राष्ट्र उभारणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान

 विवेक मराठी  06-Dec-2017

 

***अरुण करमरकर****

 ''...भारत स्वतंत्र झाला, परंतु खऱ्या अर्थाने राष्ट्र या स्वरूपात उभा राहिला आहे काय? सलग भूभाग आणि त्यावर एकच राहणारा जनसमूह या दोनच बाबींनी राष्ट्र बनत नाही. राष्ट्र या नात्याने संघटित होण्याच्या प्रक्रियेत (ज्या समूहातील) व्यक्तिमात्राची 'मी'पासून 'आम्ही'पर्यंत वाटचाल होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामूहिक चेतनेतून राष्ट्र उदयाला येते. इतिहासविषयीची जाण, वर्तमानातील सामुदायिक सहभाग आणि भविष्याविषयीची समान स्वप्ने हे राष्ट्रनिर्माणच्या प्रक्रियेतील अत्यंत आवश्यक घटक आहेत. सुखदु:खातील एकात्म सहसंवेदना, सहभागाची समान संधी आणि निखळ समतायुक्त व्यवहार यातून राष्ट्राचे मानस विकसित होते...!''

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उच्चारताच दलितोध्दार आणि त्यासाठी सबंध जीवनभर केलेली कठोर साधना हाच संदर्भ अत्यंत स्वाभाविकपणे आठवतो. अतिशय लहान वयापासूनच अस्पृश्यतेच्या अमानुष रूढींचे चटके बाबासाहेबांनी अनुभवले. अत्यंत दुर्लभ अशी बुध्दिमत्ता आणि कठोर परिश्रमशीलता हे गुण जन्मजातच त्यांच्या ठायी होते. त्यांच्या बळावर उत्तुंग शैक्षणिक यश त्यांनी साध्य केले; परंतु तरीही रूढीप्रिय समाजाने त्यांच्या कपाळावरचा अस्पृश्यतेचा कलंकच ठळक मानला. त्यांच्या योग्यतेचा मान दूरच; उलट 'माणूस' म्हणूनही त्यांना बरोबरीचे स्थान देण्याचा दृष्टिकोनही अंगीकारला गेला नाही. अशा स्थितीत त्यांच्या मनात सूडाची, द्वेषाची भावना प्रबळ झाली असती तरीही ते 'मनुष्यपणा'शी सुसंगतच झाले असते. मात्र बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व मनुष्यपणालाही ओलांडून 'महामानव'पणाकडे झेप घेणारे होते. त्यामुळे पुढच्या साऱ्या आयुष्यात ते अभिव्यक्त झाले ते द्वेषाने नव्हे तर त्वेषाने! त्यांच्या विवेक आणि विचारांना एकाच ध्यासाचा आधार होता अन् तो ध्यास होता देशाच्या एकात्मतेचा. अस्पृश्यतेविरुध्द उभारलेल्या कडव्या संघर्षापासून देशाच्या राज्यघटनेला आकार देण्याच्या कष्टापर्यंत सर्वत्र बाबासाहेबांनी हाच ध्यास कसोशीने जोपासलेला दिसतो.

