पोकेमॉन गो बॅक!

 विवेक मराठी  30-Jul-2016

 आभासी जगात रमणारी ही एकलकोंडी पिढी हा खेळ खेळण्यासाठी बाहेर जरी फिरली, तरी तो खेळ आभासी जगातलाच. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी, शारीरिक आरोग्यासाठीसुध्दा (अपघात!) हा खेळ नक्कीच धोकादायक ठरू शकतो. त्याचप्रमाणे हा खेळ खेळण्यासाठी रस्त्यावर वाय फाय उपलब्ध नाही, म्हणजे डेटा पॅक सुरू करावा लागणार, म्हणजे मग त्यासाठी बॅटरी जास्त वापरली जाणार, तसेच पैसेही जास्त लागणार... म्हणजेच अतिशय महागडे व्यसन आहे हे!  युवा पिढीला अनारोग्याकडे नेणारा हा खेळ आहे. त्यात आपल्या देशातील शहरात, खेडयात वाहतूक व सर्व बाबतीत सर्वत्र एकूणच सावळा गोंधळ आहे. त्यामुळे आपल्यासाठी तो जास्त धोकादायक आहे. त्यामुळे त्यास परवानगी देणे योग्यच नाही.


पोकेमॉन गो, पोकेमॉन वॉक या संज्ञा या महिन्याभरात आपल्या आंतरजालात - नव्हे, जगभरातल्या आंतरजालात अवतरल्या आणि थोडयात काळात अगदी घराघरात, विशेषतः तरुणाईच्या, लहान मुलांच्या स्मार्ट फोनमध्ये परवलीचा शब्द झाला.

याच के्रझमध्ये किंवा प्रभावाखाली मुलुंडमध्ये परवा काही मुले पोकेमॉन शोधायला जीपीएससारख्या प्रणालीचा उपयोग करून रस्त्यावर निघाली. कारण ते कोठेही बागेत, महत्त्वाच्या ठिकाणी मिळणार होते. त्यासाठी एखाद्या मोर्चाला किंवा मिरवणुकीत जसे दोरी घेऊन संरक्षणासाठी उभे राहतात, तसे त्यांचे पालक उभे राहिले. आता पोलिसांनी यावर बंदी घातली आहे.

काय आहे हा पोकेमॉन वॉक/गो? पोकेमॉन गो हा वास्तव जगातून आभासी जगाकडे नेणारा प्रवास आहे किंवा आभासी जगातला पोकेमॉन वास्तव जगात शोधायचा आहे.

पोकेमॉनची कल्पना ही मुळात सातोशी तांजिरी यांची. सातोशी तांजिरी यांना लहानपणी गवतातले कीडे, कीटक वगैरे गोळा करण्याचा छंद होता. त्यावरून त्यांना यावर आधारित व्हिडिओ गेम्सची कल्पना सुचली ती 1989मध्ये गेम बॉय रिलीज झाला तेव्हा. याच्यामागे संकल्पना होती ती त्या विशिष्ट आभासी जगात उपलब्ध पोकेमॉनचे प्रकार आहेत ते गोळा करणे, त्यांना व अशा इतरांना संघ बनवून त्यांना दुसऱ्या अशा संघाविरुध्द लढायला प्रशिक्षित करणे व त्यांच्यातील सामने, साखळी सामने जिंकणे! थोडक्यात, वास्तव जगात जे खेळाडूंबद्दल करतो, ते या आभासी जगातील 'राक्षसां'बद्दल करायचे. त्यासाठी जे हत्यार किंवा साधन वापरले जाते ते त्याला पोकेबॉल असे म्हणत. हा पोकेबॉल फेकल्यावर त्यांच्या प्रभावाखालून जर त्या पोकेमॉनला निघता आले नाही, तर तो त्याचा गुलाम किंवा सैनिक!

मग ही संकल्पना गृहीत धरून सर्वात पहिले पॉकेट मॉन्स्टर्स 'अका' आणि 'मिदोरी' (लाल, हिरव्या रंगाचे) जपानमध्ये निर्माण केले गेले व नंतर त्यात 'एओ' या निळया रंगाच्या पॉकेट मॉन्स्टरचाही समावेश केला गेला.

त्यानंतर 1999मध्ये दुसरी पिढी आली - पोकेमॉन गोल्ड व सिल्व्हर. 2002मध्ये तिसरी पिढी आली - रुबी व सफायर नावाने. 2006मध्ये चौथी पिढी आली - पोकेमॉन डायमंड व पर्ल. नंतर हे सगळे गेम्स वाय फायबरोबर खेळता येतील अशी व्यवस्था झाली, तर 2010 साली जपानमध्येच निनटेण्डोने पाचवी पिढी जन्माला घातली - पोकेमॉन ब्लॅक ऍंड व्हाईट. 2013मध्ये सहावी पिढी त्रिमिती घेऊन आली.

