ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे निधन

 विवेक मराठी  01-Jul-2016

सा.विवेकच्या शिल्पकार चरित्रकोश प्रकल्पातील साहित्य खंडातून घेतलेली नोंद...

ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे निधन

रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या छोटयाशा खेडेगावात आजोळी झाला. श्री. चिंतामण गंगाधर ढेरे हे त्यांचे वडील व शारदा या त्यांच्या आई. ढेरे यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी (1935) त्यांच्या वडिलांचे निधन उसे धामणे या मावळातील गावी झाले. लगेच आई व पाठची बहीण प्रमिला हिच्यासह त्यांना आजोळी जावे लागले. वडिलांच्या तेराव्या दिवशी आईने प्रयोषवेशन करून प्राणत्याग केला. थोरले व धाकटे मामा व वृध्द आजी यांनी या दोन्ही भावंडांचे पालकत्व स्वीकारले. वयाच्या 14 व्या वर्षी आजी मामा व धाकटी बहीण यांच्यासह ढेरे पुणे मुक्कामी आले ते आता पूर्णपणे पुणेकर झाले.

म्युन्सिपल शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल (व्ह.फा.) या परीक्षेत सर्वप्रथम आले. पुढे जमातीत तशी अर्धवेळ विविध कामे (शिक्षक, मुद्रित शोधक, ग्रंथपाल इत्यादी) उपजीविकेसाठी करीत रात्रशाळेत शिक्षण घेत शालान्त परीक्षा देत असतानाच राष्ट्रभाषा 'प्रवीण', 'साहित्य विशारद' अशाही परीक्षा दिल्या. पुढे बहिस्थ पध्दतीने पुणे विद्यापीठात बी.ए. झाले. एम. ए. ची परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे देता आली नाही. पण एकीकडे स्वतंत्र संशोधनपर ग्रंथ प्रकाशित झाले होते. 1975 मध्ये 'षट्स्थल एक अध्ययन' या संशोधनपर प्रबंधासाठी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी प्राप्त झाली. 1980 मध्ये 'लज्जागौरी', 'चक्रपाणी', 'महाराष्ट्राचा देव्हारा' आणि 'संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध' या ग्रंथासाठी पुरे विद्यापीठाची डी.लिट. ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाली. 2004 मध्ये डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या अभिमत विद्यापीठ पुणे यांनी सन्माननीय डी.लिट. (डॉक्टर ऑफ लेटर्स) ही पदवी दिली. औपचारिक पदवी प्राप्तीसाठी प्रयत्न  न करता ह्या सर्व सन्मानांनी डॉ. ढेरे यांच्या ज्ञाननिष्ठेचा आणि संशोधन कार्याचा गौरव केला आहे.

'श्रीविठ्ठल : एक महासमन्वय', 'लज्जागौरी', 'दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा', 'नाथसंप्रदायाचा इतिहास' या ग्रंथाची कन्नड भाषेत भाषांतरे झाली असून 'दत्तसंप्रदायाचा इतिहास', 'विसोबा खेचर विरचित षट्स्थल', 'शिखर शिंगणापूरचा श्रीशंभूमहादेव' अनुवादित होत आहेत. 'श्रीविठ्ठल' व 'लज्जागौरी' या ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.


