सर्पदंशातील प्रथमोपचार आणि काळजी

 विवेक मराठी  14-Nov-2017

 

***रूपाली पारखे-देशिंगकर***

दसरा-दिवाळीत फराळाच्या, खरेदीच्या गप्पांमध्ये आपल्या सापांच्या गप्पा थोडयाशा मागे पडल्या खऱ्या. आतापर्यंत सर्पायनातल्या गप्पांमध्ये आपण आठ भागांत साप, त्यांचे प्रकार, त्यांचं विष आणि त्या विषाचे परिणाम वाचलेत. आजच्या गप्पा साप चावल्यास काय करावं, तो चावू नये म्हणून काय करावं ह्याबद्दलच्या...

 मागच्या गप्पांमध्ये मी जाताजाता लिहिलं होतं की उपचार देणाऱ्या डॉक्टरांना सापाची अतिरंजित वर्णनं न करता, दंश झालेल्या  रुग्णाला  न घाबरवता वैद्यकीय मदत वेळेवर मिळाल्यास सर्पदंश झालेली व्यक्ती नक्कीच वाचू शकते. रुग्णालयात दंशित रुग्ण पोहोचेपर्यंत द्यायचा प्रथमोपचार अतीव महत्त्वाचा समजला जातो.  रुग्णाला झालेला दंश विषारी सापाचा की बिनविषारी सापाचा होता हे नक्की कळेपर्यंत शरीराची शक्यतो कमी हालचाल होऊ  देणं गरजेचं असतं. कमी हालचालीमुळे, शरीरातील रक्ताभिसरणाची गती कमी होते आणि विषारी सर्पदंश झाला असल्यास रक्तात विष भिनण्याची गती कमी होते. रुग्णाला संपूर्ण झोपवून दंश झालेला भाग हृदयाच्या पातळीपेक्षा खाली ठेवणं गरजेचं असतं. प्रथमोपचाराची दुसरी पायरी म्हणजे, दंश झालेला भाग जंतुनाशकाने साफ करणं गरजेचं असतं. अशा वेळी डेटॉल, सॅवलॉन यासारखी जंतुनाशकं जरूर वापरावी. तुरटी वापरल्याने जखमेजवळची नाजूक त्वचा क्षतिग्रस्त होऊ  शकते. तसंच, चुन्याची निवळी अथवा हळद वापरणं असे प्रकार करणं शक्यतो टाळावं. असं करण्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांना जखमेचे व्रण स्पष्ट न दिसण्याचा संभव असतो. चित्रपटात आणि मालिकांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे दंशाच्या जागी धारदार वस्तूने कापून विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे शरीरात गेलेलं विष बाहेर येत नाहीच, पण भलत्याच नसा कापल्या जाऊन अतिरक्तस्रावाने रुग्णाचा मृत्यू होऊ  शकतो. जखमेतील रक्त चोखून विष थुंकणं आणि रुग्ण बरा होणं फक्त सिनेमाध्यमातच होतं. वास्तवात असं चोखून आणि थुंकून विष निघत नसतं. दंश झालेल्या रुग्णाला धीर देऊन त्याचं मनोबल सतत वाढवत राहिल्यास उत्तम. याच दरम्यान, जखम स्वच्छ केल्यावर रुग्णाला आवळपट्टी बांधणं गरजेचं असतं. बहुतांश दंश ठरावीक ठिकाणीच होतात, असं निरीक्षणातून सिध्द झालंय. बोटांवर अथवा मनगटावर सर्पदंश झाला असल्यास दंडावर आवळपट्टी बांधावी. पाऊल, घोटा अथवा पोटरी भागात दंश झाला असल्यास मांडीवर जांघेजवळ आवळपट्टी बांधावी. आवळपट्टी बांधण्याची  एक शास्त्रीय पध्दत आहे. रुमाल, पट्टा, कपडा अथवा दोरी घेऊन अवयव आणि गाठीत एक बोट ठेवून आवळपट्टी बांधावी. रुग्णाला मदत करताना आवळपट्टी करकचून बांधल्यास, अवयवाला रक्तपुरवठा नीट न झाल्याने तो भाग काळानिळा पडायची भीती  जास्त असते. दंश झालेली व्यक्ती दवाखान्यात पोहोचेपर्यंत, दर दहा मिनिटांनी अर्धा ते एक मिनिटाकरता ही आवळपट्टी सैल करून पुन्हा बांधावी.

