मुक्त - विमुक्त बंदिश

 विवेक मराठी  26-Oct-2016

शांतीनिकेतनहे एक छोटंसं गाव होतं तेव्हा! रवींद्रनाथांनी जी शिकण्याची पध्दत सुरू केली, त्याचं ते नाव होतं. तो काळ होता 1901. श्री निकेतनची स्थापना झाली ती 1924. याला नाभाभिधान होतं 'ब्रह्मचर्याश्रम'. 1921ला विश्वभारती झाली. पहिली-दुसरी अशा इयत्ता सुरू झाल्या. मग चौथी आणि पाचवी आणि पुढे. इथे खूप लवचीकता आहे, कोणती Compartment नाहीत, कप्पे नाहीत. वातावरण इतकं मोकळं आहे की निसर्ग एक सुंदर Ambience देतो. एरवी शाळा म्हणजे मुलांसाठी सेल्युलर जेल बनतो. तुम्ही खूप ठरावीक वातावरणात काम करता, तेव्हा तुमची विचारप्रणालीही तशीच बनते, तुम्ही त्याच वर्तुळाचा विचार करता. तुम्हाला इथे आल्यावर तुमचा गिअर बदलावा लागतो. या वातावरणाचे हेतू काय आहेत? इथे आहेत मोकळा श्वास घेता येईल अशी आसनव्यवस्था. इथे गर्दी नाही. भिंती नाहीत. मग कोंडलेपण नाही. खिडक्याच नाहीत, त्यामुळे त्या बंद होणं नाही नि वेगळं बाहेर बघावंसं वाटणं नाही.


बो
लपूर (शांतीनिकेतन) स्टेशन. अक्षरशः सामानाला फरफटवत मी उडीच मारली. नाहीतर मग रामपूरलाच. स्टेशनवर उतरले. ती संध्याकाळ. भरून आलेले ढग नि एका कोपऱ्यातून आपण दिसायची धडपड करणारा मावळतीचा सूर्य. ''बाय बाय, सी यू टुमारो'' म्हणणारा.

सायंकाळी रिक्षा शांतीनिकेतनची वाट चालू लागली. तेव्हा डाव्या बाजूला असलेल्या इमारतीवर लिहिलं होतं - ‘The Story of Shantiniketan’. रवींद्र संगीताचे स्वर. मातीच्या कणाकणात दडलेली कला, कलावंत, कलारसिक मन!... असं वाटत होतं समोरून शांतीनिकेतन घडवणारा शिल्पकार जणू येत आहे. हे काय असेल, ते काय असेल असं शोधत शोधत सायकल रिक्षावाला दादा मला घेऊन पूर्वपल्ली अतिथिगृहात आला. रणवीरभय्या माझ्या आधीच येऊन थांबले होते. हे इथला मराठी भाषा विभाग बघतात. आम्ही खूप बोलत होतो. हिंगोली मराठवाडयातला माणूस इतक्या लांब कसा आला हा प्रश्नच नव्हता. शांतीनिकेतनमध्ये आयुष्यातलं महत्त्वाचं वय जगायला मिळणं यासारखं भाग्य कोणतं? आम्ही उद्या भेटणार होतो. ते इथे सकाळी 7 वाजता येणार आहेत. जेवले आणि अंथरुणावर पडले.

बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात (तिसरी-चौथी बहुधा) 'चाफा' कविता समाविष्ट करण्यासाठी खूप आग्रह धरावा लागला होता. मला आठवलं, Where the mind is without fear... कविता डोळयापुढे आली. पु.लं.नी भाषांतरित केलेली रवींद्रनाथांची तीन भाषणं आठवू लागली. शिवानीचं 'शांतीनिकेतन' आठवू लागली. बी.एड.च्या, डी.एड.च्या अभ्यासक्रमातील रवींद्रनाथांविषयी लिहिलेली रूक्ष माहिती आठवून तर कससंच झालं. रवींद्रनाथांचं 'शिक्षा' पुस्तक आठवलं. बापरे! सगळया सुंदर आठवणींनी गोफ विणला, फेर धरला आणि मी त्यात हरवून गेलेय. कोण आहे मी?... कुठे आलेय? इतका छान फील जगण्याला आला होता की... वाचलेलं जिथं घडलेलं होतं, ते आता मी उद्यापासून चार-पाच दिवस अनुभवणार?

गजर लावावाच लागला नाही. तशी मी दचकूनच उठले. आठ वाजले की काय? एकदम आवरायलाच घेतलं. मग घडयाळ पाहिलं तर पावणेसहा वाजले होते. म्हणजे 5.30ला लखलखीत उजाडलं होतं. समोर पाहते तो आंब्याच्या झाडाएवढा चाफ्याच्या फुलांचा वृक्ष. त्याहीपेक्षा मोठा असावा.

फिरून येण्यासाठी बाहेर पडले. साधारण 8 वाजता शांतीनिकेतनच्या 'पाठोभवन'मध्ये प्रवेश केला. माप ओलांडून आत प्रवेश करणाऱ्या नववधूसारखी माझी स्थिती झाली होती. काय काय असेल? कसं असेल? आपण कसं सारं समजून घेणार? केव्हा समजेल सगळं? मनभर वाचलेले रवींद्रनाथ होते, मनभर रवींद्र संगीतांचे सूर होते. मनभर 'गीतांजली'तल्या कविता होत्या. आणि असं खूप खूप घेऊन शांतीनिकेतनच्या पाठोभवनच्या मातीला मी स्पर्श केला... Where the mind is without fear... भयमुक्त मनाने!

मी आणि रणवीरभाई तडक इमारतीकडे निघालो होतो. डोळे आजूबाजूला बसलेली मुलं पाहत होते. केवढी मोठी मोठी झाडं, अजानवृक्षाची! कितीतरी जुनी असणार! किमान 100 वर्षांपूर्वीची तरी! हो ना! कारण शांतीनिकेतनसुरू झालं तेच मुळी 1901मध्ये. त्याआधी देवेंद्रनाथ टागोरांनी हा परिसर घेतला. इथेच बसून त्यांना आत्मशांती मिळाली.

तेव्हा रवींद्रनाथ फक्त 7 वर्षांचे होते.

आम्ही फक्त पाहत होतो. इतक्यात एका दीदींनी आम्हाला अडवलं. (इथं शिक्षकांसाठी सर आणि मॅडम असे वाईट शब्द वापरत नाहीत, तर दा आणि दी हा दादा आणि दीदीचा शॉर्ट फॉर्म वापरतात.) क्षणभर मला वाईट वाटलं. कुठेही दिसतात तशाच त्या अगदी खडबडीत, खरखरीत आवाजात बोलणाऱ्या होत्या. It's not fair, you should take the permission. स्वातंत्र्याच्या आवारात परवानगी कसली? पण त्यांचंही बरोबर होतं. सारखीच माणसं येणार आणि इकडे तिकडे फिरणार. बरं, इथे मुलं वर्गात नाहीत. सर्वच बाजूंनी मुक्त. वर्गच नाहीत, मग भिंती कसल्या? पण मुलांनाही ही सवय झालीच असणार! जाणवत होतं. मुलांचं आमच्याकडे क्षणभरच लक्ष गेलं असावं. तेही काही मुलांचंच. असं फिरणारे बरेच प्राणी ते पाहत असणार. ज्या (बाईंनी) दीदींनी आम्हाला अडवलं, त्यांनीच दुसऱ्या दिवशी त्यांच्या इतिहासाच्या तासाला बसायला काहीच हरकत घेतली नाही. उलट तेव्हा मला जास्त मार्दव जाणवलं.

