बंदा रुपया...

 विवेक मराठी  10-Oct-2017

****-जयंत विद्वांस****

 त्याच्यासारखं यश, प्रेम परत कुणाला मिळालं नाही. तुलना करूच नये. आकडयांवर सिध्द होणारा माणूस तो नव्हे. काळ काय, झरझर सरला. तो पंचाहत्तर वर्षांचा झाला. तो अमर नाही, आपणही नाही. पण तो अजरामर आहे. पुढली अनेक शतकं थेटरात अंधार होईल, डोअरकीपर दरवाजे लावेल, टायटल्स संपतील आणि मग त्याचा संमोहनाचा खेळ सत्तर एमएमवर चालू होईल. त्याच्या चेहऱ्यावर हलणारी नस, डोळयांपाशी होणारी मायक्र्रो हालचाल, गळयाशी ताणल्या जाणाऱ्या शिरा, तो अंगावर काटा आणणारा आवाज, कुठल्याही भूमिकेतला तो सुसंस्कृत, अभ्यासपूर्ण वावर असेल.

 अकरा ऑॅक्टोबरला हा माणूस पंचाहत्तर पूर्ण करून शहात्तरीत शिरला. बेचाळीस साली 'चले जाव' आंदोलन झालं हा जसा इतिहास आहे, तसाच हा माणूस त्याच साली जन्माला आला हाही इतिहास आहे. इतिहास असा सांगड घालून शाळांतून शिकवला, तर पोरं अभ्यास करतील बघा. आमचे एक शिक्षक कवितेला गाण्याची चाल लावायचे, विनासायास कविता पाठ होऊन जायची. आपण एकेरी हाक कुणाला मारतो? आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याला आणि आपल्या आवडत्या माणसाला. मुलगा आईला, आजीला अरे तुरे करतो, तसाच आहे तो. लता, किशोर, आशा, सुनील, सचिन सगळेच एकेरी प्रेमातले. विंडीजच्या टीमबद्दल कुठल्याही क्रिकेट कळणाऱ्या रसिकाला असतं, तसंच कुठल्याही वयातल्या सिनेरसिकाला त्याच्याबद्दल विशेष ममत्व आहे. क्रिकेटमध्ये ऑॅलराउंडरचं कौतुक असतं ते त्याच्या नशिबात आहे. त्याने काय केलं नाही पडद्यावर? गाणं गायलं, ऍक्शन केली, रडवलं, उत्तम विनोद करून हसवलं, अन्यायाविरुध्द लढा दिला. आपल्याला जे जे आवडतं, ते सगळं त्याने केलं. काळाच्या ओघात करमणुकीचे संदर्भ बदलत जातात, काही गोष्टी कालबाह्य होतात, काही हास्यास्पद होतात. आपल्याला हे आवडत होतं एकेकाळी? असा प्रश्न आपणच आपल्याला विचारून मनाशीच हसतो. याला हा प्रकार लागू नाही. त्याच्या आजूबाजूचा प्रकार कदाचित कंटाळवाणा असू शकेल, पण तो नाही.