 हे करत असतानाच रुग्णाचं मनोधैर्य वाढेल यासाठी सतत धीर द्यावा. मदत करत असताना, पूर्वी सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या परिचयातल्या लोकांबद्दल हिरिरीने चर्चा करून रुग्णाला घाबरवू नये. सर्पदंश झालेली व्यक्ती अनेकदा भीतीने रक्तदाब वाढून थंड पडायला सुरुवात होते. अशा वेळेस चहा किंवा कॉफी प्यायला द्यायला हरकत नाही. पाणी, लिंबू सरबतही चालेल, पण कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल देऊ नये. रुग्णाला उबदार कपडयात गुंडाळून जिथे शक्य असेल तिथे मिळेल त्या वाहनाने दवाखान्यात न्यावं. मात्र वाहन मिळत नसल्यास घाईघाईने रुग्णाला चालवत नेऊ  नये. त्याऐवजी चादरीची झोळी करून, त्यात झोपवून त्याच्या शरीराची हालचाल कमी ठेवावी. अजूनही अनेक ठिकाणी, दंश करणारा साप तावडीत सापडल्यास त्याला ठार मारून रुग्णाबरोबर दवाखान्यात डॉक्टरला दाखवायला नेला जातो. असं करणं चूकच आहे, कारण उपचार करणारे डॉक्टर साप ओळखण्यात तज्ज्ञ असतीलच असंही नाहीच. त्यामुळे असं न करणंच योग्य राहील. त्याचबरोबर, रुग्णासोबत गेलेल्या लोकांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सापाची अतिरंजित वर्णनंही करू नये. विषारी दंश झाला असल्यास थोडया वेळाने रुग्णाचं शरीर त्या विषाचे परिणाम दाखवायला सुरुवात करतंच. मात्र बिनविषारी दंश झालेला असेल तर भीतीचा बहर ओसरल्यावर वैद्यकीय देखरेखीखाली असलेला रुग्ण सामान्य स्थितीत येऊन बरा होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कुठल्याही विषारी सर्पदंशावर अंगारे, धुपारे, तावीज, मंत्रतंत्र यांचा प्रभाव होत नाही. प्रतिसर्पविष हा एकमेव उपाय अशा वेळेस गरजेचा असतो.

हे एवढं सगळं करायलाच लागू नये, म्हणून सर्पदंशच टाळलेले बरे असा विचार मनात येऊन जातो. सर्पदंश टाळण्यासाठी करायच्या सोप्प्या गोष्टी म्हणजे रात्रीच्या वेळी अंधाऱ्या जागी, अनोळखी ठिकाणी अनवाणी पायाने फिरू नये. अशा वेळी टॉर्चचा व काठीचा वापर करणं योग्य असतं. रात्री झोपताना जमिनीपासून शक्यतो उंचीवर झोपावं. जुन्या पध्दतीच्या घराच्या भिंती, कुंपणाच्या भिंतींना पडलेले तडे, छिद्रं लगेच बुजवून टाकावीत. खिडक्यांना जाळया जरूर बसवाव्यात म्हणजे पालींच्या मागे साप येण्याचा धोका कमी होतो. कोंबडया-कबुतरांची खुराडी घरापासून लांबच ठेवावीत. सभोवती जमणारा पालापाचोळा, घाण साठू देऊ नये. जळणाची लाकडं, गोवऱ्या सापांची आवडती ठिकाणं असल्याने घराजवळ साठवू नये. घराजवळ खरकटं अन्न, कचरा टाकल्यास त्यावर येणारे उंदीर-घुशी सापांना आमंत्रण देतात. अंगणात उखडलेल्या फरशा, साठलेली पाण्याची डबकी सापांना आकर्षित करतात, हे कायम लक्षात ठेवावं. गिर्यारोहकांनी जंगलात फिरताना ओंडका, दगड पलीकडे न बघता, हात घालून उचलू नये. त्याखाली एखादा साप बसलेला असू शकतो. तलावात, पाणथळीच्या जागांमध्ये कामासाठी वावरताना तिथे साप नसल्याची खात्री करावी. थंड रक्ताचा प्राणी असल्याने उन्हाळयात शरीराचं तापमान कायम ठेवायला अशा थंड ठिकाणी सापांचा वावर हमखास असतो.

