सण विजयाचा

 विवेक मराठी  04-Oct-2016

भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना विशेष महत्त्व आहे. गुढीपाडवा, दिवाळी, होळी-रंगपंचमी अशा सणांच्या निमित्ताने  आप्तस्वकीयांच्या भेटी होतात, आनंद वाटता येतो. हे  सर्व सण भारतभरात तितक्याच उत्साहाने  साजरे  केले  जातात. विजयाचा सण असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो  सण म्हणजेच विजयादशमी अर्थात 'दसरा'. दसरा देखील संपूर्ण भारतात तितक्याच उत्साहाने  साजरा केला जातो. वेगवेगळया राज्यांत वेगवेगळया पध्दतींनी दसऱ्याचा आनंद लुटला जातो.

 
भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना विशेष महत्त्व आहे. गुढीपाडवा, दिवाळी, होळी-रंगपंचमी अशा सणांच्या निमित्ताने  आप्तस्वकीयांच्या भेटी होतात, आनंद वाटता येतो. हे  सर्व सण भारतभरात तितक्याच उत्साहाने  साजरे  केले  जातात. विजयाचा सण असं ज्याचं वर्णन केलं जातं, तो  सण म्हणजेच विजयादशमी अर्थात 'दसरा'. दसरा देखील संपूर्ण भारतात तितक्याच उत्साहाने  साजरा केला जातो. वेगवेगळया राज्यांत वेगवेगळया पध्दतींनी दसऱ्याचा आनंद लुटला जातो. कोणतंही नवीन कार्य सुरू करायचं असेल किंवा एखादी नवी वस्तू घ्यायची असेल, तर हा दिवस त्यासाठी चांगला मानला जातो.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा सण. दसरा या सणाशी संबंधित अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात. दुर्गेने  महिषासुराशी नऊ रात्री, नऊ दिवस अखंड युध्द केल्यानंतर त्याचा वध झाला आणि देवांचा जय झाला तो  दिवस म्हणजे  आश्विन शुध्द दशमी. दहाव्या दिवशी महिषासुराचा वध झाला, म्हणून या दिवसाला दशहरा - अर्थात दसरा हे  नामाभिधान प्राप्त झाले. याच दिवशी रावणवध करून श्रीरामांनी सीतेची मुक्तता केली. अज्ञातवासाच्या काळात अर्जुनाने  शमी वृक्षावर लपवलेली शस्त्रे  याच दसऱ्याच्याच दिवशी खाली उतरवली आणि कौरवसैन्यावर स्वारी केली. या सगळया संकेतांना, आख्यायिकांना अनुसरूनच आश्विन शुध्द दशमीला विजयादशमी असं म्हटलं जाऊ लागलं.

दसऱ्याला सार्वत्रिक सण म्हटलं जातं. कारण भारतभरात समाजाच्या सर्व स्तरांत तितक्याच उत्साहाने  दसरा साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला काही ना काही सामाजिक अंग असल्याचं आपल्याला आढळतं. दसरा साजरा करण्यामागे  केवळ पौराणिक मिथकंच नाहीत, तर तो  लोकोत्सव आहे. हा कृषिवलांचा सण म्हणूनही ओळखला जातो. पाऊस सुरू होण्याची लक्षणं दिसू लागताच कामाला जुंपलेला शेतकरी पुढील चार महिने  अहोरात्र कष्ट करत असतो, तेव्हा कुठे पीक हातात येतं. दसऱ्याच्या दिवशी पहिलं पीक देवाला वाहण्याची प्रथा भारतात अनेक ठिकाणी प्राचीन काळापासून आहे. अनेक घरांमध्ये  घटस्थापनेच्या दिवशी नऊ धान्याची रुजवण केली जाते  व उगवलेले  अंकुर देवाला वाहून दसरा साजरा केला जातो. कृषिसंस्कृतीशी असलेलं आपलं नातं असा संकेतांतून अधिक गडद होत जाते.


प्रांतोप्रांतीचा दसरा

दसरा म्हणजे  सीमोल्लंघनाचा दिवस. अपरान्हकाळी गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमीची, आपटयाची पूजा करायची. आपटयाची पानं आणून सोनं म्हणून देवाला वाहायची व आप्तांना लुटायची अशी महाराष्ट्रातील परंपरा आहे. या दिवशी शस्त्रपूजन केलं जातं. तसंच सरस्वतीची पूजा व शैक्षणिक साधनांची पूजा केली जाते. शेतातील लोब्यांचं, झेंडूंचं तोरण दाराला बांधलं जातं. शुभशकुन म्हणून आंब्याचा टाळा दाराला लावला जातो.