त्याचे चित्रपट बघत गेले की कळतं, काय काय बारकावे टिपलेत त्याने ते. मुद्राभिनय, हातांचा वापर, पॉझेस, उभं राहणं, कशाकशावर बोलणार? तो अनुभवण्याचा विषय आहे. तो स्कॉचसारखा आहे, चवीने बघाल तर अजून आवडत जाईल. त्याचे चित्रपट अनंत वेळा बघण्याचं ते एक कारण आहे मला. मजा येते बघताना. दर वेळेला काहीतरी नवीन सापडत जातं आणि वाटतं, 'अरे, हे या आधी लक्षातच नाहीत आलं'. 'डॉन'मधलं पळणं, जिना चढणं, 'शक्ती'मध्ये दिलीपकुमारकडे बघताना आणि राखीकडे बघताना त्याचे डोळे बघाल, किती सांगतो तो त्यातून. चित्रपट शब्दबंबाळ नसावा, ते नाटक नव्हे. आवाजासाठी प्रसिध्द असलेला हा माणूस चेहऱ्याने किती बोलका आहे ते एकदा समजलं की मजा येते. उन्मळून पडणं, उद्ध्वस्त होणं, विश्वासघाताचा धक्का, जिगर, बदले की आग, खर्जातले संवाद, चेहऱ्याच्या हलणाऱ्या नसा वगैरे गोष्टी अनेक ठिकाणी वेगवेगळया बघण्यापेक्षा के. भाग्यराजनी लिहिलेला तामिळ कमल हसन अभिनित Oru Kaidhiyin Diaryचा हिंदी अवतार 'आखरी रास्ता' बघावा. संपूर्ण चित्रपटात इन्स्पेक्टर विजय हा 'त्या'च्या चित्रपटात शशी, ॠषी कपूर जसे दबलेले असतात, तसा आहे. अर्थात ही किमया 'त्या'ची आणि पटकथेची. कुठेही 'विजय' वरचढ वगैरे वाटत नाही. जेलात जायच्या आधीचा खेळकर डेव्हिड आणि बाहेर आल्यावर गंभीर झालेला बुढ्ढा डेव्हिड, दोन वेगळी पात्रं, वेगळया देहबोली आहेत. त्याने या चित्रपटात सरसर बदलणारे चेहरे काय अप्रतिम दाखवलेत. नेमक्या वाक्याला, शब्दाला त्याचा चेहरा जो काही बदलतो ना, त्याला तोड नाही. (तो ज्या भोळेपणाने रडतो, दलीप ताहिलला विश्वासाने सांगतो, ते बघाच.) पात्राच्या वयोमानानुसार बदललेला आवाज ऐकणीय आहे त्याचा. डेव्हिडचा आधीचा गमत्या आवाज, विजयचा कठोर माणसाचा आवाज, म्हाताऱ्या डेव्हिडचा खर्जातला, राग दाबलेला आवाज.

'शोले' मधले बडबडे वीरू आणि बसंती आणि जोडीला अबोल जय आणि राधा. काय सुरेख लिहिलीयेत ती पात्रं. त्यातला त्याचा मुद्राभिनय बघा, ते म्हशीवरून उतरणं असो, माउथऑॅर्गन वाजवताना वरच्या मजल्यावर बघणं असो किंवा शेवटाला 'ये कहानी भी अधूरी रह गयी' म्हणणं असो, चेहरा बोलतो बॉस. 'रोटी कपडा'मध्ये त्याला चंद्रा बारोटने घ्यायला लावलं होतं मनोजकुमारला, ज्याचा कॅमेरामन होता 'चौदहवीका चांद'वाला नरिमन इराणी. तिथली दोस्ती त्यांची. तो, झीनत, इराणी आणि बारोट. बुडालेल्या नरिमन इराणीला बाहेर काढण्यासाठी त्यांनी 'डॉन' केला होता. इराणी अपघातात गेला रिलीज व्हायच्या आधीच, पण त्याला मरणोपरांत कर्जमुक्त केलं. मला नेमकं आठवत नाही, पण गीतकार(?) समीर की त्याचे वडील अंजानच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं अमिताभच्या हस्ते. बोलता बोलता तो म्हणाला, ''मी आलोच असतो प्रकाशनाला. माझं करिअर घडवण्यात अंजानसाहेबांच्या 'खईके पान बनारसवाला'चा मोठा वाटा आहे.'' अशी कृतज्ञता आता दुर्मीळ आहे. पाय जमिनीला घट्ट चिकटलेले असले की माणसं आभाळाएवढी मोठी होतात, हेच खरं. किती लिहिणार त्याच्या सिनेमांवर? जागा पुरायची नाही. 'त्रिशूल', 'दीवार', 'अमर अकबर', 'मुकद्दर का सिकंदर', 'काला पत्थर', 'अग्निपथ' किंवा अलीकडचा 'पिंक', 'पा', 'सरकार' काय दुर्लक्ष करायच्या लायकीचे आहेत का? एकाच माणसाचे महिन्यात सलग शुक्रवारी चित्रपट रिलीज होताहेत आणि ते सगळे हिट होताहेत, संमोहनच ते. सिंगल स्क्रीनला महिनोन्महिने एका वेळी दोनपेक्षा जास्त एकटयाचे चित्रपट हाउसफुल्ल ठेवणं हे खायचं काम नाही. अनेक टुकार पटकथा त्याच्या नावामुळे हिट होऊन गेल्या.