''मी ठरवले असते तर देशाचे वाटोळे करू शकलो असतो, परंतु मला इतिहासात 'देशविरोधी' अशी माझी नोंद करायची नव्हती...'' असे उद्गार त्यांनी काढले. या उद्गारातून त्यांना त्यांच्या मनातली खंत व्यक्त करावीशी वाटली ती सनातनी समूहाने दीर्घकाळ अंगीकारलेल्या बधिरतेमुळेच. याच बधिरतेपोटी 'मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही...' असेही त्यांना म्हणावे लागले. धर्मांतराची त्यांची घोषणा आणि प्रत्यक्ष धर्मांतर यामध्ये बावीस वर्षे एवढा प्रदीर्घ कालावधी त्यांनी व्यतीत केला हे ध्यानात घेतले पाहिजे आणि इतक्या दीर्घ प्रतीक्षेनंतर तद्दन निराशा पदरी येऊनही त्यांनी धर्मांतर केले ते अतिशय डोळसपणे. देशाच्या सांप्रदायिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याला बाधा येणार नाही याची काळजी घेऊनच त्यांनी बौध्द धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयापूर्वी हिंदू समाजजीवनात उचित सुधारणा घडवून आणण्याची जी जी संधी त्यांना मिळाली तिचा उपयोग करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. देशाची राज्यघटना साकार करण्याच्या उपक्रमातील सहभाग असो वा स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री या नात्याने सहभाग असो; त्यांनी समाजसुधाराचाच दृष्टिकोन सदैव अंगीकारला असल्याचेच दिसून येते. कायदामंत्री या नात्याने त्यांनी 'हिंदू कोड बिल' हे विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला. हिंदू समाजात ऐक्यमूलक आणि समाजाधिष्ठित सुधारणा घडवून आणण्याचा अभ्यासपूर्ण दस्तावेज असेच त्या विधेयकाचे स्वरूप होते; परंतु त्या विधेयकासंबंधातही राजकीय आणि सांसदीय पातळीवरही त्यांच्या पदरी निराशाच आली. एवढेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी वचनभंग करून त्यांची फसवणूकच केली. प्रचलित हिंदू कायद्यांमधील परस्पर मानवी संबंध, व्यवहार आणि परंपराविषयक तरतुदींमधील विसंगती आणि विषमतांना पूर्णविराम देऊन एक समान न्यायसंगत संहिता निर्माण करण्याच्या कल्पनेने त्यांनी हिंदू कोड बनविले होते. अर्थात, त्यामागील त्यांचा हेतूही सामाजिक ऐक्य परिपुष्ट करण्याचा होता. याच हेतूचा अत्यंत सशक्त अंत:प्रवाह त्यांच्या जीवनभरातील कार्यकर्तृत्वातून वाहत होता. मंत्रिपदाच्या माध्यमातून ते राजकारणात शिरले खरे; परंतु ते सत्तापद ना त्यांच्या समाजकारणाला झाकोळू शकले, की ना त्यांना व्यक्तिश: मोहवू शकले. हिंदू कोड बिल मांडण्यात आलेले अपयश आणि त्यानिमित्ताने सत्ताधारी उच्चपदस्थांची अप्रामाणिकता अनुभवता येताच त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

