(?) नेमका...

 विवेक मराठी  24-Nov-2017

 मानवी व्यवहारातील गमती-जमती, मर्मबंधातील आठवणी, नातेसंबंधांच्या रेशीमगाठी यांनी सजलेले, कधी खळखळून हसवणारे, तर कधी डोळयात पाणी आणणारे असे ललित लेखांचे नवे सदर या अंकापासून सुरू करत आहोत.  जयंत विद्वांस यांच्या लेखणीतून साकारलेले हे 'ललितबंध' दर पंधरा दिवसांनी आपल्या भेटीस येणार आहेत.

नेमका या शब्दातच त्याचं अचूकपण किंवा नेमकेपण आहे. एखादा माणूस बोलण्यात चतुर आहे असं आपण जेव्हा म्हणतो, त्याचा अर्थ तो नेमके शब्द वापरून रंजकता वाढवत असणार हे नक्की आहे. मराठी भाषेची कायम मला गंमत वाटत आली आहे. फाफटपसारा हा शब्द सहाअक्षरी आहे आणि नेमका, अचूक हे शब्द तीन अक्षरी आहेत, यातच आलं सगळं. सुळसुळीत, गुळगुळीत, मुळमुळीत, बुळबुळीत या शब्दांत मला तरी त्यांचा जो अर्थ आहे तो उच्चारताना जाणवतो. दणकट आणि लेचापेचा हे शब्द घ्या. कदाचित त्याला चिकटलेले अर्थ आपल्याला माहीत असल्यामुळे असेल, पण त्यांच्या उच्चारात जादू आहे हे नक्की. तर मूळ विषय 'नेमका', उगाच फाफटपसारा नको.

लिहिण्यात, बोलण्यात, गाण्यात एखादा शब्द अचूक आला, एखादी उपमा नेमकी असेल, तर ते जास्त आवडतं आपल्याला. त्या शब्दाची, सुराची योजना करायला देणगी हवी किंवा व्यासंग हवा. नेमका शब्द मेंदूतून येतो. कुणी म्हणेल - मी लिहीन आणि मग नेमके शब्द बाजूला काढून ठेवलेत ते नंतर पेरेन, तर तसं नाही होत. विचार करताना ते सुचत जातं तुम्हांला. सिनेमा-नाटकात नेमका कलाकार असला की किती मजा येते बघताना. ते पात्र आपल्या का लक्षात राहतं? कारण ते करणारा नट, नटी त्या भूमिकेत अचूक बसतात किंवा स्वत:ला बसवतात, म्हणून ते नेमके वाटतात. 'शोले'तला ए.के.हन्गल, 'दो बिघा जमीन'चा बलराज सहानी किंवा इतर असे अनेक का लक्षात आहेत? ते नेमके आहेत तिथे म्हणून. गदिमा, खेबुडकर यांची गाणी घ्या. का आवडतात इतकी वर्ष झाली तरी? त्यातले शब्द नेमके आहेत. ज्ञानेश्वर या नावातच सगळं आहे. किती नेमके शब्द आहेत त्यांचे. 'अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू'. अळुमाळू म्हणजे अल्प. सुवास किती पसरला? एवढुसा. पण तो शब्दोच्चारण करण्यात जी मजा आहे ना, ती इतर शब्दात नाही. हाच शब्दं आरती प्रभूंच्या 'ये रे घना'मध्येसुध्दा आलाय, 'फुले माझी अळुमाळू', चुरगळू शब्द येणारंच हो मागोमाग. आधी परिमळूला अळुमाळू चिकटला, इथे आधी आला, एवढंच.