ढेरे यांच्या संशोधनाची जातकुळी प्रतिभा प्रज्ञावंताची आहे. कविता, कथा, कादंबरी लेखकांबाबत प्रतिभेचा विचार बहुधा केला जातो. परंतु कुठल्याही क्षेत्रातील संशोधक मुळात प्रतिभासंपन्न असावा लागतो. त्याला प्रज्ञेची जोड मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने नवनिर्मिती होते. ढेरे यांचे सर्व संशोधन समाज आणि संस्कृती यांच्या अनुबंधातून झाले आहे. ते एखाद्या प्रतिभासंपन्न कवीच्या निर्मिती प्रमाणे आहे. कारण ढेरे यांचा मूळ पिंड हा कवीचाच आहे. ऐन उमेदीच्या काळात ढेरे यांच्या साहित्य निर्मितीचा प्रारंभ त्यांच्या गावची भजनी मंडळे आणि विशेषतः शहरी परंपरेतले मित्र यांच्यासाठी रचना करीत झाला. पुढील काळातील त्यांचे लेखन पाहिले तर कधी काळी तमासगीर मित्रांसाठी त्यांनी पोवाडे, लावणीची रचना केली असेल यावर विश्वास बसू नये. पण 1953 ते 1960 या काळात पुणे व मुंबईच्या आकाशवाणीसाठी त्यांनी पाच संगीतिका लिहिल्या होत्या. 'कांचनमृग', 'प्रेमयोगिनी मीरा', 'यक्षप्रिया' या  शीर्षकांवरून त्यांच्या स्वरूपाची कल्पना येते. या खेरीज अप्रकाशित काही स्फुट कविताही आहेत. वाच्यार्थाने पुढे कविता मागे पडली असली तरी त्यांच्या ग्रंथांची काव्यात्म पण अन्वर्थक शीर्षके आणि अत्यंत संवेदनशील विषयांवरील लेखनाची काव्यात्म शैली यांतून त्यांच्या काव्यप्रवृत्तीची कल्पना येते. कविप्रकृतीला वस्तुनिष्ठ पुरावे, तर्क आणि अभ्यासपूर्ण मांडणी यांची साथ असल्याने रसिकसुध्दा आणि तर्कमुद्रा यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या सर्व ग्रंथातून प्रत्ययास येतो. त्यासाठी अंतरज्ञानशाखीय अभ्यासाचा भक्कम पाया आहे.

डॉ. ढेरे यांनी कविता, स्फुट लेख, चरित्रे, संतसाहित्यासंबंधीचे संशोधन, सहसा अलक्षित अशा मुसलमान मराठी संतकवींवरचे संशोधन किंवा वारकरी संतसाहित्याप्रमाणे नाथ संप्रदाय, देवी (स्त्री देवता) संप्रदाय महानुभाव संप्रदाय, आधुनिक कवींची संपादने आणि नाटयोदय मीमांसा अशा अनेक विषयांचा धांडोळा घेतला आहे. त्याचा केवळ अल्पसा परिचयच येथे शक्य आहे.

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे हे प्रामुख्याने प्राचीन व मध्ययुगीन मराठी साहित्याचे संशोधक, संतसाहित्याचे अभ्यासक, लोकसंस्कृती व लोकसाहित्याचा एकूण जीवनानुबंध शोधणारे संशोधक आहेत. भारतीय संदर्भात महाराष्ट्रातील संस्कृतीशोध घेणारे साक्षेपी संशोधक आहेत. हा त्यांच्या संशोधक म्हणून परिचय फार पृष्ठस्तरीय ठरावा एवढा सूक्ष्म, सखोल, संख्यात्मक दृष्टयाही विपुल आणि ऐतिहासिक भौगोलिक दृष्टया विस्तृत स्तरावरच्या त्यांच्या संशोधनाचा व्याप थक्क करणारा आहे.

विद्यार्थी दशेतच लेखन-संशोधनाला प्रारंभ भौतिकदृष्टया अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ?करून? त्याच प्रतिकूलतेशी झगडत गेल्या साठ-पासष्ट वर्षात त्यांची एकूण ग्रंथसंस्था शंभरी ओलांडून गेली आहे. सन्माननीय डी.लिट. पासून साहित्य ऍकॅडमी पुरस्कारांसह लहानमोठे सुमारे पन्नासहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक ग्रंथांची विविध भाषांत भाषांतरे झाली आहेत. तीन गौरव ग्रंथांतून त्यांच्या संशोधन कर्तृत्वाचा आढावा घेतला गेला आहे. एखाद्या संशोधन संस्थेला साजेसे शोधकार्य डॉ. ढेरे यांनी निर्माण केले आहे. त्यासाठी स्वतःचा प्रचंड, विविधांगी व सर्वार्थाने अमूल्य ग्रंथसंग्रहही प्रतिकूलतेवर मात करीत सिध्द केला आहे.

