'वन्दे मातरम्'

 विवेक मराठी  06-Dec-2014

****मिलिंद सबनीस****

 

'वन्दे मातरम्' हा द्विखंडात्मक ग्रंथ 16 डिसेंबर 2014 रोजी प्रकाशित होत आहे. 'माते, तुला वंदन असो!' इतका साधा अर्थ असलेले हे दोन शब्द. 1875मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय या द्रष्टया कवीने लिहिलेल्या गीताची ही सुरुवात; पण पुढे ब्रिटिशांविरुध्द चाललेल्या स्वातंत्र्यलढयात या शब्दांनी एक इतिहास घडवला. 'वन्दे मातरम्'ची समग्र स्थित्यंतरे, स्पंदने टिपणाऱ्या या ग्रंथाविषयी लेखकाचे मनोगत.....

'माते, तुला वंदन असो!' इतका साधा अर्थ असलेले हे दोन शब्द. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय या द्रष्टया कवीने लिहिलेल्या गीताची ही सुरुवात; पण पुढे ब्रिटिशांविरुध्द चाललेल्या स्वातंत्र्यलढयात या शब्दांनी एक इतिहास घडवला.

शस्त्रधारी क्रांतिकारकांपासून नि:शस्त्र जनतेने शस्त्र म्हणून याच शब्दांचा वापर केला. 1905च्या वंगभंगविरोधी आंदोलनात या शब्दांना प्रथम रणघोषाचे स्थान प्राप्त झाले. त्यानंतर प्रथम 'गदर', 'असहकार चळवळ' आण्ाि अगदी 1942च्या 'चले जाव' आंदोलनापर्यंत याच शब्दांच्या जयघोषाने ब्रिटिश शासनाच्या मनात धडकी भरवली. 1875मध्ये बंकिमचंद्रांच्या अलौकिक प्रतिभेतून हे गीत निर्माण झाले, तेव्हापासून 'वन्दे मातरम्' या विषयातही अनेक स्थित्यंतरे झाली.

1994मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे स्मृतिशताब्दी वर्ष होते. त्यानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती देण्याकरिता अमरेंद्र गाडगीळ यांचे 'वन्दे मातरम्' हे पुस्तक वाचण्यात आले आण्ाि उत्सुकतेपोटी 'वन्दे मातरम्'विषयी इतर संदर्भ मिळवण्यास सुरुवात केली. त्याच सुमारास गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर आण्ाि विष्णुपंत पागनीस यांनी गायिलेल्या 'वन्दे मातरम्'च्या ध्वनिमुद्रिका ऐकण्यास मिळाल्या. अ.भा.वि.प.सारख्या संघटनांच्या सभांमध्ये वेगवेगळया चालीतील 'वन्दे मातरम्' ऐकावयास मिळत होते. अशा वेगवेगळया संगीतरचनांमधील 'वन्दे मातरम्' जमवण्यास सुरुवात केली. आज या ध्वनिमुद्रिकांची संख्या 175हून अधिक झाली आहे. मास्तर कृष्णराव यांनी पंडित नेहरूंबरोबर दिलेल्या 'वन्दे मातरम्'च्या सांगीतिक लढयाविषयीचा माझा लेख 'विवेक'मध्ये प्रसिध्द झाला आण्ाि मास्तरांचे चिरंजीव राजाभाऊ फुलंब्रीकर यांनी या सांगीतिक संघर्षातील अनेक कागदपत्रे, प्रत्यक्ष पुरावे व केवळ घटना समितीसमोर वाजवण्यासाठी तयार केलेल्या 'वन्दे मातरम्'ची आठ ध्वनिमुद्रणे (कच्च्या रेकॉर्ड्स) माझ्याकडे सुपुर्द केली. इतकेच नव्हे, तर मास्तरांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली याविषयीची टिपणेही मला दिली. एकंदरीत 'वन्दे मातरम्'च्या या शोधकामाला आपोआप एक चालना मिळत गेली.

कलकत्त्याजवळील नैहाटी-कांटालपाडा या 'वन्दे मातरम्'च्या जन्मस्थानाला मुद्दामहून भेट दिली. तिथे अधिक माहिती तर मिळालीच, शिवाय 'वन्दे मातरम्'च्या आणखी काही दुर्मीळ ध्वनिमुद्रिकाही मिळाल्या.

