स्वर्गीय केदारनाथ साहनी - राष्ट्रचिंतक व्यक्तिमत्त्व

 विवेक मराठी  04-Oct-2017

 

**सुरेश द. साठे***

अत्यंत देखणे, गोरेपान, मध्यम बांध्याचे हे व्यक्तिमत्त्व शुभ्र पांढरे धोतर, झब्बा, जाकिटात सर्वांचेच आकर्षण होते. कायम स्मितहास्य, कधीही न रागावणारे, हळुवारपणे बोलून समोरच्याचे म्हणणे ऐकून घेऊन त्याला समजेल अशा भाषेत बोलण्याची केदारनाथ साहनी यांची हातोटी विलक्षण होती. पक्षशिस्त, कार्यकर्त्यांचे आचरण, स्वीकृत कार्यावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रामाणिक व्यवहार करण्याची त्यांची शिकवण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. केदारनाथजींनी कोणत्याही कामाचे श्रेय स्वत: घेतले नाही. सदैव सभोवतालच्या कार्यकर्त्यांना पुढे अाणण्यासाठी प्रोत्साहन देणारी त्यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी आता या पार्टीत अगदी अपवादानेच पाहावयास मिळतात.

पंजाब प्रांतात 1937मध्ये संघकार्य सुरू करण्यासाठी नागपूरहून राजाभाऊ पातुरकर, के.डी. जोशी, नारायणराव पुराणिक व मोरेश्वर मुंजे अशा चार युवकांना पाठविण्यात आले. सर्वप्रथम लाहोर (आता पाकिस्तानात आहे) येथे प्रथम शाखा सुरू करून या स्वयंसेवकांनी रावळपिंडी, सियालकोट, फिरोजपूर, मुलतान येथेही शाखा घेण्यास सुरुवात केली. संघविस्तार करणे म्हणजे रोज संध्याकाळी मोकळया जागेत मैदानावर शालेय विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांचे खेळ घेणे, राष्ट्रभक्तिपर पद्य म्हणून घेणे आणि शेवटी संघप्रार्थना (त्या वेळी 'हे प्रभो श्रीराम दूता शील हमको दीजिये...' अशी 8 ओळींची संघप्रार्थना होती) असा कार्यक्रम होत असे. तासाची ही शाखा संपली की हे कार्यकर्ते त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांचा परिचय करून घेत असत आणि घरातील मोठया व्यक्तींना संघासंबंधी माहिती देत असत. यातूनच संघ वाढत असे. पुढे पूजनीय डॉक्टरांच्या निधनानंतर माधवराव मुळये यांच्यासह अन्य चार कार्यकर्त्यांनी पंजाब (संपूर्ण पंजाब, जम्मू-काश्मीर, आत्ताचा हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली) प्रांतात जाऊन नियमितपणे संघ शाखा सुरू करून त्यात विद्यार्थ्यांबरोबर व्यावसायिक, किसान अशांनाही आकर्षित करून घेतले. पुढील 2-3 वर्षांत बघता बघता झपाटयाने संघ वाढू लागला. 1943मध्ये या भागात 100पेक्षा जास्त स्थानी शाखा सुरू झाल्या. त्यात हिंदू महासभेचे, आर्य समाजाचे कार्यकर्तेही प्रभावित होऊन कार्य करू लागले.

वर्ष 1944मध्ये पंजाब प्रांतातून 40पेक्षा जास्त स्वयंसेवक प्रचारक म्हणून बाहेर पडले. अमृतसर, जालंधर, लाहोर येथे त्यांचे 10 दिवसांचे वर्ग घेण्यात आले. त्यात बाबाराव सावरकर, बाबासाहेब आपटे, वसंतराव ओक, भय्याजी दाणी, बाळासाहेब देवरस इ.नी मार्गदर्शन केले. स्वत: माधवरावांनी यासाठी अपार कष्ट घेऊन सर्वांची संघविस्ताराची स्थाने निश्चित केली. या पंजाबातील प्रचारक वर्गाच्या व्यवस्थेत केदारनाथ साहनी हा 18 वर्षांचा रावळपिंडीचा युवक होता. तेव्हा तो बी.ए.चा अभ्यास करत होता. नंतर जम्मू भागात त्याची नियुक्ती करण्यात आली. या सर्व 40 प्रचारकांना जेथे जेथे पाठविण्यात आले, त्या सर्व स्थानी राहण्याची सोय करण्यात आली. एवढेच नव्हे, तर तेथील प्रतिष्ठित व्यक्ती पालक म्हणूनही जबाबदारीने या युवकांना मदत करते झाले.

