दुभंग पाऊस

 विवेक मराठी  24-Aug-2016

असा तडाखेबंद कोसळून, तर कधी अजिबात न येता दुष्काळाची जाणीव देत वारंवार जणू सांगत राहतो - बाबांनो, मी यायला हवा असेन तर माझ्या स्वागतासाठी सिध्द व्हा. जो वसा पूर्वजांनी घालून दिलाय तो जपा. धन, धान्य, समृध्दी आणि सुखमय जीवन तुम्हाला माझ्यामुळेच मिळेल, पण माझा रस्ता रोखू नका. मी येण्याचा मार्ग निष्कंटक ठेवा, सोपा करा. लोभ आणि हव्यासापायी स्वत:चीच प्रगती थांबवू नका. भविष्य उजाड करू नका. पण आम्हाला ही सूचना समजत नाही. कारण आमची व्यक्तिमत्त्वं दुभंगून आम्ही कधीच मनोरुग्ण झालो आहोत.


पावसाळा सुरू होतो आणि अचानक सारा आसमंत बदलून जातो. ग्रीष्माच्या भट्टीत तप्त झालेले बोडके डोंगर, म्लान झालेले वृक्ष, तरुलता, वेली, आटलेल्या नद्या, खोल गेलेली तळी, उजाड माळरानं आणि प्रत्येक जीवमात्र 'पाणी' 'पाणी' असा जप जपत आकाशाकडे डोळे लावून बसलेला! आधीची वर्षं दुष्काळाने कोरडी ठणठणीत ठेवलेली असतील, तर त्या जलजपाबरोबरच डोळयांची तळीही अश्रूंनी भरलेली!

'काळोखाने विहिरी भरल्या

तेजहीन तरुलताही झाल्या

थेंबा थेंबासाठी झुरतो

क्षण क्षण नित अनिवार'

अशी अवस्था! पण एक अनाहूत क्षण येतो आणि पावसाची एक चिंब सर सरसरत येते आणि सजीव, निर्जीव प्रत्येक वस्तुमात्राच्या अंतरंगातून एक आनंदोद्गार निघतो. मग सरी येतच राहतात आणि मेघांचं साम्राज्य चहूदिशांना पसरतं. सूर्यदेव आनंदाने विश्रामस्थळी जातात. आणि मग सुरू होतो वर्षा ऋतू!

'बादरवा बरसन को आए

ननी ननी बूँदन, गरज गरज और

चहूँ ओर ते बिजुरी चमकत'

असा पाऊस येतो आणि मनभर गाऊ लागतो. रिमझिम, टपटप, धुवांधार, कोसळता आणि मुसळधार..

'पाऊस पडतो मुसळधार, रान होईल हिरवंगार!'

पाऊस येतो आणि चार दिवसांतच डोंगर हिरव्या रंगाच्या तलम गालिच्याने वेढले जातात. हवेतल्या हव्याहव्याशा गारव्याने तन-मनं प्रसन्न होतात. पहिल्या पावसात भिजत असताना -

'आला पाऊस मातीच्या वासात गं

मोती गुंफित मोकळया केसात गं...'

असा हर्षभरित उद्गार येतो ओठातून आणि सगळा अवकाश पावसाच्या धारांनी नादमय होऊन जातो.

या वर्षीही पाऊस आला. काहीसा उशिरा आला, पण आला तो वाजत, गाजत! गर्जत आणि जोरदार वर्दी देत आला. गेल्या वर्षीसारखा आगमनानंतर गडपही झाला नाही. येत राहिला. नद्या नाले भरत राहिला. तळयांचं, तलावांचं समाधान करीत सातत्याने बरसत राहिला. चला, आता हे वर्ष छान असेल, पाण्याची टंचाई नसेल तेवढी! असे उद्गार निघू लागले. चिमुकले रेनकोट आणि छत्र्या अपूर्वाईने कपाटातून बाहेर पडल्या, वर्षासहली निघू लागल्या. डोंगरांमधले धबधबे साद घालू लागले, स्वच्छ आंघोळ केलेल्या चराचरामुळे चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या. कांदाभज्यांची आणि गवती चहाची रेलचेल सुरू झाली. सगळया जगाला आपल्या हिरव्या रंगाच्या दुलईत लपेटून पावसाने निश्चिंत केलं... पण या पावसाला अचानक मध्येच होतं तरी काय?

'पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुरांनी...'

दु:खाचे सूर! हो, हा पाऊसच आणतो हे दु:खही! आजोबांच्या पोटावर बसून त्यांच्या मिशीशी खेळणाऱ्या नातवाकडे कौतुकाने पाहत असताना अचानक अकारण त्यांनी त्याला ढकलून द्यावं, तसंच करतो हा पाऊस!