इथे बऱ्याच इमारतीपुढे 'ऐतिह्य भवन' म्हणजे ऐेतिहासिक इमारत असं लिहिलेलं होतं आणि अर्थात फोटो काढायला परवानगी नव्हती. एक-दोघे दादा म्हणाले, ''व्हाईस प्रिन्सिपॉलांशी बोलून घ्या. प्रिन्सिपॉल सोमवारी येतील.'' तरीही आम्ही स्टाफ रूममध्ये गेलो. तिथे सुजितदांनी खूप गप्पा मारल्या. ते त्यांचा तास चुकवत नव्हते. ते तासाहून आले की मी बोलत होते. आता रणवीरदा त्यांच्या कामाला निघून गेले. आता मी, एवढं मोऽऽठ्ठं प्रांगण आणि मनातले खूप खूप प्रश्न...

जे जे वाचत आले होते, ते ते अनुभवायला सुरुवात झाली. जे टोचलं, ते कशाला लिहायचं? जे रुचलं, भावलं, जाणवलं, खूप खूप वेगळं वाटलं तेच नोंदवावं. मनाने तेच टिपून घेतलं.

पहिल्यांदा हे एक छोटंसं गाव होत. इथे रवींद्रनाथांनी देश-विदेशातून अनेक वेगवेगळया झाडांचे प्रकार आणून तेव्हा लावलेत. आज 100-116 वर्षांनी त्याचे प्रचंड वृक्ष झालेत. एक जण म्हणाले, ''इथे सर्व ऋतूत तुम्हाला फुलं फुललेली दिसतील. झाडं हिरवीगार दिसतील नि ढोल उत्सवात सगळे सगळे दंग झालेले दिसतील. वसंतोत्सव, वर्षा उत्सव इथला संगीत-नृत्य-नाटय विभाग आजही वेगळया पध्दतीने साजरा करतात. सगळी मुलं, मोठी माणसं, इतकंच नाही, तर बाहेरूनही माणसं त्या वेळी जमतात.''

खरंच, उत्सवाने उत्साह येतो. उत्सवाने मन आनंदित होतं, उत्सवाने माणसं एकत्र येतात. यंत्रापेक्षा, तंत्रापेक्षा रवींद्रनाथांचा भर कलेवर, कला शिकण्यावर जास्त होता. रवींद्रनाथ स्वत: पहिली ते चौथीला शिकवायचे. त्यासाठी त्यांनी तयार केलेली पुस्तकं आजही प्रथम भाषेसाठी बंगाली भाषेसाठी वापरली जातात. 1950नंतर त्यात वेळोवेळी संस्करण केलंय, पण मूळ गाभा फार बदलला नाही. मला नवल वाटलं. एवढा मोठा माणूस पहिली, चौथी, आठवी अशा वर्गात शिकवत होता. मुलांच्यात बसून, मुलांमधले होऊन जाऊन...

आजही तेच जपलंय इथे. प्रत्येक झाडाखाली सिमेंटने बांधलेला एक एकविटी गोल दिसेल. झाडाखाली शिक्षकांना बसायला 'बेदी' म्हणजे बैठक दिसेल. शिक्षक तिथेच थांबतात. पांढऱ्या-हळदी पिवळया रंगाचे कपडे घातलेली मुलं इकडून तिकडे जाताना दिसतात. पहिली ते चौथीच्या मुलींसाठी स्कर्ट-ब्लाउज नि मुलांना शर्ट-पँट, चौथी ते सातवीच्या मुलींसाठी पंजाबी ड्रेस व मुलांना फुलपँट आणि आठवी ते दहावीसाठी मुलींना चक्क साडी आणि मुलांना सलवार कमीज असा ड्रेस कोड आहे. हा युनिफॉर्म आला 1960मध्ये. साडया? आत्ताच्या काळात? लांब बाह्यांचे लांब आणि बंद गळयांचे ब्लाउज - कुणाचे पांढरे तर कुणाचे काळे! इकडून तिकडून पिना लावून छान चापून चोपून साडया नेसलेल्या मुली, त्याही कॉटनच्या साडया! (शी, चिकटतात सगळया कॉटनच्या साडया! मेन्टेनन्स किती लागतो असं म्हणून आधी साडी नाकारणाऱ्या, त्यात कॉटनच्या साडीला अव्हेरणाऱ्या मुली मला आठवल्या नि लांडे स्कर्ट, थोडयाशा उघडया मांडया दिसणारे, बूट-मोजे घातलेल्या, अनेक शाळांच्या मुलीही आठवल्या.)

साडीबद्दल काय वाटतं हे मात्र विचारायलाच हवं. तसे आम्ही फार फिरू शकत नव्हतो. म्हणून एका छोटयाशा पुलावर झाडाखाली बसलेल्या मुलींजवळ मी जाऊन बसले. सरळ आहे ना की साडीबद्दल विचारणार! त्याहीपेक्षा इथल्या प्रत्येक मुलाला न्याहाळण्यातच माझा वेळ कसा गेला कळलं नाही. एवढी जवळजवळ हजार मुलं-मुली! किचाट नाही, किंचाळाकिंचाळी नाही, छानसा हळुवार दंगा जाणवला. कदाचित त्याला दंगा नाही म्हणता येणार. (एरवी वर्गातून बाहेर पडण्यासाठी उतावीळ झालेली मुलं मला बिच्चारी वाटत होती, आणि वर्गाबाहेर पडल्यावर सैराट झालेली मुलं मला दिसत होती. वर्गच नाही, त्यामुळे ही भानगडच नाही.) आवतीभोवती मोकळेपणाच ना! ऑफ पिरियड होता, पण मुलं झाडाखाली बसून मस्त गप्पा मारत होती. झाडाखालीच तर त्यांचं विश्व. तेही एका झाडाखाली नाहीच! मुलींना विचारलाच प्रश्न मी साडीबद्दल... ''खूप छान वाटतं आम्हाला. उलट आम्ही मोठया मोठया होत आलेलं साडीने आम्हाला जाणवून दिलं. स्कर्टमधली मी, पंजाबी सूटमधली मी आणि आता तरुण मी... माझ्यातला बदल या युनिफॉर्मने मला टप्प्याटप्प्याने जाणवून दिला...'' तिच्या उत्तराने मी अक्षरश: अवाक झाले. जीन्सच्या नि टाईट टी शर्टच्या काळात इतकं समजपूर्वक उत्तर तिने तिच्या पोषाखाबद्दल दिलं होतं. कोणीतरी सांगतंय म्हणून नाही, तर तिला हे जाणवून दिलं होतं... हेही जाणवलं (जे इतरत्र अजिबात जाणवत नाही) की आपण प्रत्येक गोष्ट का करतोय हे मुलांना माहीत होतं. त्याच मुलीच्या गटाशी मी गप्पा मारत होते. आणि हे उत्तर बऱ्याच मुलींनी दिलं. हे उत्तर का दिलं? धडयाखालील प्रश्नाच्या उत्तरासारखं हे उत्तरही पाठ करून घेतलं असावं की काय? हे कुणी सांगितलं नाही. हे आम्हालाच फील झालं. ''मोठया तायांनी साडी नेसायला शिकवलं. आमच्यात भावनिक नातं निर्माण होत गेलं. आमच्याबद्दल वयाबद्दल त्या त्या वेळी त्या बोलायच्या.'' ''तुम्ही इथे इतक्या मोकळेपणाने मुलं-मुली फिरता.''  ''हे तर कुठेही घडणारच ना! तो वयाच्या प्रॉब्लेम आहे.'' हाच प्रश्न नंतर मी त्यांच्या प्राचार्यांना विचारला, तेव्हा त्या म्हणाल्या, ''येतात ना खूप प्रॉब्लेम्स! तो काळाचा नि इथल्या खूप मोकळया वातावरणाचा परिणाम. सोडवावे लागतात प्रश्न. त्यांच्याशी खूप बोलावं लागतं. इथं मुलं-मुली वस्तिगृहात (आश्रमात) पहिली-दुसरीपासून येतात. त्यामुळे वर्गात कुणी वेगळं आहे असं नाही फील होत त्यांना. पण तरी...''

