टाईप वन मधुमेह

 विवेक मराठी  09-Aug-2016

तुमच्या जीन्समध्ये ऑॅटोइम्युनिटी बनायला अनुकूल असे बदल झालेले असतील, तरी ते पुरेसं नाही. त्याला इतर कुठल्यातरी गोष्टीची जोड मिळाली, तर आणि तरच बीटा पेशी नष्ट होतात. म्हणूनच जीन्स सारखे असलेल्या दोन जुळया भावंडांपैकी एकाला टाईप वन मधुमेह झाला, तर दुसऱ्याला तो होतोच असं नाही. झालाच तर एकाच वेळी दोघेही बळी पडतात असं नाही.


धुमेहाचे अनेक प्रकार आहेत असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात ते मधुमेहाचे प्रकार नसून रक्तातलं ग्लुकोज वाढायची कारणं आहेत. खरं तर रक्तात ग्लुकोज वाढतं कशाने? असं विचारलं तर अगदी थोडक्यात उत्तर देता येऊ शकतं. जेव्हा खाण्यातून किंवा शरीरात असलेल्या साठयातून रक्तात अवतरलेलं ग्लुकोज नियंत्रणात राखण्याइतकं इन्श्युलीन शरीर बनवू शकत नाही, तेव्हा मधुमेह होतो. वेगळया शब्दात सांगायचं तर खाण्यातून आलेलं ग्लुकोज किती आहे याला फारसं महत्त्व नाही. ग्लुकोज फार कमी असलं आणि शरीर शून्य इन्श्युलीन बनवत असलं, तरी माणसाला मधुमेह होईल. याउलट इन्श्युलीन आवश्यकतेपेक्षा अधिक बनवूनसुध्दा रक्तातल्या ग्लुकोजवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते अपुरं पडत असेल, तरीदेखील त्याची परिणती मधुमेहात होईल. अशा व्यक्तींना मग बाहेरून मोठया प्रमाणात इन्श्युलीन देऊनही फायदा होणार नाही. म्हणजे जिवात इन्श्युलीन नसण्यापासून ते भरपूर इन्श्युलीन असण्याच्या अवस्थेपर्यंत कोणालाही मधुमेह होऊ शकतो.

त्याच्या त्याच्या गरजेइतकं इन्श्युलीन शरीर बनवत नसल्याने हा घोळ होतो. याचा दुसरा अर्थ असा की प्रत्येकाची इन्श्युलीनची गरज सारखी नाही. कोणाला चार-दहा युनिट इन्श्युलीन आवश्यक असेल, तर दुसऱ्याला शंभरची नड असेल. पहिल्याच्या इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशी तीन युनिटच बनवायला सक्षम असल्यास त्याला मधुमेह होईल. त्याचसोबत दुसऱ्याच्या बीटा पेशींनी ऐंशी युनिट इन्श्युलीन बनवूनदेखील त्याची नड भागत नसल्याने त्याच्याही रक्तातलं ग्लुकोज वाढलेलं दिसेल. म्हणजे गरज आणि पुरवठा या तराजूत पुरवठयाची बाजू कमी पडली की माणसाला मधुमेह होतो, ही बाब मनात रुजवून घ्यायला हरकत नाही. यात बीटा पेशी नॉर्मल असतील, सरासरीपेक्षा अधिक इन्श्युलीन बनवत असतील, परंतु त्या व्यक्तीची गरजच खूप मोठी असेल, तर त्याला मधुमेह होऊ शकतो.

हे पुन्हा पुन्हा घोळवण्याचं कारण आहे. मधुमेह ज्या ज्या आजारात झालेला दिसतो, त्या त्या आजारात एकतर मागणी वाढलेली असते किंवा पुरवठा कमी झालेला असतो. या दोन टोकाच्या गोष्टींमध्ये समतोल राखण्यात शरीर असमर्थ ठरलं की माणूस मधुमेही होतो. दोन टोकांपैकी एक टोक म्हणजे इन्श्युलीन बिलकुल न बनणं. अर्थात ही गोष्ट तेव्हाच शक्य आहे, जेव्हा इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशी पूर्णत: नष्ट होतील. वैद्यकीय परिभाषेत बीटा पेशी नष्ट झाल्याने जो मधुमेह होतो, तोच टाईप वन मधुमेह. आता तुमच्या मनात 'बीटा पेशी नष्ट का होतात बुवा?' हा पुढचा प्रश्न येणार, हे कोणीही सहज ओळखेल. गंमत म्हणजे या प्रश्नाचं नेमकं उत्तर शास्त्रज्ञांना अजून देता आलेलं नाहीये. जेव्हा अचूक उत्तराची वानवा असते, तेव्हा माणूस हे असेल की ते असेल? असे आडाखे बांधू लागतो. आजमितीला तरी हीच परिस्थिती आहे. अनेक थिअरीज आहेत. अनेकांवर आरोप आहेत. परंतु कुणा एकाचा गळा धरावा, एकाला फासावर चढवावं हे शक्य नाही. कदाचित भविष्यातही हे घडणार नाही. कारण आतापर्यंतचा पुरावा या एका गुन्ह्यात अनेक आरोपी असल्याचंच सांगतो आहे.

