...आणि युती तुटली

 विवेक मराठी  27-Jan-2017

राजकीय पक्ष म्हणून पक्ष वाढवणे ही त्यांची ती गरजच आहे. पण या गदारोळात हिंदुत्वाची, पर्यायाने हिंदू समाजाची हेळसांड होणार नाही याची काळजी आगामी काळात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. कारण प्रश्न केवळ दोन पक्षांतील युती तुटण्याचा नसून हिंदुत्वाचा आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर अखेर महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना युती अंशतः तुटली. गोरेगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून युती तुटल्याचे संकेत दिले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, ''पन्नास वर्षांची शिवसेना गेली पंचवीस वर्षे युतीत सडते आहे. आता महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवेल. शिवसेना कुणापुढे भीक मागायला जाणार नाही. सत्ता येणारच असेल तर ती शिवराय, शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांच्या बळावर येईल. यापुढे युती नाही.'' पक्षप्रमुखांनी आपल्या भाषणातून शिवसैनिकांना भावनिक आवाहन करून युती तोडल्याचे जाहीर केले. मात्र हा काडीमोड केवळ महानगरपालिका, जिल्हा परिषद पातळीवरच्या निवडणुकींपुरता आहे की सर्वच स्तरांवरची युती तोडली आहे, यावर पक्षप्रमुखांनी भाष्य केले नाही.
भाजपा व शिवसेना यांची युती होऊन पंचवीस वर्षांचा कालखंड उलटून गेला आहे. इतका प्रदीर्घ काळ दोन राजकीय पक्ष एकत्र राहतात, त्याला कारण हे दोन्हीही पक्ष एका तत्त्वासाठी एकत्र आले होते आणि 'हिंदुत्व' हेच ते तत्त्व होते. आता तुटलेली युती ही तत्त्वावरची निष्ठा कमी झाली म्हणून तुटली नाही, तर व्यवहार जुळला नाही म्हणून तुटली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन या दोघांच्या प्रयत्नातून भाजपा-सेना युती आकाराला आली आणि दोन्ही पक्षांनी त्याचे वेगवेगळया स्वरूपाचे फायदे घेतले आहेत. काही काळ सत्तेची ऊब चाखली आहे. सत्तेच्या पटावर आपले नाव नोंदवले आहे. अशी युती आता तुटली आहे, असे पक्षप्रमुखांनी घोषित केले. ही युती म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विरोधक अशा राजकीय वास्तवात निर्माण झालेली अपरिहार्य गरज होती. आज ती गरज संपलेली नाही, उलट तिची आवश्यकता अधिक मोठया प्रमाणात आहे. अशा वेळी युती तुटली. गेल्या पंचवीस वर्षांत या युतीकडे सर्वसामान्य माणसाने केवळ राजकीय युती म्हणून न पाहता विचारांची, आपल्या सांस्कृतिक आस्थेची युती म्हणून पाहिले होते. हा सर्वसामान्य माणूस कदाचित या दोनही पक्षांचा पाठीराखा नसेल, चार आण्याचा सभासद नसेल, पण हिंदुत्व या शब्दाशी त्यांची नाळ जोडलेली असल्यामुळे आपले राजकीय नेतृत्व म्हणून तो या युतीकडे पाहत होता. तत्त्वासाठी झालेली ही युती असल्यामुळे पंचवीसापैकी वीस वर्षे तरी तत्त्वांची साथसंगत करत वाटचाल झाली. ही वाटचाल इतकी ठोस होती की राजकीय अभ्यासकही तिचे कौतुक करत असत. मात्र मागच्या काही वर्षांत भाजपाचा महाराष्ट्रातील आणि देशातील वाढता प्रभाव शिवसेनेला सहन होत नव्हता. काहीतरी खुसपट काढून भाजपाला नामोहरण करण्याचा, दुस्वास करण्याचा चंगच जणू सेनेच्या नेत्यांनी आणि वाचाळ प्रवत्यांनी बांधला होता. महानगरपालिकेतील जागा वाटपाचे निमित्त करून सेनेने युती तोडण्यात त्याचा शेवट केला.

