रशियन क्रांतीची शताब्दी

 विवेक मराठी  11-Nov-2017

क्रांतीच्या जन्मशताब्दी वर्षात तिची फारशी चर्चा झालेली नाही. काही इंग्लिश वृत्तपत्रांत लेख आले एवढेच. रशियन क्रांतीपासून प्रेरणा घेऊन भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला; परंतु त्या पक्षात या क्रांतीच्या शताब्दीबद्दल कोणताही उत्साह नाही. ज्या रशियात ही क्रांती झाली, त्या देशाला या क्रांतीचे सोयरसुतक उरले नाही. याचे कारण ज्या कारणांच्या पार्श्वभूमीवर ही क्रांती झाली, ती कारणे आता कालबाह्य झाली आहेत

रोबर 100 वर्षांपूर्वी रशियामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट क्रांती झाली आणि जागतिक इतिहासात नवे पान उघडले गेले. तत्पूर्वी फ्रेंच क्रांतीने युरोपातील राजेशाहीला धक्का दिला आणि लोकशक्तीचा परिचय करून दिला. परंतु फ्रेंच राज्यक्रांतीत जसा राजेशाहीचा बळी गेला, तसाच ज्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वत्रयीसाठी ही क्रांती झाली, त्यांचाही त्यात बळी गेला. असे होण्याचे कारण या क्रांतीमागे भावना होती, परंतु निश्चित तत्त्वप्रणाली नव्हती. लेनिनने केलेल्या क्रांतीमध्ये माक्र्सचे तत्त्वज्ञान असल्याने या क्रांतीमुळे विसाव्या शतकाचा चेहरामोहरा बदलून गेला. असे असूनही या क्रांतीच्या जन्मशताब्दी वर्षात तिची फारशी चर्चा झालेली नाही. काही इंग्लिश वृत्तपत्रांत लेख आले एवढेच. रशियन क्रांतीपासून प्रेरणा घेऊन भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला; परंतु त्या पक्षात या क्रांतीच्या शताब्दीबद्दल कोणताही उत्साह नाही. ज्या रशियात ही क्रांती झाली, त्या देशाला या क्रांतीचे सोयरसुतक उरले नाही. याचे कारण ज्या कारणांच्या पार्श्वभूमीवर ही क्रांती झाली, ती कारणे आता कालबाह्य झाली आहेत की माक्र्सने जो मार्ग दाखवला तो मार्ग आता कालबाह्य झाला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे.

युरोपमध्ये जेव्हा औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली, तेव्हा भांडवलदारांनी आपल्या नफ्यासाठी तीन प्रकारचे शोषण सुरू केले. ज्या अविकसित देशातून कच्चा माल आणला जायचा, त्या देशाचे केले जाणारे आर्थिक शोषण हे पहिले शोषण. कामगारांना त्यांच्या श्रमाची पुरेशी भरपाई न देता त्यांच्याकडून काम करून घेतले जाई हे दुसरे शोषण. त्याचबरोबर वेगवेगळया प्रकारे आपली हक्काची बाजारपेठ निर्माण करून चढया दराने मालाची विक्री करणे हे तिसरे शोषण. माक्र्सने तर्कशुध्द विश्लेषणाच्या जोरावर भांडवलशाहीतील या शोषणाचा परस्परसंबंध स्पष्ट केला आणि संघटित कामगारवर्ग क्रांतीद्वारा भांडवलशाही उलथवून टाकेल असे भाकीत केले. माक्र्सने जगातील सर्व प्रकारच्या शोषितांमध्ये क्रांतीची भावना निर्माण केली आणि आपण संघटित क्रांतीद्वारे व्यवस्था बदलू शकतो असा विश्वास निर्माण केला. ज्या देशात भांडवलशाहीचा विकास सर्वाधिक झाला आहे, तिथे प्रथम क्रांती होईल असा माक्र्सचा अंदाज होता. तो त्याचा अंदाज चुकला आणि रशिया व चीन यासारख्या अविकसित भांडवलशाही असलेल्या देशांत ही क्रांती झाली.

