मूत्रपिंडाचे प्रश्न

 विवेक मराठी  08-Nov-2017

 


 मधुमेह झालेल्या मंडळींना सर्वात जास्त काळजी असते ती मूत्रपिंडाची. एकदा मूत्रपिंड खराब झालं की ते बदलण्यावाचून दुसरा कोणताही उपाय नसतो. आणि मूत्रपिंड बदलणं हे सोपं काम नाही. भरपूर पैसे खर्च करूनही वेळीच दुसऱ्या व्यक्तीचं मूत्रपिंड उपलब्ध होईल, याची कोणतीच खात्री देता येत नाही. शिवाय तोपर्यंत दिवसाआड डायालिसिस करत बसावं लागतं, माणसाची काम करून कमावण्याची शक्ती कमी झालेली असते, त्यांना हृदयरोग होण्याची भीती अधिक असते, कित्येक औषधं घेता येत नाहीत, सारख्या तपासण्या करत बसावं लागतं. इतकं करूनही आयुष्यमान कमी होतं ते होतंच. यावर उपाय एकच, मूत्रपिंड प्रयत्नपूर्वक सांभाळणं.

 धुमेह झालेल्या मंडळींना सर्वात जास्त काळजी असते ती मूत्रपिंडाची. साहजिकच आहे - एकदा मूत्रपिंड खराब झालं की ते बदलण्यावाचून दुसरा कोणताही उपाय नसतो. आणि मूत्रपिंड बदलणं हे सोपं काम नाही. भरपूर पैसे खर्च करूनही वेळीच दुसऱ्या व्यक्तीचं मूत्रपिंड उपलब्ध होईल, याची कोणतीच खात्री देता येत नाही. शिवाय तोपर्यंत दिवसाआड डायालिसिस करत बसावं लागतं, माणसाची काम करून कमावण्याची शक्ती कमी झालेली असते, त्यांना हृदयरोग होण्याची भीती अधिक असते, कित्येक औषधं घेता येत नाहीत, सारख्या तपासण्या करत बसावं लागतं. इतकं करूनही आयुष्यमान कमी होतं ते होतंच. सगळा घाटयातला व्यवहार. यावर उपाय एकच. मूत्रपिंड प्रयत्नपूर्वक सांभाळणं. त्यासाठी मधुमेह आणि मूत्रपिंड याचा संबंध काय? ते का खराब होतं? कसं खराब होतं? हे आधी जाणून घेतलं पाहिजे.

 आता चांगली गोष्ट. मधुमेह झाल्या झाल्या मूत्रपिंड खराब होण्याची भीती जवळजवळ नाहीच. टाइप वन मधुमेहात निदानापासून किमान तीन वर्षं काळजी नसते. टाइप टू मधुमेह जरा गोंधळात टाकतो. त्याचं निदान आणि प्रत्यक्ष शरीरात झालेले बदल यात काही वर्षांचं अंतर असतं. त्यामुळे मधुमेह झाल्याचं कळल्यावर ताबडतोब तपासणी करून घेण्याचा सल्ला बहुतेक तज्ज्ञ देतात. अर्थात त्यानंतर दर वर्षी मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर नजर ठेवावी लागते. दर वर्षी तपासणी करून घ्यावी लागते.

इथे एक महत्त्वाची सूचना करावीशी वाटते. बहुतेक लोकांना मूत्रपिंडाशी संबंधित सिरम क्रिएटिनीन ही रक्ताची चाचणी माहीत असते. पण मूत्रपिंड वाचवायचं असेल, तर या चाचणीचे निष्कर्ष आपले डोळे उघडेपर्यंत थांबणं योग्य नसतं. कारण जोपर्यंत आपलं मूत्रपिंड 80-85% कामातून जात नाही, तोपर्यंत सिरम क्रिएटिनीन नॉर्मल असल्याचं दिसतं. आता 80-85% कामातून गेलेलं मूत्रपिंड वाचवणं कठीण जाणार नाही का? म्हणजे केवळ सिरम क्रिएटिनीनचा विचार करून निर्धास्त राहणं अंगाशी येऊ  शकतं. मग यावर उपाय काय? मधुमेह मूत्रपिंडाला गिळायला लागलाय, हे लवकरात लवकर कसं कळणार?