दुर्दैवाने, ही सगळी काळजी घेऊनही अचानक साप समोर आल्यास काय करावं? अनेक जण सहज सांगतात की 'सापाला मारून टाकावं'. हे असंवेदनशीलतेचं उत्तर देणारे विसरतात की निसर्गाच्या अन्नसाखळीत प्रत्येकाला निर्भयपणे जगायचा तितकाच हक्क आहे, जितका आपल्याला आहे. पळून जाण्याचा पर्याय मिळाल्यास, निसर्गातला कुठलाच प्राणी धोक्याची जाणीव झाल्यावर थांबत नाही. सापही या नियमाला अपवाद नाहीच. अचानक आपल्या समोर आलेला सापही आपण त्याच्यासमोर येण्याने घाबरलेला असतो आणि संधी मिळाल्यास पळून जाणं पसंत करतो. पळून जायला संधी मिळत नसेल आणि बचावासाठी उरलेला शेवटचा मार्ग म्हणजे चावणं एवढाच पर्याय उरल्यावर साप चावण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी, सापाला पकडायचा प्रयत्न करू नये. साप पकडणं सोप्पं आहे असं समजून सापाला पकडायला जाणं म्हणजे मृत्यूशी हस्तांदोलन असतं. साप ओळखता येत नसेल आणि पकडता येत नसेल, तर विनाकारण टाइमपास म्हणून त्याच्याशी छेडखानी करायला जाऊ नये. 80% साप बिनविषारी असले, तरीही उगाच साप पकडायला जाण्याचा हा चाळा जिवावर बेतू शकतो. काही फुटांपलीकडे सापाला दिसत नसल्याने लांबून जाणाऱ्या सापाला अडवायचा प्रयत्न करू नये. अचानक साप समोर आल्यास, जवळ असलेली काठी, रुमाल अथवा वस्तू बाजूला टाकावी. हलणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे सापाचा लक्ष वेधलं जात असल्याने फेकलेल्या वस्तूच्या दिशेने सापाचं लक्ष वेधलं जातं व आपण सुखरूप निघून जाऊ  शकतो. सापाला कान नसल्याने आपण  वाजवलेल्या टाळया, म्हटलेले आस्तिक आस्तिक मंत्र वगैरे अजिबात ऐकायला येत नाही. अशा वेळेस, आरडाओरडा करून इतरांना जमवून तावडीत सापडलेल्या त्या एकाकी सापाला मारणं अगदी चूकच असतं. आपल्या अज्ञानापायी आणि कुतूहलापोटी कुणा निरपराध जिवाला मृत्युदंड देणं यासारखी दुसरी भयंकर गोष्ट जगात नाही.

सापांच्या गप्पा ह्या न संपणाऱ्या सदरात मोडतात. सापांबद्दल कुतूहल बाळगणारे उत्साही वाचक लाभले की खूप काही लिहिता येतं. गेल्या दीड महिन्यांत आलेल्या भरपूर ईमेल्समधून विचारलेल्या महत्त्वाच्या शंकांबद्दल सर्पायनच्या पुढच्या, अर्थात शेवटच्या भागात मी लिहिणार आहे. तोपर्यंत अगदी नि:संकोचपणे मला मेल्स पाठवा. न जाणो त्यातलीच एखादी शंका नवीन माहितीचं दार आपल्यासाठी उघडेल.

[email protected]