.
 
चालू अंक
५०टक्के आरक्षण; पण सक्षमीकरण किती?
४ डिसेंबर २०११

संपादकीय
1967 व 1975 चे स्मरण

रद पवार यांच्यावर दिल्लीमध्ये हरविंदर सिंग याने केलेला हल्ला हा देशामध्ये  1967  व 1975  ला जे वातावरण तयार झाले होते त्याची आठवण करून देणारा आहे. 1967 साली भारताच्या स्वातंत्र्याला वीस वर्षे पूर्ण झाली होती. परंतु या काळात भारताच्या प्रगतीच्या संबंधात जो आशावाद होता तो नष्ट झाला होता. सुरुवातीच्या पंचवार्षिक योजनांमध्ये औद्योगिक क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्राची उपेक्षा केली गेली असल्याने त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भीषण परिणाम झाला होता. अन्नधान्याची तूट वाढली होती, साठेबाजांनी लोकांना लुटायला सुरुवात केली होती. या साठेबाजांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आहे असा लोकांचा ग्रह झाला होता व तो रास्त होता. श्रीमती इंदिरा गांधी नुकत्याच सत्तेवर आल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसवर जुन्या नेत्यांचा प्रभाव होता. या सर्व नेत्यांवर लोकांचा राग होता. इंदिरा गांधी या नेत्यांच्या हातचे बाहुले आहेत असे म्हटले जात होते. मधु लिमये यांनी त्यांना संसदेत 'गूंगी गुडिया' म्हणून संबोधले होते. देशभरात आंदोलनांना ऊत आला होता. अराजकसदृश्य वातावरण तयार झाले होते. 1976 च्या निवडणुकीत प्रथम काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला. अनेक राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आली.
इतर कोणत्याही नेत्यांना आला नाही पण या परिस्थितीचा इंदिरा गांधींना अचूक अंदाज आला. त्यांनी या परिस्थितीचे खापर आपल्याच पक्षातील जुन्या नेतृत्वावर फोडून समाजवादाचा नारा दिला, पक्षात फूट पाडली व 'गरिबी हटाव' च्या घोषणेने काँग्रेसला पुनरुज्जीवित केले. 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व असे यश मिळाले. 1971  च्या बांगला देशच्या विजयानंतर तर इंदिरा गांधींची लोकप्रियता कळसाला पोचली. परंतु त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या तेलाच्या किमती वाढू लागल्या, युध्दाचे परिणाम जाणवू लागले, किमतीमध्ये भरमसाठ वाढ होऊ लागली. पुन्हा एकदा साठेबाजी व भ्रष्टाचाराने कळस गाठला. देशभरात असंतोषाचे, आंदोलनाचे वातावरण तयार झाले. त्यातूनच संपूर्ण क्रांती आंदोलनाचा जन्म झाला. या आंदोलनाला जयप्रकाश नारायण यांनी नेतृत्व दिले.
1967 चा काँग्रेसवर आलेल्या पेचप्रसंगातूनच इंदिरा गांधींनी सामर्थ्य प्राप्त करून घेतले; कारण त्यावेळी त्या सत्तेच्या राजकारणात पुरेशा रुजल्या नव्हत्या, त्यांच्यापाशी संवेदनशीलता पुरेशी शिल्लक होती. त्यामुळे त्यांना लोकमताचा अंदाज आला. पण  1977 साली त्या लोकापासून पूर्ण तुटल्या होत्या व त्यामुळे आपली सत्ता वाचविण्याकरिता लोकमनाला आवाहन करण्यापेक्षा त्यांनी आणीबाणीचा आसरा घेतला व स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला केंद्रात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर देशातली काँगे्रसची एकछत्री सत्ता समाप्त झाली.
