शोध - मुंबईच्या अस्तित्वाचा

 विवेक मराठी  23-Jul-2016

 मुंबई... भारताची आर्थिक राजधानी, वर्तमानात जगणारं एक शहर. या शहराच्या गर्दीत अनेक गुपितं लपलेली आहेत. 650हून अधिक वारसा स्थळे, एका डझनाहून अधिक किल्ले, जवळपास 150 लेणी, अश्मयुगीन मानवाचा इतिहास सांगणारी पुरातत्त्वीय स्थळे असे इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे या शहराच्या कुशीत दडलेले आहेत. वास्तविक आजपर्यंत असा समज होता की युरोपीय सत्तांनी मुंबई घडवली; पोर्तुगीज मुंबईत येण्यापूर्वी येथे कोणतेही नागरी वसाहत नव्हती. ही सगळी विधाने पुरातत्त्वीय पुराव्यांवर ताडून पाहायची गरज होती.


मुंबई... भारताची आर्थिक राजधानी, वर्तमानात जगणारं एक शहर. या शहराच्या गर्दीत अनेक गुपितं लपलेली आहेत. 650हून अधिक वारसा स्थळे, एका डझनाहून अधिक किल्ले, जवळपास 150 लेणी, अश्मयुगीन मानवाचा इतिहास सांगणारी पुरातत्त्वीय स्थळे असे इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे या शहराच्या कुशीत दडलेले आहेत. वास्तविक आजपर्यंत असा समज होता की युरोपीय सत्तांनी मुंबई घडवली; पोर्तुगीज मुंबईत येण्यापूर्वी येथे कोणतेही नागरी वसाहत नव्हती. ही सगळी विधाने पुरातत्त्वीय पुराव्यांवर ताडून पाहायची गरज होती. मुंबईची पोर्तुगीजपूर्व संस्कृती अभ्यासायची गरज होती. आणि म्हणूनच जन्म झाला तो एका अनोख्या प्रकल्पाचा.

मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेले पुरातत्त्व केंद्र, विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयाचा प्राचीन भारतीय संस्कृती विभाग आणि इन्स्टुसेन (INSTUCEN) ही संस्था यांनी एकत्र येऊन मुंबईच्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणाचा प्रकल्प हाती घेतला. आज मुंबई विद्यापीठात अस्तित्वात नसलेल्या पुरातत्त्व विभागाची कमतरता भरून काढण्याचा एक प्रयत्न म्हणून या संस्था एकत्र आल्या. त्यांनी या प्रकल्पाला नाव दिले 'मुंबई पुरातत्त्वीय सर्वेक्षण'. डॉ. अ.प्र. जामखेडकर, पुण्याच्या डेक्कन कॉलेज या अभिमत विद्यापीठाच्या कुलपती, यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पुराविदांची एक टीम जमली. त्यात प्रकल्प संचालक डॉ. सूरज अ. पंडित,  प्रकल्प सहसंचालक डॉ. कुरुष दलाल व पुराविद् डॉ. अभिजित दांडेकर, डॉ. प्राची मोघे आणि विनायक परब यांचा समावेश होता. त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी एकूण 17 विद्यार्थ्यांची निवड केली गेली. या व्यतीरिक्त मुंबईच्या भूगर्भशास्त्रीय अध्ययनाकरता एक चमू नेमण्यात आला. श्रीमती मुग्धा कर्णिक, संचालिका, बहि:शाल शिक्षण विभाग यांच्या पुढाकाराने ह्या मुंबईच्या इतिहासाच्या प्रवासाची सुरुवात झाली. हा प्रकल्प एकूण तीन टप्प्यांत करायचा ठरला आणि एप्रिल 2016मध्ये त्याची मुहूर्तमढ रोवली गेली.

हा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी 2015 साली आम्ही मुंबईच्या काही भागांचे सर्वेक्षण केले. यात प्रामुख्याने माहीम व मरोळ या दोन परिसरांचा समावेश होता. तसेच कान्हेरी लेण्यांचा परिसरही पिंजून काढला. यातून हाती आलेले पुरातत्त्वीय पुरावे अविश्वसनीय होते. सात नवीन लेणी आणि पोर्तुगीजपूर्व काळातील तीन देवळांचे अवशेष असे त्याचे स्वरूप होते. याला अनुषंगून भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षण (Archaeological Survey of India) विभागाची मुंबईच्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणाची परवानगी मिळवली. सर्व चमू मैदानात उतरले.