मुलांनी आपल्या इथे असण्याबद्दल वेगळं फील करणं हे खूप महत्त्वाचं आहे. इथून लाखो मुलं बाहेर पडली. इथून स्वत:ला खूप वेगळं काही घेऊन बाहेर पडली असावीत. त्या दिवशी शांतीनिकेतनमधून मी बाहेर पडले, तेव्हा एक शिक्षक भेटले. मला माहीत नव्हतं ते इथले पास्ट स्टुडंट आहेत. ते एका मिशनरी स्कूलमध्ये नोकरीत होते. जे लहानपण, कुमारवय इतक्या मोकळया वातावरणात घालवलं, ते एकदम साचेबंद शाळेत जगणं म्हणजे खूप तडजोड करावी लागत असणार. ते म्हणाले, ''काय करणार? नोकरी म्हटलं की हे आलंच. पण माझ्यापुरतं तरी मी मुलांना शांतीनिकेतन देण्याचा थोडाफार प्रयत्न करतो. मुलांनाही ते स्वीकारता येत नाही. पालकांना तर हे कल्पनेतही नाही. जग वेगळया दिशेने आणि शांतीनिकेतनचा प्रवास वेगळया दिशेने आहे. ते स्वप्न आणि हे वास्तव आहे. शंभर वर्षापूर्वीच तत्त्वज्ञान जुनं होत नाही. तत्त्वज्ञान व्यवहारात आणण्यासाठी मार्ग बदलावा लागतो. तत्त्वज्ञान कसं जगायचं ते सांगतं. व्यवहार पध्दत सांगतं. दोन्हीची सांगड मी कशी घालतोय हे महत्त्वाचं.'' अशाच इथून बाहेर पडून बाहेर काम करणाऱ्या शिक्षकांच्या एका गटाबरोबर एका आदिवासी पाडयावर आम्ही गेलो, जिथे तिथल्या आदिवासींच्या मदतीने दवाखाना सुरू केला जातोय. संध्याकाळी 'संस्कृती, धर्म आणि व्यापार हातात हात घालून जातात' या विषयावर चर्चासत्र होतं. आपल्याकडे चर्चासत्र म्हणजे भाषणं असतात. पण इथे मास कम्युनिकेशनच्या मुलांनी खूप प्रश्न विचारले.


कार्यक्रम सुरू झाला. गंध, अत्तर, उपरणीय देऊन पाहुण्यांचं स्वागत झालं. अशा वेळी आपण टाळया वाजवतो. पण सभागृहातून एकदम एक प्रतिध्वनी उमटला. ''शादो, शादो, शादो'' म्हणजे 'अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.' संस्कृतीचं वेगळेपण असं कुठेकुठे सापडत होतं. मला खूप छान वाटलं. रवींद्र संगीताने सुरुवात नि शेवट.

इतक्या वेळेपर्यंत न दिसलेल्या बंगाली साडया दिसल्या. रात्र झाली होती. इथल्या 'टोटो' बॅटरीवर चालतात. त्यात कुठे 'ढिचांग' म्यूझिकही ऐकू आलं नाही. गरज नसताना कुणी हॉर्न वाजवत नव्हतं. आणि भरधाव वेगातही जात नव्हतं. बरेच जण सायकलवरून आले होते. पूर्वांचलची आठवण झाली.

दिवसभर डोळयांनी, कानाने, मनाने इतकं वेगळं पाहिलं होतं की हे वेगळेपण पांघरून झोप कधी लागली कळलंच नाही. उद्या लवकर उठायचं ते काम लवकर उजाडणारा सूर्य करेलच...

पूर्वपल्ली अतिथिगृहातून मी पावणेसहालाच बाहेर पडले. स्वच्छ उजाडलेलं. मैदानात व्यायाम करणारी, खेळांचा सराव करणारी मुलं, रस्त्यावरून फिरणारी माणसं... एवढा गजबजाट! वा! कुणी झाडाखाली योगा करतं. विश्वभारती विद्यापीठ सर्व विद्यापीठांसारखंच जाणवलं. विषय मात्र वेगळे वाटले. इस्लामी, अरेबिक, चिनी, जॅपनीज, जर्मन अशा अनेक परकीय भाषा, तर संथालसारखी (एकच आदिवासी भाषा अशी आहे जिला लिपी आहे) आदिवासी भाषा, भारतीय भाषा इथे शिकवल्या जातात. पण वर्ग सारखेच. प्राध्यापक बोलत होते. मुलं ऐकत होती. हे मी आदल्या दिवशी पाहिलं होतं. तत्त्वज्ञान विभागाचं नाव Philsophy and Comparetive Religion असं होतं. योगा केंद्राजवळ परामर्श प्रकोष (Counselling Centre) होतं. रात्री अलाहाबादहून प्रवेश घेण्यासाठी आलेली मुलगी म्हणाली, ''उद्या 11 वाजता काउन्सेलिंग आहे. इथे जागा मर्यादित असतात. मग इथं आम्हाला पर्याय सांगितले जातात.'' बाकी आरक्षण वगैरे, वशिला वगैरे विचारायच्या मी फंदात पडले नाही. इथलं संगीत भवन, कलाभवन मात्र खूप वेगळं आहे. तो इथल्या विद्यापीठाचा प्राण आहे. परिसर इतका मोठा आहे विद्यापीठाचा की मुलं खूप भाग्यवान आहेत. श्रीनिकेतन - जिथे सिरॅमिक, लेदर वर्क, टेक्स्टाइल, शेती हे विषय 'शिकवले' जातात. फक्त हे विषय विद्यापीठातच आहेत. आपल्याकडे सर्वत्र महाविद्यालयं असतात नि विद्यापीठाच्या अंतर्गत येतात. इथे मात्र विद्यापीठ आणि विभाग इथेच आहेत. बाहेर विश्वभारती नाही. म्हणजे जसं रत्नागिरीचं कॉलेज मुंबई विद्यापीठाशी संलग्न असतं, तसं विश्वभारती बाहेर नाही. पंतप्रधान कुलपती आहेत. इथेच पूर्णविराम. हे फक्त जाणवलेलं. विद्यापीठ पाहिलं इतकंच. तो हेतूच नव्हता.