केदारनाथ साहनी यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1926 रोजी रावळपिंडीजवळील तट्टा या लहानशा खेडयात झाला. वडील केशवदास हे सैन्यात अधिकारी होते. केदारनाथांना 7 भाऊ व 2 बहिणी होत्या. आईचे लहानपणी निधन झाल्यावर त्यांच्या सावत्र आईने त्यांचा सांभाळ केला. मामाकडे अमृतसरला मॅट्रिक झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते जम्मूत वडिलांबरोबर गेले. तेथे त्यांचा संघाशी संबंध आला. त्या वेळी जम्मूत बलराज मधोक, प्रेमनाथजी डोगरा, ठाकूर रामसिंह या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून संघकार्य विस्तारित होत होते. या सर्वांशी केदारनाथांचा अगदी जवळून संबंध आला. ठाकूर रामसिंग यांच्याशी मोठया भावाप्रमाणे आपले नाते जडल्याचे केदारनाथ सांगत असत. मी माधवराव मुळये यांच्या चरित्रलेखनाच्या निमित्ताने दिल्लीत केदारनाथ यांना अनेक वेळा भेटलो. त्यांनी मला त्या वेळच्या पंजाब-काश्मीरमधील संघकार्याची, देशाच्या विभाजनाची व नंतरच्या संघकार्याची बरीच माहिती दिली. या सर्व निवेदनात ते ठाकूर रामसिंह व माधवराव मुळये यांच्याबद्दल आदराने बोलत असत. अमृतसर येथे 1944मध्ये ठाकूर रामसिंह यांची प्रचारक म्हणून नियुक्ती झाल्यावर केदारनाथजी विद्यार्थिदशेतच त्यांच्यासह अमृतसरला संघकार्यासाठी गेले. समवेत त्यांचे कनिष्ठ बंधू विश्वामित्रही होते. (तेही पुढे काही वर्षे प्रचारक होते.) तेथूनच पुढे संघप्रचारक बनून केदारनाथजी जम्मूत आले. तेथे त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेजमध्ये बी.ए. पूर्ण केले.

महात्मा गांधींनी 1942मध्ये 'भारत छोडो' आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने पुढे सर्वत्र जोर धरला. काँग्रेसचा या भागात प्रभाव होता. मुस्लीम लीगही सक्रिय होती. त्यांना स्वतंत्र पाकिस्तान हवे होते. 1944पासून तर या भागात पूर्णत: अराजक माजले होते. स्थानोस्थानी तीव्र आंदोलने सुरू झाली. त्यात हिंदू-मुस्लीम असा परस्परात वैरभाव ठेवून खून, जाळपोळीचे प्रकारही सुरू झाले. ही सर्व वर्षे संघकार्यकर्त्यांना आव्हानाचीच गेली. संघविस्तार करताना अनेक अडचणी येत असत. त्यात हिंदूंमध्ये आर्य समाज, शिखांच्या संघटना, रजपूत-जाट या जातींचे गट इ. सर्वांना संघात सामावून घेऊन त्यांच्या अंत:करणात राष्ट्रीय भावना प्रज्वलित करण्याची खरोखर कसोटीच होती. पण या सर्व विपरीत परिस्थितीला तोंड देऊन केदारनाथजींसारख्या त्या वेळच्या अनेक कार्यकर्त्यांनी शाखा विस्तार केला. 1946मध्ये मीरपूर येथे जिल्हा प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आताच्या पाकिस्तान सीमेवरील हा भाग त्या वेळी मुस्लीमबहुल होता. महाराजा हरिसिंग (काश्मीरचे त्या वेळचे राजे) यांच्या सैन्यातही तेव्हा मोठया संख्येने मुस्लीम असायचे. फाळणीच्या समयी सुमारे वर्षभर ही महाराजांची सेनाही पाकधार्जिण्यांना मदत करायची, म्हणूनच देशाच्या विभाजनाची अंतिम सीमा निश्चित होऊनही काही गावे पाकिस्तानने बळकावली. या मीरपूरमध्ये केदारनाथजींनी 1948पर्यंत पाय रोवून काम केले. पुढे पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित हिंदूंच्या पुनर्वसनाचे, छावण्यांच्या व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी याच भागात त्यांची नियुक्ती झाली.

