कलाकारातील उद्योजक

 विवेक मराठी  05-Oct-2017

***हर्षद तुळपुळे***

धंद्यात विक्री कौशल्य ज्याला जमलं तोच टिकतो. यात सर्वात महत्त्वाची कला म्हणजे 'बोलणं'. असं म्हणतात की बोलणाऱ्यांची मातीही खपते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही खपत नाही. पण संदीप भावे बोलता येत नसतानाही हजारोंच्या ऑॅर्डर्स मिळवतात! वेगवेगळया कंपन्यांमध्ये जाऊन त्यांना कोणत्या प्रकारची डिझाइन्स हवी आहेत वा त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्याप्रमाणे त्यांना नमुने दाखवणं, कामाचं कोटेशन देणं, मिळालेली ऑॅर्डर वेळेत पूर्ण करून देणं इ. सर्व व्यवस्थापन एक मूकबधिर माणूस कसा करू शकतो, ही खरंच आश्चर्याची आणि कौतुकाची गोष्ट आहे...

 त्यांची उद्योगशीलता एवढी कौतुकास्पद आहे की, ते दोघंही मूकबधिर असल्याचा उल्लेखसुध्दा करायला संकोच वाटतो. संदीप भावे आणि स्वाती भावे हे बोरिवलीच्या ज्ञानयोग सोसायटीमध्ये राहणारं जोडपं. सर्वांना आश्चर्य वाटेल की जन्मापासून कर्णबधिरत्व नशिबी आलेले संदीप भावे हे आज त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या 'क्रेझी क्रिएशन्स' या डिझायनिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत !

'कटयार काळजात घुसली' या नाटकात एक छान वाक्य आहे - 'विद्या ही बाहेरून आत येते आणि कला ही आतून बाहेर पडते.' कलेसारखीच उद्योजकताही 'आतून' यावी लागते आणि कला व उद्योजकता या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात, तो माणूस अद्भुत काहीतरी करून दाखवतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संदीप भावे. आज वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी एक उत्तम व्यावसायिक कलाकार (commercial artist ) म्हणून नावलौकिक मिळवला आहे. 'क्रेझी क्रिएशन्स' ही त्यांनी 2011 साली स्वत: स्थापन केलेली डिझायनिंग क्षेत्रातली कंपनी आज चांगली भरभराटीला आली आहे. सर्व प्रकारच्या डिझायनिंग सर्व्हिसेस - म्हणजे ऍक्रिलिक डिस्प्लेज, बिझनेस कार्ड, डायऱ्या, फ्लेक्स, ब्रोशर्स, कॅटलॉग्ज, सर्टिफिकेट्स, सी डी कव्हर्स, ग्लास ट्रॉफीज, पेपर बॅग्ज, स्टिकर्स, कॅलेंडर्स, ग्रीटिंग्ज, इन्व्हिटेशन कार्ड, मेनू कार्ड, पोस्टर्स....... आणि अशा खूप साऱ्या वस्तू या कंपनीकडून ऑॅर्डरप्रमाणे डिझाइन करून बनवून दिल्या जातात. मुंबईत बोरिवलीमध्ये या कंपनीचं ऑॅफिस आहे.

धंद्यात विक्री कौशल्य ज्याला जमलं तोच टिकतो. यात सर्वात महत्त्वाची कला म्हणजे 'बोलणं'. असं म्हणतात की बोलणाऱ्यांची मातीही खपते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही खपत नाही. पण संदीप भावे बोलता येत नसतानाही हजारोंच्या ऑॅर्डर्स मिळवतात! वेगवेगळया कंपन्यांमध्ये जाऊन त्यांना कोणत्या प्रकारची डिझाइन्स हवी आहेत वा त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्याप्रमाणे त्यांना नमुने दाखवणं, कामाचं कोटेशन देणं, मिळालेली ऑॅर्डर वेळेत पूर्ण करून देणं इ. सर्व व्यवस्थापन एक मूकबधिर माणूस कसा करू शकतो, ही खरंच आश्चर्याची आणि कौतुकाची गोष्ट आहेच; पण त्याहून मोठी, आ वासायला लावणारी गोष्ट म्हणजे त्यांनी चार अपंग माणसांनाच नोकरीवर ठेवलं आहे!

व्यवसाय - मग तो छोटा असो वा मोठा, तो सांभाळणं हे खायचं काम नाही. बरेचदा ग्राहकांच्या तक्रारी, नकार येतात, कधीकधी सहकाऱ्यांकडून फसवणूक होते. संदीप भावे या सर्व अनुभवातून गेले आहेत. पण त्यांनी जिद्द सोडलेली नाही.