पाठोभवनच्या आवारात सहा वाजता पोहोचले, तेव्हा मुलं जमत होती. इथली घंटाही एका सुंदर बांधणीत झाडाखालीच विसावली आहे. तीपण तेवढीच प्राचीन. ही घंटा वाजवणं म्हणजेदेखील शक्तीचे प्रयोगच म्हणायचे. घंटा मुलांनी दिली. मुलंच देतात. शिपाई श्रेणी दिसली, पण नेहमीच्या खाकी कपडयात नव्हती. त्यांच्याशी मात्र बोलणं झालं नाही. मुख्य दारासमोर पहिली ते बारावीची मुलं जमली. रवींद्रनाथांच्या गाण्याने/प्रार्थनेने सुरुवात झाली. मंत्र म्हटला मुलांनी आणि मुलं आपापल्या झाडाखाली जाऊ लागली. झाडाची सावली इतकी दाट आहे की ऊन कुठे जाणवतच नव्हतं. पानझडीत काय करता? हे विचारायचं भानच राहिलं नाही. पण गोल गोल बंदिस्त शेडही दिसल्या. काही खोल्याही दिसल्या. एकदोन खोल्यांत बाकंही दिसलीच, एकदोन वर्गात मुलं खाली बसलेली दिसली. दप्तर पाठीला नि हातात बस्कर घेऊन मुलं आपापल्या झाडाच्या सावलीला गेली. पटकन बस्कर अंथरले आणि त्यांचे दा/दी वर्गात आलेही होते. यात कुठेच इकडून तिकडे जाताना विलंब जाणवला नाही. मध्ये 5 मिनिटं वेळ दिला जात होता. पण रांग वगैरे शिस्त नव्हती. गोलाकार मुलं बसल्याने सगळे शिक्षकांना दिसत होते. अरे हो! सांगायचं राहिलं - सकाळी संध्याकाळी राष्ट्रगीत नाही की संविधानाची घोकंपट्टी नाही. वर्ग चौथीचा होता. शिक्षक मध्ये मांडी घालून बसले होते. मुलं शिसपेन्सिलने लिहीत होती. जवळजवळ सर्व मुलांनी नीटनेटकं लिहिलं होतं. तिसऱ्या वर्गापासून इथे इंग्लिश शिकवलं जातं. आणि गंमत म्हणजे पहिली ते बारावीपर्यंत एकच शिक्षक इंग्लिश शिकवतो / भाषा शिकतो. इंग्लिश द्वितीय भाषा आहे. संस्कृत आणि हिंदी भाषांचाही मुलं अभ्यास करतात. अशी संवादरूप/चर्चारूप पध्दती मोठया वर्गापर्यंत जाणवली. मुलं खूप मोकळी जाणवत होती. मुलं आपापसात अशीच असतात, पण शिक्षण सुरू झालं तिथे गप्प गप्प होतात. तसं जाणवलं नाही.

मुलांना ऑफ तास होता. चला तर, गप्पा मारू या. ''काय वाटतं शिक्षकांबद्दल?'' ''ते आमचे शिक्षक नाहीत. ते दादा आहेत, ताई आहेत. तो वे फॉर्मल Teacher जैसे नहीं है । आते है और पढकर चलाए जाते है।'' ''बाहेर आम्ही बघतो, तेव्हा आम्हाला खूप आश्चर्य वाटतं. शिक्षक वर्गात येतात. बोलतात. लिहायला देतात नि निघून जातात. आमचे दा आणि दी जगातले सगळयात चांगले शिक्षक आहेत. (दुनियामें सबसे अच्छे दा और दी है।)'' मुलांमध्ये हा भावनांक, संवेदनशीलता जास्त जाणवत होती. गप्पा मारणाऱ्या गटाला खूप सांगायचं होतं. कुठून आलं असेल हे? या मुक्त वातावरणातून! की इथल्या प्रणालीतून? सगळयाच मुलांना असं वाटत असेल? दोन दिवसात सगळयांना कसं अनुभवणार? मला नेहमी वाटतं, पाऊस मोजताना पर्जन्यमापकात पडेल तोच पाऊस आपण मोजतो नि आज इतके इंच/से.मी. पाऊस पडला असं मानतो. मग मुलंही त्याच निसर्गाचा भाग आहेत. त्यांच्याबद्दल तसंच मानू या...

''तुम्ही काय शिकता (आप को क्या पढाया जाता है? आप क्या पढ़ते हो?)'' ''आम्हाला कुणी शिकवत नाही. आम्ही आमचं शिकतो. आम्हाला असं वाटत नाही आम्हाला कुणीतरी शिकवायला आलंय. आम्ही कुठे असं शिकतो, आम्ही जे करतो, वाचतो, सादर करतो, एकमेकांच्यात शेअर करतो तेच शिकणं असतं. जसं जसं पुढे जातो, तसं तसं आमच्या लक्षात येतं.'' (ज्या गटाशी बोलत होते तो अगदी सहज समोर आला तो गट होता. सामान्यत: आपल्याकडे 'पुढे' ठेवायची मुलं शाळा निवडते.) बापरे! काय आत्मविश्वासाने ही मुलं बोलतायत! सहज. सरळ. जे मनात आहे, ते! आपल्याकडे असं काय सांगतील मुलं? आपल्याकडं मुलं म्हणतात, ''शिक्षक शिकवतात ते आम्ही शिकतो.'' दोष असं उत्तर देणाऱ्या मुलांचा नाही. मग बोट कोणाकोणाकडे दाखवू या? मी पुन्हा विचारात.

दीदी! (मला खूप बरं वाटलं. खूप प्रेमाने बोलावल्याचा भास झाला.) ''हमारे दादा, हमारी दीदी हमारे आसपास होते है, हमारे बीच में होते है, हमारे साथ होते है। हमसे दूर, हमारे सामने नहीं, हर एक को वो पहचानते है। हम सबकुछ उनके साथ शेअर करते है। वो हमेंसंभालते भी है और छोड भी देते है।'' हे बोलणारा मुलगा अकरावीतला होता. जिथे गरज असते, तिथे पडताना सावरतात, पडल्यावर उठायला मदत करतात, आम्ही उभं राहिलो की आमचं बोट सोडतात. वा! वा! वा! मी टाळया वाजवायच्या ऐवजी 'शॉदो शॉदो' म्हटलं. मुलांना खूप गंमत वाटली.

इथे खूप सांस्कृतिक कार्यक्रम होतात, जे फिल्मी नसतात. मनात म्हटलं, एवढा आशय रवींद्रनाथांनी दिलाय की त्यांना सिनेमातल्या गाण्यावर वाटेल तसं नाचायची गरजच नाही. संगीत आणि नृत्य दुसरीपासूनच जर मुलं शिकत असतील, अनुभवत असतील तर त्यांना फिल्मी अंगविक्षेप करण्याची गरजच भासत नसेल! तिथे सात्त्विता, सभ्यता, सहजता आणि सुंदरता खूप जाणवली. खूप छान वाटत होतं मुलांना ऐकताना! असे सांस्कृतिक कार्यक्रम मुलांवर संस्कार करतीलच ना. यातूनच संस्कृती घडत असणार ना! ''तुझ्या मनातल्या गप्पा बस करा बाईसाहेब! मुलांना ऐका.'' मी मनाला बजावलं.

