प्रवासात तब्येत सांभाळा

 विवेक मराठी  19-Dec-2016

मराठी माणूस तसा भ्रमणप्रिय आहे. जरा कुठे सुटी मिळायचा अवकाश की त्याचं लगेच फिरण्याची आखणी करण्याचं काम सुरू होतं. तसा प्रवास म्हणजे नवे प्रदेश बघणं, नव्या लोकांना भेटणं आणि वेगळे आनंदाचे क्षण मनात साठवून परत फिरणं असतं. पण अशा आनंदात एका कारणाने विरजण पडू शकतं. प्रवासात कोणी आजारी पडलं, तर सगळया रंगाचा बेरंग होऊन जातो! म्हणून भटकंतीदरम्यान आजारी न होण्याची काळजी घेणं खूप जरुरीचं आहे. आता मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे आजारी न पडण्याची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं. यासाठी काही मूलभूत गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
राठी माणूस तसा भ्रमणप्रिय आहे. जरा कुठे सुटी मिळायचा अवकाश की त्याचं लगेच फिरण्याची आखणी करण्याचं काम सुरू होतं. तसा प्रवास म्हणजे नवे प्रदेश बघणं, नव्या लोकांना भेटणं आणि वेगळे आनंदाचे क्षण मनात साठवून परत फिरणं असतं. पण अशा आनंदात एका कारणाने विरजण पडू शकतं. प्रवासात कोणी आजारी पडलं, तर सगळया रंगाचा बेरंग होऊन जातो! म्हणून भटकंतीदरम्यान आजारी न होण्याची काळजी घेणं खूप जरुरीचं आहे.

आता मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे आजारी न पडण्याची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं. यासाठी काही मूलभूत गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. आपण प्रवास जगाच्या कुठल्या भागात करतो आहोत आणि आपलं प्रवासाचं उद्दिष्ट काय आहे. मुळात आपण घराबाहेर पडण्याची अनेक कारणं असतात. जग बघायचं या दृष्टीनं केलेली भटकंती आणि तीर्थयात्रा यात खूप फरक आहे. विद्यार्थी म्हणून दुसऱ्या देशात अथवा देशाच्या वेगळया भागात जाणं निराळं नि साहसाची आवड जोपासावी यासाठी वळकटी बांधणं भिन्न म्हणायला हवं.

प्रवासाचं कारण काहीही असो, आताच्या काळात आरोग्य विम्याचं संरक्षण पाठीशी असणं ही आज काळाची गरज झालेली आहे. परदेशात जाताना तर व्हिसा मिळवण्यासाठी काही देशांनी ते अपरिहार्य केलेलं आहे. विमा पुरेशा दिवसांसाठी हवा. प्रवासाच्या दिवसांपेक्षा तो थोडासा जास्त दिवसांसाठी घेतलेला बरा. अत्यंत कमी पैशांमध्ये तुम्हाला 5 ते 10 लाख डॉलर्सचा विमा मिळू शकतो. आता तर केवळ एका बटणाचा उपयोग करून तुम्ही घरबसल्या तुमचा प्रवासी विमा उतरवू शकता. फक्त त्या विम्याचं बारीक अक्षरात असलेलं पत्रक पूर्ण वाचून काढा. तुम्हाला पूर्वीपासून असलेले आजार लपवू नका. विमा कंपन्या काही मूर्ख नसतात. त्यांना आपला फायदा पाहायचा असतो. आपण आपल्याच देशात जातोय म्हणून निष्काळजी होऊ नका. तुमचा आरोग्य विमा आधीच काढला असेल, तर त्याची कागदपत्रं सोबत घ्या. कॅशलेस विम्याच्या बाबतीत तुम्ही ज्या प्रदेशात जाणार आहात, त्या प्रदेशातल्या कोणत्या हॉस्पिटल्समध्ये तुमचा विमा चालतो की नाही ते पाहा. त्या हॉस्पिटल्सची यादी सोबत बाळगा. म्हणजे तुम्हाला काळजी करण्याचं कारण उरणार नाही. विद्यार्थ्यांना तर विमा असणं खूपच महत्त्वाचं आहे. त्या त्या देशात चालणाऱ्या विमा कंपन्यांचा विमा उतरवला आहे, याची खातरजमा करायलादेखील विसरून चालणार नाही.