मराठेशाहीत व पेशवाईच्या काळात सीमोल्लंघनाला लष्करी महत्त्व प्राप्त झालं. पावसाळयाच्या काळात नदी-नाले  ओसंडून वाहत असतात. त्यामुळे  या काळात राजेरजवाडे आपल्या मोहिमा बंद ठेवत. नवरात्राच्या सुमारास पावसाने  हळूहळू परतीचा प्रवास सुरू केलेला असतो. नदी-नाले  ओसरू लागलेले  असतात. दसऱ्याच्या मुहूर्ताला सीमोल्लंघन करायचं आणि पुढच्या मोहिमांना सुरुवात करायची, अशी मराठयांची पध्दत होती.

उत्तर भारतात शारदीय नवरात्र आणि दसरा या सणाला विशेष महत्त्व असतं. नवरात्रीच्या काळात नऊ दिवस देवीची पूजा असते. दहाव्या दिवशी या दुर्गापूजेची सांगता होते. रामलीला हा लोकनाटयाचा प्रकार या दिवसांत सादर केला जातो. दसऱ्याच्या एक महिना आधी रोज रात्री रामलीला सादर केली जाते. त्याची सांगता होते  रावणदहनाने. रावणदहनाचा विधी हे  उत्तर भारतातील विशेष आकर्षण. दसऱ्याच्या दिवशी रावणाची प्रतिकृती तयार करायची. रामायणातील रावणदहनाच्या प्रसंगाचं व श्रीरामांच्या विजयाचं स्मरण करत त्या प्रतिकृतीचं दहन करायचं, फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा करायचा अशी प्रथा दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात आहे.

प. बंगाल, ओडिशा आणि आसाम या राज्यांमध्ये  दसरा हा दुर्गापूजेच्या रूपात साजरा केला जातो. बंगालमध्ये  पाच दिवस, तर ओडिशा आणि आसाममध्ये  चार दिवस दुर्गापूजा असते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी मोठया भक्तिभावाने  दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. बंगाल परिसरातील नवरात्र हे  तिकडच्या पूजाविधींसाठी जेवढं प्रसिध्द आहे, तेवढंच ते  दुर्गेच्या मूर्तींसाठीही आहे. अतिशय रेखीव डोळयांच्या, पांढरी वसनं ल्यायलेल्या या मूर्ती अत्यंत बोलक्या असतात. षष्ठी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी असे  चार दिवस नवरात्र साजरं केलं जातं. देवीच्या भांगात सुवासिनी कुंकू  भरतात आणि एकमेकींनाही लावतात. नवमीच्या दिवशी स्त्रिया 'सिंदूर खेला' म्हणजेच कुंकवाची होळी खेळतात. विवाहोत्सुक मुली देवीचा प्रसाद असणारा सिंदूर भांगात भरतात. असं केल्याने  विवाह लवकर होतो  असा समज आहे.

हिमाचल प्रदेशात कुल्लू खोरे  येथे  साजरा केला जाणारा दसरा हे  जगभरातील लोकांचं आकर्षण आहे. कुल्लू खोऱ्यातील धालपूर मैदानात दसरा साजरा केला जातो. या उत्सवाचा कार्यक्रम सात दिवस चालतो. रघुनाथ ही कुल्लू येथील प्रमुख देवता. दसऱ्याच्या आदल्या दिवशी निरनिराळया गावांतील देवतांच्या पालख्या रघुनाथाच्या मंदिरापुढे येतात व दसऱ्याच्या दिवशी रघुनाथाची रथयात्रा निघते. त्या वेळी रघुनाथाच्या पुजाऱ्याच्या अंगात देवीचा संचार होतो  असं मानलं जातं व लोक आपल्या निरनिराळया शंका त्यांना विचारतात. त्या दिवशी रघुनाथासमोर लोक विविध प्रकारचे  नृत्य सादर करतात. शेवटी रघुनाथाचा रथ वाजतगाजत व्यास नदीच्या तीरावर आणतात. सुक्या लाकडांची व गवताची लंकानगरी तिथे  तयार केली जाते  व तिचं दहन करण्यात येतं. चांदण्याच्या प्रकाशात हा सर्व कार्यक्रम होतो. कुल्लूतील सर्व स्त्रीपुरुष नटूनसजून या आनंदोत्सवात हजर राहतात. जगभरातून अनेक लोक या कार्यक्रमाला मुद्दामहून येतात.

