प्रतिसर्पविष

 विवेक मराठी  04-Oct-2017

***रूपाली पारखे-देशिंगकर***

सापाच्या गप्पा सुरू झाल्या की साप आणि त्याच्या चावण्याबद्दलची अतिरंजित वर्णनं हमखास सुरू होतात. साप पाहिला असो नसो, चावला असो किंवा नसो, त्याच्याबद्दल अधिकारवाणीने बोलणारे पावलोपावली आढळतात. साप चावतो म्हणजे नक्की काय करतो, हेच आपल्याला माहीत नसतं. आजच्या सर्पायनातल्या गप्पा सापाचं चावणं आणि त्यावरचा उतारा ह्याबद्दलच्या आहेत.

 'साप बेक्कार चावतो' असं वाक्य म्हणणं आपल्याला खूप सोप्पं असतं. पण ज्याला चावतो, त्यालाच माहीत असतंकी साप कसा चावतो. आपण आज चार प्रमुख विषारी सापांच्या चाव्याबद्दल थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. आपल्याकडे सापडणारे चार प्रमुख विषारी सर्प म्हणजे नाग, मण्यार, घोणस आणि फुरसं. हे बिग फोर म्हणून ओळखले जातात. ह्यांच्या चाव्याबद्दल माहिती करून घेतली आणि साधरण लक्षणं लक्षात ठेवल्यास शेतकऱ्यांना, गिर्यारोहकांना किंवा अगदी सर्वसामान्य व्यक्तींनाही उपयोग होऊ शकतो. मागच्या विषारी सापांबद्दलच्या भागात मी उल्लेख केला होता की नाग चावल्यावर दंशाच्या जागी सूज येते नि भरपूर जळजळ होते. नागाचं विष मनुष्याच्या मज्जासंस्थेवर परीणाम करत असल्याने दंशित व्यक्तीच्या पापण्या नियंत्रण सुटून मिटायला लागतात. हृदयाचे ठोके वाढतात, पण नाडी नाद लागते. तोंडातून लाळ गळणं, उलटया होणं, घाम फुटणं, जीभ जड होणं असे प्रकार होतात. नागाचं विष शरीरात भिनायला लागल्यावर अंग जड होऊन हातपाय गळून जातात नि झोप आल्यासारखं वाटतं.

मज्जासंस्थेवर परिणाम करणारा दुसरा साप म्हणजे मण्यार. मण्यारीने दंश केला असताना बरीचशी लक्षणं नागाच्या चाव्याप्रमाणेच दिसून येतात. पण मोठा फरक असा आहे की मण्यार चावलेल्या जागी जळजळ होत नाही आणि सूजही येत नाही. मण्यारीचं विष हे नागाच्या विषापेक्षा पाचपट तीव्र आहे. दंश झाल्यानंतर साधारण 5-6 तासानंतर पीडित व्यक्तीच्या सांध्यांमध्ये आणि पोटात तीव्र वेदना होतात.

या दोघांनंतर रक्तावर परिणाम करणाऱ्या सापांचा नंबर येतो. म्हणजेच फुरसं आणि घोणस यांचा. घोणस अतिशय कडकडून चावत असल्याने चाव्याच्या वेदनेबरोबरच दंशाच्या जागी तीव्र वेदना होतात. जिथे दंश झाला असेल त्या जागेभोवतीची जागा सुजायला सुरुवात होते. दंशित व्यक्तीचे ठोके नियमित राहत नाहीत. घोणस चावला की बहुतेक दंशित लोकांच्या तोंडातून, नाकातून तसंच मूत्रातून रक्त पडायला सुरुवात होते. साप चावलेल्या व्यक्तीच्या डोळयावर प्रखर प्रकाश टाकला, तर त्यांचं नैसर्गिक आकुंचन-प्रसरण न होता त्या फक्त विस्फारलेल्याच राहतात. राहता राहिला सगळयात धाकला पण घोणसाहून जहाल विषारी साप म्हणजे फुरसं. फुरशाचं विष हे घोणसाच्या विषाहून जहाल असतं. याच्या विषाने रक्तात गुठळया तयार होतात. भले हा साप लहान असला, तरी त्याचे विषदंत त्या मानाने लांब असतात. फुरसं चावलेल्या ठिकाणी पहिली जळजळ सुरू होते आणि नंतरही जळजळ अंगभर पसरते. रक्तावर होणारे परिणाम दिसायला लागून दंशित भाग हिरवट काळानिळा होऊन सुजायला लागतो. घोणसाच्या चाव्याप्रमाणेच फुरशाच्या चाव्यामुळे हिरडयांमधून, मूत्रातून, तसंच दंश झालेल्या ठिकाणातून रक्त वाहायला सुरुवात होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा विषारी साप चावतो, तेव्हा ह्यातली कुठलीतरी लक्षणं मानवी शरिरावर थोडया वेळाने नक्की दिसायला सुरुवात होते. जर वरीलपैकी कुठलीच लक्षणं दिसली नाहीत, सूज आली नाही व व्यक्ती ठीक असेल, तर खुशाल समजावं की तो बिनविषारी सापाचा दंश होता. दंश विषारी की बिनविषारी हे नक्की कळल्यावर डॉक्टर रुग्णाला प्रतिसर्पविष टोचायची तयारी करतात.