आता थोडासा अभ्यास करा. आपण जिथं प्रवासाला निघालोय त्या भागात काही विशिष्ट आजार असल्यास त्याची माहिती मिळावा. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटना नियमितपणे प्रसिध्द करत असते. ही माहिती सखोल अभ्यासाअंती दिली जात असल्याने आणि त्यात रोजच्या रोज भर घातली जात असल्याने ती पूर्णत: अप टू डेट असते. शिवाय प्रवासादरम्यान काय खबरदारी घ्यायची आणि जाण्याआधी कोणत्या लसी घ्यायच्या याची अद्ययावत यादी त्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. प्रवासापूर्वी त्यावर एक नजर घालायला काय हरकत आहे? कारण आपल्याला जगाची बित्तंबातमी असेलच असं नाही. शिवाय जगात कुठे कोणती साथ अचानक उद्भवेल याची खात्री नसते. आफ्रिकेत जाताना पिवळया तापाची लस घेणं मुळात बंधनकारक आहेच. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे आरोग्याच्या बाबतीत एकदम खरं आहे. लसींचा उपयोग करून हे काम छान साध्य करता येईल.

आता स्वत:ची तयारी. म्हणजे आपल्याला काय काय त्रास होतो, कुठले आजार आधीच आपल्या शरीरात घर करून आहेत हे पाहणं आणि त्यानुसार प्रवासाची आखणी करणं. विदेशात - विशेषत: युरोपात प्रत्येक ठिकाणी गाडया जात नाहीत. त्यामुळे खूप चालावं लागतं. तीर्थयात्रेची अनेक ठिकाणं उंच डोंगरावर असतात. काही ठिकाणी पायऱ्या असतात, असल्या तरी उंच उंच असतात. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी याचं भान ठेवायला हवं. एका पेशंटला घोडयाच्या लिदीची ऍलर्जी होती. पण हे विसरून ते वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले. तिथे भरपूर घोडे होते. त्यांना दम्याचा इतका त्रास झाला की त्यांची यात्रा झाली, पण ती हॉस्पिटलची!