म्हैसुरू हे  दक्षिण भारतातील महत्त्वाचं शहर. कुल्लूप्रमाणे  म्हैसुरूमध्येही दसरा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. दसरा हा कर्नाटकातील शासकीय सण असून 'नदहब्बा' म्हणून प्रसिध्द आहे. देवी चामुंडेश्वरीने  महिषासुर दैत्याचा याच दिवशी वध केला, म्हणून या सणाला विजयादशमी आणि या शहराला म्हैसूर हे  नाव मिळालं अशी आख्यायिका आहे. विजयनगरच्या राजांनी पंधराव्या शतकात विजयाचं प्रतीक म्हणून श्रीरंगपट्टण येथे  हा सण सुरू केला. दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण शहर फुलांनी, वेगवेगळया दिव्यांनी आणि कंदिलांनी सजवलं जातं. दागिन्यांनी आणि रेशमी झुलींनी सजवलेल्या हत्तींची रस्त्यावरून मिरवणूक काढली जाते. रावण, मेघनाद आणि कुंभकर्णयांच्या प्रतिकृतींचं दहन केलं जातं. दसऱ्याच्या निमित्ताने  म्हैसुरू पॅलेस महिनाभर दिव्यांनी झगमगून जातो. देवी चामुंडेश्वरीची पूजा करून नंतर हत्तीवरून सोन्याच्या अंबारीतून म्हैसुरू पॅलेसपासून बन्नी (शमी) मंडपपर्यंत तिची मिरवणूक काढली जाते. म्हैसुरूचा हा दसरा सोहळा जगभराचं आकर्षण ठरतो.


संस्थाने  विलीन होण्यापूर्वी राजपूत राजे  राजस्थानात अतिशय उल्हासात दसरा साजरा करत असत. आजही ती पध्दत रूढ आहे. आजही राजपूत दसऱ्याच्या दिवशी आपल्या गुरूंच्या दर्शनाला जातात. उदयपूरमध्ये  शहराबाहेर या दिवशी तंबू उभारले  जातात. उदयपूरचे  राणा आपले  सरदार व मानकी घेऊन शहराबाहेर जातात व शमीची पूजा करतात. सरदार मानकरी शेठ सावकार राणांना नजराणे  देतात. भाट लोक मेवाडच्या पराक्रमाचे  वर्णन करणारे  वीरकाव्य गातात.

महाराष्ट्र आणि गणपती हे  जसं समीकरण आहे, तसंच गुजरात आणि नवरात्र आहे. गुजरातमध्ये  दसऱ्यापेक्षा नवरात्रींना अधिक महत्त्व आहे. नवरात्रींमध्ये  देवीच्या आरतीनंतर रात्रभर गरबा खेळला जातो. दसऱ्याच्या दिवशी नवरात्रींचे  उपास सुटतात व दसऱ्याच्या दिवशी कुमारिकांना देवी मानून त्यांची पूजा केली जाते. त्यांना भेटवस्तू दिल्या जातात व नंतर उपास सोडला जातो.

केरळमध्ये  महाराष्ट्राप्रमाणेच दसऱ्याच्या दिवशी आयुधांची व सरस्वतीची पूजा केली जाते. घराच्या अंगणात रांगोळी काढली जाते. तांदळाचं पीठ पाण्यात कालवून ही रांगोळी काढतात, तिला कोलम म्हटलं जातं. घरात पाटावर रेशमी वस्त्र घालून त्यावर आयुधं ठेवून त्याची पूजा केली जाते.

भारतासह नेपाळ, मलेशिया, श्रीलंका, चीन आणि मॉरिशस या शेजारील देशांमध्येही दसरा साजरा केला जातो. आजही या देशांमध्ये  रामाला सत्युगातील महानायक म्हणून पाहिलं जातं. त्याच्या पराक्रमाची स्मृती दसऱ्याच्या निमित्ताने  जागवली जाते.

'दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा' असं या सणाचं वर्णन केलं जातं. युध्दभूमीत गाजवलेला पराक्रम, शेतकऱ्यांच्या अहोरात्र श्रमाचं फलित असणारी सुफल समृध्दी, घराची झालेली भरभराट या सगळयांचं प्रतीक म्हणून दर वर्षी तितक्याच आनंदात भारतात दसरा साजरा होतो.

9920450065