विष्णुदास रचित देवीच्या आरत्या आणि पदे

 विवेक मराठी  04-Oct-2017


विष्णुदासांना देवीच्या उपासनेचे हे पारंपरिक महत्त्व संपूर्णत: ज्ञात होते. देवीच्या नवरात्रात रोज संध्याकाळी आरती केली जाते. या वेळी देवीला आळविण्याची पध्दत आहे. यासाठी विविध आरत्या-पदे-अष्टके रचली गेलेली आहेत. या सगळयात सर्वात जास्त संख्येने विष्णुदासांची पदे आहेत. शिवाय ती सर्वात जास्त लोकप्रियही आहेत. त्याचे सगळयात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची सोपी रचना. त्यामुळे त्यांना चालीत बसवणे सहज शक्य आहे आणि सामान्य माणसांना ती गाणेही शक्य आहे.

विष्णुदास म्हणजे कोण? असे विचारले, तर बहुतेक जणांना सांगता यायचे नाही. पण तेच जर 'माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली' हे गाणे विचारले, तर माहीत आहे म्हणून सांगतील. नवरात्रात सर्वत्र सगळयात जास्त वाजलेले गाणे म्हणजे उषा मंगेशकरांच्या आवाजातील हे गाणे. पण हे लिहिले कुणी? याचे कवी आहेत विष्णुदास.

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर दुर्गम भागात माहुरगड आहे. या गडापाशी रेणुकादेवीचे मंदिर आहे. नवरात्रात महाराष्ट्रात सर्वत्र देवीचा उत्सव साजरा केला जातो. हे ठिकाण देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणून प्रसिध्द आहे. (माहुर-तुळजापूर-कोल्हापूर ही तीन पूर्ण पीठे आणि वणी हे अर्धपीठ असे मानले जाते. अर्थातच यावरही काही वाद आहेत. पण तो या लेखाचा विषय नाही.) या मंदिराला लागणाऱ्या पायऱ्या सुरू होण्याच्या ठिकाणी मंदिराकडे न जाता उजव्या बाजूचा रस्ता पकडला, तर आपण विष्णूकवीच्या समाधीपाशी पोहोचतो.

या विष्णूकवींचा जन्म सातारा येथे इ.स. 1844मध्ये झाला. कृष्णा रावजी धांदरफळे हे त्यांचे नाव लोपून पुढे कवी म्हणून धारण केलेले विष्णुदास हेच नाव कायम राहिले. 1902मध्ये त्यांनी संन्यास घेतला आणि आज ज्या ठिकाणी माहुरात त्यांची समाधी आहे, त्या आश्रमाची 1907मध्ये उभारणी केली. पुढे दहा वर्षांनी 1917मध्ये त्यांनी जिवंत समाधी घेतली.

नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रातील एक प्राचीन उत्सव आहे. ज्याप्रमाणे गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू झाला, तसा काही आपल्याकडे सार्वजनिक स्वरूपात हा उत्सव नव्हता. आज रास-दांडिया-गरबाचा जो धिंगाणा दिसतो, तो म्हणजे नवरात्र उत्सव नव्हे. महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा मातृदेवतांचा प्रदेश आहे. अगदी महत्त्वाची चार शक्तिपीठे जरी बघितली, तर ती सर्वदूर पसरलेली आहेत. शिवाय देवीची इतरही प्राचीन मंदिरे सर्वत्र आहेत. घरोघरी कुठलीही कुलदेवता असो, त्यातील किमान एक देवीच असते. नऊ  दिवस उपास केले जातात. देवी घटात बसविली जाते. म्हणजे देवीची प्रतिमा असलेला चांदीचा टाक ताम्हणात तांदूळ ठेवून त्यात बसवला जातो. हे ताम्हण पाण्याने भरलेल्या कलशावर ठेवले जाते. कलशाभोवती काळी माती पळसाच्या पत्रावळीवर पसरली जाते. त्यात धान्य पेरले जाते. देवीच्या माथ्यावर बरोबर वर मंडपी लटकवलेली असते. तिला रोज एक अशा नऊ  दिवस नऊ  माळा बांधण्यात येतात. या मंडपीला (पाळण्यात मुलाला चांदवा लावतात तसा लोखंडाचा साचा) अष्टमीच्या दिवशी फराळाचे पदार्थ - करंज्या, साटोऱ्या लटकवतात. नवमीचा कुलाचार झाला की खऱ्या अर्थाने नवरात्र संपते. मग दसऱ्याच्या दिवशी घटातून काढून देवीला नवीन वस्त्र घालून तिची पूजा केली जाते व ती नियमित पूजेत ठेवली जाते. देवी दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाला निघते, असे समजतात. म्हणजेच कृतीला सिध्द व्हा असा हा संदेश आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही दसऱ्यानंतर मावळे लढाईसाठी निघत. शेतीतील खरीपाचा हंगाम संपून पीक हातात आलेले असते. म्हणून या सणाचे महत्त्व.

