भटक्यांच्या दिशादर्शकाचा विलक्षण प्रवास

 विवेक मराठी  17-Jan-2017

महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार देऊन नवी दिशा देत असंख्य तरुण कार्यकर्ते उभे करण्याचे काम भटके विमुक्त विकास परिषद सातत्याने करत आहे. अशा कार्यकर्त्यापैकी एक नाव उमाकांत मिटकर. भटक्या-विमुक्त जातींतील लोकांच्या उत्कर्षाचे आणि त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून चालू आहे, त्यात उमाकांत मिटकर या ध्येयवेडया तरुणाचा लक्षणीय सहभाग राहिला आहे. उमाकांत यांची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. भटक्यांचे जगणे ते जगले आहेत. त्यांच्यात राहून त्यांच्या विकासाचा पाया त्यांनी मजबूत केला. भटके विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून पालावरची शाळा सुरू झाली, त्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. संघाच्या मुशीत घडलेला या तरुणाच्या कामाची नोंद थेट महाराष्ट्र राज्य शासनाने घेतली आहे. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण समितीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून या समितीची स्थापना झाली. यानिमित्ताने उमाकांत मिटकर यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...
तत बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरणाऱ्या भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आव्हानात्मक होते. या समाजाला योग्य दिशा दाखवायची असेल, तर त्यांना साक्षर करणे गरजेचे आहे हे भटके विमुक्त विकास परिषदेने जाणले. या समाजात शिक्षणाची गोडी निर्माण करायची असेल तर त्यातील एक म्हणून राहावे लागेल, तरच परिषदेच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास बसेल, तेव्हाच ते आपल्या मुलांना यमगरवाडीत शिकायला पाठवतील. यमगरवाडी हे महाराष्ट्रातील भटक्यांचे विद्यापीठ. यमगरवाडीतून अनेक तरुणांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बळ दिले. यमगरवाडी प्रकल्पाबरोबरच भटके-विमुक्त समाजात जाऊन प्रबोधन आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचे काम जिकिरीचे होते. या समाजात जाऊन त्यांच्यातील एक होऊन राहण्याचा अनुभव सांगताना उमाकांत म्हणाले की, ''2002 साली मला नोकरी मिळेल या भावनेने मी यमगरवाडीत आलो. त्या काळात संघातील बरेच संघसेवक भेट द्यायचे. त्यांना पाहून मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी ठरविले, आता येथे पूर्ण वेळ म्हणून काम करायचे. यमगरवाडीतून सुरुवातीला मला मसणजोगी समाजातील लोकांसोबत राहण्यासाठी पाठविण्यात आले. महाराष्ट्रातील उमरगा, बीड, किल्लारी या भागांमध्ये या मसणजोगींची वस्ती आहे. वस्ती येथे जरी असली तरी ते पोटापाण्यासाठी फिरत असतात आणि यांच्यासोबत मी वर्षभर फिरलो. पवई आयआयटीने मला एक तंबू दिला होता. सुरुवातीला मला मसणजोगी ज्या ठिकाणी वस्ती करतात तेथे जायचे, आणि तेथे पालावरची शाळा सुरू करायची असे सांगितले. मी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेलो, आमच्या घरात सगळे उच्चशिक्षित होते. पण मी संघाच्या मुशीत घडल्यामुळेच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची शिकवण येथूनच मिळाली. या समाजातील लोकांसोबत राहत असताना मला मिळेल ते मी खाऊ लागलो, त्यांच्याप्रमाणे राहू लागलो. त्यांचा माझ्यावर विश्वास बसण्यासाठी मी त्यांचे राहणीमान स्वीकारले. मसणजोग्यांची मुले म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच. ही मुले भीक मागून आणायची आणि आपल्या पालकांचे पोट भरायचे. मी यांच्यासोबत राहत असताना ही मुले मलाही भिकेत मिळालेले अन्न घेऊन यायचे. त्यांचे ते प्रेम मला कधीच नाकारता आले नाही. या समाजातील महिला माझ्यासाठी एखाद्या प्राण्याच्या मासाची भजी बनवून आणायच्या. ते खाताना किळसवाणे वाटायचे. पण त्या महिलांचे प्रेम, आपुलकी यामुळे तो पदार्थही मी आनंदाने खायचो. त्यामुळेच या लोकांच्या मनात मी माझी जागा निर्माण करू शकलो.''