म्हटलं ना - नेमका शब्द, उपमा अफाट काम करते. आता म्हणी कुणी वापरत नाही फार, पण त्या प्रिय असण्याचं कारण तेच आहे. फाफटपसारा न मांडता मोजक्या शब्दांत कमाल अर्थ पोहोचवतात त्या. कदाचित शहरी झालेले लोक शहाणे झाले असावेत, त्यामुळे त्यांचा वापर कमी झाला असावा, कारण ते गावंढळ वाटत असावं. एखादी खेडयातली म्हातारी कधी भांडायला उभी राहिली तर म्हणी म्हणून आपल्याला बेजार करेल. आमच्या शेजारी एक आंधळया आजी राहायच्या. त्या सढळ हस्ते वापरायच्या म्हणी, एरवीच्या बोलण्यातही. 'घे माझी मिरची, बोल माझ्या वाटची.' 'आपली मोरी अन मुतायची चोरी', 'संडास मालकाचा अन रुबाब भंग्याचा', 'पी हळद अन हो गोरी' अशा त्यांच्या अनेक म्हणी माझ्या लक्षात आहेत, कारण त्या नेमका, अभिप्रेत अर्थ पोहोचवतात. नुसतं बोलणं असं नाही, माणसाच्या वागण्यात नेमकेपण असेल तर शिस्त असते. 'नेमका हा टपकला' या किंवा अशा वाक्यातच फक्त नेमका शब्द नकोसा आहे.

एक गोष्ट वाचली होती खूप पूर्वी. एका कंपनीत एक मशीन बंद पडलं. बरेच लोक झटले, पण ते काही दुरुस्त झालं नाही. मग एका माहीतगार माणसाला बोलावण्यात आलं. तो आला, त्याने मशीन बघितलं आणि हजार रुपये सांगितले. कंपनी तयार झाली. त्याने एका ठिकाणी हातोडीचा फटका मारून पिन आत घातली आणि मशीन चालू झालं. मालकाने त्याला विचारलं, ''एक फटका मारायचे हजार रुपये?'' तो म्हणाला, ''फटका मारायचा एक रुपया, नेमका कुठे मारायचा याचे नऊशे नव्व्याण्णव.'' गोष्ट घडवलेली असेल, पण मथितार्थ लक्षात घेऊ या. नेमकेपण महत्त्वाचं. म्हणून लाल्या येईपर्यंत आर.डीं.नी 'घर आया मेरा परदेसी'चं रेकॉर्डिंग थांबवलं होतं, कारण त्यांना तो नेमका ठेका हवा होता. अमुक हिरोला अमुक गायक का असतो? वन-डेमध्ये नेमके गोलंदाज का ठेवतात शेवटच्या ओव्हर्सना? सीमारेषेवर नेमका क्षेत्ररक्षक का ठेवतात? त्याचं नेमकेपण यशाचं गमक असतं म्हणून. आयुष्यात नेमकं कधी थांबायचं हे कळलं पाहिजे, म्हणजे निराशा पदरी येत नाही. प्रत्येक रागात सगळेच सूर नसतात. नेमके घेतले म्हणजे तो कुठला, हे कळतं. थोडक्यात - नेमकेपणाने वेगळेपण उठून दिसतं.

आयुष्यं तरी वेगळं काय असतं? आपल्याला सोबत नेमका माणूस हवा असतो. तो नसेल तर आयुष्य काही थांबत नाही, पण ते नेमकेपण गहाळ असतं. प्रवासात खिडकीतून बघताना समोर वाळवंट दिसत असलं, तरी नेमका माणूस सोबत असेल तर त्याचा त्रास होत नाही; पण नसेल, तर मग हिरवळ दिसत असली तरी ती फारशी सुखावह नसते. प्रत्येकाच्या नशिबात हवं असलेलं नेमकेपण असेलच असं नाही. पण मग नंतर उरतो तो फक्त फाफटपसारा असतो.

अशा वेळी वाटतं - आयुष्यात नेमकी माणसं, नेमकी वेळ या गोष्टी वाटयाला आल्या नाहीत, तरी या सगळया पसाऱ्यातून निसटण्याचा अंतिम क्षण नेमक्या वेळी गाठता आला, म्हणजे झालं. अर्थात तो आनंद आपण कुणाला सांगू शकत नाही, हे दु:खं राहतंच.

9823318980