ई कॉमर्स- संधीचे एक नवे दालन

 विवेक मराठी  21-Jul-2016

 

*** नयना सहस्रबुध्दे***

बदललेल्या सामाजिक, आर्थिक परिप्रेक्ष्यात आता ई कॉमर्सच्या रूपाने तिला ऑॅनलाइन खरेदी, विक्री, जाहिराती, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग अशा अनेकानेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. ई कॉमर्सद्वारा तुम्ही वस्तू, सेवा जगभर वितरित करू शकता, ग्राहक आणि किरकोळ विक्रेते यांच्यामधला दुवा तुम्ही बनू शकता, पैशाची देवघेव करणारी चावडी तुम्ही चालवू शकता.

चाकाचा शोध हा मानवी आयुष्याला कलाटणी देणारा महत्त्वाचा शोध मानला जातो. मैलोनमैल अंतर पायी तुडवणाऱ्या मनुष्यप्राण्याला सायकल ते विमान, मिक्सर ते वॉशिंग मशीन अशी सुखसाधने देण्यात या चक्रांचा खूप अनमोल असा वाटा आहे. विज्ञान तंत्रज्ञानाने माणसाचे फक्त जिणेच सुकर केले असे नाही, तर स्त्रियांना नव्या संधीही उपलब्ध करून दिल्या. औद्योगिक क्रांतीवर मागचे शतक स्वार झाले होते, या शतकात तसा सर्वव्यापी संचार आणि परिणाम माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने केला आहे. 1991नंतरचे आर्थिक धोरण, नव्या खाजगी व सरकारी इंजीनियरिंग महाविद्यालयांची सुरुवात, शिक्षणातले आरक्षण, स्त्री शिक्षणाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टीकोन हे सगळे एकाच समांतर काळात घडत गेले. आयटी क्षेत्र हे नवे नोकरीचे, कर्तृत्वाचे, करियरचे क्षेत्र मिळाले आणि स्त्रियांनी ते हुशारीने, अंगभूत गुणांनी काबीज केले. काही पिढया नाकारलेली, दबलेली शिक्षण-करियर-नोकरीची संधी त्यांनी गुणवत्ता आणि मेहनत यांनी अक्षरश: खेचून घेतली. घराबाहेर पडलेल्या पहिलटकरणींनी सुरक्षित नोकरीचा मार्ग स्वीकारला. मात्र दुसऱ्या फळीच्या महिला-मुलींनी विस्तारलेल्या आकाशात भरारी घेतली, उद्योग-व्यवसायाच्या वाटा चोखाळल्या. अनेक नवी क्षितिजे पादाक्रांत केली.

महिला उद्योजकतेच पहिले आयुध होते पोळपाट लाटणे, मग विस्तार झाला पापड लोणची आणि क्रमाक्रमाने.... मात्र स्वयंपाक हे तिचे पिढीजात कौशल्य, निर्विवाद कर्तृत्व, प्राथमिक संसारिक कर्तव्य वगैरे वगैरे असतानाही त्याचा व्यावसायिक उपयोग मात्र सन्माननीय मानला जात नव्हता व नाही. आजही खाद्य व्यवसायाची मालकी असो, नामांकित पंचतारांकित हॉटेलचे शेफ असोत की घरी बोलावले जाणारे आचारी ... वावर हा पुरुषांचा. शिवणकाम-भरतकाम हा तिच्या गृहकृत्यदक्षतेचा पुरावा असला, तरी त्याच्या व्यावसायिक संधी मात्र गेल्या पुरुषांकडेच. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, हे मानववंशशास्त्राने सिध्द केले आहे. घरच्या शेतीत, पारंपरिक उद्योगात ती राबते तर आहेच, पण आजही जमिनीची मालकी, पिकावरचा हक्क, शेती व्यवस्थापनाचे निर्णय पुरुषाच्या हाती एकवटलेले दिसतात. महिलांच्या उद्योजकतेकडे सुरुवातीला इतक्या नकारात्मक पध्दतीने पाहिले गेले आहे की बास, ती परिस्थितीने लादल्यावर, लादल्यामुळे करायची गोष्ट झाली. त्यातूनच 'हाती पोळपाट लाटणे आले', 'संसाराला हातभार' असे वाक्प्रचारही रूढ झाले. 'खुलभर दुधाच्या' कहाणीसारख्या अनेक कहाण्यांनी, तिने कसे मुलाबाळांचे, पै-पाहुण्याचे, घर-दाराचे करून मग इतर सर्व करावे याचे उत्तम उदात्तीकरण केलेले आहे.