लाल-बाल-पाल यांचे नातू विक्रम देव, जयंतराव टिळक व कॉलिंन पाल आण्ाि ज्येष्ठ वक्ते भाई महावीरजी यांच्या उपस्थितीत सर्ंपूण भारतातला पहिला कार्यक्रम 1999मध्ये पुण्यात 'वन्दे मातरम्'च्या 125व्या जयंतीदिनी आयोजित केला. याच कार्यक्रमात 'वन्दे मातरम् - एक शोध' हे माझे पुस्तक प्रकाश्ाित झाले.

त्यानंतर ज्येष्ठ अनुवादक मो.ग. तपस्वी यांनी या माझ्या पुस्तकाचा केलेला हिंदी अनुवादही प्रकाश्ाित झाला. त्याच्या चार आवृत्त्याही प्रकाशित झाल्या. Vande Mataram Dawn The Memorie Laneहा इंग्रजी अनुवादही प्रकाश्ाित झाला. 'वन्दे मातरम्'चे एक संगीतकार पं. वि.दे. अंभईकर यांची 'वन्दे मातरम्'च्या संगीतप्रवासावरील दोन छोटी पुस्तकेही मी प्रकाश्ाित केली. 'वन्दे मातरम्'चा प्रसार व प्रचार करण्यासाठी 'जन्मदा प्रतिष्ठान' या संस्थेची स्थापना केली.

गेल्या 125 वर्षांत मराठीत 'वन्दे मातरम्'वर जे लेख प्रकाश्ाित झाले, त्याची सूची 'दाते ग्रंथ सूची'च्या माध्यमातून मिळाली. ती 1980पर्यंतचीच होती. 'मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय', 'पुणे मराठी ग्रंथालय', 'डेक्कन कॉलेज ग्रंथालय', पुणे विद्यापीठाचे 'जयकर ग्रंथालय', 'केसरी'चे ग्रंथालय यांमधून यातील बहुतेक सर्व लेख मिळवले. यातील 300 लेखांपैकी केवळ 25 लेखच या ग्रंथासाठी निवडले.

'वन्दे मातरम्' या ग्रंथाचे दोन भागात विभाजन केले. यातील पहिला भाग 'वन्दे मातरम्'चा इतिहास सांगणारा आहे. श्ािवाय 'वन्दे मातरम्'च्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची साहित्यकृती असणारी श्रीपाद जोशी यांनी अनुवाद केलेली 'आनंदमठ' ही कादंबरी या भागात घेतली आहे. या ग्रंथाचा दुसरा विभाग प्रामुख्याने संपादन व संकलनाचा आहे. 'वन्दे मातरम्'च्या जन्माच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले, स्वत: बंकिमचंद्रांचे 2 व त्यांचे बंधूर् पूणचंद्र यांचा 1 असे हिंदीतील तीन भाषांतरित लेख, वैदिक राष्ट्रगीताविषयी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे चार लेख, तसेच लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, दि.वि. काळे, वा.गो. आपटे, गोळवलकर गुरुजी, डॉ. द.भि. कुर्लकणी यंाचे लेख, 'वन्दे मातरम्'च्या विरोधासंदर्भातील मौलाना रेजाउल करिम, देवीसिंग चौहान, मुजफ्फर हुसेन, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, 'वन्दे मातरम्'च्या संगीताविषयी ना.सी. फडके, पं. विनायकबुवा पटवर्धन, पं. वि.दे. अंभईकर, डॉ. अशोक रानडे, तसेच हरिवंशराय बच्चन, विश्वनाथ मुखर्जी, डॉ. भानुशंकर मेहता यांचे हिंदी, रवीन्द्रनाथ व श्रीअरविंद यांचे इंग्रजीतील लेख यात समाविष्ट केले आहेत.

