साधू सर

 विवेक मराठी  05-Oct-2017

**श्रीपाद ब्रह्मे***

अरुण साधू सर हे आमच्या रानडे इन्स्टिटयूटच्या म्हणजेच तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. आमची बॅच (1999-2000) म्हणजे ते विभागप्रमुख असतानाची शेवटून दुसरी बॅच. मी जर्नालिझमला प्रवेश घेण्याआधीच 'सकाळ'मध्ये उपसंपादक म्हणून काम करत होतो. त्यामुळे प्रवेश घेताना साधूंनी मला विचारलं, ''ऍडमिशन घेतोयस, पण कोर्स पूर्ण करणार का? अनेक मुलं मध्येच सोडून जातात.'' मी मात्र त्यांना कोर्स पूर्ण करणार असल्याचं ठामपणे सांगितलं आणि मग माझा प्रवेश झाला. त्यानंतर वर्षभर सर या नात्याने ते वेगवेगळया कारणांनी भेटत राहिले.

त्यांचा स्वभाव खरोखरच मृदू होता. ते कधीही, कुठल्याही विद्यार्थ्यावर ओरडून बोलल्याचं मी ऐकलं नाही. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांविषयी त्यांना विशेष आस्था होती. त्या वेळी  ग्रामीण भागातील मुलं आणि पुण्यातील किंवा अन्य मोठया शहरांतील शहरी मुलं असा वर्गभेद वर्गात कायम असायचा. (तो आजही टिकून आहेच.) त्या भेदाला इंग्लिश मीडियम विरुध्द मराठी माध्यम अशीही किनार असायची. साधू सर नेहमी इंग्लिश मीडियमच्या मुलांची बाजू घेतात, अशी तक्रार आमच्या (म्हणजे मराठी) कॅम्पमधली मुलं करायची. त्यात अगदीच तथ्य नव्हतं, असं नाही. पण मला वैयक्तिकरित्या त्याचा कधी त्रास झाला नाही. उलट ग्रामीण भागातल्या मुलांनी इंग्लिश बोलावं, इंग्लिश साहित्य वाचावं, किमान इंग्लिश वृत्तपत्रं वाचावीत असा सरांचा आग्रह होता आणि तो रास्तच होता.

सरांमुळे डिपार्टमेंटला अनेक मोठमोठया लोकांचे पाय लागायचे. त्यांच्या केबिनमध्ये अनेकदा या लोकांची मैफल जमलेली असे. सर कायम त्यांची आवडती 'विल्स' शिलगावून बोलत असायचे. मूडमध्ये असले आणि समोरचा विद्यार्थीही सिगारेट ओढतो हे त्यांनी कधीतरी पाहिलेलं असलं, तर ते त्यालाही ऑॅफर करायचे. अर्थात त्यांच्यासमोर त्यांच्याच केबिनमध्ये सिगारेट ओढण्याची कुणाची हिंमत नव्हती. सरांनी आम्हाला अभ्यासक्रमातला विषय असा कुठला शिकवला नाही. पण एखाद्या ऑॅफ तासाला ते वर्गात येऊन गप्पा मारायचे. त्यांच्या गप्पा म्हणजे जागतिक राजकारणाचा अनौपचारिक तासच असायचा. त्यांच्या मुंबई दिनांक, सिंहासन या कादंबऱ्या आधीच वाचल्या होत्या आणि प्रचंड आवडल्याही होत्या. मला पत्रकारितेत येण्यासाठी त्या कादंबऱ्यांनीच प्रवृत्त केलं, असं म्हटलं तरी चालेल.

जर्नालिझमच्या कोर्सचं महत्त्वाचं वैशिष्टय म्हणजे शेवटी दिल्लीला जाणारी ट्रिप. आमच्या ट्रिपला सर आणि उज्ज्वला बर्वे मॅडम सोबत होत्या. रेल्वेत सर वेगळया कंपार्टमेंटमध्ये होते. त्यांच्यासोबत प्रफुल्ल बिडवई आणि आणखी कुणीतरी सीनियर पत्रकार होते, असं आठवतंय. आम्ही अधूनमधून त्यांच्या गप्पा ऐकायला त्या कंपार्टमेंटमध्ये जायचो. दिल्लीत तर अरुण साधू या नाममाहात्म्याचा आम्हाला फार फायदा झाला. मनोहर जोशींपासून ते लालकृष्ण आडवाणींपर्यंत अनेकांना भेटता आलं. आडवाणी तेव्हा उपपंतप्रधान होते. नॉर्थ ब्लॉकमध्ये त्यांच्या कार्यालयात झालेली भेट ही एक अविस्मरणीय आठवण आहे. नंतर राम नाईक, पी.ए. संगमा, मार्क टुली आदींनाही आम्ही भेटलो. आकाशवाणी, इंडियन एक्स्प्रेस, एनडीटीव्हीचं ऑॅफिस अशा अनेक ठिकाणी गेलो. प्रत्येक ठिकाणी साधू यांच्या नावाचा दबदबा जाणवे.

जॉर्ज फर्नांडिस तेव्हा संरक्षणमंत्री होते. आम्हाला त्यांना भेटायचं होतं. त्यासाठी आधी साधू सर त्यांच्या बंगल्यावर जाणार होते. जाताना त्यांनी मला आणि सिध्दार्थला (केळकर) सोबत घेतलं. '3, कृष्ण मेनन मार्ग'  या बंगल्यात आम्ही गेलो. दारातच पांढऱ्या ऍम्बेसिडरमधून संसदेत निघालेले जॉर्ज आम्हाला दिसले. (साधू आणि 'डिकास्टा' यांना साक्षात भेटताना आम्ही पाहत होतो. साधूंच्या 'मुंबई दिनांक'मधलं डिकास्टा हे कामगार नेत्याचं कॅरेक्टर जॉर्जवरून बेतलंय, असं म्हणतात.)