प्राचीन व मध्ययुगीन मराठी साहित्याचा समाजसांस्कृतिक अभ्यास हा त्यांच्या सर्वच संशोधनाचा पाया आहे. भारतीय संदर्भात महाराष्ट्रातील संस्कृतीचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय संस्कृतीच्या मुळांचा शोध म्हटले की, सामान्यपणे वेदांपासून प्रारंभ होतो आणि संस्कृत साहित्याचे आधारच प्रमाण मानले जातात. परंतु डॉ. ढेरे संस्कृतीच्या गाभ्यातील लोकसांस्कृतिक साधनांचा साक्षेपाने शोध घेतात. एम.एन.श्रीनिवासन या बाबतीत त्याचे पथ प्रदर्शक ठरतात. श्रीनिवासनांप्रमाणेच त्यांच्या मते अभिजन व लोक या संस्कृतीचे परस्पराभिसरण होत असते. त्यातही प्रामुख्याने लोकसंस्कृतीमधील अनेक घटकांचे 'संस्कृतिकरण' होण्याची प्रक्रिया अधिक प्रबळपणे दिसते. कोणत्याही समाजातील देव-देवता, यांच्या मुळाशी असलेल्या श्रध्दा, उपासना, चालीरिती-रूढ, अगदी भाषासुध्दा यांचे 'नागरी'करण होण्याची प्रक्रिया सतत घडत असते.

डॉ. ढेरे यांच्या अगदी प्रारंभिक 'दत्त संप्रदायाचा इतिहास' (1958) पासून पुढे 'खंडोबा' (1961), 'चक्रपाणि' (1977), 'महाराष्ट्राचा देव्हारा' (1978 - पुणे विद्यापीठातील कै. न. चिं. केळकर व्याख्यान मालेतील व्याख्याने), लज्जागौरी 1978 (मातृदेवतांच्या उपासनेवर गंभीर प्रकाश टाकणारा प्रबंध), 'श्री विठ्ठल : एक महासमन्वय' 1984 (दक्षिणेतील गोपजनांच्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णवी करणाची आणि उन्नयनाची शोधकथा), 'महामाया' (1988) (दक्षिणेतील मध्यकालीन काव्यनाटकांतून कैकडी स्त्रीच्या रूपात प्रकटलेल्या महामायेचे रहस्य उलगडण्याच्या निमित्ताने समाज, धर्म आणि कला यांच्या परस्परसंबंधाचा शोध डॉ. तारा भवाळकर यांच्या सहयोगाने), 'शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव' (2001) या डॉ. ढेरे यांच्या अतिमहत्त्वाच्या व अन्य सर्वच ग्रंथात ढेरे यांच्या संशोधन दृष्टीचा प्रत्यय येतो.