आता प्रतिसर्पविष म्हणजे नक्की काय? ते कसं बनवलं जातं? त्याचा वापर कसा केला जातो? ह्याबाबतीत सर्वसामान्य दूरच असतात. व्यक्तीला विषारी साप चावलाय हे समजल्यावर डॉक्टर प्रतिसर्पविष रक्तजल सलाइनद्वारे शिरेतून टोचतात. प्रतिसर्पविष ह्या नावावरूनच लक्षात आलं असेल की काटयाने काटा काढतात तसंच विषाने विष मारण्याचा प्रकार इथे केला जातो. सापाचं विष दिसतं कसं? इथपासून आपण विषाबद्दल अनभिज्ञच असतो. हे प्रतिसर्पविष म्हणजे काय? हा प्रश्न सुरुवातीला मलाही पडायचा. मी जेव्हा जेव्हा विषारी साप हाताळायचे, तेव्हा विष पाहायला मिळेलच याची खात्री नसायची. सापाचं विष हे त्याच्या शरीरातील पाचकरसाचं कार्य करत असतं. सर्वप्रथम भक्ष्याला मारण्यासाठी नि त्यानंतर भक्ष्य पचवण्यासाठी या विषाचा उपयोग केला जातो. बहुतांश रंगहीन असलेल्या ह्या सर्पविषाला किंचित पिवळसर झाक असते. अर्थात रंगावर त्याचं विषारीपण अजिबात अवलंबून नसतं. मला बरेच जण विचारतात की हे विष चवीला तिखटजाळ असतं का? याला चाखल्यावर जिभेची मिरचीसारखी आग या विषाने होते का? गम्मत अशी आहे की विषाची परीक्षा कुणालाच घ्यायची नसते, म्हणून चव कुणीच घेत नाही. सर्पविष चवीला किंचित कडूसर असतं. याला कुठल्याही प्रकारचा वास नसतो. यात असलेल्या 'रायबोफ्लाविन' जीवनसत्त्वामुळे विष पिवळसर दिसतं आणि हे विष पाण्यापेक्षा किंचित जड असतं. लिटमस कागदावर ते टाकलं, तर त्याचा आम्लधर्म सहज कळतो. ह्या विषाचा अभ्यास करायचा असेल तर त्यातल्या पाण्याचा अंश काढून ते सुकवायला लागतं. याच्या सोप्या पध्दतीला 'लायोफिलयझेशन' - म्हणजेच प्रशुष्कन म्हणतात. ह्या पध्दतीत सापाचं विष उणे 30 ते 40 अंश गोठवलं जातं आणि नंतर निर्वात अवस्थेत वाळवलं जातं. मग याचे स्फटिक बनतात. ह्या स्फटिक बनलेल्या विषाचा संपर्क पाण्याबरोबर आला की लगेच ते विरघळून पूर्वपदावर येतं. विषाचे असे स्फटिक शास्त्रज्ञ अभ्यासासाठी वापरतात. जोपर्यंत विष शिरेत टोचलं जात नाही, तोपर्यंत ते शरीरावर परिणाम करत नाही.