स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये मुख्य भेद शारीरिक ताकदीचा. त्याच्या जोरावर पुरुषी सत्ता, अरेरावी, बळजबरी, अन्याय हे पिढयानपिढया नव्हे, शतकानुशतके समाजात रुजले, वाढले, प्रस्थापित झाले. स्त्रियांच्या आधुनिक शिक्षणाचा इतिहास हाच मुळी  गेल्या शे-दोनशे वर्षांचा! जगातही यंत्रक्रांती, तंत्रक्रांती ही तशी अलीकडची घटना. गेल्या शतकातल्या दोन जागतिक महायुध्दांनी स्त्रियांना घराबाहेर काढले. स्त्रियांनी अर्थार्जन करणे जवळजवळ सक्तीचे, अत्यावश्यक झाले. त्यानंतर अनेकदा कौटुंबिक उद्योगातून, व्यवसायातून तिची सुरुवात झालेली, त्यातही अनेकदा घरातल्या पुरुषाच्या आकस्मिक जाण्यातून प्रपंचाची जबाबदारी कोसळलीच, व्यवसायाचीही कोसळली. आंतरिक इच्छा, पारंपरिक व्यवहारज्ञान, कौशल्य आणि हिम्मत याच्या जोरावर ती तिने पार पाडली. त्यात अडचणी तर आल्याच असतील, त्या तिने पार केल्या - कधी कुटुंबाच्या सहकार्याने, कधी नकारात्मक गोष्टींना टक्कर देत. गावोगाव आपल्याला अशा यशस्विनी-उद्योगिनी महिला दिसतील. त्यांनी उद्योग-व्यवसायात येणे, स्थिरावणे आणि स्पर्धेत उतरणे हे अगदी अलीकडचे. त्यासाठी तिला एक्स्ट्रा माईल जावे लागले व लागते.

गेली वीसहून अधिक वर्षे महिला बचत गटांची चळवळ भारतात रुजली, वाढली, फोफावली. त्याने अल्पशिक्षित, ग्रामीण, मर्यादित उत्पादन-विक्रीकौशल्य असलेल्या महिलांना, पारंपरिक ज्ञानावर आधारित छोटे व्यवसाय करण्याच्या संधी दिल्या. त्यातून तिचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणही झाले, होते आहे. तरीही बचत गटातून स्त्री उद्योजक, व्यावसायिक घडवण्यासाठी बरेच अंतर जायचे आहे. अजूनही स्त्रियांच्या व्यवसायाला प्राधान्याचा न मानता, पूरक मानण्याची पध्दत चालूच आहे. आता त्यात कूर्मगती बदलही होत आहेत. घरच्या व्यवसायात नावापुरत्या भागीदार, किंवा सेबीने नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळावर एकतरी महिला घेणे बंधनकारक केल्यावर डायरेक्टर (निदेशक किंवा संचालक) झालेल्या महिला हाही समाजाच्या त्याच मानसिकतेचा आविष्कार आहे.

तसेच सक्षम व लायक महिलांची अनुपलब्धता, पदाची आव्हाने पेलण्यासाठी मनाची तयारी आणि घर व काम यातले संतुलन (work - life balance) करण्याचे कौशल्य असेही अडसर त्यात आहेत.

बदललेल्या सामाजिक, आर्थिक परिप्रेक्ष्यात आता ई कॉमर्सच्या रूपाने तिला ऑॅनलाइन खरेदी, विक्री, जाहिराती, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग अशा अनेकानेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. ई कॉमर्सद्वारा तुम्ही वस्तू, सेवा जगभर वितरित करू शकता, ग्राहक आणि किरकोळ विक्रेते यांच्यामधला दुवा तुम्ही बनू शकता, पैशाची देवघेव करणारी चावडी तुम्ही चालवू शकता, दुकानासारखी मोठी खर्चीक गुंतवणूक करायची गरज नाही, एका क्लिकवर तुमचे उत्पादन ग्राहकाला घरबसल्या पाहता येऊ शकेल. त्यांनाही वस्तू पाहण्याची, कधीही ऑॅर्डर देण्याची, वस्तू पोहोचल्यावर पैसे देण्याची, न आवडल्यास परत करण्याची सवलत या व्यवहारात मिळत असल्याने या क्षेत्राची वाढ दर वर्षी 15 ते 30% होत आहे. स्टार्ट अपच्या जमान्यात ती अधिक जोमाने होत जाईल. आज जगात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यात, ऑॅनलाइन खरेदी करणाऱ्यात महिलांचे प्रमाण जास्त आहे आणि ते वाढते आहे. बाजारपेठेतही महिला ग्राहकांना समोर ठेवून अनेक उत्पादने आणली जातात. त्यामुळे नजीकच्या काळात ग्राहक, खरेदीदार म्हणून आणि ई कॉमर्सच्या रूपाने विक्री करणाऱ्या म्हणून महिलांनी बाजारपेठेवर हक्क गाजवला तर आश्चर्य वाटायला नको. सध्या कुटुंबाची तसेच महिलांची खरेदी क्षमताही वाढलेली आहे.

