पर्यावरणस्नेही उद्योजिका

 विवेक मराठी  16-Aug-2016

स्वत:चा उद्योग उभारावा आणि तो पर्यावरणपूरक, पर्यावरणस्नेही असावा अशी इच्छा बाळगणाऱ्या बंगळुरूच्या समन्वीला तिची वाट गवसली. स्वयंपाकघरातल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंना तिने पर्याय निर्माण केला, उसाच्या चिपाडापासून वस्तू तयार करून. गुणवत्तापूर्ण, आगळंवेगळं उत्पादन करतानाच अनेक महिलांना रोजगार मिळवून देणारी समन्वी आज अनेकांसाठी 'रोल मॉडेल' बनली आहे.


आजचं वेगवान आणि स्पर्धाप्रेमी उद्योग जगत हे बहुतांशी पुरुषांनी व्यापलेलं आहे. अर्थात त्यामागची कारणंसुध्दा तशी सयुक्तिक आहेत. भारतात एखादा उद्योग उभारताना पहिल्यापासूनच येणाऱ्या अनंत अडचणी, दैनंदिन व्यवहारात टिकून राहण्यासाठी उद्योगांशी करायला लागणारी स्पर्धा, पुरुषांनी ठिकठिकाणी उघडलेलेले भ्रष्टाचाराचे दांडगट अड्डे आणि या सगळयातच कदाचित जन्मजात तुलनेने जास्त संवेदनशील असल्याने 'नको रे बाबा ती कटकट' असा तयार झालेला दृष्टीकोन, या सगळयामुळेच उद्योग म्हटलं की महिला जरा लांबच असण्याचं प्रमाण आजही जास्त आहे.

या पार्श्वभूमीवर, एखादी कल्पक महिला उद्योजक असेल,  आणि त्यातही जर ती सामाजिक भल्याची जाण ठेवून पर्यावरणाचा समतोल राखण्यास झटत असेल, बहरत निघालेल्या आपल्या उद्योगात अनेक जणींना रोजगार देण्याचे स्वप्न पाहत असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आभाळाएवढया कर्तृत्वाने स्वत:चा उद्योग उभारू इच्छिणाऱ्या महिलांसमोर उद्योगशीलतेचा आदर्श ठेवत असेल तर......

... तर दुधात साखर, सोने पे सुहागा आणि आणखी बरंच काही.....

अशी एक तरुण, कल्पक आणि पर्यावरणप्रेमी नव-उद्योजक महिला आहे समन्वी भोगराज.

'अर्थवेअर' या बायोडिग्रेडेबल आणि पर्यावरणपूरक गोष्टी तयार करणाऱ्या कंपनीची सह-संस्थापिका. बंगळुरू इथे राहणारी आणि सामाजिक जाणिवांचं भान असणारी समन्वी.

आजकाल कुठेही - मग ते लग्नातलं जेवण असो, आपली मुलं शाळेत नेत असलेला प्लॅस्टिक लंचबॉक्स असो किंवा कामवाली बाई सुट्टीवर असताना आपण घरी वापरतो ती डिस्पोजेबल कटलरी असो, आपल्या जेवणाच्या संबंधातल्या या गोष्टी विकत आणून वापरण्याचे सर्वच निर्णय हे, जरा नीट विचार केला, तर पर्यावरणाला घातक ठरणारेच असतात, हे आपल्या लक्षात येईलच.

पण समन्वी ही उद्योजिका या पर्यावरणाला प्रचंड मोठा धोका ठरलेल्या प्लॅस्टिकशी कल्पकतेच्या बळावर दोन हात करते आहे.

'प्लॅस्टिक आता आपली गरज झाली आहे. प्लॅस्टिक खूप स्वस्त आहे आणि कुठेही सहज उपलब्ध होणारं आहे' अशी कारणं देत आपण या ना त्या प्रकारे प्लॅस्टिकचा वापर चालू ठेवतो. या प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला तर हानी पोहोचतेच आहे, शिवाय त्यामुळे आपल्या पुढल्या पिढयांचं आयुष्यही धोक्यात येत आहे, याची जाणीव प्लॅटिकचा वापर करणाऱ्या आपल्यातल्या प्रत्येकाला असायला हवी. 

आपल्या या उद्योगामागील प्रेरणेबद्दल समन्वी म्हणते, ''शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात मी बराच वेळ काम केलेलं असल्याने पर्यावरणला पूरक प्रॉडक्ट्स तयार करावी हा माझा ठाम निर्णय होता. आणि म्हणूनच प्लॅस्टिकला मला असा एक नैसर्गिक पर्याय हवा होता, जो पर्यावरणपूरक ठरेल आणि निसर्गातलं संतुलनसुध्दा राखून ठेवू शकेल.''

समन्वीने चार वर्षांपूर्वी जेव्हा उद्योग सुरू करायचा असं ठरवलं, तेव्हा सर्वप्रथम स्वयंपाकघरात दररोज वापरण्यात येणाऱ्या कटलरी आणि इतर वस्तूंसाठी प्लॅस्टिकला पर्याय शोधायला सुरुवात केली.

या विषयाचा सखोल अभ्यास केल्यावर समन्वीने, रस काढून झाल्यावर शेवटी मागे उरणाऱ्या उसाच्या चिपाडापासून या सर्वच वस्तू तयार करण्याचा प्रयोग करायचं ठरवलं.

फूड कंटेनर्स, प्लेट्स, वाटया, जेवणाचे ट्रे किंवा कप टाकून दिल्यानंतर 30 ते 60 दिवसांतच विघटित होऊन जातील अशा गोष्टी निर्माण करायला समन्वीने सुरुवात केली.