 तो काही फार मोठा नृत्यं येत असलेला माणूस नाही. आपल्या भगवानदादांची आधुनिक स्टाइल असाच तो नाचतो खरं तर. पण तो जे करतो, ते आवडतं असा सगळा प्रकार आहे. अरुणा इराणीने किस्सा सांगितला होता. 'देखा ना हाय रे' गाणं काही केल्या जमत नव्हतं त्याला. प्रचंड फ्रस्ट्रेशन आलेलं त्याला. आपल्यामुळे शूटिंग खोळंबलंय याची बोच जास्ती होती त्याला. मेहमूद आणि बाकी सगळयांनी त्याला धीर देण्यासाठी सतत हास्यविनोद चालू ठेवले आणि सरतेशेवटी एकदा ते झालं. पहिले काही चित्रपट सोडले तर नंतर तो क्वचित हास्यास्पद दिसलाय पडद्यावर. तो जे करत होता, ते त्याला सूट होत होतं, लोकांना आवडत होतं म्हणूनही तसं वाटलं असावं. पण नाचताना तो धर्मेंद्र, राजकुमारसारखा हास्यास्पद दिसला नाही, उंच आहे म्हणून कुठल्याही अभिनेत्रीबरोबर ऑॅकवर्ड वाटला नाही, नवीन काळात तंत्रज्ञान आणि कलाकारांसमोर आउटडेटेड वाटला नाही. गाडी जसा अलगद रूळ बदलते, तसा त्याने अलगद ट्रॅक बदलला. तो उत्तम श्रोता आहे. शम्मीकपूरच्या तोंडी त्याने 'नीला आसमाँ सो गया'ची चाल 'जमीर'च्या सेटवर ऐकली होती, ती 'सिलसिला'साठी वापरायला त्याने यश चोप्राला सांगितलं. त्याच्याच वडिलांनी लिहिलेलं 'रंग बरसे' आणि 'अग्निपथ'ची कविता पडद्यावर म्हणायचं भाग्यं त्याला लाभलं. सतत पदरी अपयश पडलेल्या माणसाला यश मिळालं की तो जमिनीवर राहत असावा. सलग सात सिनेमे धाराशायी पडल्यावर एक 'जंजीर' त्याला मुक्त करून गेला अपयशातून. यश माणसाला देखणं करतं, एरवी घोडयासारखा चेहरा, बिनकामाची उंची, रेडिओवर नाकारला गेलेला आवाज असे दुर्गुण असलेला हा माणूस काय विलक्षण देखणा दिसतो.

कशी गंमत असते ना, हिरा पारख्याच्या हातात पडला पाहिजे. एका ठिकाणी त्याचं डबिंग चालू होतं. बाहेर राज कपूरने त्याचा आवाज ऐकला. त्याला माहीत नव्हतं कुणाचं डबिंग आहे ते. त्याने न बघता सांगितलं, ''ये आदमी एक दिन राज करेगा.'' यश मिळाल्यावर कौतुक होणं आणि कुणीही नसताना त्यात गुण आहेत हे कळण्यासाठी पारख हवी. राजेश खन्नाने सांगितलं होतं, ''आनंद' त्याच्याबरोबर करणं ही माझी चूक होती.'' तो न बोलता काम करत राहिला. कुणी काय म्हटलं याकडे त्याने फार लक्ष दिलं नाही. एक ऐकीव किस्सा आहे. रॉबर्ट रेडफोर्डला त्याने अपॉइंटमेंट मागितली होती. अडीच मिनिटांची होती. हा इथला सुपरस्टार होता, पण त्याने कमीपणा मानला नाही. तो वेळेत गेला, भेटला आणि ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त गप्पा मारून आला. वेळेत जाणारा माणूस आहे तो शूटिंगलासुध्दा. कर्तृत्वाचा दबदबा म्हणजे काय, ते त्याच्याकडे पाहून कळतं. नाटकी किंवा ओढून ताणून आणलेला विनम्रपणा कळतो, लक्षात येतो. मुखवटे असतात ते. हा माणूस नखशिखांत शिस्त आहे. आदर्श म्हणजे काय असतं शेवटी, त्याच्यासारखं आपण असावं असं वाटणं म्हणजे आदर्श. एकूण काय, तर तो दोनचार लेखात संपण्याचा विषय नव्हे.