संदीप भावे इथपर्यंत कसे पोहोचले, याचा इतिहासही फार विस्मयजनक आहे. त्यांचे आईवडील दोघंही नोकरी करणारे. आपलं काही महिन्यांचं मूल रांगत रांगत पुढे जातं, पण मागून येणार आवाज ऐकू शकत नाही, हे समजल्यावर आईवडिलांना धक्काच बसला. संदीप कर्णबधिर आहे हे कटू सत्य थोडयाच दिवसांत समजलं. आता पुढे काय? पण असे प्रसंगच माणसाची परीक्षा बघत असतात. आईंनी परिस्थितीची चिंता न करता मार्ग काढायला सुरुवात केली. संदीप दोन वर्षांचा असताना आईंनी त्याला मूकबधिर मुलांच्या शाळेत दाखल केलं. तेव्हापासून संदीपच्या शिक्षणासाठी आईने प्रचंड मेहनत घेतली. लहानग्या संदीपला कडेवर घेऊन बोरिवलीहून सकाळी साडेआठ वाजता मुंबई सेंट्रलला घेऊन जायचं आणि संध्याकाळी सहा वाजता परत घेऊन यायचं! या वेळांना लोकलच्या प्रवासापुढे काळया पाण्याची शिक्षाही सौम्य वाटेल! आईंनी स्वत: अधूनमधून शाळेत जाऊन लिप रीडिंगची पध्दत शिकून घेतली व त्या त्याला घरी शिकवू लागल्या. संदीप सहा वर्षांचा झाल्यावर नॉर्मल शाळेमध्ये शिकू लागला. तो जरी शाळेत जातं होता, तरी सगळा अभ्यासक्रम आईला घरीच शिकवावा लागायचा. पण संदीप शाळेत चांगले मार्क मिळवू लागला. खेळांमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बक्षिसं मिळवू लागला.

बहुतेक दिव्यांग माणसांचं वैशिष्टय म्हणजे त्यांच्यात दुसरी कुठलीतरी क्षमता अधिक असते. संदीपची चित्रकला पहिल्यापासून चांगली होती. त्यामुळे दहावीनंतर  वांद्रयाच्या रहेजा कॉलेजमधून 5 वर्षांचा डिप्लोमा कोर्स (G D Art) पूर्ण केला. त्यानंतर सुमारे वीस वर्षं त्यांनी चार वेगवेगळया कंपन्यांमध्ये नोकरी केली. तेथे डिझाइनिंग, लेआउट, फोटोशॉप, अशी कामं केली. यातून त्यांचा अनुभव समृध्द झाला आणि त्याचीच फलश्रुती म्हणजे सध्याची 'क्रेझी क्रिएशन्स'.

या सगळया वाटचालीत संदीप भावेंच्या पत्नी स्वाती भावे यांची सीतेसारखी साथ राहिली आहे. आपली पत्नी आपल्यासारखीच असावी, अशी संदीप भावेंची इच्छा होती आणि ईश्वरकृपेने पुण्याच्या ललिता सहस्रबुध्दे या मुलीशी त्यांचा योग जुळून आला आणि त्या स्वाती भावे झाल्या. मूकबधिर, पण अंगात कलागुण असलेल्या स्वाती भावे पुण्याच्या अभिनव कला विद्यालयातून शिक्षण घेऊन कमर्शिअल आर्टिस्ट झाल्या. त्यानंतर काही वर्षं त्या चित्रकलेच्या शिकवण्या घेत होत्या. सध्या त्या पार्ल्याच्या मूकध्वनी विद्यालयात चित्रकलेच्या शिक्षिका म्हणून नोकरी करतात. अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये त्यांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर बक्षिसं मिळालेली आहेत. National Abilympics Association of India या संस्थेच्या Silk Hand Paintingच्या स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळालं आहे. स्वभावाने मृदू असलेल्या स्वातीताई उत्तम गृहिणीही आहेत.

संदीप भावेंचा आणखी एक वाखाणण्यासारखा गुण म्हणजे त्यांची सामाजिक कार्य करण्याची जबरदस्त इच्छा. अपंगत्व असणं हे प्रारब्ध असतं. त्यात त्या व्यक्तीचा काहीच दोष नसतो. अशा माणसांना जमेल तितकी मदत करण्याची संदीप भावेंची इच्छा आहे. आपल्या कंपनीत त्यांनी चार कर्णबधिर माणसांना नोकरी दिली आहे. सध्या नाशिकमध्ये 'सोसायटी फॉर एम्पॉवरमेंट ऑॅफ द डिफब्लाइंड' या संस्थेचं काम प्रगतिपथावर असून संदीप भावे त्यात सक्रिय आहेत. ते ग्राहक पेठ, आर्ट ऍंड क्राफ्ट एक्झिबिशन अशा अनेक प्रदर्शनांमधून सहभाग घेत असतात. अपंग व्यक्तींनी तयार केलेल्या उत्पादनांना प्रदर्शनांमध्ये सहभाग मिळावा, म्हणून संदीप भावे प्रयत्न करत असतात. या सर्वांमध्ये त्यांना आई, वडील, भाऊ, वाहिनी, मुले यांची खूप मदत होते. संदीप भावेंची दोन्ही मुलं निर्व्यंग असून मुलगी पूजा ही आर्किटेक्ट आहे, तर मुलगा हेरंब अहमदाबादला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतो आहे. मुलांना उच्च शिक्षणात पोहोचवण्यात संदीप भावेंच्या आईंचा सिंहाचा वाटा आहे.

उद्योजक - मग तो छोटा असो व मोठा, तोच अर्थव्यवस्थेचा सारथी असतो. संदीप भावेंचं हे उदाहरण अपंगच नव्हे, तर धडधाकट  माणसांनाही प्रेरणादायी आहे. त्यांच्या उद्योजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!     9405955608