स्वातंत्र्य प्रत्यक्ष मिळण्यापूर्वी, 1946च्या ऑक्टोबर महिन्यातच बाबासाहेबांची संविधान समितीवर निवड झाली होती. स्वातंत्र्य मिळताना फाळणी झाली, ब्रिटिशकालीन विधिमंडळे बरखास्त झाली आणि बाबासाहेबांचे घटना समितीतील सदस्यत्वही स्थगित झाले. त्यानंतर पुन्हा विधिमंडळ सदस्य या नात्याने निवडून येण्याचे त्यांचे प्रयत्न दोनदा अपयशी झाले (वा जाणीवपूर्वक केले गेले!). मात्र तरीही सरदार पटेल आणि अन्य सुजाण नेत्यांच्या सुज्ञ प्रयत्नांमुळे त्यांची निवड पुन्हा घटना समितीवर झाली हे देशाचे सद्भाग्यच म्हणायला हवे. संविधान समितीसमोरील त्यांचे पहिले भाषण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या भाषणात त्यांनी समर्थ आणि एकात्म भारताच्या निर्मितीवर भर दिला, 'राष्ट्र'-निर्माणाच्या संकल्पनेबाबत या भाषणात त्यांनी समर्पक आणि सडेतोड भाष्य केले. ''...भारत स्वतंत्र झाला, परंतु खऱ्या अर्थाने राष्ट्र या स्वरूपात उभा राहिला आहे काय? सलग भूभाग आणि त्यावर एकच राहणारा जनसमूह या दोनच बाबींनी राष्ट्र बनत नाही. राष्ट्र या नात्याने संघटित होण्याच्या प्रक्रियेत (ज्या समूहातील) व्यक्तिमात्राची 'मी'पासून 'आम्ही'पर्यंत वाटचाल होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामूहिक चेतनेतून राष्ट्र उदयाला येते. इतिहासविषयीची जाण, वर्तमानातील सामुदायिक सहभाग आणि भविष्याविषयीची समान स्वप्ने हे राष्ट्रनिर्माणच्या प्रक्रियेतील अत्यंत आवश्यक घटक आहेत. सुखदु:खातील एकात्म सहसंवेदना, सहभागाची समान संधी आणि निखळ समतायुक्त व्यवहार यातून राष्ट्राचे मानस विकसित होते...!'' राष्ट्रनिर्माणाविषयी असे अत्यंत मूलगामी चिंतन व्यक्त करण्यावरच ते थांबले नाहीत, तर घटनेच्या माध्यमातून आवश्यक त्या साऱ्या पैलूंची तरतूद जनजीवनाच्या दैनंदिन आचारसंहितेमध्ये समाविष्ट होईल याच दृष्टीने घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी मोलाचे योगदान त्यांनी दिले. वस्तुत: हाच (1946 ते 1956) कालावधी बाबासाहेबांच्या जीवनातील सर्वात खळबळजनक होता असे म्हणायला हवे. हिंदू समाजमानसातील परिवर्तनासाठीची त्यांच्या मनातली अत्यंत उत्कट आस सामाजिक प्रतिसादाच्या संदर्भात नाउमेदीच्या खडकावर आपटत राहिली होती. त्यातून निर्माण होणारा कमालीचा प्रक्षोभ त्यांच्या मनात सदैव उसळत राहिला असणार. त्याच प्रक्षोभातून आपल्या लक्षावधी अनुयायांसह धर्मपरिर्वतन करण्याचे निर्वाणीचे पाऊल त्यांनी उचलले. मात्र अशा अत्यंत प्रक्षुब्ध मन:स्थितीचा घटनानिर्मितीच्या प्रक्रियेवर त्यांनी बिलकूल विपरीत परिणाम होऊ दिला नाही. अथक परिश्रमातून ते प्रस्थापित समाजधुरीणांना समतेच्या निर्मितीचा आग्रह करीत राहिले, पण त्यांना मिळणारा प्रतिसाद मात्र तर्कदुष्ट, दुराग्रही, हेकट आणि होय, अमानवी होता. यामुळे स्वाभाविकपणे निर्माण होणारी संतप्त वेदना उरात बाळगत असतानाच घटनेतील एकेका तरतुदीचा ते करीत असलेला सम्यक विचार हा संतुलन आणि प्रगल्भ औदार्य यांचा विस्मयकारक नमुना होता आणि तो सहज व्यवहारातून साकार करण्याच्या त्यांच्या कर्तृत्वामागचे रहस्य एकच होते, ते म्हणजे त्यांच्या डोळयांसमोरचे समर्थ, एकात्म आणि एकजूट भारताच्या निर्मितीचे स्वप्न.

एकात्म आणि बळकट राष्ट्रजीवनाचे भौतिक पैलूही बाबासाहेबांनी दुर्लक्षिले नाहीत आणि मानसिक, भावनिक पैलूंकडेही त्यांनी दुर्लक्ष केले नाही. व्यक्तिमात्राला आर्थिकदृष्टया समृध्दी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाचा मार्ग अनुसरण्याचा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिलाच; शिवाय त्याचबरोबर शिक्षणाने मन प्रगल्भ बनते, व्यक्ती ज्ञानवंत होते हे अधोरेखित करण्यासही ते विसरले नाहीत. शिक्षित होण्याबरोबरच संघटित व्हा, असे मार्गदर्शन करण्याचा कटाक्षही त्यांनी बाळगला आणि संघटित समाजनिर्मितीला पोषक अशी कायदेरचना उभी करण्याचा आग्रहही जोपासला. शेतीचे क्षेत्र समाजजीवनाचे एक महत्त्वाचे अंग आहे याची जाणीव जागविताना विषमतेला जन्म देणाऱ्या खोती पध्दतीला पूर्णविराम देणाऱ्या कायद्याचाही त्यांनी पुरस्कार केला. वीज आणि पाण्याच्या समन्यायी वाटपाचा आग्रह धरला आणि रेल्वेमार्ग, जलमार्ग यांची मालकी केंद्र शासनाकडेच असावी अशा दूरगामी धोरणाचे प्रतिपादनही केले. नद्यांना जोडण्याच्या योजनेचा उल्लेख त्यांनी सत्तर-एेंशी वर्षांपूर्वीच केला होता.

