बारीपाडाची वनभाजी स्पर्धा

 विवेक मराठी  13-Nov-2017


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील 'बारीपाडा' या छोटयाशा 'पाडा'रूपी गावात 'कोकणी' या आदिवासी जमातीचे वास्तव्य. आजूबाजूच्या पाडयातही याच जमाती राहतात. पण या बारीपाडा गावाला जागतिक पातळीवर नेणाऱ्या चैत्राम पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सन 2003पासून गावाला स्वयंपूर्ण करण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. वन संरक्षित केले, जलसंवर्धन, जीवविविधता जपत असताना त्यांनी ग्रामविकासात महिलांनाही सहभागी करून घेताना त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग गावाला व त्यांनाही कसा करून देता येईल याचा विचार करून वनभाजी स्पर्धा व महोत्सव आयोजित केला. प्रारंभी 3-4 वर्षे महिलांना संकोच वाटत असल्याने प्रतिसाद कमी होता. पण चैत्रामदादांनी प्रयत्न करण्याचे सोडले नाही. गतवर्षी 144 भगिनींनी नाव नोंदवले होते. प्रत्यक्ष सहभागी 110च्या आसपास झाल्या होत्या. या वर्षी 200 भगिनींनी स्पर्धेसाठी नाव नोंदविले होते. त्यापैकी 141 प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

ही वनभाजी स्पर्धा एकूण 100 गुणांची असते. गतवर्षी 44 वनभाज्या होत्या. या वर्षी स्पर्धा उशिरा झाली, तरी 60 भाज्यांची थाळी स्पर्धेत होती. एक थाळी 53 भाज्यांची होती. विशेष म्हणजे 11 वर्षाच्या व 9 वर्षाच्या दोन मुलींनीही स्पर्धेत सहभाग घेतला होता. केवळ भाज्यांच्या संख्येवर गुणदान ठरत नाही, तर गुणदान अतिशय काटेकोरपणे केले जाते. भाज्यांची माहिती व महत्त्व याला 20 गुण, भाजी करण्याची पध्दत आणि चव याला 20 गुण, व्यक्तिगत स्वच्छता (नखांची स्वच्छता, तंबाखू, तपकीर यांचे व्यसन नसणे, स्वच्छ भांडे व पाण्यात जीवन ड्रॉप टाकणे इ.) गुण 20 आणि भाज्यांची मांडणी, ताटाची सजावट याला 20 गुण, भाज्यांची संख्या, वनस्पतीच्या कोणत्या अवयवापासून भाजी बनविली आहे (मूळ, खोड, साल, पान, फूल, फळ, बी, मोहोर) याचीही नोंद घेतली जाते.

2003पासून सुरू झालेली ही वनभाजी स्पर्धा प्रारंभी बारीपाडयापुरतीच मर्यादित होती. आता तीन वर्षांपासून आजूबाजूच्या तीन-चार पाडयांतील महिलांचाही सहभाग वाढला आहे. स्पर्धक स्त्रीकडून नाममात्र 10 रुपये नोंदणी फी घेतली जाते. ताट झाकण्यासाठी त्यांना पांढरे रुमालही पुरविले जातात. स्पर्धक महिलेला भाजीचे आरोग्यविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे.

आदिवासी बोलीभाषेत असणारी नावे वनस्पतिशास्त्रदृष्टया वेगळी आहेत. आपल्यासारखे नागरी वस्तीतील लोक त्यांच्या पारंपरिक ज्ञानासमोर अडाणी ठरतो. बाफळी, कडव्या हळुंद, देवारी गोयची, धोदडा, गोगल, गोमट, मका, उळशी मोहर, सोनारू यासारख्या वनस्पतींची/भाज्यांची नावेही आपल्याला माहीत नाही, तर आरोग्याला वा शारीरिक दुखापती, व्याधींकरिता होणारे त्यांचे फायदे खूप लांबची गोष्ट आहे. (उदा. बाफळीचे मूळ कुटून घेऊन पाजले तर खोकला बरा होतो. कडवा हळुंद - पचन होणे, पोटदुखी; देवारी गोयची - स्त्रियांच्या श्वेतप्रदरवर गुणकारी आहे; गोमट - शरीरातील उष्णता कमी करणे व मूल न होणाऱ्या स्त्रियांकरिता उपयुक्त). अशा कितीतरी औषधी गुणांनी युक्त वनभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांची मांदियाळी बारीपाडयाला वनभाजी स्पर्धेला असते. आदिवासी समाजातील स्त्रियांच्या उपजत आणि पारंपरिक पाककलेला चैत्राम पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक उत्तम व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यामुळे स्पर्धेत महिलांचा सहभाग वाढतो आहे. गतवर्षी 144 स्पर्धक महिलांपैकी सुमारे 110 स्पर्धक प्रत्यक्षात होत्या. या वर्षी 200 महिलांची नोंदणी झाली होती. प्रत्यक्षात 141 स्पर्धेत आल्या. यावरून वनभाजी स्पर्धेची लोकप्रियता वाढते आहे हे लक्षात येते. ऋतू संपल्यावरही अधिकाधिक 53, 60 भाज्यांची थाळी होती.

- प्रा. पुष्पा गावित