भारतीय स्वातंत्र्यलढयात संघाचे फार मोठे योगदान आहे. अगदी कराची (सिंध)पासून वरत हिमालयात मर्दन (तक्षशीला)पर्यंतच्या 600 मैलाच्या सीमेवर आणि आतील 100 मैलापर्यंतच्या भागात संघशाखांचे जाळे होते. पाकिस्तानातील कित्येक गावा-शहरांतून संघाचे नियमित काम चालत असे. प्रत्यक्ष स्वातंत्र्यप्राप्तीच्या उद्घोषणेपूर्वी दोन वर्षांपासून (1945पासून) देशविभाजनाच्या घातक हालचाली सुरू झाल्या होत्या. हिंदू वस्त्यांवर हल्ले, लुटालूट, जाळपोळ, महिलांवर अत्याचार असे रोज घडत होते. या सर्वांना तोंड देत हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी हजारो स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून लढा दिला. अनेकांना प्राण गमवावे लागले. काही संघप्रचारक तर फाळणीनंतर 5-7 महिन्यांनी भारतात परतले. माधवराव मुळयांसारखे ज्येष्ठ प्रचारकही त्यात होते. लाहोरहून सहीसलामत अमृतसरला परत येण्यासाठी त्यांना तब्बल 4 महिने लागले. तेथे ते हिंदूंचे तसेच काही मुस्लीम कुटुंबाचेही भारतात सुरक्षित स्थलांतर होण्यासाठी कार्यरत होते. खुद्द लाहोरमध्ये त्या वेळी 55 टक्के हिंदू होते. तो भाग पाकिस्तानला देऊ नये असा संघाचा आग्रह होता. त्या वेळचे पंजाबचे मुख्यमंत्री काँग्रेस नेते गोकुळचंद नारंग यांनीही यासाठी प्रयत्न केले. सरदार पटेल, मौलाना आझाद 1946च्या जूनमध्ये लाहोरला आले, तेव्हा यासंबंधीचे त्यांना निवेदनही देण्यात आले, पण त्याचा उपयोग झाला नाही. बलराज मधोक, वसंतराव ओक, रामसिंह ठाकूर, डॉ. हरवंशलाल, भाई महावीर, पं. लेखराज शर्मा, जगदीश अब्रोल, यज्ञदत्त शर्मा, बलराम टंडन, वेद प्रकाश शास्त्री, डॉ. मंगल सेन, चमनलाल, बापूराव भिशीकर, राजपाल पुरी, केदारनाथ, धर्मवारजी, बापूराव पालधीकर, केवल नय्यर, डॉ. बलदेव प्रकाश अशा त्या वेळच्या आघाडीच्या संघ प्रचारकांनी फाळणीपूर्वी आणि नंतरही पुढे दोन वर्षपर्यंत याविपरीत स्थितीतून भारतीयांचे सुरक्षितपणे स्थलांतर होण्यासाठी जिवापाड कष्ट घेतले. विस्थापित कुटुंबीयांसाठी भारतीय सीमेवर सुमारे 125 छावण्या उभ्या केल्या. त्याला भारतीय लष्कराने संरक्षण दिले. हे काम अनेक दिवस चालू होते. या छावण्यांमध्ये काही शरणार्थी मुस्लीमही होते (ज्यांना भारतात राहायचे होते.) केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पुढे या सर्वांना भारतात अन्यत्र पाठविण्यासाठी मदत केली. थोडे विस्ताराने हे लिहिले, याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय पक्ष व विशेषत: समाजवादी, साम्यवादी विचारसरणीच्या पुढाऱ्यांनी सर्वत्र प्रसिध्दीमाध्यमांद्वारे, 'स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संघाने काहीही न केल्याचे' बेछूट आरोप करण्याचे सतत चालविले आहे. संघाने स्वातंत्र्यासाठी निश्चित कशा पध्दतीने प्रयत्न करण्यात आले, हे त्यांच्या ध्यानी येईल.