''दीदी, आम्ही इतके इतके निसर्गात राहतो की आमचं शिकणं (पढाई) सुरूच असते. निसर्ग शाळाच आहे की. प्रकृती हाच आमचा धडा असतो. खूप खूप शिकतोय असा सतत फील येतो आम्हाला. आम्ही वसतिगृहात राहतो. आमचे एक दादा/दीदी इथे येतात. आमच्यासाठी हेच आमचं दुसरं नाही, पहिलं घर आहे. आम्ही एकत्र वाढतो. आमचं आश्रम संमेलन असतं. आम्हीच ते कंट्रोल करतो. शिक्षक आमच्या पाठीशी असतात. ''दीदी, सबसे अच्छी बात ये है हम हम हैं। कोई किसीपर ना तो डिक्टेटरशिप चलाता है, हम सब एक-दूसरे को समझ लेते हैं, मदत करते है, साथमें पढते है, जो फील करते है वो शेअर करते है। विचारसभा होती है। अगर किसीने गलती की, तो विचारसभा जजमेंट करता है। पिटाईका नामही नही।''

बापरे! माझ्या डोळयापुढे खूप साऱ्या सगळया पातळीवरच्या मारामाऱ्या आल्या, अंगठे धरून उभे राहणं, हात वर करून कान पकडून उभं राहणं, छडया आणि कितीतरी... ''म्हणजे तुमची आपापसातही मारामारी होत नाही?'' ''लहान असताना व्हायची. मुलंच ना आम्हीपण.. मोठं होताना आम्हाला कळत गेलं कसा कसा आकार मिळतोय ते.''

इथली साहित्य सभा (शोहित्य शोभा) दर मंगळवारी असते. मुलांनी लिहिलेलं सगळयांसमोर वाचलं जातं. त्यावर बोललं जातं. ''हमारी खुद की रायटिंग हम पढते है।'' मी म्हणाले, ''हमारे यहाँ ये कभी कभी होता है।'' ''दीदी, एक बोलू क्या? पहले एकही बार हम शरमाएँ, लेकीन बादमे कभी नही.'' मला आठवलं, संवेदनशीलता वेगवेगळया मार्गांनी या वयात व्यक्त होतच असते. पण भीती, लाज वाटते नि हे व्यक्त होणं थांबतं, संपतं. इथे ते नाही. या 'शोहित्य शोभा'ची सगळयांनाच वेगळी जाण जाणवली. शाळा असते 6.30 ते 12.30. मग मुलं आपापल्या ठिकाणी जातात. आश्रमातली आश्रमात, घरी जाणारी घरी, पुन्हा संध्याकाळी सगळे इथे येतात, खेळ प्रकल्प, गटचर्चा असे उपक्रम सुरू होतात. आश्रमातली एक मुलगी म्हणाली, ''घरकी याद को समय ही नहीं।'' म्हणजे पुन्हा बांधलंपण आहेच की! सतत मुलांना गुंतवून ठेवणं म्हणजे बांधलंपणच की! थांबू या विचार करायचं...

इथे जवळजवळ 70 शिक्षक आहेत. प्रत्येक वर्गात 30-35 मुलं आहेत. शिवाय शास्त्रीय संगीत, नृत्य (मणिपुरी, कथकली), चित्रकला-रंगकला, वाद्यसंगीत, मातीकाम, शिल्पकाम, लाकूडकाम, रवींद्र संगीत, मातीकाम असे विषय पहिली ते आठवीपर्यंत आहेतच. (हे विषय शिकताना मजाच येत असणार. कारण इथे प्रत्येकाला संधी. म्हणून हे विषय सक्तीचे असा शब्दप्रयोग मी केला नाही.) नववीत मुलं निवड करतात. (अकरावी-बारावीला हे विषय व्होकेशनलमध्ये येतात.)

अरे! सुचितदा दिसतायत. ते म्हणाले होते, मला तास नसेल तेव्हा या तुम्ही! ते जवळजवळ 22-23 वर्षं इथे आहेत.

सुचितदांनी इतिहास इतक्या छान रितीने सांगितला की ते थेट रवींद्रनाथांच्या काळात घेऊन गेले. इथे काही शिक्षक असे 25/30/34 वर्षं आहेत. काही इथलेच विद्यार्थी नि आता इथेच शिक्षक म्हणून आहेत. मुख्याध्यापक तीन झाले. त्यातले रवींद्रनाथांनतर सुप्रियो टागोर त्यांच्याच कुटुंबातले. दुसऱ्या चंचला बॅनर्जी. ह्या इथल्या विद्यार्थी नव्हत्या. तिसऱ्या सध्या असलेल्या अध्यक्ष श्रीमती बोधीरूपा सिन्हा. ह्या इथल्या माजी विद्यार्थिनी. (त्यांच्याशी गप्पा झाल्या, तेव्हा त्यांच्याबद्दल लिहावं. नाही का?)

शांतीनिकेतनहे एक छोटंसं गाव होतं तेव्हा! रवींद्रनाथांनी जी शिकण्याची पध्दत सुरू केली, त्याचं नाव होतं. तो काळ होता 1901. श्री निकेतनची स्थापना झाली ती 1924. याला नाभाभिधान होतं 'ब्रह्मचर्याश्रम'. 1921ला विश्वभारती झाली. पहिली-दुसरी अशा इयत्ता सुरू झाल्या. मग चौथी आणि पाचवी आणि पुढे. इथे खूप लवचीकता आहे, कोणती Compartment नाहीत, कप्पे नाहीत. वातावरण इतकं मोकळं आहे की निसर्ग एक सुंदर Ambience देतो. एरवी शाळा म्हणजे मुलांसाठी सेल्युलर जेल बनतो. तुम्ही खूप ठरावीक वातावरणात काम करता, तेव्हा तुमची विचारप्रणालीही तशीच बनते, तुम्ही त्याच वर्तुळाचा विचार करता. तुम्हाला इथे आल्यावर तुमचा गिअर बदलावा लागतो. या वातावरणाचे हेतू काय आहेत? इथे आहेत मोकळा श्वास घेता येईल अशी आसनव्यवस्था. इथे गर्दी नाही. भिंती नाहीत. मग कोंडलेपण नाही. खिडक्याच नाहीत, त्यामुळे त्या बंद होणं नाही नि वेगळं बाहेर बघावंसं वाटणं नाही. Open window, doorless class room, no fixed class rooms, a gathering under the green tree & green shawdow. यातून मुलांना मुक्ततेची जाणीव होत असेल आणि मुलं त्या अनुभवात दंग होत असतील. याचा शिक्षकांना काय उपयोग? हा प्रश्न नाही. पण मुलाचं मन मात्र free होत असणारच. रवींद्रनाथांना वाटायचं, इमारतीवर (infrastructureda) फार खर्च होता कामा नये. बेेंचेसची, कपाटाची गरजच काय? आकाश, पाणी, झाडं, पानं, फुलं मुलांच्या जवळ हवीत. पक्षी, पाखरं, लहान लहान जीवाणू मुलांच्या जवळ हवेत. शिक्षक पदवीधर आहेत. प्रशिक्षित आहेत, त्याच आपल्या चाकोरीतून आलेले आहेत. काहींना मनात वाटतही असेल आपण कुठल्या युगात जगतोय? काळ कुठे चाललाय? कदाचित मुलांची वाढ आणि विकास अनुभवताना हेच खरं तर बरोबर आहे असंही वाटत असेल. संभ्रम असेल. बाहेरचे स्पर्धेचं जग आणि हे जग नक्कीचवेगळं आहे. बाहेर मुलं प्रसिध्द कशी होणार, टिकणार? असले प्रश्नही पडत असणार. पण रवींद्रविचारांबद्दल जे इथेच घडले-वाढले, ते बोलतही असणार. बोलावं लागणारच ना! त्याशिवाय मनातला नव्या-जुन्याचा गोंधळ कसा दूर होणार? तसं शिक्षकांचं स्ट्रक्चर जरी फॉर्मल असलं, तरी शिक्षकांच्यात शिकवण्याच्या पध्दती, मुलांशी नातं, प्रकल्पांचे विषय, लेखन-वाचन सवयी अशा अनेक घटकांबद्दल चर्चाही होत असणार. ते तत्त्वज्ञान तिथे जे जगलेले आहेत, तिथे बरीच वर्षं राहणारे जगताना इतर जण पाहत असणार! बदलत असणार ते! सुजितदांच्या बोलण्यातून हे जाणवत होतं. त्यांना त्यांचा स्वभाव वेगळया दिशेने बदलावा लागत असणारच. टेक्निकल चौकशीत मला फार अडकायचं नव्हतं. शिक्षेचा परिणाम होतो मुलांच्या कृतीवर, आणि विचारावर. ज्या गोष्टी मुलांच्या हातून घडू नयेत असं दा/दींना वाटतं, त्या मुलांनी केल्या तर त्यांना परामर्श (काउन्सेलिंग) प्रकोष असतोच. अनौपचारिक.