प्रकल्प सुरू झाल्यावर एकेका अडचणींना वाचा फुटू लागली. आर्थिक चणचण, एप्रिल-मेमधील प्रचंड उकाडा, त्यात करावी लागलेली पायपीट, लोकांची मानसिकता अशा अनेक आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जात संपूर्ण टीमने जून महिन्यापर्यंत काम केले आणि पुरातत्त्वीय साधनांच्या आधारे साकारणारा मुंबईचा इतिहास आकार घेऊ लागला. भारतातील कोणत्याही शहराच्या इतिहासात अशा प्रकारचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण हा एक अभिनव प्रयत्न होता.

या प्रकल्पातून हाती आलेल्या पुरावशेषांचे आपण ढोबळपणे तीन भाग करू. अश्मयुगीन हत्यारांसारखी दिसणारी दगडी हत्यारे, पोर्तुगीजपूर्व काळातील पुरावशेष आणि पोर्तुगीज-मराठा काळातील भग्नावशेष. यातून ब्रिटिशकालीन अवशेष हेतुत: वगळले आहेत. या पुरावशेषांबरोबरच मौखिक परंपरांचेही संकलन केले गेले.

अश्मयुगीन हत्यारसदृश पुरावशेषांचे महत्त्व मुंबईच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे. आज कांदिवली परिसरातील काही अश्मयुगीन हत्यारांव्यतिरिक्त अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचा मुंबईत कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता. हा मानव जर 30,000 वर्षांपूर्वी मुंबईत आला असेल, तर एका नव्या विषयाला वाचा फुटणार आहे. त्या काळी असलेली समुद्राची पातळी आजच्यापेक्षा भिन्न होती. हा मानव कदाचित भारताच्या मुख्य भूमीवरून चालतच मुंबई बेटावर आला असावा. म्हणजेच त्या काळी मुंबई हे बेट नसावे. मुंबई बंदराचे काम चालू असताना आपल्याला याचे पुरावे मिळाले होते. या समुद्राच्या पोटात प्राचीन जंगलातील झाडांचे पुराश्म सापडले होते.

पोर्तुगीजपूर्व काळातील पुराव्यांचे प्राथमिक विश्लेषण करताना मुंबईच्या इतिहासातील एका समृध्द टप्प्यावर येऊन आम्ही थांबलो. मुंबईत आम्हाला पोर्तुगीजपूर्व काळातील देवळांचे अनेक अवशेष सापडले. अंबरनाथ देवालयासारखी संपूर्ण सुस्थितीतील देवळे सापडणे अशक्य होते. म्हणूनच लोकमानसात विस्मृतीत गेलेल्या त्यांच्या आठवणी जागवणे आणि मिळालेल्या पुरावशेषांचे योग्य आकलन करणे क्रमप्राप्त होते. मिळालेल्या देवळांच्या अवशेषांची मूळची जागा लोकमानसातून खोदून काढली आणि मरोळ येथे एकूण चार देवळांचे अवशेष मिळाले. जवळजवळ शतकापूर्वी माहीम किल्ल्यामध्ये एका देवळाचे अवशेष मिळाले होते, त्या व्यतिरिक्त जॉन्सन ऍंड जॉन्सन कंपाउंडच्या परिसरात काही भग्नावशेष मिळाले. संपूर्ण मुंबईचा विचार करता बोरिवली, गोरेगाव, मालाड, पवई आणि जुहू येथे प्रत्येकी एका देवळाचे तृटित अवशेष मिळाले. याशिवाय जोगेश्वरी, मंडपेश्वर, कान्हेरी, मागाठणे, महाकाली येथील लेण्यांतून कार्यरत असलेली मठादी केंद्रे होतीच. ही सर्व धार्मिक केंद्रे त्या त्या परीसरातील गावांच्या करातील धर्मभागावर संपन्न झाली होती. एवढया मोठया प्रमाणावर संपत्तीचा विनिमय होत होता की या भागात सोळा धार्मिक केंद्रे कार्यरत होती. धर्मभाग हा विविध करांच्या प्रमाणात असल्याने या भागातील आर्थिक समृध्दीचा अंदाज मांडता येईल.