केदारनाथ साहनी मीरपूर-राजौरी भागात होते. त्यांनी त्या भागातील 30 छावण्यांचे संचालन केले. विस्थापित कुटुंबांच्या व्यवस्था मार्गी लावल्या. 1948-50 या दोन वर्षांत त्यांनी निर्वासितांसाठी शासकीय यंत्रणेद्वारे होत असलेल्या सर्व प्रयत्नांना मदत केली. त्यानंतर ते 3 वर्षे जम्मूमध्ये प्रचारक होते. गांधीहत्येनंतर लगेचच 4 फेब्रुवारी 1948 रोजी संघावर बंदी घालण्यात आली. पूजनीय श्रीगुरुजींसह सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. पुढे 1949च्या जूनमध्ये ही बंदी हटविण्यात आली. केदारनाथजी तेव्हा हिस्सार कारागृहात होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सत्याग्रहाच्या वेळी ते जम्मूमध्ये होते. शेख अब्दुल्लांनी मुखर्जींना पकडून तुरुंगामध्ये ठेवले. तेव्हा मुखर्जींना भेटण्यासाठी दिल्लीहून प्रसिध्द वकील उमाशंकर दीक्षित आले होते. त्यांच्यासह केदारनाथजी होते. त्यांची डॉ. मुखर्जींशी ही अखेरची भेट होती. पुढे महिन्याभरातच मुखर्जींचे निधन झाले.

त्या वेळचे दिल्लीतील प्रचारक वसंतराव ओक यांनी केदारनाथजींना 1953च्या अखेरीस दिल्लीत बोलावून घेतले. एकनाथजी रानडे व माधवराव मुळये यांनी बलराज मधोक, डॉ. भाई महावीर, केदारनाथ साहनी, विजयकुमार मल्होत्रा, लाला हंसराजजी गुप्ता यांना दिल्लीत संघाच्या कामात लक्ष देण्यास सांगितले. त्या वेळी दिल्लीत बरेच अस्थितरतेचे वातावरण होते. फाळणीमुळे निर्वासित होऊन आलेल्या शीख व हिंदूंच्या पुनर्वसनाचे मोठे काम होते. अनेक कुटुंबीयांचा पूर्वी संघाशी संबंध होता. हे संघकार्य सांभाळून या सर्वांना विविध प्रकारची कामे दिली गेली. प्रचारक म्हणून न राहता त्यांनी स्वत:चा व्यवसाय करण्याचाही निर्णय केला. केदारनाथजींनी भारतीय जनसंघाचे संघटनमंत्री म्हणून दिल्लीत काम करण्यास सुरुवात केली. पुढे 1961मध्ये त्यांचा विवाह झाला. संसार सांभाळून त्यांनी पक्षासाठी कार्य करण्यास प्रारंभ केला. सुमारे 16 वर्षे त्यांनी जनसंघाचे दिल्लीचे नेतृत्व केले. भाई महावीर, कंवरलाल गुप्ता, मदनलाल खुराना, विजयकुमार मल्होत्रा यांच्यासह त्यांनी पक्षाचा फार मोठा विस्तार केला. 1967मध्ये जनसंघाने दिल्ली महानगरपालिकेत पूर्ण बहुमत प्राप्त केले. लोकसभेच्या 6पैकी 5 जागांवर विजय मिळविला. केदारनाथजी महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. तेव्हा दिल्लीला राज्याचा दर्जा नसल्याने तेथील महानगरपालिका एकूण सर्व कारभार पाहात असे. अणीबाणीपर्यंतची 9 वर्षे येथे जनसंघाचेच वर्चस्व होते. अणीबाणीत केदारनाथजींना भूमिगत राहून कार्य करण्याची सूचना करण्यात आली. त्यांनी डॉ. कपूर असे नाव धारण करून सर्वत्र संचार केला. परदेशात अणीबाणीविरोधात तेथे जनमत संकलित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही स्वयंसेवकांना बाहेर पाठविण्यासाठी सर्व व्यवस्था करण्याचे दायित्व त्यांना देण्यात आले. ते त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. 20पेक्षा जास्त कार्यकर्ते बाहेर गेले. त्यात सुब्रह्मण्यम स्वामी, मकरंद देसाई इ. होते. 1980मध्ये केदारनाथजी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयात जगदीशप्रसाद माथुरांना मदत करू लागले. त्यांच्याकडे परदेशस्थ भारतीयांशी संपर्क ठेवण्याचे काम देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1996मध्ये दिल्लीत भाजपा केंद्र कार्यालयात महासचिव म्हणून कार्यरत होते, तेव्हा साहनीजी दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष होते. मोदीजींनी सहानीजींच्या निधनानंतरच्या शोकसभेत श्रध्दांजली वाहताना म्हटले की, ''साहनीजींनी वेळोवेळी दिलेला सल्ला व केलेले मार्गदर्शन मला आजही कार्य करण्यासाठी उपयुक्त ठरलेले आहे.''

