आयटी, स्किल्स, लेबर चौक वगैरे ....

 विवेक मराठी  07-Nov-2017

 

काडेपेटीसारखी चौकोनी घरं आणि त्या चौकोनी घरांत राहणारे समाधानी चार लोक. शहराच्या कुठल्याही भागातून मला हेच दिसतं. त्यांच्यामधलाच एक मी..... आणि तो?  शहराच्या कोपऱ्यात 'विशेष आर्थिक क्षेत्रात' बांधलेल्या त्या सुंदर सुंदर बिल्डिंगी मला APMC मार्केटसारख्या वाटू लागल्या. ...मी त्याच्याकडे पाहिलं. ‘Information Technology’च्या ह्या धंद्याला मनोमन नमस्कार केला. माझ्यासारखाच 'बंदोंका बिझनेस' करणाऱ्या 'त्या'च्यासोबत बसून मी चिअर्स केलं.

 का मोठया शहरात मी राहतो. माझ्या आजूबाजूला जिकडे नजर जाईल तिकडे फक्त बांधकाम सुरू असतं. दहा-पंधरा मजल्यांच्या उंच इमारती. इमारतींच्या मध्ये गार्डन, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, त्याच्या बाजूने कृत्रिम झाडांची हिरवळ, त्या झाडांच्या अंगावरून सोडलेल्या दिव्यांच्या माळा, काडेपेटीसारखी चौकोनी घरं आणि त्या चौकोनी घरांत राहणारे समाधानी चार लोक. शहराच्या कुठल्याही भागातून मला हेच दिसतं.

मी ह्या शहरात आलो, तेव्हा लहान होतो. लहान म्हणजे वयाने नाही, अनुभवाने. माझ्याचबरोबर कधीतरी तोसुध्दा ह्या शहरात राहायला आला असावा. शहराच्या एका कोपऱ्यात रांगेने बांधून ठेवलेल्या वेगवेगळया नावांच्या खूप सुंदर इमारती होत्या. मी रोज तिथे जायचो. काम करायला. माझ्याचसारखे काही हजार लोक तिकडे यायचे. वेगवेगळया वयाचे, अनुभवाचे, स्किल्सचे आणि वेगवेगळया विचारांचे लोक. रोज अशा बिल्डिंगीमध्ये बसून काम करायचं. त्यांना प्रत्येक शहरांच्या कोपऱ्यात जाऊन गोळा केलेलं. त्यांना विचारलेलं, तुमची स्किल्स काय? त्या स्किल्सची किंमत ठरायची आणि मग वर्षाला त्या हजारो लोकांना त्यांच्या कुवतीनुसार 'पगार' मिळायचा. त्यांच्यामधलाच एक मी..... आणि तो? तो रोज बघायचा ह्या शहरातले लोक सकाळी एका छोटया चौकोनात काम करतात आणि संध्याकाळी मोठया चौकोनात येऊन आराम करतात. मोठया चौकोनांना म्हणायचं घर आणि छोटयांना म्हणायचं 'क्युबिकल'. मोठे चौकोन बांधण्याचं काम करणारे शहराच्या एका कोपऱ्यातून 'स्किल' बघून लोक उचलायचे. त्यालाही तसंच उचललेलं. तासाच्या हिशोबाने त्याला दर महिना पैसे मिळायचे. माझंही तसंच.....

हळूहळू आम्ही दोघेही मोठे होत गेलो. आधी मी स्वत:च्या कामाचा विचार करायचो, आता 'प्रोजेक्ट'चा करायला लागलो. आणखी थोडा मोठा झालो. आता माझ्यासाठी काम फक्त काम न राहता 'बिझनेस' झालं होतं. मोठया मोठया 'प्रोजेक्ट'वर मी लोक लावायला लागलो. झटझट प्रमोशन घेत पुढे गेलो. तोसुध्दा एकेक पायऱ्या चढत गेला. कामगार होता, ठेकेदार झाला, पुढे पुढे जात राहिला. स्वत:ची स्किल्स विकता विकता तो स्किल्ड लोक विकू लागला.

परवा एका मोठया पार्टीमध्ये तो भेटला. मला विचारलं, ''काय करता साहेब तुम्ही?'' मी म्हटलं, ''ITमध्ये आहे.'' तो म्हणाला, ''म्हणजे नक्की करता काय?' माझ्या डोळयांसमोरून झपझप सगळं सरकलं - software, skills, business वगैरे वगैरे. क्षणभर विचार केला. म्हटलं, ''वैसे तो हम...'' त्याने मध्येच मला थांबवलं आणि म्हणाला, ''वैसे तो हम बंदे लगाते है... हेच ना???'' मी म्हटलं, ''But it is not bodyshopping… It is knowledge…'' मग मी आपणहूनच गप्प बसलो.

Engineering colleges मला शहरातल्या लेबर चौकांसारखे दिसायला लागले. त्यातला प्रत्येक विद्यार्थी केवळ एक 'रिसोर्स' दिसू लागला. एकाच वेळेस शंभर, दोनशे जणांची एकाच कॉलेजमधून 'प्लेसमेंट' करणाऱ्या कंपन्या म्हणजे मुकादम वाटू लागल्या. कन्सल्टंट्स म्हणजे ठेकेदार वाटू लागले. मला स्वत:लाच मी लोकांची 'स्किल्स' विकून मधल्या मध्ये माल खाणारा व्यापारी वाटू लागलो. शहराच्या कोपऱ्यात 'विशेष आर्थिक क्षेत्रात' बांधलेल्या त्या सुंदर सुंदर बिल्डिंगी मला APMC मार्केटसारख्या वाटू लागल्या. ...मी त्याच्याकडे पाहिलं. 'Information Technology'च्या ह्या धंद्याला मनोमन नमस्कार केला. माझ्यासारखाच 'बंदोंका बिझनेस' करणाऱ्या 'त्या'च्यासोबत बसून मी चिअर्स केलं.

9773249697

[email protected]