विष्णुदासांना देवीच्या उपासनेचे हे पारंपरिक महत्त्व संपूर्णत: ज्ञात होते. देवीच्या नवरात्रात रोज संध्याकाळी आरती केली जाते. या वेळी देवीला आळविण्याची पध्दत आहे. यासाठी विविध आरत्या-पदे-अष्टके रचली गेलेली आहेत. या सगळयात सर्वात जास्त संख्येने विष्णुदासांची पदे आहेत. शिवाय ती सर्वात जास्त लोकप्रियही आहेत. त्याचे सगळयात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची सोपी रचना. त्यामुळे त्यांना चालीत बसविणे सहज शक्य आहे आणि सामान्य माणसांना ती गाणेही शक्य आहे.

'जय जय रेणुके आई जगदंबे । ओवाळू आरती मंगळारंभे' या आरतीत पुढे जे वर्णन येते, 'भडक पीतांबर कंचुकी पिवळी। नवरत्न माणिक मणी मोती पवळी। तळपती रवी-शशीची प्रतिबिंबे' यातून अलंकारात रमणारे स्त्रीचे मन दिसून येते. आई, तू श्रीमंत आहेस, भाग्यवान आहेस, मग आम्ही तुझी मुले दु:खात का? असा एक आर्त प्रश्न विष्णुदास विचारतात. त्यांचे एक पद आहे -

असं नको करू अंबाबाई तुला जन हसतील अगं आई ॥

तुला सोन्याची ताटवाटी, मला जेवाया नरवाटी

आई, तू श्रीमंतीण मोठी, दरिद्री आलो तुझ्या पोटी

तुझ्या घरी शतकोटी गाई, मला ताकाची महागाई ॥

विष्णुदासांच्या साहित्यावर अभ्यास करणाऱ्यांनी हे दाखवून दिलेले आहे की विष्णुदास हे आपल्या देशाची परिस्थिती बिकट आहे हे पाहून हे आईला - म्हणजे भारतमातेलाच हे आळवत आहेत. ज्या निजामी राजवटीत ते राहिले, तेथील परिस्थिती त्यांना चांगलीच ज्ञात होती. केवळ पारतंत्र्यच नव्हे, तर धार्मिक अत्याचारही या भागातील लोकांना सहन करावे लागलेले ते पाहत होते.

अशा लोकांना आत्मिक बळ देण्याचे फार मोठे काम या आरत्यांनी-पदांनी केले आहे. त्यांच्या आणखी एका पदात अतिशय साध्या शब्दांत देशाच्या तेव्हाच्या स्थितीचे वर्णन केले आहे -

आलं चहुकडूनी आभाळ गं । लेकरू आपलं सांभाळ गं ॥

तीळभर दिसेना उघाड गं । दिवसच लपला ढगाआड गं।

झाले काळेकुट्ट घबाड गं । आम्ही नाही सांगत लबाड गं ।

येईल पाणी बंबाळ गं । लेकरू आपले सांभाळ गं ॥

या आरत्यांमध्ये, पदांमध्ये प्रासादिक गुण तर आहेच, सहजता आहे व शिवाय भाषेचे सौंदर्यही आहे. फार थोडया आरत्यांमध्ये भाषेचे सौंदर्य जाणवते. एरव्ही या रचना ठोकळेबाज वाटत राहतात. विष्णुदासांची या दृष्टीने अप्रतिम रचना म्हणजे -

विपुल दयाघन गर्जे तव हृदयांबरी श्रीरेणुके हो ।

पळभर नर मोराची करुणावाणी ही आयिके हो ॥

हे पद म्हणताना होऽऽ असा हेल काढून म्हणायची पध्दत आहे. त्यामुळे चालीला एक गोडवा येतो.