पांचजन्य आणि ऑर्गनायझर या साप्ताहिकांचे प्रकाशन स्थान व एकूणच व्यवस्थापन 1958मध्ये दिल्लीत आणण्यात आले. भारत प्रकाशन या संस्थेला आर्थिकदृष्टया स्थैर्य देण्याचे कार्य माधवरावांनी केदारनाथजी व त्या वेळचे खासदार महावीर त्यागी, कृष्णलाल वर्मा यांच्यावर सोपविण्यात आले. माननीय नानाजी देशमुखांच्या मदतीने या सर्वांनी प्रकाशन संस्थेला मजबुती दिली. त्याशिवाय संघाच्या केशव कुंज (झंडवाला) कार्यालयाच्या विस्तारित इमारतीसाठीसुध्दा भरीव निधी उपलब्ध करून दिला. माननीय अडवाणीजी आणि त्या वेळचे पंतप्रधान अटलजी यांनी 2001मध्ये प्रथम सिक्कीमचे राज्यपाल म्हणून साहनीजींची नियुक्ती झाली व पुढे गोव्याचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. ही एक प्रकारची कसोटीच होती. दोन राज्यांतील अंतर हजार किलोमीटर तर होतेच, तसेच भौगोलिकपासून सर्वच परिस्थिती भिन्न होती. पण त्याही वयात (76व्या वर्षी) त्यांनी समर्थपणे ती सांभाळली. 2005पासून ते भाजपाचे मार्गदर्शक व राज्याराज्यातील भाजपा श्रेष्ठींचे समन्वयक म्हणून अशोक रोडच्या केंद्रीय कार्यालयात काम करू लागले. दररोज दुपारी 3 ते रात्री 8पर्यंत ते या कार्यालयात बसायचे. अत्यंत देखणे, गोरेपान, मध्यम बांध्याचे हे व्यक्तिमत्त्व शुभ्र पांढरे धोतर, झब्बा, जाकिटात सर्वांचेच आकर्षण होते. कायम स्मितहास्य, कधीही न रागावणारे, हळुवारपणे बोलून समोरच्याचे म्हणणे ऐकून घेऊन त्याला समजेल अशा भाषेत बोलण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. पक्षशिस्त, कार्यकर्त्यांचे आचरण, स्वीकृत कार्यावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रामाणिक व्यवहार करण्याची त्यांची शिकवण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. केदारनाथजींनी कोणत्याही कामाचे श्रेय स्वत: घेतले नाही. सदैव सभोवतालच्या कार्यकर्त्यांना पुढे अाणण्यासाठी प्रोत्साहन देणारी त्यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी आता या पार्टीत अगदी अपवादानेच पाहावयास मिळतात, असे दिल्ली क्षेत्राचे माननीय संघचालक बजरंगलाल गुप्ता यांनी केदारनाथजींच्या श्रध्दांजली सभेत सांगितले, ते तंतोतंत सत्य होते. 3 ऑक्टोबर 2012 रोजी, वयाच्या 87व्या वार्धक्याने त्यांचे निधन झाले. 5 वर्षांपूर्वी स्वर्गवास पत्नी विमलाभाभी यांचा झाला होता. त्यांच्या पश्चात दोन चिरंजीव व विवाहित कन्या असे कुटुंबीय आहेत. संपूर्ण परिवार संघाशी जोडलेला आहे. दिल्लीतील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राशी सतत संबंध ठेवणारे हे व्यक्तिमत्त्व राजकारणातही स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार करणारे होते, म्हणून आजही ते अनेकांच्या सदैव आठवणीत आहेत.

& 9822823653