'पावसात न्हाली, धरणी हासली देवाजीच्या करणीने मनी संतोषली'

असं म्हणावं, तोच एकाएकी पावसाने आपली लय वाढवावी, हां हां म्हणता आपल्या कोसळण्याने हाहाकार माजवावा आणि 26 जुलैसारखं अतक्र्य अक्रित वाढून ठेवावं. धरणीच्या दशदिशांनी होणाऱ्या आक्रंदनाकडे आपल्या विकराळ धारांतून उपहासाने हसत पाहत राहावं.... तेही कालच मायेची शाल पांघरणाऱ्या पावसाने?

रस्ते, घरदारं, देवळं पाण्याखाली जातात. महावृक्ष उन्मळून पडतात. घरांवर, माणसांवर विजा कोसळतात. महापूर येऊन गावंच्या गावं उद्ध्वस्त होतात. दुर्गम भागातल्या लोकांचं अन्न-धान्य, रसद तुटते. पेरणीच्या आनंदाने सुखावलेला शेतकरी या कोसळीने मोडून पडतो. पुन्हा एकदा नैराश्याचं चक्र सुरू होतं.

या वर्षी खरं तर पावसाने सुंदर सुरुवात केली. मैफलीत एखाद्या राजबिंडया तयार गायकाने प्रवेश करावा, हंडया-झुंबरांच्या दरबारी वातावरणात श्रोत्यांच्या डोळयांची निरांजनंही त्याच्यासाठी उत्सुक असावीत. दोन सुरेल तंबोऱ्यांच्या मधोमध बसून त्याने तबियतीत षड्ज लावावा आणि श्रोतृवृंदाने आनंदाचा निश्वास सोडावा, तसाच प्रवेश करता झाला या वर्षीचा पाऊस! पण गायकाने तराण्याची श्रोत्यांना न झेपणारी लय पकडावी, तसा हा पाऊस एके दिवशी अचानक झेपेनासा झाला. त्याने पुन्हा एकदा एक घणाघाती आघात केला.

कोकणातली सावित्री! डोंगरांच्या प्रभावळीतून धावणारी, निसर्गाच्या कुशीत वर्षानुवर्षं बागडणारी सौम्य, सात्त्वि सावित्री! तिच्या दोन तीरांना जोडणारा, अनेक वर्षं तिच्याशी गुजगोष्टी करणारा, माणसं, वाहनं यांना पैलतीरी पोहोचवणारा तिच्यावरचा तो कर्तव्यदक्ष पूल! जुना, जाणता, वयोवृध्द!

त्या दिवशी पावसाने तांडव सुरू केलं आणि सावित्रीवर धारांचा राक्षसी मारा सुरू केला. या आकांडतांडवाने तीही संतापली. आपला मूळ स्वभाव सोडून तिने नागिणीसारखे फूत्कार सोडायला सुरुवात केली. सुसाटत धावायला सुरुवात केली बेलगाम! तिचा संताप तिच्यात मावेना! अनावर धक्क्यांनी ती स्वत: हेलकावू लागली, हादरू लागली आणि एका क्षणी पाऊस आणि सावित्री यांच्या असह्य थपडांनी त्या जुन्या, जाणत्याची ताकद संपली. तो वयोवृध्द कोलमडला. कर्तव्यदक्ष, जबाबदार असा, माणसं, वाहनं यांना पैलतीरी पोहोचवणारा तो पूल त्यांच्यासह कोसळला, जमीनदोस्त झाला. सावित्रीच्या वेगवान प्रवाहाने आणि पावसाच्या हिंस्र माऱ्याने ती वाहनं, माणसं दूर अज्ञातात भिरकावून दिली.

'सर्वदूर झाले पाणी

वेदनेत विरली गाणी

तडाख्यात फुटली हृदये

आर्त ही विराणी'

असं भरल्या गळयाने आणि दाटल्या मनाने म्हणत नाही, तोच क्षणात पावसाने रूप बदललं. एकाएकी तो रिमझिम बरसू लागला. काही वेळापूर्वी उच्छाद मांडणारा हाच का तो? असं वाटावं इतका निरागस, कोवळा. सावित्रीकडे बघून त्याने खोडकरपणे डोळे मिचकावले. पण ती मात्र अजूनही रागाने धुमसत होती, फुसांडत होती. अनेक वर्षं सोबत करणाऱ्या पुलाच्या विरहाचे दु:खाश्रू स्वत:च्याच पाण्यात मिसळत होती. असा कसा हा पाऊस? कधी असा, कधी तसा... कधी ऊनपावसाचा सुंदर खेळ खेळणारा, हिरवी बासरी वाजवून तन-मनं अंजारणारा-गोंजारणारा, आपल्या नादमय झंकाराने तनमनांना उत्फुल्ल करणारा, शेकडो फुलांना, फळांना उमलण्याची, पक्व होण्याची प्रेरणा देणारा, आश्वासक, शेकडो कवीमनांना जागवणारा, स्फूर्ती देणारा - कधी 'श्रावणात घन निळा' तर कधी 'सरींवर सरी' मिरवणारा! कधी 'गडद निळे गडद निळे जलद' भरून आणणारा, तर कधी 'चिंब पावसानं रानं आबादानी' करणारा! त्याच्या या हसऱ्या, सौम्य, रमणीय रूपाने मंत्रमुग्ध होतो आपण! कृतज्ञतेने मन भरून येतं. त्याचं येणं, राहणं, मध्येच उन्हाआड दडणं, सर्वांना आपलंसं करणं किती काही देऊन जातं.