सतत गावभर फिरणाऱ्या, कचरा उचलणाऱ्या, भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षणाची गोडी लावणे कसे शक्य झाले असेल, याविषयी उमाकांत सांगतात की ''मुले ही त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. त्यामुळे या मुलांना जर शाळेत पाठविले, तर त्यांच्या पालकांचे मोठया प्रमाणात नुकसान होईल. अशा परिस्थितीत काय करायचे? हा यक्षप्रश्न होता. या मुलांना शिक्षण देण्यासाठी खूप प्रयोग करावे लागले. या समाजातील महिलांना आणि पुरुषांना व्यसनाची सवय आहे. ही सवय त्यांच्या मुलांमध्येही होती. ही मुले अतिशय कळकट आणि घाणेरडी असायची, कारण या भागात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न असल्यामुळे आंघोळ तर खूपच लांबची गोष्ट होती. मी स्वत: 17 दिवस अंघोळ न करता यांच्यामध्ये राहत होतो. काही छोटया छोटया गोष्टी करायला मी सुरुवात केली - या मुलांना आंघोळ करायला लावणे, नखे काढणे, केस विंचरणे यापासून श्रीगणेशा केला. त्यांना आरसा आणून दिला. त्यात त्यांना स्वत:मध्ये फरक जाणवू लागला. ही मुले शिकार करायची, हिंडत राहायची. मी त्यांच्यामागे फिरत राहायचो. त्यांच्या भावविश्वातील गोष्टींचा आधार घेऊन त्यांना शब्द शिकविले, मण्यांच्या माळा घेऊन अंक शिकविले, त्यांच्या बोलीभाषेतील गीते शिकविली, त्यांना छोटे श्लोक शिकविले. पण या सगळया बदलाच्या वाटचालीत माझा एक प्रयोग फसला. मी सगळया मुलांचे केस कापून टाकले. त्यांच्या पालकांनी याला विरोध केला. त्यांचा तो रोष पाहता या मुलांसोबत असे काही प्रयोग करताना किती काळजीपूर्वक करावे लागतील, हे मला जाणवले. मुलांना स्वच्छतेच्या सवयीपासून त्यांच्या शिक्षणाला सुरुवात केली. त्या परिसरातील उपलब्ध गोष्टींपासूनच मी त्यांचे शैक्षणिक साहित्य तयार केले. त्याच्यामुळे त्यांना याची गोडी लागली. या समाजातील मुले दोन ते तीन भाषा बोलायची. त्यामुळे प्रत्येक जातीतील अभ्यासक्रम बदलावा लागायचा. आज आम्ही प्रत्येक जातीचा स्वातंत्र असा अभ्यासक्रम सुरू केला आहे. ना भिंत ना दरवाजे अशी ही त्यांची पालावरची शाळा सुरू झाली.

आज महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये 35 समाजांमध्ये 48 संस्कार केंद्र सुरू आहेत. हे संस्कार केंद्र म्हणजेच पालावरची शाळा. यामध्ये काम करणारे कार्यकर्त्यांचे-शिक्षकांचे चार गट आहेत. शिक्षकांची दर तीन महिन्यांनी बैठक होते. या बैठकीत मागील तीन महिन्यांचा आढावा आणि पुढील तीन महिन्यांचे नियोजन याबद्दल चर्चा केली जाते. अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे येथे शिकवणारे शिक्षकच प्रशिक्षक झाले आहेत.

यमगरवाडीतील ज्ञानकेंद्र

महाराष्ट्रातील भटक्यांच्या मुलांमध्ये शिक्षणासाठी 48 केंद्रे यमगरवाडीमार्फत सुरू करण्यात आली. यमगरवाडीविषयी बोलताना उमाकांत म्हणतात की ''यमगरवाडी हे आमचे पंढरपूर. ते आमचे श्रध्दास्थान आहे. यमगरवाडीत काम करणारे कार्यकर्ते ध्येयवेडे अाहेत. आता येथे एकूण 33 कार्यकर्ते व शिक्षक काम करतात. आज यमगरवाडीमध्ये 32 समाजांतील 450 मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. पालावरच्या शाळेतील मुलांना आम्ही शिक्षणासाठी यमगरवाडीत घेऊन येतो. यमगरवाडीतील शिक्षण पध्दत पारंपरिक शिक्षण पध्दतीला छेद देणारी आहे. पुस्तकी ज्ञानाशिवाय भविष्यातील व्यवहारज्ञान या मुलांना दिले जाते. आमच्या शाळेतील मुले राष्ट्रीय स्तरातील खेळात पहिली असतात. केवळ खेळातच नव्हे, तर सांस्कृतिक स्पर्धा, वैज्ञानिक स्पर्धा, शैक्षणिक स्पर्धा यामध्येही अव्वल असतात. आज यमगरवाडीतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी चांगल्या पदावर नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो. यमगरवाडीतील अशी एक उपक्रमशील शाळा आहे. वेगवेगळया समाजांतील असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी वेगळे गुण असायचे. त्यांचा उपयोग करून व्यावसायिक अभ्यासक्रम येथे सुरू करण्यात आला. भटके-विमुक्त विद्यार्थ्यांची ही शाळा एक उत्तम रोल मॉडेल असेल.