सुदैवाने तशी तपासणी आता सररास उपलब्ध झाली आहे. ही तपासणी लघवीची आहे. त्यामागचं तत्त्व अगदी साधं आहे. शरीराला त्याज्य असलेले रासायनिक पदार्थ शरीराबाहेर टाकून देणं हे मूत्रपिंडाचं मूळ काम आहे. त्याचबरोबर हव्या असलेल्या गोष्टी शरीराबाहेर जाऊ न देणं हादेखील त्याच्या कामाचाच हिस्सा होतो. मूत्रपिंडातून बाहेर टाकला जाणारा मुख्य पदार्थ म्हणजे क्रिएटिनीन. आणि शरीराला हव्या असलेल्या पदार्थांपैकी सगळयात उपयुक्त म्हणजे प्रोटीन्स. अल्ब्युमिन हे त्यातलं सर्वात लहान प्रोटीन. म्हणजे आपल्या लघवीतून कमीत कमी अल्ब्युमिन आणि जास्तीत जास्त क्रिएटिनीन बाहेर फेकलं जात असेल, तेव्हा आपलं मूत्रपिंड मस्त काम करतंय हे सिध्द झालं. वेगळया शब्दात अल्ब्युमिनला क्रिएटिनीनने भागलं, तर येणारं गुणोत्तर कमीत कमी 30च्या आत यायला हवं. तर आपल्या मूत्रपिंडात काहीच दोष नाही हे सप्रमाण कळतं. जर हे गुणोत्तर वाढलं, 300च्या वर गेलं, तर सावध होता येतं. गुणोत्तर वाढलं म्हणजे मूत्रपिंड कामातून गेलं असं होत नाही. अगदी थोडीशी इजा झालीय इतकं कळतं. त्यावर झटपट उपाय करता येतात. मूत्रपिंड वाचवायला भरपूर वेळ मिळतो. या कारणासाठी ही तपासणी आताशा सररास केली जाऊ लागली आहे. त्यातही सोन्याहून पिवळी गोष्ट म्हणजे पूर्वी सारखी चोवीस तासांची लघवी एकत्र करण्याची आणि ती लॅबोरेटरीमध्ये घेऊन जाण्याची गरज नाही. सकाळची थोडीशी लघवी तपासायला नेली की काम भागतं. घाण नाही, दुर्गंधी नाही.

दुसरी आनंदाची बातमी म्हणजे जरी ही तपासणी नॉर्मल आली नाही, तरी खूप घाबरून जायचं कारण नाही. कारण लघवीतून अल्प स्वल्प प्रमाणात अल्ब्युमिन जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मूत्रपिंड पूर्णत: निकामी होतंच असं नाही. मग कोणाचं मूत्रपिंड खराब होईल आणि कोणाचं नाही, हे ओळखायचं कसं? हा प्रश्न आला. यावर बहुधा आपल्या जीन्सचं नियंत्रण असावं. बऱ्याचदा कुटुंबातल्या एखाद्या मधुमेही व्यक्तीला मूत्रपिंडाचा त्रास असला की त्याच कुटुंबातल्या दुसऱ्या मधुमेहीचंही मूत्रपिंड खराब झाल्याचं दिसतं. अर्थात निश्चित आडाखे मांडता येतील अशी कुठलीही तपासणी या वेळी तरी उपलब्ध नाही. पण काही गोष्टी त्या दिशेनेअंगुलिनिर्देश करतात. हे सगळे अंदाज टाइप वन मधुमेहात अभ्यासले गेले आहेत. टाइप टू मधुमेहाच्या बाबतीत परिस्थिती आणखी संदिग्ध आहे.

साधारण ज्यांना मधुमेह होऊन दहा-पंधरा वर्षांचा कालावधी लोटला आहे, ज्यांचा रक्तदाब थोडा वरच राहतो आहे, ज्यांच्या डोळयांना मधुमेहाने ग्रासलंय अशांची रेशो ही तपासणी नॉर्मल नसली, तर ह्या मंडळींमध्ये जास्तच जपायला हवं इतकं खरं. कुठल्या रुग्णांना जास्त फायदा होणार हे निश्चित नसल्याने आणि मूत्रपिंडाचे विकार पुढे मोठे प्रश्न निर्माण करत असल्याने डॉक्टर धोका पत्करत नाहीत. लघवीत अल्ब्युमिन-क्रिएटिनीन रेशो अधिक असलेल्या सरसकट सगळयाच रुग्णांवर उपचार करतात.  