कोण आहेत हे आरोपी?

आतापर्यंतच्या संशोधनाचा रोख आपल्याच जनुकांवर (जीन्सवर) आहे. काही ठरावीक जीन्स आपल्याच रोगप्रतिकारक शक्तींना आपल्याच बीटा पेशींवर हल्ला करायला प्रवृत्त करतात आणि बीटा पेशींचा नायनाट करतात, असं दिसून आलं आहे. अर्थात नुसते दोषी जीन्स असून काम भागत नाही. त्याला अनुकूल वातावरणाची जोड लागते. प्रथम सैन्याची जमवाजमव करावी आणि योग्य संधी मिळताच हल्ला करावा, तसं काहीसं हे आहे. कारण बीटा पेशींवर प्रत्यक्ष हल्ला करायच्या कितीतरी आधी त्यांच्यावर डागायच्या हत्यारांची - म्हणजेच बीटा पेशींविरुध्द काम करणाऱ्या ऍंटीबॉडीजची - जुळवाजुळव रक्तात झालेली दिसते. थोडक्यात खराब जीन्स आणि अनुकूल परिस्थिती या दोन्हींचा मेळ जमला तरच पुढचा घोळ होतो.

बरं, इतक्याने काम भागत नाही. दोषी जीन्सची संख्या काही कमी नाही. आतापर्यंत पन्नासहून अधिक वेगवेगळया दोषी जीन्सचा शोध लागला आहे. त्यामुळे अडचण थोडी वाढली आहे. एखाददुसऱ्या जीन्समधल्या दोषाचा समाचार घेणं थोडंसं तरी का होईना, सोपं गेलं असतं. पण एवढया मोठया संख्येने असलेल्या जीन्समधला बिघाड दुरुस्त करणं नक्कीच दुरापास्त आहे.

दोषी जीन्सना वातावरणाची जोड हवी असं आपण म्हटलं खरं, परंतु वातावरणाची जोड म्हणजे नेमकं काय, याची चर्चा नको का व्हायला? तिथेही थोडा गोंधळच आहे. कारण ज्या गोष्टीवर नेमकं बोट ठेवता येईल अशा कुठल्याही एका बाबीचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे शास्त्रज्ञ वेगवेगळया वेळी वेगवेगळया गुन्हेगारांचा संशय घेताना दिसतात. ते तरी काय करणार म्हणा... त्यांच्यासमोर येणारे पुरावे गोंधळात टाकणारेच आहेत. उदाहरणार्थ, फिनलंडसारख्या देशात टाईप वन मधुमेहाचं प्रमाण जगातल्या इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक आहे. पण त्याच देशाशी मिळतीजुळती जीवनशैली, भौगोलिक परिस्थिती, खाण्यापिण्याच्या सवयी असलेल्या त्या देशाच्या शेजारी राष्ट्रांमध्ये टाईप वन मधुमेह तितक्या प्रमाणात आढळत नाही.

त्यामुळे शास्त्रज्ञ टाईप वन मधुमेहाचा प्रसार अधिक असलेल्या ठिकाणी सापडलेल्या सूचक गोष्टींचा पाठपुरावा करताना दिसतात. त्यांनी मांडलेले विचार रंजक तसेच दिशादर्शक आहेत. अशा संशयितांच्या यादीत व्हायरल इन्फेक्शनचं स्थान वरचं आहे. कॉक्सकी व्हायरसवर त्यांचा सर्वात जास्त रोख आहे. लहान बाळांमध्ये जुलाब व्हायला कारणीभूत ठरणारा रोटाव्हायरस, गोवरसदृश आजार निर्माण करणारा रुबेला व्हायरस अशा अनेक विषाणूंवर संशय आहे खरा. पण तो सिध्द करण्याइतके पुरावे अजून त्यांच्या हाती लागलेले नाहीत. शास्त्रज्ञांचे इतर काही विचार इथे नमूद करण्यासारखे आहेत. ऍक्सिलरेटर ओव्हरलोड नावाचा हायपोथिसिस म्हणतो की आपलं खाणं खूप वाढलं आहे. तेवढया खाण्याला पचवून त्यातून येणारी साखर संपूर्ण शरीरभर पोहोचवायला बीटा पेशींना अविरत परिश्रम करावे लागतात. अतिकामामुळे त्या थकतात आणि मृत होतात, असं या विचाराच्या प्रवर्तकांचं म्हणणं आहे.