अनुप्रासाची तर एकापेक्षा एक उत्तम उदाहरणे आढळतात. महालक्ष्मीची 'जय जय नदिपती प्रियतनये । भवानी महालक्ष्मी माये ।' ही आरती तर अतिशय प्रसिध्द आहे. यात 'भक्त जे परम, जाणती वर्म, सदापदि नर्म' किंवा 'तुझे सौंदर्य, गळाले धैर्य, म्हणती सुर आर्य' किंवा 'बहर जरतार, हरी भरतार, तरी मज तार' हे शब्दांचे सौंदर्य विलक्षण आहे.

'श्रीमूळपीठ नायिके' या आरतीत तर अनुप्रासाचा उपयोग प्रत्येक ओळीत केला आहे. सगळी आरतीच अनुप्रासयुक्त शब्दांची आहे.

श्री मूळपीठ नायिके, माय रेणुके, अंबाबाई ।

नको माझी उपेक्षा करू, पाव लवलाही ॥

कल्पना फिरवी गरगरा, समुळची धरा, बुडवायाची

ही दुर्लभ नरतनू आता जाती वायाची

शिर झाले पांढरे फटक, लागली चटक, तुझ्या विषयाची

कशी होईल मजला भेट, तुझ्या पायाची

ये धावत तरी तातडी, घाली तू उडी, पाहसी काही ॥

आरत्या संपल्यावर कर्पूरआरती असते. ती झाल्यावर प्रसाद वाटला जातो आणि आतापर्यंत उभे राहून आरत्या म्हणणारे सगळे जण आता बसून घेतात व देवीची अष्टके म्हणायला सुरुवात होते. महाकालीचे एक अष्टक विष्णुदासांनी रचले आहे. आपल्यासमोर देवीचे सोज्ज्वळ अलंकारात मढलेले रूप नेहमी येत राहते. प्रत्यक्षात ती महाकाली आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी आहे. विष्णुदासांनी लिहिलेले हे अष्टक तर मराठीतील वीररसाचा अद्भुत नमुनाच आहे -

अष्टादंडभुजा प्रचंड सरळा विक्राळ दाढा शुळा

रक्त श्रीबुबुळा प्रताप आगळा, ब्रह्मांड माळा गळा

जिव्हा ऊरस्थळा, रुळे लळलळा, कल्पांत कालांतके

साष्टांगे करितो प्रणाम चरणा, जय जय महाकालिके ॥

आणि हेच विष्णुदास देवीच्या सोज्ज्वळतेचे वर्णन करताना शब्दांची अप्रतिम उधळण करतात -

लक्ष-कोटी चंडकीर्ण सुप्रचंड विलपती

अंबचंद्रवदन बिंब दीप्तिमाजी लोपती

सिंहशिखर अचलवासि मूळपीठनायका

धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥

शेवटी सगळे रस येऊन करुणरसात मिळतात. रामदासांनी करुणाष्टके लिहिली, तशी विष्णुदासांनी देवीला आळवणारी अतिशय करुण अशी पदे लिहिली आहेत. त्यातील सगळयात प्रसिध्द पद आहे-

माझी पतिताची पापकृती खोटी।

तुझी पावन करण्याची शक्ती मोठी।

समजावता मी काय समजाऊ।

ऊठ अंबे तूं झोपिं नको जाऊ ॥

विष्णुदासांनी 1917मध्ये समाधी घेतली. 1844 ते 1917 या काळातील सामाजिक, राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्या रचनांचा एक वेगळाच अर्थ आपल्याला गवसतो. सामान्य माणसांना, स्त्रियांना घरच्या देवीच्या उत्सवात म्हणण्यासाठी पदे-आरत्या रचणे इतका त्यांचा प्राथमिक बाळबोध उद्देश निश्चितच नसणार. सगळयाच संतांनी सामान्य माणसांचे मनोर्धर्य उंचावण्याचे, मन:शक्ती वाढविण्याचे काम आपल्या रचनांमधून केले आहे. संत विष्णुदास हे याच परंपरेतील एक.

माहुरला जाणाऱ्यांना विनंती की विष्णूकवींच्या समाधीला आवर्जून भेट द्या.     

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

9422878575