अवाजवी संवेदनशीलता

 विवेक मराठी  26-Sep-2016

मुलं म्हणजे वस्तू नाही. उपयोग नाही असं म्हणून टाकून द्यायला ती निर्जीव गोष्ट नाही. इथून पुढे जेवढी वर्षं तो इथे असेल, तेवढी वर्षं त्याला आपण आनंदाने ठेवायचं, असा तिने निर्धार केला. सर्वांना संधी हीच तर म्हणायची! अवाजवी संवेदनशीलता म्हणेलही...

''आज शाळेला सुट्टी आहे की काय?''

''का हो?''

''सगळं अगदी शांत शांत आहे, म्हणून विचारलं...''

''मुलं त्या त्या जागी त्यांचं त्यांचं काम करतायत.''

''इतक्या शांतपणे! म्हणजे नवलच आहे. नाहीतर मुलांना हाकायचं म्हणजे नाकी नऊ येतात. गप्प बसा गप्प बसा म्हणून तोंड दुखायला लागतं...''

''काय म्हणालात? हाकायचं? अहो, ती काय गुरंढोरं आहेत?''

''वासरं नक्की आहेत. वासरांना हाकणं अवघड. शेपटया वर करून उधळतात. मुलंही तशीच... म्हणून हाकायला म्हणाले.''

''ओ!'' आमच्या दोघीत संवाद चालला होता. 'हाकायला' शब्द वापरणारी आणि नंतर शब्द बरोबर कसा हे सुचवणारी मीच होते.

नेमक्या वस्तू मुलांकडे होत्या. प्रत्येकाच्या हातात काहीतरी होतं. प्रत्येकाच्या हातातलं सो कॉल्ड खेळणं इतकं छान होतं की मलाही खेळावसं वाटत होतं. खेळणं रेडिमेड नव्हतं, तर बनवलेलं होतं. बाई गप्प बघत बसलेल्या. मुलं मुलांचं काम करत होती. सगळया बाजूंनी मुलं उभं राहून आणि मांडी घालून बसून लिहू शकतील एवढया अंतरावर लहान लहान 2#2चे फळे. मुलं फळयावर त्यांच्या मनाप्रमाणे काही काही करत होती. पांढरे, रंगीत खडूंचे बॉक्स होते. नवल याचं वाटलं की लागतील तेवढेच खडू मुलं वापरत होती. मुलांना पकडता येतील असे खडूचे तुकडे होते नि पेन्सिलीसुध्दा.

''सगळं खूप विचारपूर्वक करता आहात...''

''हवं ना करायला?''

''हवंच ना. पण कुणी एवढं फारसं करत नाही. म्हणून तुमचं नवल वाटलं...''

''सगळं साहित्य वर ठेवतच नाही. वर्ग कसा मोकळा मोकळा हवा. भरपूर श्वास, भरपूर अवकाश...''

''वा! फारच वेगळा छान विचार आहे. रिकामा आणि मोकळा यात फरक आहे ना!''

''हो ना! रिकामा म्हणजे भरता येतं पण भरत नाही असा. मोकळा म्हणजे आडोसा नसलेला, बांध नसलेला.''

ऐकून मी अवाक झाले. खूप विचार केला होता तिने. छान वाटत होतं. ''खूप बनवलंय का हो काय काय? समोर ठेवत का नाही मांडून? कुणालाही सहज बघता येईल ना म्हणजे!''

''गर्दी होते मग. मला प्रदर्शन नाही करायचं आणि मांडायचंही...''

''तेही खरंच आहे म्हणा!''

''आपण फार आग्रही होतो मग! ज्यांच्यासाठी बनवलंय त्यांनी हात लावलेलाही चालत नाही आपल्याला! मजा आहे ना! खूप जण खूप साधनं बनवतात. तिथेच काम थांबतं...'' मी फक्त समजपूर्वक होकार दिला. तिचं म्हणणं खरंच होतं. साहित्य मुलांसाठी बनवणं, साहित्य दाखवण्यासाठी बनवणं यात फरक आहेच ना? शिक्षक म्हणून मला तिची समज, जाणिवा समजून घ्यायच्या होत्या.