पण मग त्याचं ते दुसरं रूप अचानक विकराळ अवतार घेऊन समोर उभं राहतं. उग्र, रागीट, धसमुसळं, हिंस्र, अनावर, उद्दाम, उन्मत्त, रानवट... आणि हाच का तो असा प्रश्न पडतो. याचं व्यक्तिमत्त्व असं कसं दुभंग? हा असा का वागतो मनोरुग्णासारखा? असा कसा हा? असे प्रश्न मनाला सतावत असतानाच आतून स्वत:ला सतावणारे अनेक प्रश्न उसळी मारून वर येतात.

खरंच कोण दुभंग? शालेय पुस्तकातून जंगलाचं महत्त्व पटवणारा आणि व्यक्तिगत फायद्यासाठी जंगलतोड करणारा माणूस? की पाऊस? पुस्तकातून भारताच्या नैसर्गिक संपत्तीचे गोडवे गाणारा, समुद्राचं अमर्यादपण जपणं कसं आवश्यक आहे ते सांगणारा आणि त्याच समुद्रात दगडमातीची अनैसर्गिक भर घालून गगनचुंबी इमले बांधून त्सुनामीला आमंत्रण देणारा माणूस? की पाऊस? अनेक नद्यांवरचे पूल, बंधारे, धरणं 'आता आम्ही शंभरी गाठली, आम्हाला विश्रांती द्या' असं सांगत असूनही त्यांच्याकडे कानाडोळा करणारा माणूस? की पाऊस? निसर्गनियमाने येणाऱ्या वरुणराजाचं पाणी साठवा, नद्यांना बांध घाला, धरणं बांधा, जमिनीत पाणी मुरवून जमिनीची धूप थांबवा असे उपदेशाचे डोस पुस्तकातून आणि भाषणातून पाजणारा आणि त्याच पावसाचं पाणी न साठवणारा, पाण्याची अमूल्य किंमत न ओळखणारा, स्वत:चं ऐश्वर्य आणि पोकळ डौल दाखवण्यासाठी पेव्हर ब्लॉक्ससारखे उद्दाम अडथळे निर्माण करून पावसाचं पाणी वाहून जाऊ देणारा माणूस? की पाऊस?

चुकतो आहोत आपण! मनाने कबुली दिली. मन! ...

कोणाला असतं मन? मला, तिला, त्याला, ह्याला! प्रत्येक सजीवाला! पावसाला सजीव करण्याची कल्पना आमची! माणसांची! त्याला कुठे असतं मन? मनं आम्हाला असतात. ती सदैव कसल्याशा हव्यासाने आणि विकृत लोभाने भरलेली असतात. मग रुग्ण आम्ही होतो. आम्ही विभागले जातो. आम्ही दुभंगतो. पाऊस नाही खरं तर! तो बिचारा एखाद्या वर्षी छान बरसून आशीर्वाद देतो, तर कधी

'नको नको रे पावसा

असा धिंगाणा अवेळी'

असा तडाखेबंद कोसळून, तर कधी अजिबात न येता दुष्काळाची जाणीव देत वारंवार जणू सांगत राहतो - बाबांनो, मी यायला हवा असेन, तर माझ्या स्वागतासाठी सिध्द व्हा. जो वसा पूर्वजांनी घालून दिलाय तो जपा. धन, धान्य, समृध्दी आणि सुखमय जीवन तुम्हाला माझ्यामुळेच मिळेल, पण माझा रस्ता रोखू नका. मी येण्याचा मार्ग निष्कंटक ठेवा, सोपा करा. लोभ आणि हव्यासापायी स्वत:चीच प्रगती थांबवू नका. भविष्य उजाड करू नका. पण आम्हाला ही सूचना समजत नाही. कारण आमची व्यक्तिमत्त्वं दुभंगून आम्ही कधीच मनोरुग्ण झालो आहोत. आणि पाऊस मात्र आम्हाला अभंग ठेवण्यासाठी दर वर्षी नवे नवे 'उपचार' योजत आहे.

9594962586

[email protected]