जनतेचा संकेत

 विवेक मराठी  07-Dec-2016

ऱ्याच वेळा असे होते की जनमत कसे आहे? हे समजून घेण्यासाठी स्वतःला विद्वान म्हणवणारे कमी पडतात आणि मग आपले अल्प आणि संकुचित विचार मांडून तेच खरे जनतेचे मत आहे असा डांगोरा पिटत राहतात. विषय एवढयावर थांबत नाही, तर आपण आणि आपले सारे पाठीराखे उघडे पडतो आहोत, जनता आपल्याला साथ देत नाही यांचा वारंवार प्रत्यय येऊनही ही मंडळी आपला हेका सोडत नाहीत, उलट आपण जनताजनार्दनाचे एकमेव हितरक्षक असल्याचा आव आणला जातो. आपल्या देशातील विविध विरोधी पक्ष आणि काही प्रसारमाध्यमे यांच्या बाबतीत असे चित्र खरे असल्याचे आपण गेले काही दिवस अनुभवत आहोत.


आठ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय केला. या निर्णयामागे असणारा शुध्द हेतू पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत न सांगताही देशातील जनतेला कळला आणि देशातील सर्वसामान्य जनता या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. पंतप्रधानांच्या निर्णयानंतर होणाऱ्या त्रासाला जनता सामोरी जात असताना विरोधक आणि काही प्रसारमाध्यमे आपल्या कृतीतून आणि विचारातून नोटबंदीचा हा निर्णय कसा उधळला जाईल आणि जनता सरकारविरुध्द रस्त्यावर कशी उतरेल यासाठी प्रयत्न करत होती. काहींनी चिथावणीखोर भाषणे केली. एटीएमच्या रांगेत उभे राहून जनता आपल्या पाठीशी येते का? हेही आजमावून पाहिले. पंतप्रधानांनी अशा प्रकारचा निर्णय खूप खूप घाईने आणि जनतेला विश्वासात न घेता घेतला, अशीही आवई विरोधकांनी उठवून पाहिली. त्यालाही जनता प्रतिसाद देत नाही असे लक्षात आल्यावर आपले अस्तित्व जपण्यासाठी मागच्या 28 तारखेला या मंडळींनी 'भारत बंद'ची हाक दिली. संसदेत या विषयावर विरोधक तोंडघशी पडले होते, पण 'गिरे तो भी टांग उपर' या न्यायाने विरोधकांनी भारत बंदची हाक दिली.

विरोधकांनी बंदची हाक दिली असली, तरी त्याला प्रतिसाद लाभला नाही. जनता आपल्या सोबत येत नाही, रस्तावर उतरून सामाजिक जनजीवन विस्कळीत करता येत नाही हे लक्षात येताच कॉग्रेसने 'भारत बंद'ला 'आक्रोश मोर्चा'त रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही अत्यंत वाईट प्रतिसाद लाभला. ज्यांचे ज्यांचे हात दगडाखाली सापडले आहेत, असेच लोक भारत बंदची उठवळ भाषा करत होते. पण जनतेने त्यांना साथ दिलेली नाही. राजकीय विरोधकांचे असे वागणे एक वेळ राजकारण म्हणून समजून घेतले, तरी लोकशाहीचा प्रहरी म्हणून काम करणाऱ्या प्रसारमाध्यमातील काही मंडळीही खूप मोठया अभिनिवेशात सरकारवर, पर्यायाने पंतप्रधानांवर टीका करून आपल्या एकांगी पत्रकारितेचा कळस गाठला होता. आपण लोकशाहीचे रक्षक आहोत हे विसरून आपण मूठभरांचे हितरक्षक आहोत अशी भूमिका या मंडळींनी निभावली आहे. अगदी काल-परवा सोन्याबाबत सरकारने जी भूमिका घेतली, त्यालाही नकारात्मक पध्दतीने प्रकाशित करून समाजात भीतीचे आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करून आपल्या विहित कर्मांना आणि रोखठोक बाण्याला काळिमा फासला आहे. अगा जे घडलेची नाही, ते घडले, घडते आहे अशी ओरडही या वृत्तपत्रांनी केली. तरीही आजपर्यंत सर्वसामान्य जनता काही रस्तावर उतरून या मंडळींना साथ द्यायला तयार होत नाही. नोटबंदीमुळे मागील वीस दिवसांत सर्वसामान्य माणसाला खरोखरच खूप त्रास झालेला आहे. आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार नोटबंदीचा परिणाम आणखी काही महिने तरी जाणवत राहील. त्रास होत असतानाही सर्वसामान्य जनता विरोधी पक्षांना आणि बेताल प्रसारमाध्यमांना साथ देत नाही, यामागे काय इंगित आहे? कोणत्या गोष्टीमुळे जनता शांतपणे पंतप्रधानांच्या निर्णयाची पाठराखण करत आहे?

 सदुसष्ट वर्षांचा काँग्रेसचा दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा कारभार जनतेने अनुभवला होता आणि त्यातून एक प्रकारचे औदासीन्य  निर्माण झाले होते. हे वास्तव बदलले पाहिजे ही भावना मनात रुजू लागली आणि योग्य नेतृत्वाची, योग्य संधीची वाट पाहण्याचे काम जनतेने केले. मे 2014च्या लोकसभा निवडणुकीत जनतेसमोर योग्य नेतृत्व आणि योग्य संधी आली, त्यातूनच परिवर्तन झाले. लोकांना बदल हवा होता, तो झाला. पण समाजाची, देशाची बदलाची, परिवर्तनाची भूक खूप मोठी आहे. त्यांना सर्वस्तरीय बदला हवा आहे. त्यामुळे बदलासाठीच निवडून दिलेले पंतप्रधान जेव्हा जेव्हा समाजहिताचा, देशहिताचा निर्णय घेतील, तेव्हा तेव्हा देशातील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील. देशाने मतपेटीतून व्यक्त केलेल्या विश्वासाला एका अर्थाने जनतेच्या अपेक्षेला प्रत्यक्षात आणण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. त्यामुळे ज्या दिवशी निर्णय झाला, त्या दिवसापासून समाज त्या निर्णयाच्या पाठीशी राहिला. देशाचे पंतप्रधान देशाला समर्थ करण्यासाठी जे जे निर्णय घेतील, त्या निर्णयांसोबत जनता ठामपणे उभी राहील असा संकेत आठ नोव्हेंबरपासून जनता आपल्या व्यवहारातून सातत्याने देत आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि काही प्रसारमाध्यमे यांची अडचण झाली आहे. आपण वेगवेगळया प्रकारे जनतेला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करतो आहोत, समाजजीवनात काहीतरी अघटित घडावे म्हणून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रयत्न करतो आहोत, पण जनता काही आपल्याला दाद देत नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. पण सत्य स्वीकारण्याची अजून मानसिकता नसल्यामुळे वेगवेगळया प्रकारे गरळ ओकण्याचे काम विरोधक करत आहेत. जनतेला सर्वार्थाने परिवर्तन हवे होते. त्याची सुरुवात 2014मधील सत्तांतराने झाली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेने नोटबंदीचे केवळ स्वागत केले असे नाही, तर मनापासून, स्वतःला कष्ट होत असतानाही त्याला साथ दिली. याचे कारण 'मेरा देश बदल रहा है' हा जनतेच्या मनातील विश्वास.