'वन्दे मातरम्'च्या प्रभावातून श्रीअरविंदांनी 1906मध्ये 'भवानी भारती' ही 99 श्लोकांची केलेली संस्कृत रचना आजही दुर्लक्षित आहे. हे मूळ श्लोक व द.तु. नंदापुरे यांनी केलेले त्याचे समश्लोकी मराठी भाषांतर पहिल्यांदाच मराठीत प्रकाश्ाित होत आहे. 'वन्दे मातरम्'चे विविध भाषेत अनुवाद झालेले आहेत. त्यात दोन हिंदी, चार उर्दू, तेलगू, तमीळ, कन्नड व गुजराथी प्रत्येकी एक व इंग्रजीतील नऊ अनुवाद घेतले आहेत. मराठीत 'वन्दे मातरम्'चा मूळ गीताप्रमाणेच समवृत्तातील अनुवाद आजपर्यंत झाला नव्हता. प्रसिध्द कवी प्रवीण दवणे यांनी केवळ या कोशासाठी ते अनुवाद करण्याचे अवघड काम केले. प्रवीण दवणे यांच्या मराठीतील, तसेच संध्या दीक्षित यांनी कन्नड व चिरायू पंडित यांनी केलेला गुजराती अनुवाद या कोशाच्या निमित्तानेच केलेला असल्यामुळे तो प्रथमच प्रकाश्ाित होत आहे.

अथर्ववेदातील द्वादशकांडातील 63 पृथिवि: सूक्ते ही प्राचीन वैदिक वाङ्मयातील आद्य राष्ट्रभक्तिपर रचना मानल्या जातात. ही सर्व सूक्ते व पं. सातवळेकर, डॉ. सिध्देश्वरशास्त्री चित्राव यांनी मराठीत या सूक्तांचा अर्थ दिला आहे. या सूक्तांसह इतर काही वैदिक राष्ट्रगीते, भारत-भूमाता स्तोत्र अशा काही संस्कृत रचना, तसेच मातृभूमीविषयक 'वन्दे मातरम्'च्या आशयाशी नाते सांगणाऱ्या संत विष्णुदास माहूरकर, भा.रा. तांबे, स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी गोविंद, ग.दि. माडगूळकर, सुधीर मोघे, अमरेंद्र गाडगीळ व सुरेश भट यांच्या रचना पद्य विभागात घेतल्या आहेत. तसेच मातृभूमीविषयक हिंदी, बंगाली, तमीळ, गुजराथी, इंग्रजीमधील विविध 40 रचनाही समाविष्ट केल्या आहेत.

संगीत विभागात रवीन्द्रनाथांपासून 'वन्दे मातरम्'च्या 23 विविध स्वरलिपी (नोटेशन्स) व 'वन्दे मातरम्'च्या ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती, सीडी, ध्वनिचित्रमुद्रणे यांची परर्िपूण सूची, या सूचींप्रमाणे बंकिमचंद्रांचे साहित्य, 'वन्दे मातरम्'वर विविध भाषांत निघालेले ग्रंथ, 'वन्दे मातरम्'वरील विविध भाषांतील लेख अशा वेगवेगळया सूचीही परिश्रमपूर्वक तयार केल्या आहेत.

'वन्दे मातरम्'च्या प्रसारकांची माहिती, तसेच 'वन्दे मातरम्'च्या संदर्भातील अनेक दुर्मीळ कागदपत्रे, 'भारतीय विचार साधना'ने काही काळापूर्वी तयार केलेली 'भारतमाता पूजन पोथी' या खंडाच्या अखेरच्या प्रकरणात आहे.'वन्दे मातरम्'च्या अनुषंगाने भारतमातेची विविध चित्रकारांनी केलेली चित्रे, 1923मध्ये कानपूरमधून प्रकाश्ाित झालेल्या 'वन्दे मातरम्'च्या प्रत्येक वाक्यावरील केलेल्या चित्रांच्या पुस्तकातील चित्रे, बंकिमचंद्रांची व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची दुर्मीळ छायाचित्रे यांचा 48 पानी स्वतंत्र रंगीत विभाग केलेला आहे.

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, व्यासंगी लेखक आनंद हर्डीकर यांनी पहिल्या इतिहास खंडाच्या लेखनाचे चिकित्सकपणे संपादन केले. विवेक परिवार, हिंदुस्थान प्रकाशन संस्था हे सर्व प्रकाश्ाित करण्यासाठी खंबीरपणे उभी राहिली आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

'वन्दे मातरम्'चे महत्त्व कालातीत होते, आहे आण्ाि यापुढेही राहणार आहे. आजच्या पिढीपर्यंत हे सर्व पोहोचवण्याचा हा प्रयत्न जास्तीत जास्त प्रामाण्ािक आहे. अधिकाधिक अचूकपणा येऊन 'वन्दे मातरम्'च्या पुढील काळातील अभ्यासकांना संदर्भासाठी उपयोगी पडेल, हीच बंकिमचंद्रांना खरी आदरांजली असेल.

9422881783