'ती' गोष्ट

 विवेक मराठी  18-Dec-2017

मधुमेहींच्या बाबतीत लैंगिक समस्या भरपूर असतात. एकंदरीतच या सगळया बाबी 'सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही' या सदरात मोडतात. स्त्रीपुरुषांच्या कामजीवनाचे अनेक पैलू आहेत. मधुमेहींच्या कामजीवनात सुधारणा व्हायला हवी असेल, तर मुळात दोष कुठे आहे ते शोधणं अत्यंत आवश्यक असतं, याची जाणीव ठेवायला हवी. म्हणजे व्यक्तीचं कामजीवन कसं आहे हे आधी समजून त्यावर कसा इलाज करायचा याची निश्चिती करायला हवी.'ती गोष्ट' आपल्या जीवनाचा एक भाग आहे, हे उमजून डॉक्टरी सल्ला घ्यायला हवा.

काही गोष्टी आपण कुणाशी बोलायच्या ते समजत नाही. मधुमेहींच्या बाबतीत लैंगिक समस्या भरपूर असतात आणि त्याबद्दल ना डॉक्टरांकडून विचारणा होत, ना रुग्ण स्वतःहून त्याची वाच्यता करीत. त्यामुळे एकंदरीतच या सगळया बाबी 'सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही' या सदरात मोडतात. परंतु आजच्या घडीला यावर उत्तम प्रकारचे अनेक उपाय उपलब्ध झाले आहेत. रुग्णाला चूपचाप सहन करत बसण्याची किंवा कुठले तरी सांगोवांगीचे अथवा भोंदू बाबाचे उपचार करत बसण्याची गरज नाही.

अर्थात गरज आहे ती निदानावर नेमकं बोट ठेवण्याची. स्त्रीपुरुषांच्या कामजीवनाचे अनेक पैलू आहेत. मधुमेहींच्या कामजीवनात सुधारणा व्हायला हवी असेल, तर मुळात दोष कुठे आहे ते शोधणं अत्यंत आवश्यक असतं, याची जाणीव ठेवायला हवी. म्हणजे व्यक्तीचं कामजीवन कसं आहे हे आधी समजून त्यावर कसा इलाज करायचा याची निश्चिती करायला हवी.

आणि इथेच खरी गोम आहे. बहुतेक मंडळींना कामजीवनाबद्दलची माहिती मिळते ती सांगोवांगी. त्याचं कुठलंही शास्त्रोक्त शिक्षण उपलब्ध नाही. या सांगोवांगीत मिळालेलं ज्ञान उचित असेल असं बिलकुल म्हणता यायचं नाही. किंबहुना ते चुकीचं असण्याची शक्यताच अधिक आहे. मग पुढच्या आयुष्यात जे काही घडतं, ते Trial and Error या पठडीतलं. साहजिकच यात बहुधा गैरसमजाची भीती जास्त.

मुळात प्रत्येक व्यक्तीला शास्त्रीय लैंगिक शिक्षण मिळालं तर या समस्या बऱ्याच कमी होतील, हे निश्चित आहे. परंतु अशा प्रकारचं शिक्षण कोणी द्यायचं, नेमकं कुठल्या वयात ते द्यायला हवं याबाबत संभ्रम आहेत. सामाजिक, सांस्कृतिक व स्थानिक विचारांच्या कक्षेत किंबहुना लैंगिक उदारतेने उलट समस्या कमी होतात, हे स्वीडनसारख्या देशात अनुभवातून सिध्द झालं आहे. योग्य व्यक्तींनी अशा शिक्षणाचा पुरस्कार आणि प्रचार केला, तर लैंगिकतेशी निगडित कित्येक प्रश्न मुळातच उद्भवणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं.

इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की इतर प्राण्यांच्या आणि आपल्या कामजीवनात एक मूलभूत फरक आहे. इतर प्राणी रतिक्रीडा करतात ते केवळ प्रजोत्पादनासाठी, आपला वंश पुढे चालावा म्हणून. फक्त माणसाने त्यात आनंद शोधला. दुसरा भाग म्हणजे इतर प्राणी या कारणासाठी काही विशिष्ट काळ कार्यरत असतात. माणसाला ही मर्यादा नाही. यातून मिळणारा आनंद ही मानसिक गोष्ट असल्याने त्याच्या कामजीवनात विचारांना महत्त्व बरंच आलं. एक प्रकारे त्याची उद्दीपित होण्याची प्रक्रिया विचारातून उगम पावते. मानसिक ताणतणावांचा त्याच्या लैंगिक इच्छेवर आणि पुढे संपूर्ण क्रियेवर विलक्षण प्रभाव पडतो. हवा तसा आनंद देता/घेता येईल की नाही याची धास्ती वाटल्याने गळून पडणारे थोडेथोडके नाहीत. याचाच अर्थ या विषयीच्या समस्यांमध्ये प्रत्यक्ष ताणतणावांचा, पुढचं सर्व आपण व्यवस्थित निभावून नेऊ  शकू, याबद्दल वाटणाऱ्या विश्वासाचा भाग किती आणि शारीरिक प्रश्नांचा भाग किती हे ठरवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. इतर आजारांप्रमाणे लक्षण सांगितलं, आणि दिलं डॉक्टरांनी औषध लिहून... असं केलं, तर भ्रमनिरास व्हायची भीती वाढते.

उपचार करण्याच्या दृष्टीने रुग्णाचा पूर्ण इतिहास समजून घेणं, प्रश्न नाजूक असल्याने त्याला नेमके प्रश्न विचारणं, त्याने दिलेल्या उत्तरांचा योग्य तो अर्थ लावणं याला खूपच महत्त्व आहे. त्यासाठी डॉक्टर समजूतदार असावे लागतात आणि रुग्णाने न संकोचता आपली समस्या त्यांच्या समोर मांडण्याचं धैर्य दाखवणं जरुरीचं असतं. समागम हा स्त्री आणि पुरुष दोघांशीही निगडित असल्याने दोघांचीही एकत्रित भेट व चर्चा आवश्यक ठरते. कधीकधी काही गोष्टी नवरा-बायकोदेखील एकमेकांकडे उघड करत नाहीत. तसं काही समस्या घेऊन आलेल्या जोडप्याच्या बाबतीत घडतंय असं वाटलं, तर डॉक्टर दोघांना वेगवेगळं भेटण्याचा विचारदेखील करतात. जवळजवळ 50% वेळेला केवळ अशा भेटींमधून जोडप्यातले गैरसमज दूर होऊन त्यांचं लैंगिक जीवन सुखी होतं.  उत्तम समागम होण्याच्या आड कित्येकदा शारीरिक अडचणी असण्यापेक्षा काही सामान्य गोष्टी असतात. दोन व्यक्तींमधले गैरसमज दूर होणं यातच त्यांच्या शरीरसंबंधातला आनंद दडलेला असतो. म्हणून इथे समुपदेशन किंवा काउन्सेलिंग महत्त्वाचं ठरतं. म्हणजेच अशा समस्यांसाठी डॉक्टरांना भेटताना मनमोकळं बोलणं, बारीकसारीक गोष्टीदेखील त्यांना सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र आपल्याकडे डॉक्टर म्हणजे औषध देणार, हे एवढं घट्ट बसलेलं समीकरण आहे की नुसते बोलण्याचे कसले पैसे द्यायचे असा विचार केला जातो आणि तिथेच घोडं फसतं.

समस्या कोणत्याही गैरसमजावर आधारित नाही, त्या समस्येमध्ये मानसिक काहीही नाही, हे एकदा समजलं की समस्येचा शारीरिक भाग शोधणं आवश्यक होतं. अर्थात मग निदानात नेमकेपणा यावा यासाठी काही तपासण्या करणं ही पुढची पायरी असते. काही वेळेला पहिल्या, रुग्णाशी बोलून मिळवलेल्या माहितीच्या आधारे निदान होत नाही. समस्या शारीरिक की मानसिक यावर प्रकाश पडत नाही. त्या वेळी स्टँप टेस्ट कामाला येते. ही अत्यंत अल्प खर्चाची तपासणी आहे. रात्री निजताना लिंगाभोवती स्टँपची पट्टी गुंडाळायची व सकाळी उठल्यावर त्या पट्टीचं काय होतं हे डॉक्टरांना दाखवावं, अशी ही खूपच साधी तपासणी आहे. नॉर्मल पुरुषांना झोपेत पहाटे लिंग ताठरता येते. त्यामुळे स्टँपची पट्टी फाटते. बहुतेक वेळी या प्रकाराने 'दूध का दूध, पानी का पानी' होतं. मग इतर महागडया आणि सर्वत्र सहज उपलब्ध नसलेल्या तपासण्या करून घेण्याची कोणतीच गरज उरत नाही. 

