गरज संयमाची

 विवेक मराठी  23-Jul-2016

मागील काही दिवस सामाजिक आणि राजकीय पटलावर धामधुमीचे ठरले. महाराष्ट्रातील विधिमंडळाचे अधिवेशन आणि केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन लक्षात घेता सामाजिक व राजकीय जगतातील घटना जर गाजल्या नाहीत तर नवलच. आपला देश कायद्याने चालवला जातो आणि हे कायदे संसदेत, विधिमंडळात तयार केले जातात. त्या कायद्यांनुसार समाजाचे वर्तन व्हावे, कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा असते. पण ती अपेक्षा पूर्ण होताना दिसत काही. गेल्या काही दिवसांतील समाजातील आणि संसदेतील चित्र पाहिले की संसदेत आणि संसदेबाहेर आपण संयम हरवून बसलो आहोत का? असा प्रश्न पडतो. 11 जुलै रोजी गुजरात राज्यात एक दुर्दैवी घटना घडली. ही घटना इतकी घृणास्पद होती की देशभर तिचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. मृत गाईचे कातडे काढले म्हणून गोरक्षक दल नावाच्या तथाकथित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाच तरुणांना भर रस्त्यात उघडे करून मारझोड केली. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. कारण ज्या अमानुषपणे ही मारझोड झाली, त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित झाले. ही दृश्ये पाहताना कोणताही संवेदनशील माणसाला धक्का बसेल. या प्रकरणात त्या तथाकथित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला. देशात गोरक्षणाबाबत कायदा आहे. जे या कायद्याचे उल्लंघन करतील, त्यांना कायद्याच्या अधीन राहून शासन करण्याची सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. पण उना येथे घडलेली घटना पाहता समाजातील काही घटक आपला संयम हरवून बसले आहेत आणि ते स्वतःच कायद्याचे काम करत आहेत, असे चित्र समोर येते. कायदा तयार करणाऱ्या संसदेतही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. सभागृहाचे नियम व कायदे मोडून तेथे गोंधळ घातला गेला. कायदा मोडणारे फक्त रस्त्यावरच नाहीत, तर संसदेतही आहेत याचे 


कारण हरवलेला संयम. ज्या संघटनांना गोसेवा, गोरक्षा करायची आहे, त्यांनी वास्तविक पहाता गोसंवर्धनावर आपले लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. देशी गायींची विविध वाणे, जास्त दूध देणाऱ्या गायीचे संवर्धन व प्रसार करायला हवा. गोविज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी जास्तीत जास्त वेळ गो उपज, गो उत्पादने आणि गो आधारित कृषी या विषयासाठी द्यावा. त्यांनी कायदा हातात घेऊ नये. कारण कायद्याची अंमलबजावणी करणे हे सरकारचे काम आहे. एखाद्या ठिकाणी गोरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर त्याची रीतसर तक्रार नोंदवावी, पण कायदा हातात घेऊ नये एवढा संयम गोरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी बाळगायलाच हवा.

संयम हरवून बसले की काय होते, याचे आणखी एक उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह. राजकीय जीवनात काम करताना, बोलताना आपल्या वाणीवर संयम असायला हवा. पण दयाशंकर सिंह यांनी तो संयम हरवला आणि मायावती यांच्यावर अत्यंत हीन पातळीवरची टीका केली. राजकारणात अशा वाचळवीरांनी याआधी अशा हीन पातळीवरची भाषणे करून स्वतःला प्रसिध्दीच्या झोतात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दयाशंकर सिंह त्याच मार्गाने निघाले, पण उत्तर प्रदेश भाजपाने या उपाध्यक्षाला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. पण प्रश्न एवढयापुरता मर्यादित नाही; तर राजकारणात, सामाजिक जीवनात अशा उथळ प्रवृत्तीचा जो सुळसुळाट होत आहे, त्याचा गंभीरपणे विचार करण्याची ही वेळ आहे. राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करताना जी पथ्ये पाळली पाहिजेत, त्यांचा विसर पडला आणि वाणी व्यवहारावरचा संयम सुटला की त्यातून ती व्यक्ती तर बदनाम होतेच, त्याचबरोबर ती व्यक्ती ज्या विचारधारेचा वारसा सांगते, ती विचारधाराही बदनाम होत असते. म्हणूनच संयम कायम ठेवणे ही आजच्या काळात महत्त्वाची गोष्ट ठरते आहे.

या दोन्ही गोष्टी या ना त्या कारणाने हिंदू विचार आणि सामाजिक समता यांच्याशी संबंधित आहेत. अशा घटनांमुळे मागील कित्येक वर्षांपासून कमावलेले संचित पणाला लागते आणि विचारधारेवरच आघात करण्याची माध्यमांतून स्पर्धा लागते. वर्षानुवर्षे विचारधारेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या म्हणण्याचा अर्थ नक्कीच कळेल. कारण त्यांनी विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जाऊन अनेक कार्यकर्त्याच्या परिश्रमातून हिंदुत्वाची विचारधारा रुजवलेली आहे. या विचारधारेत अशा प्रकारच्या हिंसेला, बेताल व्यक्तव्याला स्थान नाही. कारण हिंदुत्व जोडण्याचे काम करते. समता, ममता, समरसता ही हिंदू विचाराची कार्यत्रयी आहे. पण याचा विसर पडला की काय होते, याचा अनुभव वरील घटनांतून येत आहे. अशा प्रकारच्या घटनांबाबत माध्यमांतून जे प्रसिध्द होते, त्याचा समाजमानसावर नक्कीच परिणाम होत असतो. यांची हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या  कार्यकर्त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. संघ आणि संघविचारधारेतील विविध संघटना या प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक समरसतेचा, हिंदू सबलीकरणाचा विषय हाताळत असतात. एका व्यापक परिप्रेक्ष्यात ते हिंदुत्वाचे काम करत असतात. अशा घटनांमुळे त्यांच्या कामामध्ये बाधा येऊ शकते. अशा घटनांमुळे समाजात निर्माण होणारा संभ्रम हिंदुत्वाच्या कार्याला अडथळा ठरू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. हिंदुत्वाचे काम हे केवळ भाषणबाजी व प्रसिध्दीमाध्यमातून चालणारे काम नसून प्रत्यक्ष कृतीतून साकार होणारे काम आहे. त्यामुळे या कामावर अशा घटनांचा परिणाम होत नसला, तरी हिंदुत्वाची प्रतिमा अशा घटनांमुळे मलिन होते, हे लक्षात घ्यायला हवे.

उना काय किंवा उत्तर प्रदेशातील दयाशंकर सिंह यांची बडबड काय, या दोन्ही घटनांमुळे हिंदुत्वावर टीका झाली. काही लोकांच्या संयम हरवून बसण्यामुळे हे झाले आहे. अनेक वर्षे खडतर परिश्रम करून जे मिळवले, ह्या उंचीवर विचारधारा पोहोचली, त्या स्थानाला अशा संयमहीन वर्तनामुळे गालबोट लागले आहे, हे ध्यानात घेण्याची गरज आहे. उना आणि उत्तर प्रदेशच्या घटनांनंतर समाजात ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, प्रसारमाध्यमे ज्या प्रकारे चर्चा घडवत आहेत, ते पाहता संयम हरवून चालणार नाही, हे पक्के ध्यानात ठेवले पाहिजे.