.
 
चालू अंक
खासदारांची वेतनवाढ - जनतेसाठी की स्वत:साठी?

५ सप्टेंबर २०१०

संपादकीय

चीनची तिरकी चाल !

चीनसमवेतचे संबंध सुधारावेत म्हणून भारताकडून प्रयत्न चालू असले तरी, एका हाताने टाळी वाजत नाही, हे लक्षात घेता चीनकडूनही सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा असते. पण चीन तसा प्रतिसाद देत नसल्याचे आढळून येत आहे. भारताचा पाणउतारा करायचाच, असा निर्धार चीनने केला आहे की काय, अशी शंका यावी, इतके चीनचे वागणे संशयास्पद आहे. चीन-पाकिस्तान यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. चीन नेहमीच पाकिस्तानचे हित लक्षात घेऊन वागत आला आहे. त्या संबंधांचा विचार करताना, भारताबरोबरच्या संबंधात बाधा येईल का, याचा चीनने कधी विचार केला नाही. किंबहुना भारताची दखल घ्यावी, अशी आवश्यकता चीनला वाटली नाही. चीनने तिबेटवर आक"मण करून तो भूभाग गिळंकृत केला, त्यानंतरही चीनकडून विस्तारवादी पावले टाकली जात आहेतच. भारताच्या अरुणाचल प्रदेशवर चीनने या आधीच दावा केला आहे. चीन आपली हटवादी भूमिका सोडायला अजिबात तयार नाही. पं. नेहरूंच्या काळात "हिंदी-चिनी भाई भाई'चे नारे दिले गेले. पण चीनने आपला खरा रंग दाखविला. त्यावेळची परिस्थिती आणि चीनचे आताचे वागणे पाहता चीन बदलला आहे, असे म्हणता येणार नाही.
अगदी अलीकडचे उदाहरण लक्षात घेतले तरी चीनचे मनसुबे कसे आहेत, पाकिस्तानला चीन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कसा मदत करीत आहे, ते दिसून येते. भारतीय लष्कराच्या उत्तर क्षेत्राचे प्रमुख लेफ्ट. जनरल बी.एस. जसवाल चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार होते. नेहमीसारखा हा उच्च पातळीवरील दौरा होता. पण चीनने लेफ्ट. जनरल बी.एस. जसवाल यांच्या दौऱ्यास आक्षेप घेतला. त्यासाठी चीनने जे कारण पुढे केले ते लक्षात घेतले तर भारताच्या अंतर्गत व्यवहारात चीनने सरळसरळ हस्तक्षेप केला असल्याचे म्हणता येईल. लेफ्ट. जनरल जसवाल हे जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे "नियंत्रण' करीत होते, हे कारण पुढे करून चीनने भारताच्या एका ज्येष्ठ सेनाधिकाऱ्याच्या दौऱ्यास मनाई केली. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असला तरी तसे मानण्याची चीनची तयारी नसल्याचेच या घटनेवरून पुन्हा दिसून आले. जम्मू-काश्मीर हा "वादग"स्त' भूभाग आहे, असे चीनचे म्हणणे आहे. त्या "वादग"स्त' भागात असलेल्या भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी जसवाल होते हे कारण चीनने पुढे केले. जम्मू-काश्मीरमधील घडामोडींमध्ये लक्ष घालण्याचा अधिकार चीनला कोणी दिला? जो भूभाग भारताचा आहे, त्या भागात भारताने काय करावे, काय नको, यात चीनने दखल घ्यायचे काहीच कारण नाही. चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये भारताने कधी ढवळाढवळ केली नाही. तसेच चीनने अनेकदा कुरापती काढल्या तरीही भारताकडून कोणतीही जहाल प्रतिकि"या व्यक्त झाली नाही. भारत आपले काही वाकडे करू शकत नाही, याची चीनला पक्की जाणीव असल्यानेच भारताशी चीन असे वागत आहे, हे उघड आहे.

लेफ्ट. जनरल बी.एस. जसवाल यांच्या दौऱ्यास चीनने आक्षेप घेतल्यानंतर अत्यंत कडक शब्दात भारताने चीनकडे आपला निषेध नोंदविला. एवढेच नव्हे; तर नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी जे दोन चिनी लष्करी अधिकारी येणार होते त्यांनाही भारताने परवानगी नाकारली. तसेच भारतीय लष्कराचे एक शिष्टमंडळ चीनच्या दौऱ्यावर जाणार होते. तो दौराही भारताने रद्द केला. चीनच्या कृतीला भारताने त्वरित प्रत्युत्तर दिले असले तरी चीनची तिरपगडी चाल रोखण्याच्या दिशेने भारत सरकार काय पावले टाकणार? जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या पारपत्रांवर "व्हिसा' स्टेपल करण्याचा निर्णय घेऊन चीनने आगळीक केलीच होती. त्यावेळीही भारताने चीनकडे निषेध नोंदविला होता. तसेच अरुणाचल प्रदेशमधील लोक हे चीनचेच रहिवासी असल्याचे सांगून त्यांना व्हिसा देण्यास चीनने नकार दिला होता. अशी एक-दोन नव्हे तर अनेक उदाहरणे चीनची चाल कशी तिरकी आहे ते दाखवून देणारी आहेत. आता जम्मू-काश्मीरसंदर्भात चीनने आक"मक दृष्टिकोन स्वीकारायचे ठरविलेले दिसते. 2008 मध्ये पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील काही बांधकाम प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन भारताची आपण पत्रास बाळगत नसल्याचे चीनने दाखवून दिलेच आहे. तसेच पाकिस्तानला दोन आण्विक भट्ट्यांचा पुरवठा करण्याची घोषणा करून भारताला जुमानत नसल्याचे चीनने दाखवून दिले आहे. आधीच्या या सर्व घटना पाहता चीनच्या भारतविरोधी धोरणामध्ये काही सातत्य दिसत आहे. चीन जगातील आर्थिक महासत्ता बनू पाहत आहे. आर्थिक महासत्ता बनू पाहणाऱ्या भारताची, स्वत:च्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर आगळीक करण्याचे चीनचे उपद्‌व्याप चालू आहेत. चीनची ही तिरपगडी चाल लक्षात घेऊन भारतानेही पावले टाकायला हवीत. चीनची विस्तारवादी भूमिका भारत मुळीच खपवून घेणार नाही, एवढा धाक त्या देशाला वाटेल, अशी परिस्थिती निर्माण करायला हवी. केवळ निषेध नोंदवून चीन आपल्या धोरणात बदल करणार नाही, याचा अनुभव खूप पूर्वीपासून भारत घेत आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा भूभाग "वादग"स्त' असल्याचे ठरवून चीन पाकिस्तानची बाजू मजबूत करू पाहत आहे. चीनची ही तिरकी चाल वेळीच ओळखून शहास काटशह देण्याची गरज आहे. भारताकडे तेवढे मनोबल व इच्छाशक्ती असेल आणि त्याला सामर्थ्याची जोड असेल तरच चीनचे असले उद्योग थांबू शकतील. तेवढे सामर्थ्य जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत चीनच्या आगळिकींना आवर घालता येणार नाही.