आणि आता त्यापुढे जाऊन जुलैमध्ये सर्व स्मार्ट फोन्सवर - विशेषतः ऍंड्रॉइड फोन्सवर उपलब्ध होईल असा पोकेमॉन गो असा खेळ विकसित करून तो सर्वांच्या हातात येईल अशी व्यवस्था झाली आहे. काय आहे हा खेळ? हा गेम फोनवर डाउनलोड करून त्याचे खाते चालू झाले की मग खेळाडू त्याला हवा तसा रंग, केस (स्टाईल), डोळे, डोळयांचा रंग, कपडे ठरवू शकतो. मग हा अवतार (असेच नाव आहे) खेळाडूच्या आताच्या ठिकाणावर अवतरतो व बरोबर आजूबाजूच्या ठिकाणांचा नकाशाही येतो. त्यावर वेगवेगळे पोकेस्टॉप (बसस्टॉपसारखे) व पोकेजिम्स असतात. पोकेस्टॉप्सवर खेळाडूला अंडी, पोकेबॉल्स, विशिष्ट केमिकल्स मिळतात, जी या पोकेमॉन्सना मिळवायला मदत करत असतात, तर पोकेजिम्स ही युध्दस्थळे असतात.

जसे खेळाडू वास्तव जगात प्रवास करू लागतात, तसे त्यांचे अवतार नकाशावर फिरू लागतात. वेगवेगळे पोकेमॉन वेगवेगळया ठिकाणी राहत असतात. उदा. वॉटरटाइपचे पाण्याजवळ वगैरे! मग या वेगवेगळया पोकेमॉन्सवर पोकेस्टॉपवरील वेगवेगळी आयुधे वापरायची. जर तो पोकेबॉल वापरून समोरचा पोकेमॉन अंकित झाला, तर त्याबद्दल काही बक्षिसे मिळतात. पोकेमॉन कोणत्या पिढीचा आहे वगैरेवर ही बक्षिसे अवलंबून असतात. प्रत्येक पोकेमॉनचे उत्क्रांतीचे झाड काय आहे.. म्हणजे तो कोणत्या टप्प्यावरील उत्क्रांत आहे यावरून त्याला मिळणारे बक्षीस ठरत असते. 'पोकेडेक्स'मध्ये (पोकेमॉन विश्वकोशामध्ये) प्रवेश घेऊन मूळ पोकेमॉन मिळवणे हे या पूर्ण खेळाचे अंतिम ध्येय!

शेवटच्या पाचव्या पायरीवर पोकेजिममध्ये जायचे असते. तेथे लढायचे असते. प्रत्येक पोकेजिममध्ये लढाई होते वगैरे वगैरे! म्हणजे थोडक्यात कीटक गोळा करण्याच्या छंदातून असे विचित्र कीटकसदृश राक्षससदृश प्राणी अंकित करणे, त्यांच्या संघावर विजय मिळवणे या आदिमानवी वृत्तीला वाढीस लावणारे हे खेळ आहेत. टोळीयुध्द असावे तसा हा खेळ आहे.

1999मध्ये प्रथम जेव्हा पोकेमॉनचा खेळ अस्तित्वात आला, तेव्हापासून तो स्तुतीबरोबर टीकेचाही धनी झाला आहे, नैतिकता व धार्मिक बाबतीतील दृष्टीकोनातून! जपान-अमेरिकेत हा खेळ लोकप्रिय झाल्याने ख्रिश्चन व बौध्द धर्मीयांचा नाराजीचा सूर प्रकटला. बायबलमधील तत्त्वांच्या विरुध्द असा हा खेळ आहे असे ख्रिश्चनांचे म्हणणे होते, तर बौध्द धर्मातील काही प्रतीकांचा - 'अमनजी'चा चुकीचा वापर केला गेल्याचे बौध्द धर्मीयांचे म्हणणे होते. ज्यू धर्मीयांनीदेखील असेच आक्षेप नोंदवले होते. हे सर्व आक्षेप धार्मिक किंवा नैतिक दृष्टीकोनातून असल्याने उत्पादकांनी त्यातील आक्षेपार्ह भाग काढून काही सुधारणा केल्या.

पण तरीसुध्दा एकमेकांना अंकित करणे, टोळी बनवणे, टोळी घेऊन दुसऱ्या टोळीला जिंकणे, त्यासाठी वेगवेगळया आयुधांचा वापर करणे असा सारा हा हिंसात्मक मामला होता.

त्यात आता भर घातली नवीन खेळाने. वास्तव जगातच आभासी जग मिसळायचे, वास्तव जगात राहून आभासी जगातले राक्षस, प्राणी पकडायचे... म्हणजे थोडक्यात दोन्हीची सरमिसळ करायची व त्यासाठी घराबाहेर पडायचे. म्हणजे खोलीत राहून हिंसात्मक खेळ खेळत होते, ते फक्त बाहेर फिरून खेळणार. म्हणजे थोडी शारीरिक हालचाल, फिरणे एवढाच फायदा.