परीक्षेचं काय? मूल्यमापनाचं काय? आठवीपर्यंत पहिल्यापासून ठोस परीक्षा नाहीत. ''वैसा देखा जाये, तो हम जादा test देते हैं। लेकिन कोई टेन्शन नही होता है।'' मुलांचं होतं हे उत्तर! रवींद्रनाथांच्या मते प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन जरुरी नाही. कृतीतून मनात जे बदल होतात ते जाणवून घेणं महत्त्वाचं. इथे फॉर्मल लेसन नोट नाही नि पाठोभवनमध्ये 'मस्टर' नाहीच. मुलं वर्ग बदलतात तेव्हा दा/दी उपस्थिती पाहतात. एखादा वेगळा मुलगा म्हणजे त्या वर्गात नसलेल्या एखाद्या शिक्षकांच्या तासाला येऊन बसला, तर त्याच्या उपस्थिती पत्रकावर तो सही घेतो. (म्हणजे बंधन आहेच की! असं वाटेल ना! काळानुसार केलेला बदल असावा).

इथली झाडं मुलांना किती प्रकारे शिकवतात? विज्ञानाच्या तासाला ही झाडं वेगळी असतात. भूगोलांच्या तासाला वेगळा रोल करतात. कविता शिकताना वेगळा रोल असतो, चित्रकलेला वेगळा रोल असतो. मुलांच्या पेंटिंग्जमध्ये झाडं नेहमीपेक्षा वेगळी व्यक्त होताना दिसली, जाणवली.

सुजितदांना आता वर्गावर जायचं होतं. जाताना म्हणाले, ''1951ला विश्वभारती युनिव्हर्सिटी झाली. रूल्स आले. पाठोभवन हे आता युनिव्हर्सिटीअंतर्गत येतं. प्रेशर्स येतात. त्यातून बाहेर पडायला प्रयत्न करावा लागतो. हे असं संपूर्ण भारतात एकच विद्यापीठ आहे, ज्याच्यात शाळा, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, पाठोभवन, कलाभवन, संगीतभवन येतं.''

विश्वभारतीचं यासाठी स्वतंत्र बोर्ड अाहे. हे बोर्ड/विश्वभारतीचं बोर्ड मुलांना सर्टिफिकेट देतें. 1951पर्यंत हे काहीच नव्हतं. टेक्निकॅलिटी येतात. माध्यमांचं प्रेशर आहे. पालकांना वाटतं, प्रत्येक मूल गायक, वादक बनून पोट कसं भरणार? पैसे कसे कमावणार? खरं तर इथं घडलेली भावनिक बाजू, सामाजिक बाजू, कलेतून सर्जन, विकास यातून बाहेर पडणार मूल वेगळं काम करणारच. बाहेरच्या जगात कुणीही बनलं तरी. असं मला माझं मन सांगत होतं. जे माजी विद्यार्थी भेटले, त्यांच्यावरून जाणवलं.

अरे वा! आज डॉ. देवेंद्र पांडे भेटतायत. ते डॉक्टरेट आहेत, पण पाचवीच्या वर्गातून आले. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तास मात्र चुकवत नव्हते. डॉ. पांडे इथे 32-33 वर्षं आहेत. खरं तर मला इथल्या जुन्या जुन्या विद्यार्थ्यांना भेटायचं होतं. पण नाही लक्षात आलं. वेळही नव्हती. ज्या व्यक्ती 75-80च्या असणार आणि इथले विद्यार्थी असणार, त्यांनी रवींद्रनाथांना पाहिलं असणार. ऐकलं असणार. ते राहिलंच. डॉ. पांडे यांनी दोन ओळी लिहून दिल्या, मग मला कुणीच, कुठेच अडवलं नाही. आणि हो, इथे पाठोभवन शनिवारी-रविवारी नेहमीचंसारखंच सुरू असतं. बुधवार-गुरुवार सुट्टी असते. पाच दिवसांची शाळा.

मी आता श्रीमती बोधीरूपा सिन्हा आणि डॉ. पांडे यांच्या दोघांशी मारलेल्या गप्पांचं कॉम्बिनेशन करणार आहे. डॉ. पांडे यांनी तत्त्वज्ञान मांडलं नी डॉ. बोधीरूपादींनी प्रत्यक्ष अनुकरण मांडलं. हे डॉ. पांडे आता निवृत्तीला आले असावेत, पण मुलांचे 'दा'च आणि बोधीरूपा 'दी'च बरं का! दोघांकडे अगदी लहान वर्गातली मुलं सहज येत होती, काय काय सांगत होती. कुणी हट्ट करत होतं. दोघंही आपापलं काम करताना सारं काही ऐकून घेत होते. शांतपणे, प्रसन्न चेहऱ्याने बोलत होते. भीतिदायकता नव्हती. मुख्याध्यापक असून दोन्ही बाजूंनी मोकळेपणा होता.

जोपर्यंत माणूस निसर्गाशी जोडलेला असतो, बुध्दी-शरीर-मनाने प्रसन्न असतो, तोपर्यंत स्वस्थ, शांतचित्त असतो. आनंदात असतो. गरजा, ओरबाडणं, हाव, सुखाचा शोध घेता घेता निसर्गापासून दूर गेला, निसर्गाला आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून संकटाना निमंत्रण देण्याचं काम त्यानेच केलं. सगळीकडेच उलथापालथ सुरू झाली.

