युरोपसमोरील अधर्मसंकट

 विवेक मराठी  30-Jul-2016

ख्रिश्चन धार्मिक आचार हे मानवाच्या भौतिक दु:खांवर आणि मानसिक ॠणतेवर उपचार करू शकत नाहीत. या उलट भारतीय योग पध्दती व बौध्द आणि पौर्वात्य ध्यानधारणा या मात्र अनेक व्याधींवर उतारा ठरतात. हा अनुभव सर्वांनाच येत असल्याने आता पाश्चात्त्य देशांत योग आणि ध्यान यांचा फार मोठया प्रमाणावर प्रसार होतो आहे. तो ख्रिश्चन धर्माच्या मुळाशी येईल. लोकांची ख्रिश्चन धर्मावरील श्रध्दा उडते आहे हे लक्षात आल्याने काही कॅथलिक धर्मगुरूंनी योग हे ख्रिस्तविरोधी आणि पाखंडी असल्याची विधाने केली. त्यातून त्यांना वाटत असलेली भीतीच समोर आली. कारण आजकाल स्वत:ला ख्रिस्ती न म्हणविता निधर्मी अथवा मानवताधर्मी असे म्हणवून घेणाऱ्यांची संख्या युरोपमध्ये झपाटयाने वाढते आहे.


या वर्षी फेब्रुवारीमध्ये ख्रिश्चन धर्मासंदर्भात एक महत्त्वाची बातमी प्रसिध्द झाली. कॅथलिक पंथीयांचे सध्याचे प्रमुख धर्माचार्य पोप फ्रान्सिस यांनी रशियातील ऑर्थोडॉक्स पंथाचे प्रमुख धर्मगुरू पॅट्रीआर्च किरील यांची मेक्सिको शहरात भेट घेतली. ही भेट एका दृष्टीने ऐतिहासिक होती. हे दोन पंथांचे धर्मगुरू हजार वर्षांच्या कालावधीनंतर एकमेकांची तोंडे पाहत होते. एकाच येशू ख्रिस्ताला प्रेषित मानणारे, आकाशातील बापालाच फक्त देव मानणारे हे दोन पंथ गेली हजार वर्षे एकमेकांना धुळीस मिळवू पाहत होते. आता त्यांच्यात दिलजमाई - परस्पर स्नेह उत्पन्न होण्यासारखी काय परिस्थिती बदलली की त्यांना भेटावेसे वाटले? गोऱ्या युरोपात आणि अमेरिकेत खरोखरीच तशी परिस्थिती उत्पन्न झाली आहे. अमेरिकेची लोकसंख्या प्रॉटेस्टंट पंथाकडे जास्त झुकली आहे. तेथे एक प्रकारचा मोकळेपणा आणि आधुनिक विचारांची देवाणघेवाण होत असते. लोक नवे विचारप्रवाह सामावून घेणाऱ्या मनोभूमिकेत असतात. युरोपची स्थिती तशी नाही. युरोपमध्ये कॅथलिक पंथाचे वर्चस्व अजूनही टिकून आहे. त्यांचे आपापसातील पंथद्वेष पुरेसे पुसले गेले नाहीत. त्याचप्रमाणे विज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे गेल्या शंभर-दोनशे वर्षांत अनेक जुने धार्मिक गैरसमज धुळीस मिळाल्यामुळे धर्माच्या आधाराला घट्ट धरून ठेवून त्याच्या आसऱ्याने दिवस कंठायचे हे हळूहळू सुटत चालले आहे. लोक धर्म संकल्पनांना विज्ञानाचा आधार शोधत आहेत आणि अशा वेळी जुन्या-कालबाहय झालेल्या संकल्पनांना चिकटून बसलेल्या धर्मशाहीकडे नवी पिढी आकर्षित होताना दिसत नाही. चर्चमध्ये जाणाऱ्या आणि त्याला धरून चर्चच्या चरितार्थासाठी देणगी देणाऱ्या लोकांच्या संख्येत झपाटयाने घसरण होते आहे. अनेक ठिकाणी चर्च भाविकांच्या अभावी ओस पडत असल्याने त्यांची पुरातन प्रेक्षणीय स्थळे करण्याकडे कल वाढला आहे. ओसरत्या संख्याबळाला परत वाढविण्यासाठी पोप महाशयांनी हजार वर्षे लाथाडलेल्या ऑर्थोडॉक्स पंथाला, तसेच इतर पंथोपथांना जवळ करण्याचे धोरण आरंभले आहे.