लिहायला घेतलं की त्याच्याबद्दल काय लिहिणार? असा प्रश्न मला नेहमी पडत आलाय. न कळत्या वयात त्यालाच पहिल्यांदा पाहिल्यामुळे असेल, पण त्याचा अमिट ठसा एकदा उमटला तो उमटलाच. त्याच्या अभिनयाबद्दल किती बोलणार? आता कंटाळा येईल इतकं बोलून झालंय. रसिक, प्रेक्षक आणि समीक्षक ह्या भिन्न गोष्टी आहेत. 'कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता बघतो तो प्रेक्षक' अशी आपली कॅटेगरी आहे. समीक्षक जे बघतो ते बघू दे बापडा, उगाच पृथक्करण करून मजा घालवायची नसते, हे कळलं की झालं. दोन चार घटका आपल्या विवंचना विसरायला लावून त्या मायावी दुनियेत तो आपल्याला रमवून टाकतो, हे त्याचं मोठं ॠण आहे आपल्यावर. त्याची जादूच वेगळी आहे. पण तो नुसता उंचीनेच मोठा नाहीये. गुणांनीही मोठा आहे. जिवंत दंतकथा. सुसंस्कृत, नम्र. एक प्रामाणिक माणूस, सगळी कर्तव्यं पार पाडणारा, कुणाचाही रुपया न बुडवणारा, संकटांना सामोरा जाणारा आणि हरलेली बाजी जिंकणारा. नम्रता आणि कृतज्ञता हे त्याचे सर्वात मोठे गुण आहेत. म्हणून एक अभिनेता यापेक्षा या सगळया गुणांसाठी तो मला जास्त आवडता आणि आदरणीय आहे. लोक सगळया बाजूंनी बोलतात, पण सगळया बाजूंवर बोलत नाहीत. 'हत्ती आणि सहा आंधळे' या बोधकथेसारखा तो प्रत्येकाला वेगळा दिसू शकेल. त्यामुळे मला ज्यासाठी आवडला, तसाच दुसऱ्यांना आवडेल असं नाही.

माणूस एकदा प्रेमात पडला की दोष दिसत नाहीत किंवा दिसले तरी खुपत नाहीत. एकदा आपण भक्त झालो की मग आपल्याला वाईट दिसत नाही. पण मी काही भक्त नाही. मी त्याच्यावर अतोनात प्रेम करणारा एक माणूस आहे. पण टीका करायला फार बुध्दी लागत नाही. त्यात वेळ घालवण्यापेक्षा पुलं म्हणाले तसं समोरच्यातलं चांगलं काय दिसतं ते बघावं, सांगावं. चुका सांगायला जगात तज्ज्ञांची कमतरता नाहीये. व्यक्तिपूजा हा आपला राष्ट्रगुण आहे. तरीही त्याचा 'मृत्युदाता' पाहताना मी काळझोप लागल्यासारखा झोपलो होतो, 'मर्द', 'गंगा जमना सरस्वती', 'आज का अर्जुन' बघताना तुफान हसलो होतो, 'इन्सानियत' बघताना लाजून काळवंडलो होतो. 'जादूगर', 'अजूबा', 'तुफान' मी अजून पूर्ण बघू शकलेलो नाही. 'द लास्ट लिअर' मी पाहिलेला नाही. तसे त्याचे बरेच नवीन चित्रपट मी पाहिलेले नाहीत. त्यामुळे माझं काही अडलेलंही नाही. त्याचे 'डॉन', 'मुकद्दर का...'. 'अमर अकबर...', 'चुपके चुपके', 'मिली', 'अभिमान', 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'फरार', 'दीवार', 'सत्ते पे सत्ता', 'अग्निपथ', 'आखरी रास्ता', 'सौदागर', 'मजबूर' आणि एक छोटासा हिट 'शोले' पुरेसे आहेत. 'सुहाग', 'कस्मे वादे', 'कालिया', 'शहेनशाह', 'देशप्रेमी', 'हम', 'खुदा गवाह', 'दोस्ताना', 'परवरिश', 'हेरा फेरी' चॅनल बदलताना दिसले तर क्षणिक घुटमळायला बरे आहेत. (लिस्ट थांबवण्यात येत आहे. किती लिहिणार ना!)

