आपण भारतीय आहोत

 विवेक मराठी  03-Oct-2017

 

विजयादशमीच्या उत्सवानिमित्त आपण सारेच जण आपल्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देत असतो. मात्र, आपल्या परंपरेचे, वारशाचे आणि शौर्याचे स्मरण करताना आज आपले वर्तमान काय आहे याकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. एका बाजूला आपण जागतिक क्रमवारीत विविध क्षेत्रांत अग्रेसर होत आहोत असे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला जागतिक पातळीवर भारताची नाचक्की करण्याची संधी आपले शेजारी सातत्याने शोधत आहेत. या साऱ्याला उत्तर देण्यासाठी आपले सरकार समर्थ आहे. सरकारचे काम सरकार करेल, पण आपले काय?

पाकिस्तान हे दहशतवाद्यांचा कारखाना आहे, हे उघड सत्य आहे. दाऊद पाकिस्तानात लपून बसला आहे हेही आता समोर आले आहे. डोकलाममध्ये चीनने माघार घेतली असली, तरी ती अशांतच राहणार. भारतीय मुत्सद्देगिरीने तूर्तास चीनला काबूत आणले आहे, पण हेच चित्र कायम राहील अशी स्थिती नाही. म्यानमारमधून रोहिंग्या मुसलमान अनधिकृतपणे भारतात घुसत आहेत आणि त्यांना भारतात आश्रय द्यावा अशीही मागणी काही मंडळी करत आहेत. पूर्वांचलात प्रयत्नपूर्वक स्थापन केलेली शांतता भंग करण्यासाठी काहीचे प्रयत्न चालू आहेत. अशा पार्श्वभूमीवर सरकारचे काम आणि भारतीय नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी यांचा विचार करतो का?

आपल्याला सर्वच गोष्टींकडे राजकारण, मतपेढी अशा चष्म्यातून पाहायची सवय लागली आहे. त्यामुळे सर्वच गोष्टींना सरकार किंवा राजकीय पक्ष जबाबदार आहेत असे म्हणून आपण आपली जबाबदारी झटकून टाकतो का? सरकार जे करायचे ते करेलच, पण आपण नागरिक म्हणून काय करतो? सरकारवर आवश्यक तेव्हा टीका करायला हवीच. त्याशिवाय सरकार योग्य दिशेने जात नाही. त्याचबरोबर आपण हेही लक्षात घ्यायला हवे की सरकार ही व्यवस्था आहे आणि ती बदलता येते, पण कायम राहते ती लोकशाही आणि भारतीय नागरिक म्हणून मूल्य. या मूल्यासाठी आपण काय करतो? ते आपल्या जगण्यावागण्यातून कसे प्रतिबिंबित करतो? हा खरा प्रश्न आहे.

याच देशात राहून आपण आपल्या देशाचे अहित होऊ शकेल अशा गोष्टीचे समर्थन आपण का करतो? आपण आपल्या राष्ट्राला एकसंघ करण्याऐवजी त्यांचे विघटक करणाऱ्या घटकाचे समर्थन का करतो? आपणच आपल्या हाताने राष्ट्रापुढे समस्या निर्माण होतील असे वर्तन का करतो? 'आपण भारतीय आहोत यांचा पडलेला विसर' असे या साऱ्या प्रश्नांचे उत्तर आहे. आपण आपल्या जाती, संप्रदाय, विचारधारा यांच्या प्रभावाखाली येऊन भारतीय नागरिक म्हणून संविधानाने आपल्याला दिलेली ओळख आपण विसरलो आहोत का? आजच असा प्रश्न विचारावा वाटतो, कारण आज तशी परिस्थिती आहे. या परिस्थितीचे दर्शन घडवणारे उदाहरण म्हणज रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न. म्यानमारमधील बौध्दांच्या, हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या रोहिग्यांच्या टोळया भारतात येतात आणि त्याचे इथले समर्थक मूलभूत अधिकारानुसार सरकारने त्यांचे पुनर्वसन करावे म्हणून कोर्टात उभे राहतात. घुसखोरांना भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार द्या म्हणणारे या देशाच्या हिताचा विचार करतात असे कशाच्या आधाराने म्हणायचे ?

आपला देश एकसंघ राहिला पाहिजे अशी आपण अपेक्षा ठेवायची आणि राजकारणसाठी मोहरमची पाठराखण करत ममताबाईंनी दुर्गा विसर्जनाला विरोध करायचा, 'देश के तुकडे होंगे हजार' अशा घोषणा देणाऱ्यांना जननायक म्हणून प्रस्थापित  करण्याचा प्रयत्न करायचा... हे सारे प्रकार देशहिताच बळी घेणारे आहेत. सामाजिक एकता आणि राष्ट्रीय एकात्मता यांना चूड लावणारे आहेत. आणि त्यामागे मतपेढीचे राजकारण, सत्ताधाऱ्यांपुढे अडचणी निर्माण करण्याचे धोरण तर आहेच, पण त्याहीपेक्षा आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा एक मोठा भाग आहे.

आज आपल्या देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. पाकिस्तान आणि चीन सातत्याने काहीनाकाही कुरघोडया करत आहे. सीमेवरचे आक्रमणाचा आपले सैन्यदल समर्थपणे सामना करेल. पण देशांतर्गत चालू असणारी अघोषित फुटीरतावादी मोहीम आपण कशी मोडून काढणार आहोत? हा आजचा प्रश्न आहे. सीमेवरचे ताणतणाव आणि देशांतर्गत सामाजिक विघटनाची सुरुवात पाहता आता आपण आपल्या खऱ्या ओळखीला अधोरेखित - म्हणजे आपण भारतीय असल्याच्या जाणिवेला अधिक प्रखर करण्याची गरज निर्माण झाली आहे. आज आपल्या देशात प्रांतवाद, जातवाद, संप्रदायवाद यांचे पेव फुटले आहे आणि त्यातून माणूस माणसापासून दुरावत आहे. एकमेकांविषयी संशय आणि अविश्वासाने बोलले जाते. समाजाचा, राष्ट्राचा मूळ एकक असणारा माणूसच आज जात, संप्रदाय, धर्म आणि विचारधारा यांच्या गर्तेत गटांगळया खात आहे. या साऱ्या परिस्थितीतून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संविधानाने दिलेली भारतीय नागरिक ही ओळख आपल्या मानसिकतेत आणि व्यवहारात रुजवणे. जोपर्यंत आपण जात-धर्म आणि राष्ट्रविरोधी विचाराच्या जंजाळातून स्वतःला मुक्त करून 'मी केवळ भारतीय नागरिक' ही ओळख सांगत नाही, तोपर्यंत देशापुढीलआणि आपली संस्कृतीपुढील धोके कायम राहणार.

विजयादशमीला आपल्या संस्कृतीने सीमोल्लंघन करण्याचा वारसा दिला आहे. हा वारसा केवळ भौगोलिक सीमा उल्लंघन करण्यास सांगतो असे नाही, तर मानसिक आणि बौध्दिक सीमाही आपण पार कराव्यात अशी त्यामागे अपेक्षा असतात. आपण आजवर जात, धर्म, संप्रदाय या कुंपणात अडकून पडलो आहोत. हे कुंपण मोडून पुढे जात आपण भारतीय आहोत हे सांगण्याची आणि हीच वेळ आहे. चला, आपल्या सीमा मोडू या, खऱ्या अर्थाने भारतीय होऊ या.