''माझे सामाजिक तत्त्वज्ञान स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारलेले आहे. मात्र ही त्रिसूत्री मी फ्रेंच राज्यक्रांतीतून उसनी घेतली आहे, असे कोणी समजेल तर ते चुकीचे आहे. ही त्रिसूत्री मी माझे सामाजिक सर्वश्रेष्ठ गुरू (My Master) भगवान बुध्द यांच्या तत्त्वज्ञानातून अंगीकारली आहे. माझ्या सामाजिक तत्त्वज्ञानाची मुळे राज्यशास्त्रात नसून धर्मसंकल्पनेत (Not in political science, but in Religion) सामावलेली आहेत...'' हे बाबासाहेबांचे प्रतिपादन अतिशय महत्त्वाचे आहे. 'स्वातंत्र्याला समतेची मर्यादा असली पाहिजे तर समतोल स्वातंत्र्याचे अधिष्ठान आवश्यक आहे आणि या दोन्हीच्या संतुलनासाठी बंधुता आवश्यक आहे.' या त्यांच्या मांडणीतून त्यांची समाजभक्तीच प्रत्ययाला येते. या राष्ट्रसमर्पित समाजभक्तीच्या मनोपिंडातूनच त्यांनी राज्यघटनेतून साकार होणाऱ्या व्यवस्थात्मक चौकटीकडे पाहिले. घटना समितीत सहभागी झाल्यानंतरचे 1946 मधील त्यांचे पहिले भाषण आणि प्रत्यक्ष राज्यघटना देशाला अर्पण करताना 1951 साली त्यांनी केलेले भाषण त्यांच्या देशभक्तीची ठळक साक्ष देणारी आहेत. या दोन्ही भाषणांमधून त्यांनी 'समर्थ भारत'च्या निर्मितीचे उत्कट आवाहन केले आहे. घटना समिती, घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेल्या कामगिरीकडे याच भूमिकेतून पाहिले पाहिजे.

कायदा-सुव्यवस्थेची सक्षम रचना, सामाजिक सामरस्य, आर्थिक विकास, राजकीय स्थैर्य आणि एकात्म राष्ट्रभावना यांनी परिपूर्ण समाजजीवन साकार करण्यातूनच राष्ट्राच्या सुरक्षेची हमी निर्माण होते. याच दृष्टिकोनातून देश-समाजांतर्गत मजबुतीची बांधणी करण्यास सर्वाधिक प्राधान्य देणे हे राष्ट्र-राज्याचे           (National State M{) प्रथम कर्तव्य आहे अशी समर्पक धारणा बाबासाहेबांनी प्रतिपादित केली. अंतर्गत सामंजस्य, सामर्थ्य आणि  समृध्दी यांनी युक्त राष्ट्रजीवन बाह्य आक्रमणांना समर्थपणे सामोरे जाऊन त्यांना परतवू शकेल. याच जाणिवेतून त्यांनी आयुष्यभर सामाजिक समतेच्या प्रस्थापनासाठी संघर्ष उभारला होता. त्याच जाणिवेचे अधिष्ठान घटनेला प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अपार परिश्रम केले. समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर सामंजस्य निर्माण करण्याबरोबरच भौगोलिक एकात्मता (Regional Integration), राजकीय स्थिरता, राष्ट्रीय सुरक्षा-सिध्दता, कुशल परराष्ट्र नीती यांची सर्वांगीण बांधणी करण्याचा विचार त्यांनी प्रसृत केला.