त्याची माणुसकी अफाट आहे, जी मला कायम मोह घालत आली आहे. कुठेही वाच्यता न करता चांगलं काहीतरी करत राहणं अवघड असतं. 'इन्सानियत' टिटो टोनीचा ('राम बलराम', 'दो अंजाने' त्याचेच) होता. 89ला सुरू झालेला चित्रपट नूतन, विनोद मेहरा गेल्यामुळे तसाही रखडलाच होता. तो, सनी, चंकी, सोनम, रविना, जयाप्रदा अशी एकदाच एकत्र आलेली स्टारकास्ट होती. तेव्हा त्याचा वाईट काळ होता. तरीही 94ला फिल्म रिलीज झाली. आपटणार हे कन्फर्म होतं. पण त्याचा सिनेमा एक आठवडा भारतभर चालला तरी कॉस्ट वसूल होते, म्हणून त्याने फिल्म पूर्ण केली. त्याच्या करिअरला फटका बसलेलाच होता, हा रिलीज करून आणखी खपली निघणार होती, पण तरीही त्याने मान्यता दिली. निर्माता आयुष्यातून उठला नाही त्यामुळे. त्याच्या केवळ या कृत्यापोटी कृतज्ञता म्हणून मी 'विजय'ला जाऊन हा चित्रपट बघितला होता. प्रत्येक वेळेला पैशाचा मोबदला मिळतो असं नाही आणि एरवी कितीही पैसे टाकले तरी ॠणाची परतफेड करता येईलंच असं नाही. ठपका नको म्हणून त्याचा आणि मुमताजचा 'बंधे हाथ' मला बघायचाय. काळाचा महिमा असतो - 'परवाना' आला तेव्हा नवीन निश्चलने आल्फाबेटिकली नामावली द्यायला विरोध केला होता, कारण 'त्या'चं नाव पहिलं आलं असतं. 'मंगला'ला रीरनमध्ये पाहिला मी, तेव्हा नवीन निश्चल कोपऱ्यात निश्चल होता आणि व्हिलन 'तो' पोस्टर व्यापून. नावात काय नसतं, झेडवरून चालू झालं असतं तरी काही फरक नसता पडला. कर्तृत्व असलं की तो म्हणालाय तसंच, ''हम जहाँ खडे होते है, लाईन वहांसे शुरू होती है.''

आई-बाप सुसंस्कृत असले म्हणजे मुलं असतीलच असं नाही. सुनील दत्तने 'यादें'मध्ये दिलेला पहिला रोल तो आजपर्यंत विसरलेला नाहीये. 'रेश्मा और शेरा'मध्ये ऐन वेळी रोल अदलाबदली झाले आणि तो मुका झाला आणि विनोद खन्ना बोलका, पण सुनील दत्तच्या शब्दावर तो काही बोलला नाही. संजय दत्तच्या पाठीशी परतफेड म्हणून तो कायम उभा असतो. 'नाम' (सलीमचा एकटयाचा 'दीवार') रिलीज झाल्यावर त्याने त्याला सोन्याची साखळी आणि पत्रं दिलं होतं. 'सात हिंदुस्थानी'मध्ये संधी देणाऱ्या ख्वाजा अहमद अब्बास यांच्या आजारपणात त्याने त्यांची काळजी घेतली होती. पंकज पराशरच्या पहिल्या मोठया चित्रपटासाठी ('जलवा') त्याने दोस्तीत स्पेशल ऍपिअरन्स केला होता. रजनीकांतची हिंदीत एंट्री सुखकारक व्हावी, म्हणून 'अंधा कानून' केला. एबीसीएल काढली आणि त्यात तो बुडाला. बुडणारच होता. माणूस भिडस्त असला की वेगळं काय होईल? नाहीतर मग पळून गेला असता की तो. पडद्यावरचा नायक नावाला नव्हता तो. त्याच्यासारखाच धीराचा आणि सरतेशेवटी विजय मिळवणारा होता. पेशन्स लागतात, नैराश्यं आलं की धीर खचतो, सल्लागार वाढतात, कुणीही अक्कल शिकवायला लागतं. काही न बोलता काम करत राहणं सोपं नसतं. 