या अति महत्त्वाच्या स्वतंत्र संशोधन ग्रंथाखेरीज त्यांनी केलेली संपादने महत्त्वाची आहेत. त्यातील काही हस्तलिखितांचा प्रयत्नपूर्वक शोध घेऊन मुद्रित स्वरूपात आणली आहेत. या ग्रंथांच्या विस्तृत प्रस्तावना आणि टिपा यांमधून डॉ. ढेरे यांची स्वयंप्रज्ञ प्रतिभा दृष्टी व्यक्त होते. पूर्वप्रकाशित व पुनःसंपादित ग्रंथांवर नवा प्रकाश टाकला आहे. अशा संपादनांपैकी 'आज्ञापत्र' (रामचंद्र अमात्य-प्रणीत स्वराज्यनीती) 1960, 'श्रीशिवशान्त स्तोत्र तिलकम्' 1960 (प्र. शे. जोशी सहयोगाने), 'निरंजन माधव-विरचित सुभद्रा स्वयंवर' (1967), 'संतांच्या आत्मकथा' (1967, 1969-2 रीआ.), 'संतांच्या चरित्रकथा' (1967), 'मानपुरी पदावली' (1967), 'श्री आदिनाथ भैरव-विरचित नाथलीलामृत' (1972), 'श्री चक्रधर-निरूपित श्रीकृष्ण चरित्र' (1973), 'महिकावतीची बखर' (1973), 'मुरारिमल्ल विरचित बाळक्रीडा' (1977), 'बोरकरांची प्रेमकविता' (1987), 'विसोबा खेचर विरचित षट्स्थल' (1989) या काही ग्रंथांच्या निवडक शीर्षकांवरही ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, आधुनिक कविता, आदी अनेकविध विषय डॉ. ढेरे यांच्या शोध विषयांचा व्याप दाखवतात. याखेरीज 'सरदार वल्लभभाई पटेल' (1950) या त्यांच्या पहिल्या पुस्तकापासून संतचरित्रे, विवेकानंद शारदामाता आणि रामकृष्ण परमाहंसांपासून ते मुसलमान मराठी संतकवी (1967) अनेक लहानमोठे चरित्रग्रंथ हे डॉ. ढेरे यांच्या ग्रंथनिर्मितीचे एक स्वतंत्र दालन आहे तर 'अमृतकन्या' (1959), 'विविधा' (1967), 'लोकसंस्कृतीची क्षितिजे' (1971), 'विराग आणि अनुराग' (1975), 'लौकिक आणि अलौकिक' (1976), 'लोकसंस्कृतीचे उपासक' (1964) असे कितीतरी स्फुटलेख संग्रह आहेत. खेरीज 'लोकदेवतांचे विश्व' (1996) आणि अगदीच वेगळया स्वरूपाचा 'भारतीय रंगभूमीच्या शोधात' (1996) आणि अगदीच वेगळया स्वरूपाचा 'भारतीय रंगभूमीच्या शोधात' (1996) असे ग्रंथही आहेत.

या खेरीज 'इंद्रायणी' नावाच्या नियतकालिकाचे द.र. कोपर्डेकर (पुणे) यांच्यासह चौदा अंकांचे (1962-1963) संपादन त्यांनी केले होते.

याखेरीज अद्यापही ग्रंथरूपात न आलेले असंख्य स्फुटलेख, काही मुलाखती आहेत.

'लज्जागौरीचा' पुढचा टप्पा म्हणून 'आनंदनायकी' (2022), 'तुळजाभवानी' नंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या शोधकार्यात ढेरे सध्या मग्न आहेत. या सर्व स्त्री देवतांच्या निमित्ताने भारतातील-महाराष्ट्रातील मातृदेवतांवर नवीन प्रकाश पडेलच पण येथील स्त्री जीवनाच्या स्थितिगतीचा एक एक विशाल पट लोकसंस्कृती प्रकाशात स्पष्ट होईल.

- डॉ. तारा भवाळकर

संदर्भ -

1)  डॉ. कुलकर्णी गो. म., शेटे वि. त्र्यं - 'महाराष्ट्राची सत्त्वधारा' पहिली आवृत्ती (1981), दास्ताने रामचंद्र आणि कंपनी पुणे

2)  डॉ. ढेरे अरुणा, गजेंद्रगडकर वर्षा; 'लोकसंस्कृतीचे प्रतिभादर्शन' पहिली आवृत्ती (2000); पद्मगंधा प्रकाशन.

3)  डॉ. भवाळकर तारा, 'संस्कृतीची शोधयात्रा- डॉ. रा. चिं. ढेरे : व्यक्ती आणि संशोधन, पहिली आवृत्ती 2005, पद्मगंधा प्रकाशन.