साधू सर त्यांच्याशी काही तरी बोलले. आम्ही थोडा वेळ आत बंगल्यात बसलो. पण नंतर जॉर्ज यांना काही कारणाने यायला जमलं नाही आणि सर्व वर्गाची व त्यांची भेट काही झाली नाही. पण साधू सरांमुळे मला आणि सिध्दार्थला मात्र संरक्षणमंत्र्यांना जवळून पाहता आलं.

नंतर आमचा अभ्यासक्रम संपला. साधू सरही निवृत्त होऊन मुंबईला गेले. त्यानंतर फारसा संबंध उरला नाही. मध्यंतरी त्यांच्या 'ग्लानिर्भवति भारत' या पुस्तकाचं परीक्षण मी लिहिलं होतं. तेव्हा सरांना फोन करू म्हटलं, पण राहूनच गेलं. आता तर ते शक्यच नाही.

पण सरांचा मृदू आवाज आणि त्यांची ठाम मतं कायमच लक्षात राहतील.

-----------------------------------------------------------------

 चिंतनशील

त्तरच्या दशकात डाव्या विचारांचे तरुणांवर गारूडच होते. डावा विचार, त्याचे जागतिक सत्तास्थान आणि पडसाद याबाबत त्या वेळी देशभरातल्या तरुणांना कुतूहल होते. त्या तरुणाईला लेखणीच्या माध्यमातून डाव्या विचारसरणीची ओळख करून देणारे अरुण साधू... एक ज्येष्ठ पत्रकार, तत्कालीन राजकीय आणि सामाजिक संदर्भांचे दर्शन आपल्या साहित्यकृतीतून घडविणारे साहित्यिक म्हणून सर्वपरिचित होते.

गोविंद तळवळकर यांनी साधूंची यथार्थ ओळख करून दिली होती. त्यांच्या मते, अरुण साधू म्हणजे जागतिक राजकारणाच्या घडामोडींच्या दुनियेचे दरवाजे खुले करून देणारा साहित्यिक -पत्रकार. साधू ज्या काळात पत्रकारिता करत होते, त्या वेळी अन्य प्रसारमाध्यमांची इतकी चलती नव्हती. अशा काळात गल्लीबोळातल्या जिज्ञासूंना, रशियामधील डाव्या विचारसरणीचा उदय, तिचा उत्कर्ष आणि तिचा ऱ्हास लेखांच्या माध्यमातून समजावला तो अरुण साधूंनी! त्याचबरोबर, चीनमध्ये या विचारसरणीचे पुढे काय झाले, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. चीनमधला कम्युनिझम, त्याचे बदलते रूप याची ओळख करून देताना, अरुण साधू यांच्यातला डाव्या विचारसरणीकडे झुकणारा विचारवंत समर्थपणे आपले मत व्यक्त करत होता. चीनमध्ये कम्युनिस्टांची चलती असली, तरी चीनची संस्कृती आणि भांडवलशाही यांनी डाव्या विचारसरणीला एक वेगळेच परिमाण कसे प्राप्त करून दिले, यावर अरुण साधू यांचे विवेचन विशेष लक्षात राहण्याजोगे होते. 

जागतिक संदर्भाचा रंग देतानाही अरुण साधूंच्या प्रतिभेला-भाषेला इथल्या मातीचा गंध होता. पत्रकार या नात्याने जे जग त्यांना दिसले, जे संदर्भ त्यांच्या काळाला होते, ते सगळे 'मुंबई दिनांक', 'सिंहासन', 'मुखवटा', 'शोधयात्रा', 'बहिष्कृत', 'त्रिशंकू', 'तिसरी क्रांती' या साहित्यकृतींमध्ये प्रतिबिंबित झाले.

मूळचा विदर्भातल्या मातीतला हा साहित्यिक जागतिक स्तरावर होणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या क्रांतीचा सतत मागोवा घेत, त्याबद्दलची त्याची मते-निरीक्षणे साहित्यातून मांडत राहिला आणि त्याच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचा बदलता बाज आणि साजही त्यांनी नेमका ओळखला. 'मुंबई दिनांक' आणि 'सिंहासन' या दोन कादंबऱ्या ही त्याची उदाहरणे. त्यातून समोर उलगडत जाणारे जग वाचकांना एका वेगळयाच दुनियेची सफर घडवते.

साहित्यिक, पत्रकार यांचे भाषेशी नाते म्हणजे जसे आईचे मुलाशी असलेले नाते. म्हणूनच अरुण साधू मराठी भाषेच्या उत्कर्षासंदर्भात कायम विचार करत असत. चिंतेत असत. 80व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना अरुण साधू यांनी ती खंत व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते, 'मराठी भाषेविषयीची  आपली अस्मिता दांभिक आहे.' त्यांच्या मते, भाषेच्या उत्कर्षासाठी तिला उद्योग व सत्ता यांचे बळ हवे. त्यांचा अतिशय निकटचा संबंध आहे.

त्यांच्या वाचनाने जवळजवळ एका पिढीच्या वैचारिक घडणीवर परिणाम केला, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. असा एक प्रभावी लेखक आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

योगिता साळवी