विषयबदल झाला, तरी एका गोष्टीचं स्पष्टीकरण इथे करायलाच हवं. केवळ क्रिएटिनीनचा आकडा नॉर्मल आहे म्हणून सुखाचा श्वास सोडणं योग्य नाही. कारण क्रिएटिनीन अगदी पातळीच्या आत असतानादेखील पेशंटचं मूत्रपिंड प्रत्यक्ष खराब झालेलं असू शकतं. मुळात मूत्रपिंडाचा मूळ पिंड, म्हणजे रक्त गाळून त्यातले त्याज्य पदार्थ बाहेर टाकायची क्षमता असते. मग मूत्रपिंड दर मिनिटाला किती रक्त गाळू शकतं, यावर त्याचं कामकाज ठरायला हवं. आणि ही क्षमता शरीरात स्नायूंचं प्रमाण किती आहे, त्यांची रोजची झीज किती होते यावर अवलंबून आहे. कारण मुळात हालचाल होत असताना स्नायूंची जी झीज होते, त्यातूनच तर क्रिएटिनीन निर्माण होत असतं. क्रिएटिनीन कमी तयार झालं, तर त्याचं रक्तातलं प्रमाण नॉर्मल असू शकतं. परंतु प्रत्यक्षात मूत्रपिंडाची कामगिरी बरीच खालावलेली असू शकते. म्हणून केवळ ते नॉर्मल आहे यावर समाधान मानणं योग्य नाही. मूत्रपिंडाचं काम कसं चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी मूत्रपिंडाची रक्त गाळण्याची क्षमता - ज्याला वैद्यकीय भाषेत 'इ जी एफ आर' (eGFR) म्हणतात, ती समजायला हवी.

कदाचित तुम्ही म्हणाल, आता ही कुठली नवीन टेस्ट? पण सुदैवाने तसं काहीही नाही. तुमचं क्रिएटिनीन पाहून त्याचं गणित मांडता येतं. म्हणजे इ जी एफ आर चक्क फुकट आहे. हे शोधून काढायला बरीच ऍप्स मोफत उपलब्ध आहेत. नॅशनल किडनी फाउंडेशनचं ऍप सर्वात चांगलं आहे. त्यात वेगवेगळया फर्ॉम्युल्यांनी आपला इ जी एफ आर काढण्याची सोय आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांनादेखील सांगू शकता. ते तुम्हाला तुमचा इ जी एफ आर काढून देतील. हा आकडा लक्षात ठेवा. तुमच्या मधुमेहाचा इलाज करताना कुठली औषधं वापरायची, त्यांचा डोस किती द्यायचा हे यावर ठरतं. एवढयासाठी इ जी एफ आर महत्त्वाचा आहे.

आता जर क्रिएटिनीनचंच गणित मांडून इ जी एफ आर हा एकदा काढला जातो, तर तो इ जी एफ आरपेक्षा कमी महत्त्वाचा कसा काय? हा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिकच आहे. पण शरीरात तयार होणारं क्रिएटिनीन तुमच्या शरीरात किती मांसपेशी आहेत, स्नायूंचं प्रमाण किती आहे यावर अवलंबून असतं. वयानुसार कुठल्याही व्यक्तीच्या शरीरातल्या स्नायूंच्या पेशींचं प्रमाण इतर पेशींच्या तुलनेत कमी कमी होत जातं. पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा स्नायूंचं प्रमाण जास्त असतं. म्हणून कुठल्याही दोन व्यक्तींचं रक्तातलं क्रिएटिनीन एकसारखं असलं, तरीही त्यांचं मूत्रपिंड एकसारखं काम करतंय हे गृहीतक बरोबर होणार नाही. त्यांचं लिंग, वय आणि वजन लक्षात घेऊनच त्यांच्या मूत्रपिंडाची कार्यक्षमता ठरवावी लागेल. इ जी एफ आर नेमकं हेच करतो. आपल्याला मूत्रपिंडाच्या कार्याची बऱ्यापैकी अचूक कल्पना देतो. एक उदाहरण देऊन ही गोष्ट अधिक स्पष्ट करता येईल. समजा, 75 वर्षांची 50 किलो वजन असलेली एक स्त्री आणि दुसरा 35 वर्षांचा 80 किलो वजनाचा पुरुष - दोघांचंही रक्तातलं क्रिएटिनीन 1.2 आहे, तर एम डी आर डी फॉम्युल्यानुसार त्या स्त्रीचा इ जी एफ आर 44, तर त्या पुरुषाचा 69 येईल. पाहा किती फरक आहे तो! म्हणून इ जी एफ आर महत्त्वाचा.

अर्थात हा आकडाही काही वेळेला तात्पुरता बदलतो. व्यायाम केल्यावर स्नायूंची झीज होते. गरोदरपणात स्त्रीचे हॉर्मोन्स बदलतात. त्यातून अधिक क्रिएटिनीन तयार होतं. खूप मोठया प्रमाणात प्रोटीन्स खाण्यात आले किंवा मूत्रपिंडाच्या रक्तपुरवठयात कमी-जास्त झालं, तरी हेच होतं. इ जी एफ आर बदलू शकतो.

9892245272