गेल्या पाच-सहा वर्षांत हे क्षेत्रही महिलांनी गाजवायला सुरुवात केली आहे. आपली यात्रा, तिकीट-हॉटेल-वाहन बुकिंग इ. सुकर करणाऱ्या यात्रा डॉट कॉमची सबिना चोप्रा ही सह-संस्थापक आहे. पुरुष विक्रेते असलेल्या दुकानात स्त्रियांसाठी अंतर्वस्त्रांची खरेदी करणे म्हणजे घाईघाईत, पाच मिनिटात आवरण्याची संकोचाची गोष्ट असते. ही अडचण ओळखून रिचा कार या तरुणीने झिवामे डॉट कॉम हे ऑॅनलाइन लिंगरी दालन सुरू केले. सुची मुखर्जीने लाईमरोड डॉट कॉम नावाने लाइफस्टाइल शॉपिंग पोर्टल चालू केले. अनिशा सिंग, फाल्गुनी नय्यर, स्वाती भार्गव, विशाखा सिंग, निधी अग्रवाल, राधिका घई-अग्रवाल अशी अनेक आघाडीची नावे त्यात आहेत आणि भारतातल्या एकूण ई कॉमर्सच्या 17 ते 20% वाटा महिला उद्योजिकांचा आहे, यावरून या क्षेत्रात किती वाव आहे हे लक्षात येईल. ही उदाहरणे मोठया कंपन्यांची किंवा पोर्टलची आहेत. पाकक्रिया, भाषांतर, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, चित्रे किंवा कलाकुसरीच्या वस्तू अशी स्वत:ची कौशल्ये व सेवा, ऑनलाइन उपलब्ध करून देऊन अर्थार्जन करणाऱ्या अनेक जणी आहेत.


इंटरनेटच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातली महिला जगाशी जोडली जाऊ शकते, यासाठी अनेक संस्था व सरकारही प्रयत्नशील आहे. महिला व बालकल्याण मंत्रालयाने महिला-ई-हाट नावाने महिला व बचत गटांच्या उत्पादनासाठी मोफत पोर्टल चालू केले आहे. त्यावर आपल्या उत्पादनाचे फोटो, किंमत व इतर तपशील टाकता येतील. रेल्वे मंत्रालयाच्या बुक माय मील योजनेत बचत गटातील महिलांना वेगवेगळया स्टेशनांवर जेवणाचे डबे पुरवता येतील. शेती उत्पादने, फळे, भाज्या, फुले, दागिने, हस्तकला, सिल्क व इतर वस्त्र यांच्या खरेदी-विक्रीसाठीही अशाच सेवा उपलब्ध आहेत, होतील. ई-बे, फ्लिपकार्ट अशा विक्रीतळांवर आजही हजारो महिला विक्रेत्या व्यवसाय करत आहेत. इंटरनेट व स्मार्ट फोनच्या ग्रामीण, दुर्गम भागात पोहोचलेल्या जाळयामुळे भारतातली ई बाजारपेठ, 2020पर्यंत 200 बिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे.

उद्योजकांना कल्पकता, कौशल्य, कष्ट, सातत्य, नावीन्य दाखवत महाजालावर व्यवसाय वाढवायला हजारो संधी उपलब्ध आहेत. या प्रकाराने व्यवसाय करण्यात मिळणारी लवचीकता व संधी याचा आपण पुरेपूर वापर करायला हवा. अशी माती भुसभुशीत असताना जे पेरू ते उगवणार आहे. महिला उद्योजकता ही स्वत:च्या पायावर उभे राहणे, क्षमता-कौशल्याचा उपयोग, फावल्या वेळातला छंद, घर सांभाळून लावलेला हातभार याच्या पलीकडे जाऊन गांभीर्याने विचार करायची गोष्ट आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे हे उपभोक्त्यासाठी मार्गदर्शक तत्त्व आहे, उद्योजकासाठी sky is the limit हे तत्त्व आहे. महिलांनी व्यवसाय विस्ताराच्या योजनेसह उडी तर घ्यायला हवीच, पण रोजगार देणाऱ्या व्हायला हवे. महाजालावरील बाजारपेठेत खरेच सूर्य मावळत नाही. तुम्ही झोपलात तरी अर्धे जग ऑॅनलाइन खरेदी करतच असते. त्यावर राज्य करायचे असेल, तर  महिलांना अगणित संधी आहेत.

9821319835

[email protected]