धर्मगुरूंच्या स्वैराचाराचा धक्का

गेल्या दोन-तीन दशकांपासून ख्रिश्चन धर्मशाहीला धर्मगुरूंच्या वैषयिक आणि स्वैराचारी वागणुकीचे ग्रहण लागले आहे. आज तिशी-चाळिशीत असलेले आणि चर्चशी बालपणी संबंध असलेले लोक त्या वेळच्या धर्मगुरूंनी कसे त्यांचे लैंगिक शोषण केले, ते खुलेपणाने सांगू लागले आहेत. ज्या स्थानिक धर्मगुरूंनी त्यांचे लैंगिक शोषण केले, त्यांची नावे देऊन थेट आरोप करू लागले आहेत. अशी घटना एखाददुसरी नसून हजारोंनी अशा घटना समोर येत आहेत. त्यावरून लक्षात येते की, चर्च आस्थापनांमध्ये गेली कित्येक शतके हे स्वैराचार आणि अनाचार सुरू होते. रोममध्ये असलेल्या व्हॅटिकन परिसरातील एका तळयाची साफसफाई करायला घेतली, तेव्हा अक्षरश: हजारोंच्या संख्येने अर्भकांचे सांगाडे त्यातून निघाले. पोपच्या रखेल्या असत. त्यांची संतती साहजिकच पोपला आपली वाटत असे. तो मग त्यांच्या भल्यासाठी आजच्या राजकारण्यांप्रमाणे विशेष मर्जी दाखवीत असे. त्यावरूनच इंग्लिश भाषेत नेपोटिझम (nepotism) हा शब्द रूढ झाला. ही नेपोटची पिलावळ पोपची आणि धर्मगुरूंची अर्थातच अवैध संतती असे. त्या वेळी चर्च संस्थेचा दरारा असल्याने ती कुलंगडी दाबली गेली. आता बदलत्या काळाबरोबर ती बाहेर येत आहेत. त्या धर्मगुरूंवर कायदेशीर खटले चालून त्यांना शिक्षा होत आहेत. दि. 3 जून 2002च्या बातमीप्रमाणे एकेकाळी स्थानिक पारीश - धर्मग्रामाचा नैतिक आधार समजला गेलेला धर्मगुरू कोहेलीया जोन्स याला वयाच्या 72व्या वर्षी तुरुंगाची हवा खाण्यास पाठविण्यात आले. त्याने दोन दशकांच्या आपल्या कारकिर्दीत काही बालकांचे लैंगिक शोषण केल्याचे सज्जाड पुरावे बाहेर आल्याने त्याला शिक्षेला सामोरे जावे लागले. (3 ऑगस्ट 2002). पूर्वी मुलांचे पालक अत्यंत विश्वासाने आपल्य मुलांना चर्चच्या स्वाधीन करत असत. वरील घटना पाहता आता चर्च संस्थेवरील त्यांचा विश्वास उडत चालला आहे. आजकाल लहान मुलांचे ख्रिश्चन पालक आपल्या मुलींपेक्षा मुलांना चर्चमधील धर्मगुरूंपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असतात.

पोपना या सर्व गैरप्रकारांची नोंद घ्यावीच लागली. त्यांनी ठिकठिकाणी वेगवेगळया समित्या स्थापन करून अशा प्रकरणांची न्यायिक स्तरावर तपासणी न करता चर्चच्या अंतर्गत तपासणी करण्यास सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे 'तू मला वाचव, मी तुला वाचवतो' असा संगीत खुर्चीचा डाव सुरू झाला. चर्चच्या माध्यमातून स्वैराचारी धर्मगुरूंना शिक्षा घडविण्यास एकंदरच चर्चचे साम्राज्य कमी पडले. माझ्याकडे चर्चच्या व पोपच्या संदर्भात आलेला रॉड ड्रेहर याचा एक वृत्तान्त आहे. (Rod Dreher 20 ऑगस्ट 2002.) त्यात त्याने पोप जॉन पॉल दुसरे यांना अनुलक्षून फार कडवट टीका केली आहे. The Pope has let us down. ड्रेहर विचारतो, ‘Why does such a great man seem to care so little about plight of faithful catholics, both sex abuse victims and those who have seen their children raped by evit priests? Who in turn were protected by derelict bishops?’ एकंदरच चर्च संस्थेच्या नैतिकतेबाबत ख्रिश्चन-कॅथलिक जनतेच्या मनात अत्यंत कडवट भावना निर्माण झाल्याने 'नको तो धर्म, नको ती चर्चशाही' असा विद्रोह युरोपमध्ये वाढतो आहे.