तिची कंपनी आता इतर संस्थांकडून किंवा थेट रसाच्या दुकानदारांकडून उसाची चिपाडं मिळवते. या सर्व कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते आणि नंतर वाळवून, मोल्ड करून, आवश्यक तेवढी उष्णता देऊन आणि आवश्यक त्या त्या इतर सर्व प्रक्रिया करून स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू तयार केल्या जातात.

चिपाडाला उष्णता देऊन त्यावर दाब दिल्यानंतर त्याची ताकद वाढवण्यासाठी प्रक्रिया केली जाते. तसंच, या सर्वच वस्तूंची, एका विशिष्ट प्रक्रियेने, पाणी- आणि तेलविरोधक क्षमतासुध्दा वाढवण्यात येते.

चिपाडापासून या वस्तू तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया नैसर्गिक असते. म्हणजेच त्यात कुठल्याही प्रकारचे बाईंडर्स, ऍडिटिव्ह्ज, कोटिंग्ज किंवा केमिकल्स वापरले जात नाहीत. त्यामुळे तयार केलेल्या सर्व वस्तू वापरासाठी पूर्णत: निर्धोक आणि प्लॅस्टिकला एक सक्षम पर्याय ठरल्या आहेत.

उसाच्या चिपाडापासून तयार केलेल्या या वस्तू, त्यात ठेवलेल्या खाण्याच्या पदार्थांवर कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाहीत. म्हणजेच कुठल्याही पदार्थाचा मूळ रंग, वास किंवा चव बदलत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तयार केलेल्या सर्वच वस्तू मायक्रोवेव्हमध्येही वापरता येतात आणि घेतल्यानंतर साधारणपणे दोनेक वर्षं चांगल्या टिकतात.

या वस्तू 'डिस्पोजेबल' या गटात मोडत असल्याने एकदा वापरल्यानंतर धुता येत नाहीत. काही वेळा मात्र ओल्या फडक्याने पुसून घेतल्यास दोन-चार वेळा वापरू शकतो.

या अशा प्रकारे तयार केल्या गेलेल्या वस्तूंच्या किमती आकारानुसार बदलतात. कपांची किंमत साधारण 95 पैशांपासून आहे, प्लेट्स साधारण 2 रुपयांपासून मिळतात. जेवणाचे डबे साधारण 14 रुपयांना पडतात, तर कंटेनर्स 8 ते 18 रुपयांमध्ये मिळतात आणि लाकडी चमचे साधारण 1.95 रुपयांना मिळतात.

समन्वीचं घरच उद्योजकांचं. ती तिसऱ्या पिढीतली उद्योजिका. स्वत:चा उद्योग उभारायचा आणि अनेकांना रोजगार मिळवून द्यायचा हे तिचं स्वप्न होतं.

तिचं स्वत:चं इंजीनिअरिंग आणि एम.बी.ए. पूर्ण झाल्यावर  पंचविसाव्या वर्षीच तिने या उद्योगाला सुरुवात केली आहे.

आज तिची कंपनी दर महिन्याला कटलरीच्या साधारण 15 लाख वस्तू तयार करते आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे तिची ही कंपनी दक्षिण भारतातली अशा प्रकारची एकमेव कंपनी आहे.

तिच्या कंपनीत तयार झालेली सगळीच उत्पादनं बंगळुरूमधल्या विविध संस्था, हॉटेल्स, टेक-अवेज अशा  ठिकाणी मोठया प्रमाणावर वापरली जातात.

बंगळुरूच्या आसपास असलेल्या गावांमध्येसुध्दा समन्वी अनेक महिलांसोबत काम करते आणि त्यामधून ज्यूट, कागद आणि कपडे यांपासून बॅग्ज आणि गारमेंट कव्हर्स वगैरे वस्तूंचं उत्पादन करते.

तिची बंगळुरूस्थित टीम जवळच्या तुमकुर, नेलमंगला, मैसूर जवळच्या गावांमध्ये जाते आणि तेथल्या ग्रामीण महिलांना घरूनच काम करण्याचं शिक्षण देते. त्यामुळे या महिलांना घरबसल्या रोजगारही मिळतो आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू  थेट ग्राहकांपर्यंत विनासायास पोहोचतात.

''सहज आणि स्वस्तात उपलब्ध होणारं प्लॅस्टिक, या प्लॅस्टिकमुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम आणि त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला भोगाव्या लागणाऱ्या परिणामांची भीषणता लोकांपर्यंत पोहोचवणं हेच आमच्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे.'' समन्वी सांगते.

नुकत्याच Central Pollution Control Boardने (CPCBZ{) भारतातल्या 60 शहरांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये संपूर्ण देशभरात निर्माण होणारा प्लॅस्टिक कचऱ्याचं प्रमाण पाहिलं, तर आपल्याला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. आजमितीस भारत दररोज 15342.6 टन इतका, प्रचंड मोठया प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा तयार करतो.

भारताच्या आणि आपल्या सर्वांच्याच पुढील पिढीच्या भवितव्याचा विचार करून पर्यावरणपूरक वस्तूंची उद्योजिका होणाऱ्या समन्वी भोगराज हिचं पुरुषांचे प्राबल्य असणाऱ्या उद्योग जगतात पूर्णपणे हटके पण पर्यावरणपूरक वस्तू तयार करतानाच, शेकडोंना रोजगार देण्याचं हे काम निश्चितच अनेक महिलांना प्रेरणादायक ठरेल.

 'Team Bharatiyans'

9049457575