामाजिक कामाला सुरुवात केली त्या स्वामी विवेकानंदांनी कायमच देशातल्या तरुणाईवर विश्र्वास ठेवला होता. आज अण्णा आपल्या या गुरूच्या वचनांवर विश्र्वास ठेवून प्रत्यक्ष कृती करीत आहेत. विधायक बदल घडविण्याची विलक्षण ताकद असलेल्या या तरुणाईला अण्णांनी या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांच्यातल्या सुप्त शक्तीची ओळख करून दिली आहे. आपल्या प्रश्नांसाठी लढा द्यायला उठून उभी राहिलेली तरुणाई "उत्तिष्ठत्' च्या टप्प्यावर आहे... तिथून "जाग्रत' ते "प्राप्यवरान्निबोधत्'पर्यंत हा प्रवास करायचा आहे...अण्णांचं मार्गदर्शन असेलच, पण आता आंदोलनाचा झेंडा या तरुण वर्गाने आपल्या बळकट खांद्यावर घ्यायला हवा, विचारपूर्वक पावलं टाकायला हवीत. आंदोलनाला व्याप्तीबरोबर खोलीही कशी प्राप्त होईल याचा विचार करायला हवा. आदर्श राजकीय व्यवस्था असण्यासाठी सामाजिक संस्थांसार"या "जागल्यांची' आवश्यकता असतेच पण प्रत्यक्ष त्या व्यवस्थेत शिरुनही "स्वच्छता मोहीम' हाती घ्यावी लागते याकडेही लक्ष द्यायला हवं. व्यवस्थेत विधायक बदल घडविण्यासाठी "आंदोलन' करणं हा एक योग्य पर्याय आहे, एकमेव मात्र नाही. समाजाचा, देशाचा गाडा नीट चालण्यासाठी सर्वच क्षेत्रात चांगल्या माणसांची गरज आहे यावरही या निमित्ताने गांभीर्याने विचार होण्याची आणि त्या दिशेने कृती होण्याची गरज आहे. यापुढील काळात अण्णांच्या आंदोलनाने "असं' वळण घेतलं तरच त्याचा प्रभाव दीर्घकाळ जनमानसावर राहिला असं म्हणता येईल. ती या आंदोलनाची खरी फलश्रुती असेल.
यानिमित्ताने आणखी एका मुद्द्यावर विचार करावासा वाटतो. अण्णांच्या जन लोकपाल विधेयकाला मान्यता म्हणजे "संसदेच्या सार्वभौमत्वावर घाला' अशीही टीका करणारा वर्ग आहे...पण, ही संसद ज्या लोकप्रतिनिधींची बनली आहे ते खरंच लोकांचं प्रतिनिधित्व करतात का?...हा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर जर नकारार्थी असेल तर त्याला बऱ्याचशा प्रमाणात या देशातले नागरीकच जबाबदार आहेत. घटनेने दिलेले मतदानासारखे प्रभावी अस्त्र हातात असतानाही त्याचा वापर न करणं किंवा कायमच त्या बाबतीत उदासीन राहणं ही जी नागरिकांची मानसिकता आहे, त्यातूनच त्यांचे प्रतिनिधित्व "न करणारे' प्रतिनिधी संसदेत बसले आहेत. नागरिकांच्या या उदासीनतेचा अचूक फायदा उठवत प्रत्येक राजकीय पक्ष, आर्थिक बळ पुरवणाऱ्या व्यक्तीला उमेदवार म्हणून उभं करायचं धाडस करू शकतो आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने नागरिकांनी कठोर आत्मपरीक्षण केलं आणि आलेली उदासीनता, मरगळ झटकून निवडणूक प्रकि"येत कृतीशील सहभाग घेतला तरच खऱ्या अर्थाने "आपले प्रतिनिधी' संसदेत दिसतील. ज्या आंदोलनाचा "दुसरा स्वातंत्र्यलढा' असा गौरव केला जातो आहे त्या आंदोलनातून सगळ्यांनीच काही धडा घ्यायची गरज आहे. गणेश विशेषांकाच्या निमित्ताने या घटनाक"माचं आणखी एक वैशिष्ट्य समोर मांडावंसं वाटतंय. आपल्याकडे गणपती ही देवता प्रस्थापित झाली ती गणशक्तीचा-लोकशक्तीचा नायक म्हणून. बुद्धी-शक्ती-समृद्धी या तीनही शक्तींचं गणपती प्रतीक मानला जातो, ज्या समाजातही सुप्तावस्थेत दडलेल्या असतात. एखादा नेता जेव्हा या शक्ती जागृत करतो तेव्हा तो समाज प्रगतीपथावर चालू लागतो. गणनायकाप्रमाणे या आधुनिक जननायकाने जागृत केलेला लोकशक्तीचा प्रवाह आपल्या राष्ट्राला बुद्धी-शक्ती-समृद्धी प्रदान करो अशी प्रार्थना करुया!
|