''घरी जसं होतं तसंच शाळेत होतं. आपण पुन्हा पुन्हा हेलपाटा नको म्हणून, कधी आवडलं म्हणून एकदम खेळणी आणतो. मुलांनी ती बघितलेली असतात. मुलं एकदम खेळणी मागतात. आपणही देऊन टाकतो. सगळंच अर्धवट करून मुलं टाकून देतात. नीट विचार करून मुलांच्या हातात वस्तू दिल्या तर त्याचा छान उपयोग होतो.'' ती सांगत होती. तिचं असं बोलणं मला खूप प्रेरक वाटलंच, तसंच आशादायीही. यंत्रणेत काम करताना कामात रचनात्मकता होती.

''एक-दोन मुलं अशी आहेत, कितीही प्रयत्न केला तरी लिहीतच नाहीत. अजिबात लिहीत नाहीत. माझ्या लक्षात आलं, यांना मदतीची गरज आहे. त्यांच्यावर विशेष मेहनत घेण्याची गरज आहे. त्यासाठी विशेष व्यक्ती हव्यात. अभ्यास आणि अनुभव असणाऱ्या व्यक्ती हव्यात, कारण त्या मुलांचा प्रॉब्लेम वेगळा असावा. अशी किती मुलं प्रत्येक ठिकाणी आहेत हे शोधायला हवं. खरं तर शोधलेलं असतं, पण नंतरचे व्याप नकोत म्हणून त्यांना पुढे ढकललं जातं. दहावीत मूल तसंच जातं नि दहावीत येऊनही लिहिता येत नाही ही तक्रार राहतेच...''

अशा मुलांना एकत्र करता येईल का? खऱ्या अर्थाने या मुलांच्यातली ही अप्रगतता कशी दूर करू? अशा मुलांचा प्रश्न तसाच आहे अजून. नुसतं वाचता, लिहिता न येणारी मुलं आणि काही कारणामुळे हे न जमणारी मुलं यातलं अंतर तिने जाणलं होतं. काहीतरी करावं असं वाटणंही छानच आहे. तिलाच अपराध्यासारखं वाटत होतं. ती मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणार होती. तिने पालकांना बोलवून घेतलं. तिच्याआधीच पालक डॉक्टरांना भेटले होते. ती सगळी कागदपत्रं तिने पाहिली. तिने त्या डॉक्टरांना फोन केला. ते म्हणाले, ''याचा बुध्दयंक खूप कमी आहे. व्यावहारिक ज्ञान त्याला आहे. तो लहान लहान काम करेल, पण मनात आलं तर उठून बाहेर जाईल. त्याला एकही अक्षर काढता येणार नाही. रेषा मारेल, काही सरावानंतर. तो सराव करणंही अवघड आहे. त्याला त्रास होईल, तो गाणी म्हणेल, नाचेल. तुम्हाला अपेक्षित आहे ते नाही शक्य...''

डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी तिच्या अनुभवाशी तंतोतंत जुळत होत्या. तो असंच करायचा वर्गात. इकडेतिकडे धावायचा. मुलांच्या खोडया काढायचा, बाई त्याला आवरायचा प्रयत्न करायच्या. त्यांच्या तावडीतून सुटून तो धावायचा. सगळया मुलांना-पालकांना-शाळेला त्याला आवरणं कठीण होतं. असं ठरलं की पालकांना बोलवायचं नि त्याला वेगळया शाळेत घाला असं सुचवायचं. तिला वाईट वाटलं, कारण ते शक्य नव्हतं. काय करायचं? तिने ठरवलं, तो निदान शाळेपर्यंत येऊ दे. जरा त्रास दिला तरी करू सहन. मुलं म्हणजे वस्तू नाही. उपयोग नाही असं म्हणून टाकून द्यायला ती निर्जीव गोष्ट नाही. इथून पुढे जेवढी वर्षं तो इथे असेल, तेवढी वर्षं त्याला आपण आनंदाने ठेवायचं, असा तिने निर्धार केला. सर्वांना संधी हीच तर म्हणायची! अवाजवी संवेदनशीलता म्हणेलही कोणी!

& 9403693275

[email protected]