चर्चची झालेली अधोगती पोप जॉन पॉलनी अजिजी करण्यास कारणीभूत ठरली. टोरांटो येथे तरुणांपुढे बोलताना पोप महाशयांनी चर्चच्या धर्मगुरूंनी केलेली ही गर्हणीय कृत्ये काळिमा फासणारी आहेत असे विदारक विधान केले. त्याच वेळी असेही आवाहन केले की, ‘If you love Jesus, Love the Church.’ (29 जुलै 2002.) पोपनी असे पश्चात्तापाचे विधान करण्यामागचे कारण, त्याच दरम्यान कॅनडामध्ये उघडकीस आलेली बालक शोषणाची प्रकरणे होती.

मागासलेली मानसिकता

डेरेक ओब्रायन (Derek O’Brien) हे तृणमूल काँग्रेसचे ख्रिश्चन आधारस्तंभ आणि लोकसभा सदस्य आहेत. ते धर्म संदर्भातील आपली सडेतोड मते अनेकदा वृत्तपत्रांमधून मांडत असतात. दि. 16 ऑक्टोबर 2014च्या टाइम्स ऑफ इंडियातील लेखात त्यांनी चर्च संस्थेच्या मागासलेल्या मानसिकतेवर प्रहार केला आहे. ते स्वत: धार्मिक ख्रिश्चन आहेत, इतर अनेकांप्रमाणे नास्तिक नाहीत असेही ते लेखात नमूद करतात. यामुळेच त्यांच्या म्हणण्याला अधिक वजन प्राप्त होते. चर्च विचारसरणीमध्ये वैवाहिक बंधनांच्या संदर्भात एकविसाव्या शतकात मोकळेपणा आलेला नाही. पती-पत्नीमध्ये वितुष्ट आले असले तरी त्यांना चर्च नैतिक व धार्मिक स्तरावर घटस्फोट घेण्यास परवानगी देत नाही. चर्चमध्ये घटस्फोटितांना आणि त्यांच्या संततीला इतर भाविकांचे अधिकार मिळत नाहीत. गर्भपातसंदर्भात चर्चची भूमिका एकान्तिक आहे. समलिंगी आकर्षणासाठीही फार मोठया प्रमाणावर तशीच भूमिका आहे. असे आकर्षण नैसर्गिक असू शकते हे आधुनिक चर्चशाही खुलेपणे स्वीकारू शकलेली नाही. त्याला सध्याचे पोप फ्रान्सिस बदलू पाहतात. ओब्रायन यांनी सप्टेंबर 2013मध्ये व्हॅटिकनमध्ये लागलेल्या 20 लग्नांचा संदर्भ दिला आहे. त्या वेळी घटस्फोटित, तथाकथित अवैध संतती असलेल्यांची आणि विवाहपूर्व संतती असलेल्यांची लग्ने लावून दिली. हा एक प्रकारे चर्चच्या विचारप्रणालीत आधुनिक काळाला धरून घडत असलेला बदल आहे. ते लिहितात - If the catholic faith had to survive, it had to make sense to adherents in their local context. आपल्याप्रमाणेच युरोपीय देशांमधली जुनी पिढी परंपराप्रिय असल्याने नवी पिढी चर्चपासून दुरावते आहे.


मानवतेतून सर्व जगाला तारण्याचा उपदेश पाजत देशोदशी फिरणारे पोप बेनेडिक्ट 16वे महाशय पाहा. जगातील पूर्वी मागे असलेली भारत, चीन यासारखी राष्ट्रे जेव्हा तंत्र-वैज्ञानिक स्पर्धेत उतरून गोऱ्यांच्या पुढे जातात, तेव्हा त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबतात. त्यांनी आपल्या प्रवचनांमध्ये व बिशपना लिहिलेल्या पत्रांमधून अशी वर्णभेदाची भूमिका घेतल्याचे प्रसिध्द लेखक स्वामिनाथन अंकलेसरिया अय्यर यांनी आपल्या लेखात (टाइम्स, दि. 2 ऑ. 2015) मांडले आहे. चर्च संस्थेचा आणि पोपसारख्या उच्च पदांवरील मुखंडांचा दुटप्पीपणा वेळोवेळी असा उघडपणे व्यक्त झाला आहे. जे विचारी आणि विशेषत: व्यापार-उद्योग क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, त्यांना पोप बेनेडिक्ट 16वे यांनी घेतलेली भूमिका पसंत पडली नाही. त्यामुळे चर्चकडे येणाऱ्या पैशांचा ओघ आटत चालला आहे. चर्चची सर्व व्यवस्था दात्यांच्या भरघोस दानावर अवलंबून असते. आजकाल प्रशिक्षित होऊन धर्मगुरू बनणाऱ्या तरुणांची संख्या युरोपमध्ये कमी होत असल्याने आशिया खंडातून त्यांची आयात करण्याचे सुरू आहे.