आजच्या स्थितीची या दोन्ही वेळच्या परिस्थितीशी तुलना करता येण्यासारखी आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला आता 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रारंभीच्या काळात या प्रक्रियेमुळे कुंठित झालेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली. उद्योजकतेच्या व रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण झाल्या. आय. टी. क्षेत्रात भारताने आपला दबदबा निर्माण केला. सेवा क्षेत्राच्या विकासाने एक नवा संपन्न वर्ग निर्माण झाला. वाजपेयी सरकारच्या काळात या प्रक्रियेत टिकून रहाण्यासाठी व तिचा लाभ घेण्याकरिता निर्णय घेतले गेले. त्या निर्णयाचा परिणाम मनमोहनसिंग सरकारला आपोआपच मिळाला. मनमोहन सरकारच्या यशाचे प्रमुख कारण या सरकारला मिळालेला वाजपेयी सरकारचा वारसा हे होते. परंतु हे सरकार पुन्हा निवडून आल्यानंतर त्याच्या मर्यादा स्पष्ट होऊ  लागल्या. आज चलनवाढीला, दरवाढीला आवर घालण्यात सरकारला अपयश आले आहे. 1967 व 1975 ची परिस्थिती व आजची परिस्थिती यात एक महत्त्वाचे अंतर म्हणजे त्यावेळी जी अन्नधान्याची तूट होती ती आज अस्तित्वात नाही. परंतु प्रश्न महागाईचा आहे. उत्पादन ठप्प झाले आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या समस्यामुळे सेवा  क्षेत्राच्या विकासाला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे रोजगाराच्या समस्या भीषण होत आहेत.
सामान्य माणसाला या गुंतागुंतीच्या गोष्टी कळत नसतात. परंतु परिस्थिती बिघडत जात असताना हे सरकार काही करीत नाही, करू शकत नाही, उलट भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडले आहे, हे तो पहात आहे. कृषी क्षेत्रापेक्षा शरद पवार आयपीएलमध्ये अधिक लक्ष देतात हीच गोष्ट लोकांना चीड यायला पुरेशी ठरते. या  हल्ल्याचा सार्वत्रिक निषेध झाला आहे. तो योग्य व स्वाभाविकही आहे. परंतु, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया 'बस्स, फक्त एकच', ही मुत्सद्देगिरीची नसली तरी, अनेकांना ती स्वाभाविक का वाटली? यावर राज्यकर्त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. त्यामुळे हरविंदरचा हल्ला निषेधार्थ असला तरी या सरकारच्या संवेदनाशून्यतेवर केलेला प्रातिनिधिक हल्ला आहे हे विसरता कामा नये.
नेहरू  घराण्याच्या दोन पिढयांनी आपल्या आधीच्या पिढीने स्वीकारलेल्या कार्यसंस्कृतीविरोधात बंड पुकारून आपले स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केले. इंदिरा गांधी यांनी नेहरूंच्या काळात निर्माण झालेल्या नेतृत्वाला आव्हान देऊन काँग्रेसविरोधी असलेला असंतोष आपल्या समर्थनार्थ वळवून घेतला. राजीव गांधींनीही आपल्या आईच्या काळात जी पक्षार्ंतगत भ्रष्ट संस्कृती निर्माण झाली होती तिला काँग्रेसच्या शताब्दी अधिवेशनात जोरदार आव्हान दिले व स्वत:बद्दलच्या नव्या अपेक्षा निर्माण केल्या. या दोघांनीही आपल्या काळात नेतृत्वाच्या आपापल्या फळया निर्माण केल्या. आज राहुल गांधींचाही तोच प्रयत्न सुरू  आहे. परंतु त्यांचा वकूबच एवढा कमी आहे की, ना त्यांच्याकडे सक्षम व्यक्ती ना नवा विचार.

या हल्ल्यामागच्या खऱ्या कारणाचा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेसने बंद व रास्ता रोको सुरू केला, तो त्या पक्षाच्या दादागिरी संस्कृतीला धरूनच आहे. अशा मार्गाने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आपण जिंकू असे त्यांना वाटत असेल, तर खडकवासलाचा फार लवकर विसर पडला असे म्हणावे लागेल.