शिलाहार राजवंशाचे अनेक पुराभिलेख या परिसरात मिळाले आहेत. या लेखांमध्ये विविध व्यवसायांचा उल्लेख येतो. या काळात अनेक विदेशी पर्यटकांनी साष्टी बेटाला (मुंबईची उपनगरे) भेट देऊन आपली प्रवासवर्णने लिहून ठेवली होती. या प्रवासवर्णनातून येथील आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो. मुंबईतील ग्रामनामांच्या अध्ययनाच्या आणि उपरोक्त साधनांच्या आधारे असा निष्कर्ष काढाता येतो की शिलाहार काळातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने व्यापार, शेती आणि अरण्य व समुद्रातून उप्तन्न होणाऱ्या लाकूड, मध, ताडगूळ, मीठ, मासे अशा उप्तादनावर अवलंबून होती. याचाच अर्थ या बेटाचा काही भाग तरी नागरी होता. ठाणे परिसरात मिळालेल्या पुरावशेषांइतकेच मरोळ भागात मिळालेले पुरावशेष महत्त्वपूर्ण आहेत. ठाणे ही शिलाहारांची राजधानी होती. तो एक नागरी भाग होता. मिळालेल्या पुरावशेषांवरून असे म्हणता येईल की माहीम आणि मरोळही नागरी भाग होते. या व्यतिरिक्त नागरीकरणाची प्रक्रिया बोरिवली, गोरेगाव, मालाड, पवई आणि जुहू भागातही सुरू झालेली दिसते. याचाच अर्थ मुंबईच्या साष्टी बेटावर नागरीकरणाची प्रक्रिया पोर्तुगीज येण्याच्या किमान चार शतके आधी सुरू झाली होती. यात सहभागी असलेल्या क्षत्रिय, ब्राह्मणच नव्हे, तर कैवर्त आणि इतर स्थानिक जनजातींनी आपल्या मौखिक परंपरेत हा इतिहास जपला आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी आपल्याला धेनुगळ (सवत्स धेनूचे अंकन असलेले दगड) सापडले आहेत. धेनुगळांचा संबंध सुपीक शेतजमिनीशी आहे असे मानले जाते. त्याशिवाय ठाणे-भांडुप येथे मिळालेले शिलाहारांचे ताम्रपट आणि विहार, पवई, आंबोली, मरोळ व नव्याने प्रकाशात आलेले उत्तन (1115 इ.स.) आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बी.ए.आर.सी.) (1368 इ.स.) शिलालेख येथील उपलब्ध शेतजमिनीबद्दल माहिती देतात. यातून पोर्तुगीजपूर्व काळातील मुंबईचे एक वेगळेच चित्र उभे राहते.

BARC (बी.ए.आर.सी.) शिलालेख इ.स. 1368मधील असून माहीम बिंबस्थानचा राजा हंबीरराव याचा त्यात उल्लेख आहे. तो दिल्लीच्या फिरोजशहा तुघलकाचा मांडलिक असल्याचे समजते. या लेखात मरोळ या प्रशासकीय विभागाचा व त्यातील नानाळे व देवनार या गावांचा उल्लेख येतो. 'मुंबई पुरातत्त्वीय सर्वेक्षण' प्रकल्पाअंतर्गत हा लेख प्रकाशात आला. या शिलालेखातून येणाऱ्या संदर्भांमुळे बिंबाख्यानाची - म्हणजेच महिकावतीच्या बखरीची ऐतिहासिकता सिध्द होते. तत्कालीन लोक, समाज आणि शासन याविषयी मोलाची माहिती मिळते. हंबीरराजाच्या इ.स. 1367च्या शिलालेखामध्ये तो एक स्वतंत्र राजा असल्याचे त्याच्या बिरुदावलीवरून जाणवते. या प्रकल्पामुळे शिलाहारोत्तर परंतु पोर्तुगीजपूर्व काळातील मुंबईविषयी मोलाची माहिती उजेडात आली आहे.

या प्रकल्पातून हाती आलेल्या पुराव्यांआधारे प्रमुख तीन प्रकारच्या लोकपरंपरा दिसून येतात. जनजातींच्या ऐतिहासिक स्मृती व मौखिक परंपरा, लोकपरंपरेतील रितीरिवाज आणि पोर्तुगीजांनी बाटवलेल्या समाजांमधील मौखिक परंपरा यांचा वेगळा अभ्यास सुरू आहे. या पुरातत्त्वीय अवशेषांना घडवणारे, त्यांचा उपभोग घेणारे हे याच लोककथांतील व लोकपरंपरांतील वीरपुरुष होते. या पुरावशेषांचा अभ्यास म्हणजे त्यांच्या स्मृतींचा अभ्यास होय. आज तरी या प्रकल्पाने पोर्तुगीजपूर्व काळातील मुंबईचा नागरी इतिहास उजेडात मोलाचे कार्य केले आहे. पुढील आणखी तीन वर्षे तरी हा प्रकल्प चालेल. अनेक ऐतिहासिक तथ्ये पुरातत्त्वीय साधनांच्या कसास उतरतील. मुंबईचा इतिहास पुन्हा नव्याने लिहिला जाईल आणि तोही पुन्हा नव्याने तपासून पाहण्यासाठी.

शुभं भवतु!

- प्रकल्प संचालक, मुंबई पुरातत्त्वीय सर्वेक्षण.

विभाग प्रमुख, प्राचीन भारतीय संस्कृती

साठये महाविद्यालय, मुंबई