वैज्ञानिकतेचा निकष

गेल्या शतकात विज्ञानाने अभूतपूर्व झेप घेतली. त्या वेळी अनेक शास्त्रज्ञ श्रध्दाळू मनःस्थितीचे होते. पण शतकाच्या उत्तरार्धात मात्र शास्त्रज्ञांची नवी पिढी विज्ञानालाच निकष मानू लागली. विज्ञानाच्या निकषावर धर्मग्रंथांमधील स्वर्ग-नरक वर्णन, स्वर्गाचे भव्यदिव्य वर्णन व पऱ्या, देवदूतांची वर्णने, त्यातील भौतिक जगातील रत्न-मोत्यांच्या सजावटीची वर्णने विश्वोत्पत्ती शास्त्राच्या प्रगतीमुळे फोल ठरू लागली. अनेक नास्तिकतेकडे झुकणारे ख्रिश्चन धर्मगुरूंना व धर्मशास्त्री निपुणांना या स्वर्गसुखाच्या आणि नरकयातनांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडू लागले. अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या चर्चला त्या रेटयापुढे झुकावे लागले. 1992मध्ये चर्चने थोर खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ याची रीतसर माफी मागितली. मला आठवते त्याप्रमाणे त्यांनी गॅलिलिओच्या परंपरेतील स्टीफन हॉकिंग यांना व्हॅटिकनमध्ये खास निमंत्रण देऊन, बायबलच्या विश्वोत्पतीला छेद देणाऱ्या विश्वोत्पत्तीचे त्यांचे व्याख्यान ऐकून घेतले. जुना पुराणमतवादी ख्रिश्चन धर्म हा विज्ञानाच्या वाटचालीतील अडथळा ठरला होता. त्याला अडगळीत टाकून विज्ञान पुढे झेपावले.

मानवजात जर एकाच देवाची लेकरे असतील, तर त्याचे दैवी अनुभव एकतर समांतर असले पाहिजे अथवा पूरक असले पाहिजेत हा दृष्टीकोन ठेवून मी 'अध्यात्माचे विज्ञान आणि गणित' या माझ्या पुस्तकात विश्वाच्या संदर्भातील पाश्चात्त्य अनुभूतींचा उलगडा केला आहे. काही ख्रिश्चन धर्मगुरूंबरोबर मी या संदर्भात चर्चा केली. त्यांनी थेट नाकारले अथवा स्वीकारले नसले, तरी ही संगती विचार करण्याजोगी आहे हे मान्य केले.

ख्रिश्चन धार्मिक आचार हे मानवाच्या भौतिक दु:खांवर आणि मानसिक ॠणतेवर उपचार करू शकत नाहीत. या उलट भारतीय योग पध्दती व बौध्द आणि पौर्वात्य ध्यानधारणा या मात्र अनेक व्याधींवर उतारा ठरतात. हा अनुभव सर्वांनाच येत असल्याने आता पाश्चात्त्य देशांत योग आणि ध्यान यांचा फार मोठया प्रमाणावर प्रसार होतो आहे. तो ख्रिश्चन धर्माच्या मुळाशी येईल. लोकांची ख्रिश्चन धर्मावरील श्रध्दा उडते आहे हे लक्षात आल्याने काही कॅथलिक धर्मगुरूंनी योग हे ख्रिस्तविरोधी आणि पाखंडी असल्याची विधाने केली. त्यातून त्यांना वाटत असलेली भीतीच समोर आली. कारण आजकाल स्वत:ला ख्रिस्ती न म्हणविता निधर्मी अथवा मानवताधर्मी असे म्हणवून घेणाऱ्यांची संख्या युरोपमध्ये झपाटयाने वाढते आहे. इंग्लंडमध्ये 2011 साली स्वत:ला निधर्मी (No Religion) असे नोंदविणाऱ्यांचे प्रमाण 26 टक्के होते, ते तीन वर्षांत 40 टक्क्यांवर गेले. या निधर्मी लोकांच्या वाढत्या प्रमाणामुळे युरोपातील ख्रिश्चन धर्माचा प्रभाव झपाटयाने कमी होत आहे. त्याच्या जोडीला संयुक्त राष्ट्र संस्थेने धर्मांना दूर करत एक प्रकारे मानवतावादाचा जो जाहीरनामा (UN Charter) केला आहे, तो आता युरोपातील सर्वसामान्यांना भावतो आहे. ज्या वेळी सीरिया, इराकमधून लाखो निर्वासित युरोपमध्ये पळून येऊ लागले, तेव्हा मानवतावादाच्या प्रभावामुळे त्यांची कणव येऊन आणि मानवी दृष्टीकोनातून त्यांना मदत करण्यासाठी युरोपातील अनेक नागरिक पुढे आले. मानवताधर्माचे ते आधुनिक काळातील फार आश्वासक चित्र होते. मला स्वत:ला ते भावले. जोपर्यंत ते अंगाशी येत नव्हते, तोपर्यंत युरोपातील नागरिकांनी निर्वासितांना केलेली मदत, त्यांच्याबद्दल दाखविलेली कणव हा मानवजातीच्या एकंदर इतिहासातील वाखाणण्यासारखा काळ होता.