आपल्याला खाण्याच्या वस्तूंपैकी कसली ऍलर्जी असली, तर तेदेखील लक्षात घ्यायला हवं कारण वेगळया देशांची खाद्यसंस्कृतीही वेगळी असते. तिथले खाद्यपदार्थ बनवताना त्यात कोणते साहित्य वापरलं गेलं आहे, याची आपल्याला कल्पना असेलच असं सांगता येत नाही. म्हणून त्याचा शोध घेणं फायद्याचं ठरू शकतं. थोडीशी सावधानता आपल्याला पुढच्या मोठया अनर्थापासून नक्कीच वाचवू शकेल. एकटेच प्रवासाला निघणार असाल, तर आपल्याला असलेल्या आजारांची माहिती एका कार्डवर लिहून ते कार्ड सोबत बाळगणं ही चांगली सवय आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे आजार असणाऱ्यांनी हे निश्चितपणे करावं. एखाद्याला मधुमेह असेल आणि त्याचं रक्तातलं ग्लुकोज अचानक कमी झालं असेल, तर ती व्यक्ती बेशुध्द होऊ शकते. बेशुध्द व्यक्ती आपली माहिती देऊ शकत नाही. त्या व्यक्तीच्या खिशात अगर अंगावर याची माहिती देणारं कार्ड असेल तर त्याचं निदान लवकर होईल आणि त्या व्यक्तीचा इलाज विनाविलंब होऊ शकेल. तसंच त्या व्यक्तीने त्याला अथवा तिला असलेल्या औषधांच्या ऍलर्जीदेखील त्या कार्डावर नमूद कराव्यात. म्हणजे डॉक्टरांकडून यासोबत आपलं वय चाळिशीच्या पुढे असेल, तेव्हा आपल्या काही मूलभूत तपासण्या करून घेतल्या तर बरं. मुख्यत्वे हृदयाशी संबंधित तपासण्यांना नक्कीच प्राधान्य द्यायला हवं. मध्यम वयात छुपा हृदयरोग अशक्य नाही. त्यासाठी जर तुम्हाला दोन-चार जिने चढल्यावर दम लागत असेल, तर त्याचा तुमच्या हृदयाशी काहीच संबंध नाही याची पक्की खातरजमा करून घ्यायला हवी. ज्यांना हवेत ऑॅक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी जायचं असेल, त्यांनी फुप्फुसांची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी. तिबेट, मानसरोवर, हिमालय, अमरनाथ यात्रा यासारख्या ठिकाणी ऑॅक्सिजन कमी असतो आणि श्वसनाचे विकार असलेल्या मंडळींना तिथे बराच त्रास होऊ शकतो. प्रसंगी त्यांचा जीवदेखील जाऊ शकतो. रक्तातलं हिमोग्लोबिन कमी असलेल्या व्यक्तींनी त्यांचं हिमोग्लोबिन नॉर्मलच्या जवळपास येईपर्यंत आपलं जाणं पुढे ढकलावं. कारण अशांची ऑॅक्सिजन शोषून घ्यायची क्षमता हिमोग्लोबिन कमी असल्याने कमीच झालेली असते. हवेत ऑॅक्सिजनचं प्रमाण कमी असताना त्यांचा त्रास आणखीनच उफाळून येईल.

प्रवासादरम्यान लागणारी औषधं नेणं ही पुढची तयारी. बहुधा ज्याला आपण 'फर्स्ट एड बॉक्स' म्हणतो, तो लांब पल्ल्याचा प्रवासाचा सोबती असायलाच हवा. त्यात औषधांचा पुरेसा साठा असावा. साधारणत: जुलाब थांबवण्याची, ताप, डोकेदुखी, वांत्या, पोटदुखी, ऍलर्जी बंद करण्याची औषधं या पेटीत असावीत. दुखलं खुपलं तर वेदनाशामक गोळया, लावायची मलमं, जखमांना करायची मलमपट्टीची साधनं असू द्यावीत. मोठया गटाने प्रवास करताना एकापेक्षा अधिक फर्स्ट एड बॉक्स बाळगावेत. ग्रूपमधल्या सर्वांची ऍलर्जी लक्षात घेऊन पेटीतली औषधं गोळा करावी. जंगलात जाणार असाल, तर कीटकनाशक फवारे सोबत ठेवा. मलेरियासारख्या डासांपासून होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या ठिकाणी जाताना मच्छरदाणी असणं फायद्याचं आहे. किमान डासांना पळवून लावणारी मलमं अथवा स्प्रे गाठीला असावा. पट्टया कापायला कात्री वगैरे सोबत घेतली असेल, तर एक लक्षात ठेवा. विमानात चढण्यापूर्वी सुरक्षा कर्मचारी कात्री अथवा चाकू काढून घेतात. विमानात या वस्तू न्यायला परवानगी नसते. त्या तुमच्या चेक इन लगेजमध्ये ठेवल्या गेल्या पाहिजेत. पॅकिंग करताना हे विसरू नका.