दुर्धर 'मायस्थेनिया ग्रेव्हीस', पुनीत इस्सारबरोबरची फायटिंग, टी.बी. सगळयातून तरला, दिवाळखोरीच्या उंबरठयावरून परत आला. संपूर्ण देश एखाद्यासाठी प्रार्थना करतो याला पुण्याई लागते. कुणी नवस बोललं, कुणी देवाला उलटं चालत गेलं. नोंद नसलेल्या अनंत प्रार्थना पाठीशी उभ्या राहिल्या, कशामुळे? त्याने जे काही दिलं इतक्या वर्षात, त्याची ती मूक परतफेड होती. रेखा, परवीन, माधवी अनेक नावं जोडून झाली, तो एक शब्दही कधी बोलला नाही. 'बावर्ची'च्या सेटवर तो जयाला घ्यायला जायचा, तेव्हा खन्ना त्याच्याशी बोलणं लांब, ओळखसुध्दा द्यायचा नाही. पण तो एक शब्दही कधी बोलला नाही, उलट त्याला कायम पहिला सुपरस्टार म्हणून वंदत आला.  बोफोर्स प्रकरणात एकदाही आक्रस्ताळं तो बोलल्याचं मला आठवत नाही किंवा निर्दोष सुटला म्हणून 'जितं मया' करत बोलत सुटला नाही. मौनात मोठी ताकद असते. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणं कधीही चांगलं. तो तेच करत आलाय. पेशन्स पाहिजेत बॉस. मला त्याला बघितलं की एक शेर आठवतो - 'अपने खिलाफ बातोंको अक्सर मैं खामोशी से सुनता हूं ... क्योंकी...जवाब देनेका हक मैंने वक्तको दे रखा है'! आदर्श असे गल्लोगल्ली मिळत नसतात. वर म्हटलं ते आणि आदर्श म्हणजे काय याची आणखी एक व्याख्या आहे माझी. आपल्याला सोयीस्कर असतो तो आदर्श नसतो, त्याच्यासारखं वागणं, जगणं आपल्याला जमणार नाही असं वाटून जातं, तो माणूस 'आदर्श' असतो.

 

 टॅक्स भरण्यासाठी त्याने 'दो बूंद जिंदगीके' जाहिरात केली होती. पैसे किती मिळाले यापेक्षा त्याच्या नावामुळे पोलिओचे डोस खेडयापाडयात दिले गेले आणि अशिक्षित लोकांनीही घेतले, याचं क्रेडिट मोठं आहे. शब्दाला वजन हवं, ओ द्यायला हाक मारणारा माणूसही तास हवा. कर्जातून बाहेर पडण्यासाठी एका संध्याकाळी यश चोप्रांकडे जाऊन काम मागण्यात त्याला कमीपणा वाटला नाही. कुठल्याही फालतू जाहिराती करतो तो, पण त्याला कारण आहे. आर्थिक दुरावस्था कदाचित त्याच्या मनात भीती धरून आहे. खरं तर आता गरज नाही, पण आपण त्याला सांगायचं हे चुकीचं आहे. सगळे गुणच असतील तर देवत्व मिळतं. तो माणूस आहे तेच बरंय. छोटया पडद्यावर यायला मोठया कलाकारांचा धीर व्हायचा नाही. अतिपरिचयाने किंमत कमी व्हायची भीती असते. पण हा माणूस या वयात 'कौन बनेगा करोडपती?' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळयात जास्ती टीआरपी खेचतोय. नाव आल्यावर त्याच्याकडे जाताना माणसं सद्गदित होतात. त्याला भेटणं, त्याच्यासमोर बसणं, बोलणं, त्याला स्पर्श करणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं, आहे. प्रश्नांची उत्तरं समोर पीसीवर दिसतात, पण इतर जे बोलतो, ती त्याची बुध्दी आहे. स्क्रिप्टच्या बाहेरचं बोलायला वाचन लागतं, अभ्यास हवा. समोरच्याला न्यूनगंड वाटू नये, दडपण येऊ नये यासाठी त्याची वागण्याची पध्दत बघा. त्याचं कौतुक केल्यावर त्याची होणारी कुचंबणा बघा. नकली नसलेला सभ्यपणा त्याच्यात आहे. त्याची-माझी भेट होण्याची सुतराम शक्यता नाही. पण तेच बरंय. शब्द फुटणार नाही एकतर आणि डोळे भरून येतील, त्यामुळे तो धूसर दिसेल.