हिंदुत्वाच्या मुद्दयावर झालेली आणि पंचवीस वर्षे टिकलेली ही युती केवळ राजकीय नव्हती, तर ती हिंदू समाजाची मानसिक भूक होती. याआधी युती तोडण्याचा, युतीत फूट पाडण्याचा प्रयत्न काही मंडळींनी करून पाहिला होता, पण त्याला यश आले नव्हते, कारण कार्यकर्त्यांची मानसिक एकात्मता आणि नेतृत्वाचा समन्वय अधिक घट्ट होता. आपण तत्त्वासाठी युतीत आहोत, याचे तत्कालीन नेतृत्वाला भान होते. आपण स्वतंत्रपणे लढलो, तर केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपली पीछेहाट होऊ शकते, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे अनेक विषयांवर मतभेद असतानाही युती अभंग राहिली. कारण तेव्हा युतीत मतभेद होते. मनभेद नव्हते. मतभेदावर एकत्र बसून चर्चेतून उत्तर निघू शकते. युतीतील नेत्यांनी याआधी अशा प्रकारचा अनुभव अनेक वेळा घेतला आहे. पण आता युती तुटली ती मतभेदामुळे नव्हे, तर मनभेदामुळे.

सेनानेतृत्वाच्या मनात काय चालले आहे, याचे प्रतिबिंब सेनेच्या मुखपत्रातून - सामनातून अनुभवास येत होते. कारण पक्षप्रमुखच सामनाचे संपादकही आहेत. गेले काही महिने सामनामध्ये ज्या प्रकारची मांडणी होत होती, ती पाहता शिवसेना नेतृत्वाच्या मनात काही वेगळेच आहे, याचा सर्वसामान्य माणसाला अंदाज येत होता. केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असणाऱ्या पक्षाकडून आपल्या सहकारी पक्षावर, त्याच्या नेत्यावर ज्या शब्दात टीका केली जात होती, सत्तेत राहून सरकारच्या योजनांची आणि सरकारच्या संबंधित घडामोडींची ज्या प्रकारे खिल्ली उडवली जात होती, ती पाहता शिवसेना सत्तेतील सोबती नसून सत्तेची ऊब चाखत विरोधी पक्षाचे काम करते आहे, असेच सर्वसामान्यांचे मत झाले आहे. सामनामधून ज्याप्रमाणे भाजपाला टीकेचे लक्ष्य केले गेले, ते पाहता शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये केवळ व्यावहारिक मतभेद नसून तीव्र स्वरूपाचे मनभेद झाले आहेत आणि यामुळे व्यावहारिक तडजोडीचा मार्ग स्वतःच पक्षप्रमुखांनी बंद करून टाकला आहे. अशा प्रकारचे मनभेद का निर्माण होतात? तत्त्वासाठी केलेली युती, व्यावहारिक कारणामुळे का तुटते? आणि अशा प्रकारे मनभेद विकोपाला जावेत यासाठी कोणते झारीतील शुक्राचार्य कारणीभूत होते? असे अनेक प्रश्न या निमित्ताने हिंदुत्वाच्या सहानुभूतिदारांना पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरे कधीतरी पक्षप्रमुखांनी दिली पाहिजेत.

आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंचवीस वर्षे जुनी युती तुटली आहे. एका तत्त्वासाठी एकत्र आलेले दोन पक्ष पुढच्या काळात स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील आणि आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतील. राजकीय पक्ष म्हणून त्यांची ती गरजच आहे. पण या गदारोळात हिंदुत्वाची, पर्यायाने हिंदू समाजाची हेळसांड होणार नाही याची काळजी आगामी काळात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. कारण प्रश्न केवळ दोन पक्षांतील युती तुटण्याचा नसून हिंदुत्वाचा आहे.