समाजातील सगळया संघटना - राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच अनेक संस्था, संघटना आमच्या पाठीशी उभ्या आहेत. आम्हांला लागणारे आर्थिक पाठबळ यांच्यामुळेच मिळते. प्रत्येक खर्चाचा हिशोब आमच्याकडे मांडून ठेवण्यात येतो. आम्ही व्यवहारात ती पारदर्शकता ठेवली आहे. आमचे माजी विद्यार्थी जेव्हा यमगरवाडीला भेट देतात किंवा स्वत:ची पहिली कमाई यमगरवाडीला देतात, तो क्षण खूप भावनिक असतो. यमगरवाडीतील काही माजी विद्यार्थ्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून यमगरवाडीचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करत आहे. हीच आमच्या कामाची पोचपावती असते.''

 यमगरवाडी ऑनलाइन

आजचा काळ हा सोशल मीडियाचा आणि स्मार्ट फोनचा समजला जातो. महाराष्ट्रात यमगरवाडीसारखा चालणारा असा आगळावेगळा प्रयोग लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमे हे एक उत्तम व्यासपीठ आहे. गेल्या तीन वर्षांपासून 'यमगरवाडी न्यूज' असा एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर महिन्याला एक बातमी 1500 लोकांना मेल करायची. फेसबुकवर यमगरवाडी हे एक पेज आहे. यावर दर आठवाडयाला एक पोस्ट टाकली जाते. या पोस्ट्सना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. लाखो लोकांपर्यंत त्या पोहोचतात. यमगरवाडीचे काम लोकांपर्यंत पोहोचते. लोक या प्रकल्पाला भेट देण्यासाठी येतात. त्यातून विद्यार्थ्यांना काहीतरी शिकता येते आणि यातून यमगरवाडीची प्रसिध्दी होते.


पालावरच्या झोपडीपासून सरकारी खुर्चीपर्यंतचा प्रवास

पंधरा वषर्े निःस्वार्थीपणे सुरू असलेल्या या कार्याची दखल समाजातील विविध स्तरांतून घेतली जातच होती, पण शासन दरबारी याची वर्णी लागायला एवढा वेळ लागला. पण 'देर आये दुरुस्त आये' याप्रमाणेच शासनाच्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण समितीवर उमाकांत यांची निवड करण्यात आली. समाजमन ओळखत महाराष्ट्रातील जिल्हे भटकणाऱ्या तरुणाला थेट सरकारी खुर्चीत बसण्याचा मान मिळाला. याविषयी सांगताना उमाकांत म्हणतात की, ''मी या सगळया जमातीतील लोकांना फार जवळून पाहिले आहे. पारधी समाज गुन्हेगार असतो ही आपली साधारण मानसिकता असते. मग कोणत्याही गुन्ह्यांच्या आरोपाखाली या समाजातील पुरुषांना अटक होते. मग आपल्या घरातील वडील, भाऊ किंवा पती यांना तुरुंगातून सोडविण्यासाठी महिला कोणत्याही परिस्थितीला सामोऱ्या जातात. आपल्या घरातील व्यक्ती तुरुंगातून बाहेर येईल एवढीच त्यांना आशा असते. पोलिसांविषयी आवाज उठविणे शक्य नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले की आज पोलिसांच्या विरोधात मोठया प्रमाणावर खटले दाखल आहेत. देशभरात अनेक खटले सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एक अभ्यास समिती स्थापन केली. या समितीने देशभरातील सगळया राज्य सरकारांना 'राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण समिती' स्थापन करण्याचे सुचविले. भारतामध्ये आठ राज्यांमध्ये ही समिती स्थापन झाली आहे. महाराष्ट्रात 2 जानेवारी 2017पासून या समितीचे काम सुरू झाले आहे. पोलिसांच्या विरोधातील कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा गुन्हे यावरील निकाल या समितीत घेतला जाईल. पाच सदस्यांचे मंडळ या समितीत कार्यरत असेल. चार जण शासकीय विभागातील सदस्य आहेत आणि महाराष्ट्रातून एकमेव अशासकीय सदस्य म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. प्रशासन, पोलीस शासन आणि सामान्य जनता यांच्यातील एक दुवा म्हणून मी गेली 15 वर्षे कार्य करत होतो. त्यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत आहोत आणि करत राहू. माझ्या कामाचा अनुभव आणि समाजाशी असलेली बांधिलकी याच जोरावर या समितीच्या सदस्यपदी माझी निवड करण्यात आली आहे. समाजात अशी एक समिती असेल जी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी असेल.''

पालावरच्या शाळेच्या शिक्षकापासून सुरू झालेला उमाकांत यांचा प्रवास स्वप्नवत वाटावा असाच आहे. त्यांच्या भावी वाटीचालीसाठी शुभेच्छा!

[email protected]

 

संपर्क

भटके विमुक्त विकास परिषद

रावसाहेब कुलकर्णी - 9420301992

शेखर पाटील - 9545631000