पण आज हे ऍप घरोघरी उपलब्ध झाले आहे. परदेशात - मग ती अमेरिका असो, युरोप किंवा सिंगापूर, चीन, जपान - तेथे वाहतूक, रहदारी नियमबध्द आहे. शहरे नियोजनबध्द आहेत, मोकळी मैदाने आहेत. लोकही शिस्त पाळणारे आहेत, त्यामुळे असे खेळ खेळण्यासाठी लगेच तिथे नियम केले जातात, भाग केले गेले, व लोक ते पाळतातही! पण भारतात व तत्सम आशियाई देशात याबाबत सगळाच सावळा गोंधळ. ना नियोजनबध्द शहरे, ना नियमित वाहतूक, ना नियम पाळणारे नागरिक अशा अव्यवस्थेत, आभासी जगाकडे नजर खिळलेले असे तरुण, किशोरवयीन मुले गेली तर अपघात किती होतील, याची काही गणना करू शकत नाही. परदेशातही अनेक मुले जखमी झाली, तर भारतात काय होईल... आपण कल्पनाच केलेली बरी.

तसेच मुळात हिंसा दाखवणारे व प्रबळ करणारे हे खेळ सतत खेळल्याने, तसेच त्यातील विविध रंग सतत बदलत असल्याने मेंदूच्या पेशींवर त्याचे दुष्परिणाम होतात. त्या पेशी मृतवत् होतात व फीट्सची केंद्रे बनतात. त्यामुळे फीट्सचे प्रमाण वाढते, तसेच मेंदूच्या पेशी मृतवत् झाल्याने मेंदूच्या मुख्य कार्यावर - म्हणजे बुध्दी, स्मरणशक्ती, विचारशक्ती यावर - परिणाम होऊ शकतो, ज्याचाच परिणाम म्हणून या खेळातील आभासी जगच वास्तव वाटू लागते किंवा त्यातील सीमारेषा कळेनाशी होऊन 'सायकोसिस'सारख्या विकारांचे प्रमाण वाढीला लागू शकते.

मुळात अनेक ऍप्स घेऊन आलेले हे स्मार्ट फोन्स आज व्यसनांचे आगार बनत आहेत. त्यावरील हे विविध गेम्स, सोशल मीडिया या सर्वांसाठी सातत्याने या फोन्सचा वापर वाढत राहिला आहे. विशेषतः कुमारवयीन मुलांना व युवा पिढीला तर याचे चांगलेच आकर्षण आहे. त्यामुळे एकूण सर्वेक्षणात या वयातील मुलांची 'मोबाईल व्यसना'तील टक्केवारी सर्वात जास्त आहे आणि भारतात तर या व्यसनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशा प्रकारच्या के्रझी गेम्सची क्रेझ तर अक्षरश: वाऱ्यासारखी पसरली आहे, जी या 'व्यसनाधीन' पिढीला अधिक व्यसनाधीन बनवू शकते.

तसेच आभासी जगात रमणारी ही एकलकोंडी पिढी हा खेळ खेळण्यासाठी बाहेर जरी फिरली, तरी तो खेळ आभासी जगातलाच. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी, शारीरिक आरोग्यासाठीसुध्दा (अपघात!) हा खेळ नक्कीच धोकादायक ठरू शकतो.

त्याचप्रमाणे हा खेळ खेळण्यासाठी रस्त्यावर वाय फाय उपलब्ध नाही, म्हणजे डेटा पॅक सुरू करावा लागणार, म्हणजे मग त्यासाठी बॅटरी जास्त वापरली जाणार, तसेच पैसेही जास्त लागणार... म्हणजेच अतिशय महागडे व्यसन आहे हे!

थोडक्यात, कोणत्याही समाजाचा, राष्ट्राचा पाया असलेल्या युवा पिढीला अनारोग्याकडे नेणारा हा खेळ आहे. त्यात आपल्या देशातील शहरात, खेडयात वाहतूक व सर्व बाबतीत सर्वत्र एकूणच सावळा गोंधळ आहे. त्यामुळे आपल्यासाठी तो जास्त धोकादायक आहे. त्यामुळे त्यास परवानगी देणे योग्यच नाही.

आणि कोणी आग्रह केलाच, तर विशिष्ट नियमावलीशिवाय नाही. साध्या पूर्वापार चालणाऱ्या दहीहंडीचे नियम या दोन वर्षांत जिथे झाले व या वर्षी व्यवस्थित पालन होईल अशी अपेक्षा आहे, तिथे अशा धोकादायक (आरोग्यास) खेळांना खरे तर थारा नकोच. पण दिलाच, तर नियमावली करून मगच दिला पाहिजे, हे नक्की.

म्हणून आपण 'पोकेमॉन गो'ला आपण म्हटले पाहिजे 'पोकेमॉन गो बॅक!'

[email protected]