रवींद्रनाथांना वाटायचं, सगळं जग एका झाडाखाली एकत्र व्हावं. विश्वाच्या मूळ रूपात वावरावं. माणसांनी स्वत:ला जाणून घ्यावं, निसर्गाची पूजा करावी, ज्ञान मिळवावं. खरंच त्यांची ही इच्छा इतकी तीव्र होती, सशक्त होती की आज काळ बदलला आहे (1901 ते 1942पर्यंत स्वत: रवींद्रनाथ शांतीनिकेतनमध्ये होते) तरी तशाच पध्दतीने पाठोभवन सुरू आहे. आजही या विचारांची तीव्रता कमी झाली नाही. रवींद्रनाथ वाचण्यातून अनुभवणं आणि त्यांचे विचार प्रत्यक्ष जे जगतायत, त्यांनी अनुभवणं हा खूप वेगळा अनुभव होता. समाजात राहणं, समाजातले बदल अंगावर येणं, बदलांचा आग्रह होणं यात प्रयत्नपूर्वक विचार जगणं अवघड आहे. डॉ. पांडे म्हणाले, ''तालाबका पानी खराब हो तो बेचारी मछली क्या करे।'' खरंच, तिला जिवंत राहायचंय. तो तिचा अधिकार आहे. तिला तडफड करावीच लागणार. जेवढी दूरता निसर्ग-माणसात वाढेल, तेवढा नाशाकडे प्रवास आहे. शांतीनिकेतन (इथे पाठोभवनसाठी सगळीकडे हा शब्द वापरला आहे, तिथे सर्व विश्वभारतीसाठी वापरला जातो.) म्हणजे निसर्गाशी आत्मिक संवाद साधण्याचा प्रयोग आहे. इथले उत्सव - हलकर्षण, कृषीकर्षण, वर्षाउत्सव, वसंतोत्सव, रंगोत्सव, हे सगळे माणसाला आनंद देतात, ते निसर्गात नेतात म्हणून! या उत्सवाला रवींद्रनाथ सर्वांना बोलवत असत. बाहेरची माणसंही यात सहभागी होत असत. हे उत्सव माणसाला एकत्र आणतात, एकाकार करतात. प्रवाहाच्या विरुध्द जाऊन त्याही काळात गुरुदेवांनी या आश्रमाची स्थापना केली. तो ब्रिटिशांचा काळ. इंग्लिश शिक्षण प्रणाली जोर धरू लागली होती. तेव्हाच गुरुदेवांनी या प्रणालीची स्थापना केली. निसर्गात जाऊन निसर्गाशी संवाद साधला तर निसर्ग काय अपेक्षा करतो हे समजेल. तिथे ज्ञानाची वाट सापडेल. तिथे आत्मिकतेचा शोध घेता येईल. ज्ञानाची वाट सापडून त्या वाटेवरून जाताना जी अनुभूती असते, ती अध्यात्माची असते. आपल्याला आपण सापडल्याची असते. शांततेचं वातावरण मिळालं नाही, तर अनुभूती कशी मिळेल? निसर्गात राहून शिकणं हाच स्वर्ग असतो आणि निसर्गापासून बाजूला होणं म्हणजेच नरक असतो.

डॉ. पांडे म्हणाले, ''यहाँ का परिवेश, प्रकृती, सज्जन लोगोसे रवींद्र शिक्षा दर्श का पालन होता है। हम टस से मस नहीं होना चाहते।'' इथून मुलं बाहेर पडतात, तेव्हा त्यांना या सगळया स्पर्धेशी सामना करावा लागतो. ज्या गोष्टी रवींद्रनाथांच्या तत्त्वात बसणाऱ्या नव्हत्या, त्या गोष्टींना मुलांना तोंड द्यावे लागतंय. जे शिकवायचं तो आशय ज्या पुस्तकात त्या पुस्तकाला स्पर्श नाही करायचा. ही गोष्ट मुलांनीही करू नये. खरं शिकणं पुस्तकाबाहेरच घडतं, हा विचार जगायची पूर्ण जबाबदारी शांतीनिकेतनवर आहे. आजच्या काळात तिथे दिसणारं चित्र काचनेतलं वाटणारं आहे. खरं न वाटणारं आहे.

इथले सेवा विभाग, विचार विभाग, साहित्य सभा, कलाविभाग असे अनेक भाग वेगळं काम करतायत. कलाभवनामध्ये मुलं संगीताच्या, नृत्याच्या साधनेमुळे वेगळया लयीत जाणवतात, आपल्यात मग्न जाणवतात. इथल्या पाठयपुस्तकाचं स्वरूप Need based आहे. त्यांना म्हणतातच 'सहजपाठ'. सातवीचं पुस्तक  सिनियर टीचर्सनी कंपाइल केलंय. तयार होणारी पुस्तकं इथल्याच मुलांसाठी, कारण या प्रणालीची शाखा निघणं अवघड आहे. बंगाली मातृभाषेची - माध्यमाची पुस्तकं आहे. भाषेची पुस्तकं इथेच तयार होतात. चौथीचं पुस्तक मी पाहिलं, तर किती आशय होता त्यात! आपल्याकडच्या पुस्तकांसारखी मोठया मोठया आकाराची, मोठया चित्रांची ही पुस्तकं नाहीत. नेहमीच्या पुस्तकांसारखा आकार आहे. विशेष म्हणजे धडे-कवितांच्या शेवटी स्वाध्याय वगैरे भानगड नाही. फक्त उत्तम-दर्जेदार कलात्मक साहित्य एवढाच निकष आहे. आपोआप अभ्यासाचं स्वरूप धडयाखालचे प्रश्न सोडवणं हे नाही. परीक्षा नाही, त्यामुळे गाईड्स नाहीत. गृहपाठ नाहीत, ते साईन करायचा भानगड नाही. शिक्षक मुलांना Own task देतात, ते worksheets करायला सांगतात. मुलं काम करताना मनात येणाऱ्या काचना शिक्षक नोंदवतात. तयार teaching aids वापरत नाहीत. गरज पडेल तशी तयार करतात. अभ्यासक्रम त्यांनी तयार केलेला, तो follow करणार फक्त 'पाठोभवन'. भिंती नाहीत म्हणून रंगवणं नाही, तक्ते नाहीत, पताका नाहीत. इतिहासाच्या दीदींनी सोबत काहीही आणलेलं नव्हतं. इतिहासाचा क्लास ऐतिह्य इमारतीत होता, कारण तिथे खूप काही साधनं ठेवलेली होती. भूगोलाच्या वर्गभर ऐेतिहासिक वस्तू, मुलांचे नकाशे होते. खूप साऱ्या वस्तू होत्या. विज्ञान प्रयोगशाळा विशेषत: अकरावी-बारावीसाठी नेहमीप्रमाणेच होत्या. दुसरीच्या वर्गासाठी लॉटरी पध्दतीने मुलांची निवड होते. म्हणजे Cream of the Society किंवा मिक्स मुलं (आर्थिक मध्यमवर्ग, झोपडपट्टी, अपंग वगैरे) असंही काही नव्हतं. अगदी संथाल जनजातीतलीही मुलं होती. पालक येणारे अगदी साधे वाटले. भाषेमुळे त्यांच्याशी बोलता आलं नाही. त्यांना याची जाणीव होती का की, आपलं मूल भारतातल्या एका वेगळया सावलीत शिकतंय! कुणी रिक्षावाला पालक, कुणी शेतकरी, कुणी मध्यमवर्गीय दिसला. परदेशी मुलंही इकडे तिकडे फिरताना दिसत होती.

बोधीरूपा दीदींनी तर खूप वेळ दिला. इथे मुख्याध्यापकपद सिनिऑरिटीने येत नाही, तर स्वतंत्र नियुक्त होतं आणि ती व्यक्ती विद्यापीठाच्या सिनेटवर असते. बोधीरूपादींचे आईवडील गुरुदेव असताना इथे होते नि चायनीज डिपार्टमेंटला होते. बुध्दाच्या तत्त्वज्ञानाने भारावून गेल्याने आपल्या मुलीचं नाव त्यांनी इतकं सुंदर ठेवलं. मी त्यांनी तसं म्हणालेही. त्यांचा नितळ, प्रेमळ, सोज्ज्वळ चेहरा म्हणाला, ''ही माझ्या आईवडिलांची कृपा!''