रशियन क्रांतीमुळे जगात एक पर्यायी वैचारिक शक्तिकेंद्र तयार झाले. परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या क्रांतिकारकांच्या दृष्टीने रशिया ही स्वप्नभूमी तयार झाली. या विचारांचा प्रभाव एवढा होता की, लेनिन आणि स्टॅलिन यांनी ज्या निर्घृणपणे कत्तली केल्या, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले किंवा त्याला क्रांतीची अपरिहार्यता मानली गेली. चीनच्या क्रांतीने जगाला इतके मोहित केले होते, की माओने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली जो अमानुष नरसंहार केला, त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. परंतु या वसाहतवादाच्या विरोधात त्याच वसाहतवादाचे व साम्राज्यवादाचे नवे स्वरूप लोकांच्या ध्यानी येऊ लागले आणि हळूहळू या क्रांतीबद्दलचे बौध्दिक आकर्षण कमी होत गेले.

रशिया आणि चीन या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था जेव्हा कोसळू लागल्या, तेव्हा माक्र्सवादाच्या नावाने अर्थव्यवस्थेचा जो डोलारा उभा केला होता, त्यातील निरर्थकताही तेथील जनतेला आणि राज्य सरकारला जाणवू लागली. खासगी मालमत्ता ही आर्थिक शोषणाला प्रवृत्त करते, म्हणून कोणाचीही खासगी मालमत्ता न ठेवता ती सार्वजनिक केली पाहिजे, या अट्टाहासापायी माणसांना काम करण्याकरता आर्थिक प्रेरणाच राहत नाही हे हळूहळू लक्षात येऊ लागले. त्यामुळे रशिया आणि चीनमधील अर्थकारणाचे जे सर्वंकष सरकारीकरण झाले होते, त्यात बदल होऊ लागले. रशियात हा बदल एवढया वेगाने झाला की, त्यामुळे सर्व रशियन प्रजासत्ताक कोलमडून पडले आणि सोव्हिएत संघराज्यातील देश वेगळे झाले. चीनमध्ये मात्र टप्प्याटप्प्याने आर्थिक सुधारणा केल्या गेल्या आणि त्या करताना राजकारणातील कम्युनिस्ट पक्षाची पकड ढिली होऊ दिली नाही. चीनचे नवे राष्ट्राध्यक्ष ती अधिक घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत.

एकविसाव्या शतकात शोषणाचे स्वरूप बदलले आहे, तरी वेगवेगळया स्वरूपात ते आजही अस्तित्वात आहे. माक्र्सने शोषणाकडे बघण्याची तत्त्वज्ञानात्मक दृष्टी दिली, हे मान्य केलेच पाहिजे. त्यामुळे केवळ कच्च्या मालाचे किंवा कामगाराचे शोषण यापुरतीच त्याची चर्चा मर्यादित न राहता भावनिक, बौध्दिक, पर्यावरणीय अशा अनेक प्रकारच्या शोषणांची चर्चा सुरू झाली. यातील काही कारणे खरी होती, काही निर्माण केलेली होती. परंतु या चर्चेत जे सामाजिक व राजकीय वातावरण तयार झाले, त्याची दखल घेणे सर्वांना भाग पडले. आजवर ज्या गोष्टी केवळ मानवतावादी भावनेतून होत होत्या, त्याला एक भक्कम तत्त्वज्ञानात्मक बैठक मिळाली. परंतु माक्र्सने शोषणाच्या प्रश्नाचे स्वरूप स्पष्ट केले असले, तरी ते पूर्ण करण्याचे सामर्थ्य माक्र्सवादात नाही, हेही विसाव्या शतकात स्पष्ट झाले. त्यामुळे रशिया, चीन, क्युबा येथील कम्युनिस्ट क्रांत्या केवळ ऐतिहासिक कथांच्या स्वरूपात उरल्या आहेत. त्यांच्यातील परिवर्तनाची शक्ती नष्ट झाली आहे. त्यामुळेच शंभर वर्षांपूर्वीच्या जग हलवून टाकणाऱ्या क्रांतीच्या आठवणींमुळे जगाचे पानही कुठे हललेले दिसत नाही.