लोकसंख्येचे विघटनकारी संकट

यानंतर युरोपपुढे वेगळेच विकराळ संकट उभे ठाकणार आहे. युरोपात लाखोच्या संख्येने आश्रय घेणारे मुस्लीम शरणार्थी हे मात्र युरोपमध्ये दुसऱ्या महायुध्दानंतर प्रगत झालेल्या अधार्मिक मानवतावादाच्या संस्कृतीपासून शेकडो मैल दूर आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या गोष्टींची सध्याची निकड भागू लागते असे दिसल्यावर ते आपली शरीयती नखे बाहेर काढू लागतील. युरोपात Sharia4UK, Sharia4Belgium अशासारख्या संघटना मूळ धरत आहेत. शतकांचा मुस्लीमद्वेष (Islamophobia) बाजूला सारून मानवतावादी बनलेल्या बहुसंख्य युरोपीय नागरिकांची मानसिकता भोटपणाकडे आणि व्यवहारशून्यतेकडे झुकणारी झाली आहे. आजचे स्थलांतरित थोडयाशा अन्यायाच्या भावनेने एकतर चवताळून उठतील अथवा पुढे संख्याबळावर युरोप पादाक्रांत करून त्यांना अभिप्रेत असलेल्या इस्लामची प्रस्थापना करू पाहतील, याचे भान थोर अधार्मिकांना नाही. गैर ख्रिश्चनांच्या बाबतीत चार शतकांपूर्वी त्यांच्या पूर्वजांची जी मनोधारणा होती, तीच गैर इस्लामी द्वेषाची - KafiroPhobiaची मनोधारणा या मुस्लिमांमध्ये झटक्यात तयार होईल, हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे. युरोपशी जुळवून घेणारे बदल इस्लाममध्ये कसे घडले पाहिजेत हे सांगण्याची तात्त्वि क्षमता आणि सामूहिक संख्यात्मक शक्ती हे अधार्मिक लोक जमवू शकणार नाहीत. या अधार्मिकांपासून युरोपात अधर्मसंकट उभे राहणार आहे. एका पिढीच्या आत ते आकार घेईल.

ताजा कलम

हा लेख लिहून पूर्ण झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी जर्मनीवर दहशतवादी हल्ला झाला. एका सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेत असलेल्या बारा जर्मन नागरिकांना जखमी केल्यानंतर हल्लेखोर सीरियन स्थलांतरित दहशतवाद्याने स्वतःलाही पेटवून घेतले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अशा दहशतवाद्यांना मनोरुग्ण ठरवून त्यांची पाठराखण करण्याचा, स्वतःला मानवतावादी म्हणवणाऱ्यांचा प्रघातच आहे. सर्वसामान्य जर्मन नागरिक या सगळया प्रकाराने अस्वस्थ झाले आहेत. जर्मनीतील राजकारणी जाओचेम हरमन यांनी लोकांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केल्या. या वक्तव्यात ऍंजेला मर्केल यांच्यावर कोणत्याही टीकेचा सूर नव्हता. ते म्हणाले, ''Its terrible... that someone who came into our country to seek shelter has now committed such a heinous act and enjured a large number of people. ... We must do everything possible to prevent the spread of cuch violence in our country by people who came here to ack for asylum''(द इंडियन एक्स्प्रेस, 26 जुलै 2016.) पं. नेहरूंप्रमाणे ऍंजेला मर्केल यांच्याही नोबेल पारितोषिकाच्या मनीषेची जबर किंमत जर्मन जनतेला मोजावी लागणार आहे.

9975559155