कडक धोरण हवे

 विवेक मराठी  29-Dec-2017

भारतासाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप ठेवत, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना अटक केल्याच्या घटनेला आता दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. कुलभूषण यांना त्वरेने कायदेशीर मदत देण्यासाठी भारत सरकारने तर पावले उचललीच, त्याचबरोबर भारतीय दहशतवादाचा चेहरा म्हणून जगासमोर जाहीर करत कुलभूषण यांना फाशी देण्याचा पाकिस्तान सरकारचा कुटिल डावही भारताने हाणून पाडला. स्वत:च्या कर्माने दहशतवादी देश म्हणून जगासमोर असलेली प्रतिमा पुसण्यासाठी पाकिस्तानने केलेला हा केविलवाणा प्रयत्न होता.

ज्याप्रमाणे 'बुडत्याचा पाय खोलात' जातो, त्याप्रमाणे या प्रकरणात पाकिस्तानने उचललेले एकेक पाऊल या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय राजकारणात अधिकाधिक मलीन करणारे ठरत आहे. कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला भेटीची परवानगी देत, मानवी मूल्याची चाड असलेला देश आहे असे चित्र रंगविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न चांगलाच अंगलट येणार असे दिसत आहे. कारण ही तथाकथित भेट प्रसारमाध्यमांच्या कृपेने सगळया जगाने पाहिली. भेटीच्या वेळी या दोन महिलांवर आणि कुलभूषण यांच्यावर घालण्यात आलेली अमानुष बंधने सगळयांना कळली. या बंधनांचे पालन करत भेट घेत असतानाही, बंद काचेआड असलेल्या आपल्या पुत्राची विवशता आणि त्यामागचा कुटिल हेतू त्यांच्या मातेने जाणला आणि अतिशय धैर्याने परखड सवाल करत, पाकिस्तान सरकारच्या डावालाच सुरुंग लावला. मूल्यांची जपणूक करतो हे दाखविण्यासाठी जे नाटक रचले गेले, त्यातूच त्या देशात मानवी मूल्ये कशी कवडीमोल समजली जातात हे जगाने पाहिले. 

कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा तसेच बलुचिस्तान, कराची येथील दहशतवादी हल्ल्यांच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवत पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारताने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात उचलून धरले असल्याने, तेथील निकाल येईपर्यंत त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. जगासमोर एवढी नाचक्की झाल्यानंतरही पाकिस्तान सरकार आणि तेथील लष्कर स्वस्थ बसणार नाही, याची कल्पना आहे. त्यामुळेच कुलभूषण जाधव यांना गुन्हेगार ठरविण्यासाठी ते सर्व पातळयांवर प्रयत्न करत राहणार, हेही उघड आहे. दहशतवाद्यांचे नंदनवन अशी जगाला ओळख असलेल्या या देशाला भारतात दहशतवाद पोसला जातो हे काहीही करून आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणे ठसवायचे आहे. त्या देशाची ही विकृत मानसिकता एकवेळ समजून घेता येईल. मात्र भारतीय राजकारणात सक्रिय असलेले नेते जेव्हा या संदर्भात पाकिस्तानच्या बाजूने जाहीर मतप्रदर्शन करतात, ती गोष्ट अधिक चिंताजनक वाटते. पाकिस्तानचे समर्थन करताना देहभान हरपलेल्या मंडळींमध्ये समाजवादी पक्षाच्या नरेश अग्रवाल या नरोत्तमाचा सगळयात वरचा क्रमांक लागेल. ते म्हणतात, ''पाकिस्तानने कुलभूषण जाधवला जर अतिरेकी मानले आहे, तर अतिरेक्यांशी ज्या पध्दतीने व्यवहार केला जातो, तसाच व्यवहार पाकने त्याच्याशी केला पाहिजे.'' इतकेच बोलून त्यांचे समाधान होत नाही म्हणून की काय, वर अशीही पुस्ती जोडतात की, ''पाकच्या कैदेत शेकडो भारतीय कैदी असताना केवळ कुलभूषण जाधवलाच माध्यमे कशासाठी प्रकाशात आणत आहेत?'' अशी बेजबाबदार आणि बेलगाम वक्तव्ये करणाऱ्या नरेश अग्रवाल यांनी माफी मागावी अशी मागणीही संसदेत करण्यात आली आहे. तात्पर्य इतकेच की कायमची डोकेदुखी ठरलेल्या या शेजारी देशाचे समर्थक केवळ त्यांच्या देशातच नाहीत, तर भारतातही आहेत, तेही सक्रिय राजकारणात आहेत. विरोधी पक्षात असले तरी दुसऱ्या देशासमोर, त्यातही पाकिस्तानसमोर देशहिताच्या विषयात सर्व जण एक असायला हवेत याचेही भान त्यांना राहिलेले नाही. ज्या विषयाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे, त्या विषयात टिपण्णी करताना कसे बोलावे हेही ज्यांना समजत नाही, असे नेते संसदेत आहेत. असे नेते म्हणजे काँग्रेसच्या मणिशंकर अय्यरांचेच वैचारिक वारसदार होत.

कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आईला व पत्नीला भेटू दिले यामागे कोणत्याही मूल्यांची चाड नव्हती, तर भारत दहशतवादी देश आहे या आपल्या आरोपाला पुष्टी देण्यासाठी रचलेला तो एक नीचतम कट होता, हे आता सगळयांना समजले आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव टाकत आपल्याला हवे तसे संभाषण घडवून आणणे आणि त्यातून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे तयार करणे हा तो कट होता. पण तोही साध्य झाला नाही आणि ज्या प्रकारे त्या दोघींशी वर्तन करण्यात आले, त्यातून पाकिस्तानच्या भल्याचा कोणताही संदेश जगासमोर गेला नाही. या दोन्ही महिलांना पोषाख बदलायला लावणे, ज्याला सौभाग्यालंकार समजले जाते ते अलंकार काढायला लावणे, पादत्राणांमध्ये चिप बसविल्याची शंका व्यक्त करत तीही काढायला लावणे आणि मातृभाषेत न बोलण्याची सक्ती करणे ही पाकिस्तानच्या मानसिक दहशतवादाची एक झलक आहे. त्या तणावपूर्ण वातावरणात, मनाची शांती ढळू न देता पाकिस्तानचा डाव त्यांनी उधळून लावला, या धैर्याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे.

एवढी नाचक्की होऊनही समाधान झाले नाही, म्हणूनच बहुधा या भेटीनंतर कुलभूषण जाधव पाक सरकारचे आभार मानत असल्याची एक चित्रफीत जारी करण्यात आली होती. आपण दयाळूपणे व्यवहार करतो आणि आपल्या कैदेत असणाऱ्या व्यक्तीशी मानवतेचा व्यवहार करतो, हे बिंबविण्याचा प्रयत्न करणारी ती चित्रफीतही बोगस असल्याचे आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या जाणकारांनी स्पष्ट केले. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडा पडला आहे. एक खोटे लपविण्यासाठी हजार वेळा खोटे बोलावे लागते, हेच पाकिस्तानच्या व्यवहारातून पुन्हापुन्हा सिध्द होत आहे.

भारतीय परराष्ट्र खात्याच्या पाठपुराव्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय संबंधामुळे जरी जाधव यांच्या शिक्षेला स्थग्ािती मिळाली असली, तरी पाकिस्तानने आपले आरोप अजून मागे घेतलेले नाहीत. भारताला कोंडीत पकडण्यासाठी हत्यार म्हणून पाकिस्तान कुलभूषण जाधव यांचा वापर करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकच्या या खेळीचा खरपूस समाचार घेतला असला, तरी अधिक कडक धोरण अवलंबून या विषयात पुढे गेले पाहिजे. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढविण्यासाठी वेगाने हालचाली करायला हव्यात. आणि हा प्रयत्न करत असतानाच कुलभूषण जाधव यांना परत कसे आणता येईल याचाही प्रामुख्याने विचार व्हायला हवा.