दुसरा विचारप्रवाह अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. जीवाणू (बॅक्टेरिया) आपले शत्रू आहेत हे आपल्या मनात घट्ट बसल्याने आपण बॅक्टेरियांना मारत सुटलो आहोत. औषधांपासून ते साबणापर्यंत अनेक हत्यारांचा त्यातही वापर करतो आहोत. हे करताना आपल्या आतडयात असलेले आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे बॅक्टेरियादेखील बळी जाताहेत हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वेगवेगळया रोगजंतूंमध्ये असलेला सूक्ष्म फरक ओळखायला समर्थ बनत नाही. त्यातूनच आपल्याच रोगप्रतिकारक पेशी आपल्याच शरीरात असलेल्या दुसऱ्या पेशींना 'परकं' समजू लागतात, त्यांच्यावर हल्लाबोल करतात. याला 'ऑॅटोइम्युनिटी' म्हणतात. आणि हा हल्ला जेव्हा इन्श्युलीन बनवणाऱ्या बीटा पेशींवर होतो, तेव्हा आपल्याला टाईप वन मधुमेह होतो असं या विचारप्रवाहाचं म्हणणं आहे. विचार कुठलाही असो - निष्पन्न एकच होतं. तुमच्या जीन्समध्ये ऑॅटोइम्युनिटी बनायला अनुकूल असे बदल झालेले असतील, तरी ते पुरेसं नाही. त्याला इतर कुठल्यातरी गोष्टीची जोड मिळाली, तर आणि तरच बीटा पेशी नष्ट होतात. म्हणूनच जीन्स सारखे असलेल्या दोन जुळया भावंडांपैकी एकाला टाईप वन मधुमेह झाला, तर दुसऱ्याला तो होतोच असं नाही. झालाच तर एकाच वेळी दोघेही बळी पडतात असं नाही.


गम्मत म्हणजे बीटा पेशी नष्ट होण्याचा वेगदेखील सारखा असत नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये त्या दोन-चार दिवसात पूर्णपणे नष्ट होतील, तर दुसऱ्यात हा वेग इतका कमी असेल की पेशी पूर्ण संपायला महिनोन्महिने किंवा कदाचित वर्षदेखील लागतील. हा वेळ कमी-जास्त असला, तरी शेवटी बीटा पेशी कधीतरी नष्ट होतात आणि त्या व्यक्तीवर आज ना उद्या इन्श्युलीन घ्यायची पाळी येते. टाईप वन मधुमेहात इन्श्युलीनला पर्याय का नाही? हे तुमच्या-आमच्या लक्षात यायला कठीण नाही.

या सगळया भानगडींनी डॉक्टरांचं काम अवघड करून ठेवलं आहे. कधीकधी योग्य निदान करायला वेळ जातो तो त्यामुळेच. शिवाय टाईप वन मधुमेह सिध्द करायला बऱ्याच चाचण्या कराव्या लागतात. रुग्णाच्या रक्तात बीटा पेशी नष्ट करणाऱ्या ऑॅटोऍंटीबॉडीज आहेत हे पाहावं लागतं. या तपासण्या महागडया असतात. अशा अनेक ऍंटीबॉडीज असल्याने तपासण्यांची लांबलचक यादी होते. रुग्ण त्या करायला सहजी तयार होतात असं नाही.

डॉक्टरांचं सुदैव म्हणजे निदान आपल्या देशात तरी टाईप वन मधुमेह कमी प्रमाणात आढळतो. अर्थात चुकून असा एखादा रुग्ण वाटयाला आला, तर मात्र त्यांना समजवताना डॉक्टर दमून जातात. कारण बहुधा असे रुग्ण कमी वयाचे असतात. आपल्या मुलांना मधुमेह झालाय हे मान्य करायला त्यांचे पालक तयार होत नाहीत. त्यांना समजवायचं ही मोठी परीक्षा असते. रुग्ण झालेली मुलं स्वत:वरच प्रयोग करायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या संपर्कात राहणं व इन्श्युलीन इंजेक्शन नियमितपणे घ्यायला लावणं ही कसोटी असते. त्यावर डॉक्टर कशी मात करतात, हे आपण पुढे पाहणार आहोत. टाईप वन मधुमेह म्हणजे काय आणि त्यात इन्श्युलीनच का घ्यावं लागतं, हे आपल्या मनात बसलं तरी तूर्तास पुरे आहे.

जुवेनाइल डायबेटिस विरुध्द टाईप वन मधुमेह

टाईप वन मधुमेह लहान वयातल्या व्यक्तींमध्ये दिसत असल्याने पूर्वी त्याला जुवेनाइल डायबेटिस - म्हणजे वयात येऊ घातलेल्या मुलांमध्ये दिसणारा मधुमेह म्हणायचे. आता लक्षात आलंय की बीटा पेशी केवळ या वयातच नष्ट होतात हे खरं नाही. त्या कुठल्याही वयात नष्ट होतात व इन्श्युलीनवर जीवन अवलंबून असलेला मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो. यासाठीच वयाशी जोडलं गेलेलं जुवेनाइल डायबेटिस हे नाव बदलून टाईप वन डायबेटिस असं करण्यात आलं.

 9892245272