त्याच्या सुसंस्कृतपणाचा एक फारसा प्रसिध्द नसलेला किस्सा आहे. खूप वर्ष झाली. प्रसिध्द गोगटे कुटुंबीयांकडून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचा सत्कार झाला होता. कसला तरी पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम होता. सत्कार झाला, भाषणं झाली. सगळयांना मंत्रमुग्ध करून तो निघाला. मग मागे मुख्यमंत्री, गोगटे कुटुंबीय व इतर मान्यवर गप्पा मारत उभे होते. उत्सवमूर्ती गेल्यामुळे काही लोक बाहेर गप्पा मारायला आले. बघतात तर काय, तो पार्किंगमध्ये गाडीला टेकून उभा. एक जण अचंबित होऊन पुढे गेला (ज्याने मला हा किस्सा सांगितलाय तो). कारण विचारलं, काही राहिलंय का, कुणी येणार आहे का? नाहीतर आत चला, मी थांबतो कुणी येणार असेल तर. त्यानी दिलेलं उत्तर वेड लावणारं  होतं. ''नाही, तसं काही नाही, पण मुख्यमंत्री हे राज्याचे प्रथम नागरिक आहेत, त्यांनी गेल्यावर आपण जायचं हा शिष्टाचार आहे. म्हणून थांबलोय.'' बातमी वाऱ्यासारखी पसरली. मग मुख्यमंत्री गेले, मग हा गुणांनीही उंच असलेला माणूस गेला.  बारा फुटी फ्लेक्स लावून उपयोग नाही, अशी उंची गाठण्यासाठी मुळात तेवढं उंच असावं लागतं माणसाने. 'वाहतो ही दुर्वांची जुडी'मध्ये (चू.भू.दे.घे.) बाळ कोल्हटकर फार सुंदर म्हणून गेले आहेत - 'नियतीने उत्कर्षाच्या प्रत्येक क्षणी एक घसरण्याचा क्षण ठेवलेला असतो.' उंचीवर पोहोचलेला माणूस म्हणजे सतत स्लीपर घालून तेल सांडलेल्या जमिनीवरून चालणारा माणूस. एक क्षण पुरतो पतन व्हायला, घसरायला. म्हणून त्याच्याकडे बघून मी एवढंच शिकलोय आणि लक्षात ठेवलंय की 'मान वर हवी ती अजून किती उंची गाठायची आहे ते बघण्याकरता, नाहीतर ठेच आहेच.'

आमची पिढी सगळयात नशीबवान. आम्ही लता, आशा, सचिन, द्रविड, मार्शल, रिचर्ड, प्राण, आरडी, किशोर पाहिले, ऐकले.  त्याच्यासारखं यश, प्रेम परत कुणाला मिळालं नाही. तुलना करूच नये. आकडयांवर सिध्द होणारा माणूस तो नव्हे. काळ काय, झरझर सरला. तो पंचाहत्तर वर्षांचा झाला. तो अमर नाही, आपणही नाही. पण तो अजरामर आहे. पुढली अनेक शतकं थेटरात अंधार होईल, डोअरकीपर दरवाजे लावेल, टायटल्स संपतील आणि मग त्याचा संमोहनाचा खेळ सत्तर एमएमवर चालू होईल. त्याच्या चेहऱ्यावर हलणारी नस, डोळयांपाशी होणारी मायक्र्रो हालचाल, गळयाशी ताणल्या जाणाऱ्या शिरा, तो अंगावर काटा आणणारा आवाज, कुठल्याही भूमिकेतला तो सुसंस्कृत, अभ्यासपूर्ण वावर असेल. आम्ही कदाचित नसू ते बघायला. पुढच्या पिढया बघतील, त्या चकित होतील. अरे, कोण रे हा? म्हणतील, मग त्याला शोधतील आणि हरखून जातील. आम्ही तुला वर्षांनुवर्षं पाहिलं, ऐकलं हे आमचं भाग्य. तुला निरोगी शंभर वर्षं आयुष्य लाभू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पूर्वी सोळा आण्याचा रुपया होता. पूर्ण काम झालं की 'सोळा आणे काम झालं असं म्हणायची पध्दत होती. एखादा माणूस परिपूर्ण असेल, तर त्याला बंदा रुपया म्हटलं जायचं. दशमान पध्दतीत शंभर पैशाचा रुपया झाला. चार, आठ आणे तर कधीच वापरातून कमी झाले. वयाचे बारा आणे पूर्ण झाले त्याचे, पण तो मुळातच बंदा रुपया आहे - माणूस म्हणून, अभिनेता म्हणून, आदर्श म्हणून. आणखी काय बोलू? तुझे ॠणको आहोत आम्ही. 

9823318980