मुख्याध्यापक म्हणून मला त्यांना खूप प्रश्न विचारायचे होते. लेसन ऑब्झर्वेशन, शिक्षक ट्रेनिंग, रजा, अभ्यासक्रम पूर्तता, पालक सभा, मोटिव्हेशन, गुरुदेवांचं तत्त्वज्ञान त्यांच्यापर्यंत नेणं वगैरे वगैरे, मेमो देता का, मस्टर, गृहपाठ, स्टाफसभा अगदी सगळया मुद्दयांची सविस्तर उत्तरं त्यांनी दिली. 1) इथे मस्टर नाही. तरी सगळे वेळेपूर्वी येतात. 2) मेमो तर नाहीच नाही. ऍलिगेशन्स होतात, पण नीट विचारपूर्वक चर्चा करून सोडवतात. पालक तक्रार ज्या शिक्षिकेबद्दल होती, अशी शिक्षिका आली होती तिथे. संवाद कळला नाही. समस्या समजली. त्यांनी तिला सांगितलं. जे घडलं ते मनापासून लिहून दे. त्या पालकांशी बोलू आणि प्रश्न मिटवून टाकू. नंतर म्हणाल्या, ती नवीन आहे. पण सोन्सिटिव्ह आहे. एकदम गरज म्हणून पालकांची बाजू घेऊनही चालणार नाही. 3) तास वेगळे काय पाहायचे? बाहेर उभं राहिलं की सगळया झाडाखाली काम सुरू असलेलं दिसतं. वर्गावर्गात जायची भानगड नाही. 4) अभ्यासक्रम पूर्ण होतो, पुस्तक पूर्ण होणं न करणं हे त्या त्यावर अवलंबून सक्तीचं नाही. आणि मुलं बोलतात. जेव्हा मुलं बोलतात, तेव्हा शिक्षक समजतो. तेवढं पुरेसं असतं.
5) पालकसभा गरजेनुसार. वर्गवार दोन तर होतातच. पण अशी गरज नसते. पालकांच्या अपेक्षांना विचारपूर्वक सामोरं जावं लागतं. ते आजच्या काळातले. आम्ही गुरुदेवांच्या. पालकांना ती फिलॉसॉफी माहीत नसली तरी आम्हाला उपयोगी पडणाऱ्या आयडिया पालकांकडूनही येतात. 6) प्रत्येकाला जाणणं, प्रत्येकाशी face to face approach असतो. त्यांनाही व्हिजन असते. दोन काळांना जोडून पुढे नेणाऱ्या कल्पना ते देतात. आम्ही गुरुदेवरूप व्हायचा प्रयत्न करावाच लागत नाही. तिथेच घडलो, वाढलो नि जगतोय. 7) Self-motivation खूप महत्त्वाचं असतं. साठ शिक्षकांच्या साठ methods असतात. माझ्या दृष्टीने हे मीपण समजून घ्यायला हवं. (आपल्याकडे काय काय घडतं?) मुळात बाहेर विचार प्रक्रियाच थांबलीय. इथे तसं चित्र दिसत नाही. याचा अर्थ सर्वच उत्तम, जसं हवंय तसं आहे असं नाही. तसं करते मी! मुळात माझा या तत्त्वप्रणालीवर विश्वास आहे. या निसर्गशिक्षणाने मला वेगळी अनुभूती दिली आहे. 8) प्रत्येकाच्या इच्छेनुसार अभ्यासाचं स्वरूप असतं. मुक्ततेतून स्वैराचार येत नाही. समजूतदारपणा येतो. वाद-विसंवाद होतात. शेवटी माणसंच ना? 9) एकत्र राहण्याने नि काळाच्या परिणामाने नाही म्हटलं तरी अडचणी, प्रश्न, समस्या येतातच. बाहेर गेली मुलं की त्या जगातल्या गोष्टी, इथे आली की जग वेगळं. आमची समस्या नाहीच. उलट मुलांची खूप कमाल आहे असं वाटतं. आणि एकूणच या तत्त्वज्ञानाने भारलेल्या जीवनप्रणालीवर मुलांचा विश्वास आहे, जाणीवपूर्वकता आहे. 10) वयोगटानुसार (वसतिगृह) आश्रम व्यवस्था आहे. 2 ते 4साठी, 5 ते 7साठी, 8 ते 10साठी व 11 ते 12साठी असे मुलांसाठी वेगळे नि मुलींसाठी वेगळे आश्रम आहेत. मृणालिनी आश्रम आणि इतर आश्रमही पाहिले.

खरंच, मोकळेपणा, स्वातंत्र्य, आनंद, अनुभूती हे इथे शब्द नाहीत, वास्तव आहे. विचार करताना ग्रंथालयाजवळ आलो. आणि ग्रंथपाल दीदी मुलांशी वाचनाबद्दल बोलत होत्या, त्यांना मदत करत होत्या. बापरे! पुस्तकं देतानाही विचित्र चेहरा करणाऱ्या ग्रंथपालापेक्षा हे ग्रंथलय लगेच वेगळं जाणवलं. इथे प्रत्येक मुलगा आठवडयाला एक पुस्तक वाचतोच. मोठया मुलांना आठवडयाला दोन पुस्तकं दिली जातात. 36802 पुस्तकं असणार हे शमींद्र पाठागार आहे. दीदी म्हणाल्या, ''मुलं आवडीची पुस्तकं घेतात. खूप खूप वाचतात. सतरंजी घातलेली आहे. मुलांना जमेल तसं मुलं येतातच. वाचतात. बोलतात.'' कमाल आहे, सगळीकडे गुरुदेवांचे सुंदर फोटो आहेत, वचनं आहेत, साहित्य आहे, भव्यता आहे, दिव्यता आहे.

हे व्यक्त झालंय हा काही क्षणांचा फील आहे. खोचक आणि टोचक काही विचारायचंच नव्हतं. जाणायचं होतं. पाहायचं होतं. बोलायचं होतं. समजून घ्यायचं होतं. वाचलेल्या रवींद्रनाथांना शोधायचं होतं. मनात साठवायचं होतं. क्षण कसे भारावलेले. कुठून कुठून गीतांजलीतल्या प्रार्थना जाणवत होत्या. आणि तिथे असताना खरंच एका वर्षा उत्सवाच्या निमित्ताने अनुभवल्याही. आत्ताच्या काळात डोळयांना दिपवणारं नि मनाला प्रज्वलित करणारं हे पाठोभवन, तिथली झाडं, फुलं, पानं, मुलं, शिक्षक, वस्तू, वास्तू सगळं सगळं भरून घेऊन मला नवा प्रवास सुरू करायचाय.

मला वाटतं, पाठोभवनमधील प्रत्येक कृती, प्रत्येक बाजू, प्रत्येक वस्तू यामागे, यातून रवींद्रनाथ विचार शलाका जाणवते. आजच्या काळात तिचं लकाकणं वेगळं आहे. इथे कुठेच रवींद्रनाथांचे विचार, वाक्यं मी दिली नाहीत. कारण याची डोळा ती अनुभवली. जे विचार प्रत्यक्ष अनुभवले ते मग उताऱ्यांच्या रुपात रवींद्र विचार वेगळे कशाला लिहावे!

9403693225

[email protected]