सर्व औषधांसाठी डॉक्टरी चिठ्ठी असावी. त्याची झेरॉक्स प्रत बाळगायलादेखील हरकत नाही. परंतु तुम्ही जितक्या दिवसांसाठी प्रवासाला जाणार असाल, त्यापेक्षा आठेक दिवसांचा साठा जास्त बरोबर न्या. इतर ठिकाणी तुम्ही वापरात असलेली औषधं तंतोतंत मिळतीलच असं नाही. परदेशात तर आपल्यासारखा केमिस्ट कुठलंही औषध देत नाही. तिथे प्रत्येक वेळी डॉक्टरांची चिठ्ठी बंधनकारक आहे आणि तिथे औषधं खूप महाग असतात. इन्श्युलीनच्या बाबतीत काही सूचना कराव्या लागतील. कारण इन्श्युलीन हे उष्णतेने बिघडणारं औषध आहे. गाडीने प्रवास करणाऱ्यांनी आपलं इन्श्युलीन थेट ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवू नये. उष्णतेपासून दूर थंड जागी ठेवावं. उष्ण वातावरणात खराब झालेल्या इन्श्युलीनमध्ये पांढरे कण तरंगताना दिसतात. असं काही झालं की ते इन्श्युलीन चक्क फेकून द्यावं लागतं. म्हणून इन्श्युलीनचा जास्त साठा ठेवावा. इन्श्युलीन अथवा मधुमेहाची औषधं घेणाऱ्यांनी सोबत खाण्याच्या वस्तू सहज सापडतील अशा बाळगाव्या. बिस्किटं, ठेपले लवकर खराब होत नाहीत. मात्र साखर अथवा ग्लुकोज जवळ ठेवताना खबरदारी घ्या. अनेक देशात ग्लुकोजच्या पावडरींना ड्रग्ज असल्याचं समजून त्या प्रवाशाची सखोल चौकशी केली जाते. त्यात तुमचा खूप वेळ वाया जाऊ शकतो.

इतकं करून तुम्ही ईप्सित स्थळी पोहोचलात, तरी तिथला आनंद लुटताना काही गोष्टी लक्षात ठेवणं चांगलं. आपण त्या जागच्या वातावरणाला योग्य असे कपडे परिधान केले पाहिजेत. तशी आखणी प्रवासापूर्वीच केलेली असावी. बरेच जण प्रवासातल्या कपडयांवर भरपूर खर्च करतात, परंतु पायात घालायच्या पादत्राणांचा विचार करत नाहीत. चालणं सोपं जावं असे बूट असावेत. त्यांचे सोल झिजलेले नसावेत. प्रत्यक्ष प्रवासात वापरण्यापूर्वी ते दोन चार वेळा इथे वापरले गेले पाहिजेत. आयत्या वेळी घातलेत आणि तुम्हाला शू बाईट झालं, तर वेदना सहन करत प्रवास करण्याची पाळी येईल, ते नको. जंगल सफारी करणाऱ्या मंडळींनी प्रत्येक वेळी बूट पायात चढवताना ते उलटे करून पाहावे. विंचवासारखा विषारी प्राणी काही वेळा बुटात दडून बसल्याची अनेक उदाहरणं आहेत. हायकिंग किंवा गिरिभ्रमण करणाऱ्या लोकांनी चांगले सोल असलेले बूट वापरावे. कारण तिथल्या निसरडया जागांवर घसरून जीव जाण्याचा धोका पत्करण्यात अर्थ नसतो.

तसं सर्वांनीच अपघातापासून आपलं संरक्षण केलं पाहिजे. परंतु जी मंडळी खास हायकिंग किंवा गिरिभ्रमण अथवा साहसी खेळ याच कारणासाठी पर्यटनाला जातात, त्यांनी साहस आणि आत्मघात यात असलेल्या अत्यंत सूक्ष्म रेषेचं भान ठेवूनच वागलं पाहिजे. हल्ली सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांचे जीव जाताना दिसतात. म्हणून फोटो काढा, पण जपून. कडयाच्या टोकाला, समुद्राच्या किनारी जरा जास्तच काळजी घ्या. तुम्ही आयुष्यभर जपण्यासाठी असा ठेवा मिळवण्यासाठी फिरायला निघाला आहेत. तिथे भलतंच काही वाटयाला येऊ नये, म्हणून अपघात आणि तब्येतीचे प्रश्न यापासून दूर असणं हे सगळयात महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त आनंद लुटा. एन्जॉय करा. त्यासाठीच तुम्ही पैसे खर्च करता आहात.

 9892245272