समस्येप्रमाणे इलाज हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आपल्या मनानेच व्हायग्रा सुरू करणं यासारखी चुकीची गोष्ट नाही. इच्छाच न होणं हा वेगळा प्रश्न आहे. बहुधा काउन्सेलिंगने तो सुटतो. काउन्सेलिंग फक्त एकाचं करून भागत नाही. जोडप्याचं करावं लागतं. तरच त्यातून योग्य काहीतरी निष्पन्न होतं.

इच्छा झाल्यावर आणि योग्य संधी उपलब्ध झाल्यावर लिंगात आवश्यक तितकी ताठरता न येणं हे अनेकांमध्ये दिसतं. त्यावर अनेक प्रकारचे उपचार सध्या शक्य आहेत. दारू बंद करणं, धूम्रपानाचा त्याग करणं याने अनेकांच्या समस्या सुटू शकतात. रक्तदाबासाठी वापरण्यात येणाऱ्या काही औषधांनीदेखील हा प्रश्न उद्भवू शकत असल्याने डॉक्टरी सल्ल्यानुसार ती औषधं बदलून घेणं गरजेचं असतं. शिवाय व्हायग्रासारखी काही औषधं यावर रामबाण उपाय म्हणून वापरली जातात. फक्त गरजेपुरती अथवा इच्छा झाल्यावर ती वापरण्यापेक्षा या औषधांचा नियमित वापर नक्कीच अधिक चांगला ठरतो. ज्या मंडळींना त्यांच्या हृदयरोगासाठी नायट्रेट नावाची औषधं सुरू आहेत, त्यांनी व्हायग्रा गटातली औषधं वापरू नयेत. व्हायग्रा गट काम करत नसल्यास पंप वापरून लिंगात ताठरता आणता येते.

प्रसंगी लिंगामध्ये इंजेक्शन देऊन पाहिलं जातं. हे इंजेक्शन आपलं आपण घ्यायचं असतं. प्रकार महागडा असला, तरी परिणामकारक आहे. अगदीच प्रश्न सुटला नाही की सरतेशेवटी शस्त्रक्रिया करून तो सोडवावा लागतो.

समोरच्या व्यक्तीचं समाधान होण्याआधी ढेपाळणाऱ्या व्यक्तींसाठी वेगळे उपचार करावे लागतात. तिथे व्हायग्रा वापरून फारसा फरक पडत नाही. इथेही तोंडावाटे घ्यायची औषधं आणि त्या जागी लावायची औषधं असे पर्याय आहेत.

जाता जाता मनातला एक विचार निश्चितपणे मांडायला हवा. यावर नीट संशोधन व्हायला हवं. प्राचीन काळी वात्स्यायन ऋषींनी कामशास्त्र लिहिलं. त्यात कामेच्छा वाढवण्यासाठी आणि त्यातून समाधान मिळवण्यासाठी काय खावं याबद्दल उल्लेख आहेत. ते वाचल्यावर 'पूजेतलं पंचामृताचं महत्त्व कदाचित हेच असेल का?' असं माझ्या मनात आलं. देवपूजा साधारण घरातली कर्ती व्यक्ती करते, तिचं कामजीवन नीट राहावं यासाठी त्या व्यक्तीने योग्य प्रमाणात ज्या पाच वस्तू सेवन करायला वात्स्यायन सांगतात, त्या पाच गोष्टी मिळून पंचामृत बनतं. कित्येक शतकांपूर्वी देवळांमध्येदेखील ज्या गोष्टीला महत्त्व होतं, लोकशिक्षणासाठी कामजीवनाची शिल्पं बनवली जात होती त्या देशात असा विचार होणं साहजिक वाटत नाही का?

मग आता आधुनिक म्हणवणारे आपण आपला हा प्रश्न डॉक्टरांना सांगतानादेखील का आढेवेढे घेतो, हे कळणं थोडं अवघड जातं खरं. पण असं होतंय. कित्येक जोडपी आपली घुसमट दाबून टाकत जगताहेत. त्यांनी जरा मोकळं व्हायला हवं. 'ती गोष्ट' हाही आपल्या जीवनाचा एक भाग आहे, हे उमजून डॉक्टरी सल्ला घ्यायला हवा.

9892245272