विषारी सर्पदंश झाल्यावर लगेच प्रतिसर्पविष टोचावं असं मत तात्त्विदृष्टया खरं असलं, तरी कुठल्याही एका विषारी सापासाठी दुसऱ्या प्रकारचं विष टोचून चालत नाही. नागाचं व मण्यारीचं विष मज्जासंस्थेवर परीणाम करतं, तर घोणसाचं व फुरशाचं रक्तावर. मानवी शरीरावर दोन वेगवेगळया प्रकारे परिणाम करणाऱ्या ह्या सर्पविषांपासूनच प्रतिसर्पविषाची निर्मिती होते. माणसास उपयुक्त अशा प्रतिसर्पविषाची पहिली निर्मिती पहिल्यांदा फ़्रान्समध्ये पाश्चर इन्स्टिटयूट येथे 1895मध्ये करण्यात आली. लिओ अल्बर्ट कोलमेट याने गिनिपिग्जवर व कबुतरांवर प्रयोग करून त्यांची सर्पविषापासून प्रतिकारशक्ती वाढवली. त्यानंतर ह्या प्रतिकारशक्ती वाढलेल्या प्राण्याचं रक्त त्याने सर्पदंश झालेल्या दुसऱ्या प्राण्याला देऊन पाहिलं. या लस टोचलेल्या प्राण्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला नाही. ही होती सर्पदंशावर उतारा शोधण्याची पहिली पायरी. यानंतर जगभर वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळे प्रयोग होऊन प्रतिसर्पविष बनवण्याच्या नवनवीन पध्दती विकसित होत गेल्या. आपल्या देशात प्रतिसर्पविष रक्तजलाची निर्मिती 1901मध्ये सुरु झाली. 1905 सालापासून हिमाचल प्रदेशातल्या कसौली इथल्या केंद्रीय अनुसंधान संस्थेत आजपर्यत याची निर्मिती होतेय. आता मी प्रतिसर्पविष रक्तजल हा शब्द वाक्यात वापरलाय. हे प्रतिसर्पविष रक्तजल उर्फ प्रतिसर्पविष कसं बनतं, ते पटकन पाहू या. ही लस बनवण्यासाठी खास पाळलेले घोडे अथवा काही ठिकाणी मेंढया असतात. या प्राण्यांना काही आठवडे सापाच्या विषाचं इन्जेक्शन विषाच्या 1/10 इतक्या कमी मात्रेत टोचलं जातं. ही मात्रा प्राणघातक नसते. दर आठवडयाला हे प्रमाण काही पटीने वाढवलं जातं. साधारण तीन महिन्यानंतर ह्या प्राण्याच्या शरीरातील रक्तात ह्या विषाविरुध्द झगडणारी प्रतिकारशक्ती तयार झालेली असते. हे प्रतिक्षम रक्त काढून प्रयोगशाळेत गोळा केलं जातं. एका विशिष्ट यंत्राद्वारे ह्यातील लाल व पांढऱ्या पेशी वेगळया केल्या जातात. ह्या पांढऱ्या पेशी म्हणजेच लस असते. पूर्वी वेगवेगळया सापांसाठी वेगवेगळया लशी बनवल्या गेल्या होत्या. पण हाफकिन जीवऔषध निर्माण महामंडळाने भारतातल्या चार मुख्य सापांसाठी मिळून एकच बहुसंयुजी प्रतिसर्पविष रक्तजल 1944मध्ये बनवलं. याचे वैशिष्टय म्हणजे ते सुकवलेल्या भुकटीच्या स्वरूपात असतं. प्रतिसर्पविष रक्तजल साठवायला खास तापमान लागतं, तर ही भुकटी घरच्या तापमानात साठवता येत असे, जी पाच वर्षं राहू शकते. सुरुवातीलाच उल्लेखलेल्या पध्दतीने सुकवलेलं विष खेडयापाडयात उपयोगी ठरतं, जिथे विजेची समस्या अजूनही सतावते.

लिहायचं म्हटलं तर सापाच्या विषयाबद्दल लिहायला खूप काही आहे. मात्र हे प्रतिसर्पविष रक्तजल म्हणजे 100% जादूची कांडी नाही. प्रत्येक औषधाचे दुष्परिणाम असतात, तसेच ह्याचेही आहेतच. विषारी सापच चावला आहे ह्याची 100% खात्री झाल्याखेरीज हे दुसरं विष शरीरात टोचताच येत नाही. ही लस बहुतांश घोडयाच्या रक्तापासून बनवलेली असल्याने मानवी रक्त घोडयाच्या रक्तातील प्रथिनांना स्वीकारताना ऍलर्जी दाखवू शकतं. हे प्रतिसर्पविष रक्तजल शरीरात टोचणारी व्यक्ती निष्णात असावीच लागते, कारण ही लस स्नायूत किंवा शिरेत टोचली जाते. जास्त प्रमाणात एकदम जर डोस दिला गेला, तर दंशित व्यक्तीला हुडहुडी भरते, दम लागतो, ऍलर्जी येते, अस्वस्थपणा, मळमळ, वमन आणि डोकेदुखीबरोबर सांध्यामध्येही दुखू शकतं. त्यामुळे ते हळूहळू शिरेतून टोचावं लागतं. ही लस कधीच बोटांवर, अंगठयात दिली जात नाही. विषारी साप चावणं कधीही वाईटच. जर प्रतिसर्पविष रक्तजल उर्फ प्रतिसर्पविष वेळेत मिळालं, तर त्यातूनही रुग्णाचा प्राण वाचवता येतो. साधरण 2-3 तासात मिळालेल्या लशीने रुग्णाचे प्राण वाचू शकतात. प्रतिसर्पविष रक्तजल सर्व शासक ीय रुग्णालयात उपलब्ध असतं. खाजगी रुग्णालयांमध्येही हे उपलब्ध असतं. उपचार देणाऱ्या डॉक्टरांना सापाची अतिरंजित वर्णनं न करता, दंश झालेल्या रुग्णाला न घाबरवता वैद्यकिय मदत वेळेवर मिळाल्यास सर्पदंश झालेली व्यक्ती नक्कीच वाचू शकते.

[email protected]