14 वर्षे वयापर्यंतच्या मुलामुलींना सक्तीची शिक्षण सुविधा, विशिष्ट वयातील किशोर-कुमारांना लष्करी शिक्षणाची योजना याचाही पुरस्कार बाबासाहेबांनी केला. लष्करी शिक्षणामुळे राष्ट्रभावना, देशभक्ती, अनुशासन आणि आधुनिक कार्यसंस्कृतीची जोपासना संस्कारक्षम वयातच केली जाईल याकडे त्यांनी धोरणकर्त्यांचे लक्ष वेधले. राज्यरचनेच्या संदर्भात 'एक भाषा एक राज्य' नव्हे, तर 'एक राज्य-एक भाषा' या सूत्राचा अवलंब करण्याची सूचना त्यांनी केली होती. या सूत्रामुळे क्षितिजसमांतर (Horizontal) एकात्मतेची जोपासना सुलभ होईल अशी त्यांची रास्त भूमिका होती, तर समाजातील दबलेल्या, पिचलेल्या वंचित घटकांची उन्नती साध्य करण्याच्या उपायांद्वारे स्तंभावर (Vertical) एकात्मता साध्य होईल असे त्यांचे विश्लेषण होते.

भारतीय राज्यघटना ही बहुतांश पश्चिमी देशांच्या घटनात्मक संरचनेची नक्कल आहे अशा स्वरूपाची टिपणी काही वेळा केली जाते. त्याविषयीची सविस्तर चर्चा हा स्वतंत्रपणे दखल घेण्याचा विषय आहे. मात्र एका बाबतीतले, बाबासाहेबांच्या चिंतनातले वेगळेपण ठळकपणे अधोरेखित करणे या लेखाच्या विषयाच्या दृष्टीने आवश्यक ठरेल. पश्चिमी देशांप्रमाणे भारताच्या राजकीय संरचनेचे वर्णन त्यांनी राज्यांचा समूह (Federation of States) अशा शब्दाने नव्हे तर राज्यांचा संघ (संघराज्य - Union of States) अशा शब्दांत केले. शब्दयोजनेतील हा फरक मूलगामी तर आहेच; पण त्याचबरोबर बाबासाहेबांच्या मनातील एकात्म राष्ट्रभावनेला ठळकपणे अभिव्यक्त करणारा आहे.

भारताचा शेजार भारताविषयी शत्रुभावना बाळगणाऱ्या देशांनी भरलेला आहे याचे भान त्यांना अचूक होते. त्या दृष्टीने देशात दोन राजधान्यांची योजना करावी अशी सूचना त्यांनी केली होती. त्या दृष्टीने दिल्लीव्यतिरिक्त हैदराबाद येथेही राजधानी उभारावी असे त्यांनी सुचविले होते. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शत्रुराष्ट्रांपासून नवी दिल्लीचे अंतर संभाव्य बॉम्बहल्ल्याच्या टप्प्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले, तसेच दिल्ली आणि हैदराबाद या दोन्ही शहरांचा देशाच्या अन्य प्रमुख शहरांपासूनच्या (मुंबई, कोलकाता, चेन्नई, लखनौ, चंदिगड, पतियाळा) अंतराचा तुलनात्मक तक्ता मांडून दिल्लीपेक्षा हैदराबाद चारही दिशांकडून समानांतरावर असल्याचे दाखवून दिले होते.

देशातील जातिव्यवस्था आणि तिच्या आंधळया अवलंबातून निर्माण झालेली विषमता हा तर बाळासाहेबांच्या सर्वाधिक जिव्हाळयाचा विषय. सखोल अभ्यासाअंती त्यांनी जातिअंताचा (Annihilation of caste) विचार ठामपणाने मांडला. मात्र त्याचबरोबर जाती-जातींत विभागल्या गेलेल्या समाजाच्या मानसिकतेमध्ये एक खोलवरच्या सांस्कृतिक एकतेचा (Deep Cultural Unity) अंत:प्रवाह वाहतो आहे याचीही जाणीव त्यांनी बाळगली. जातींच्या निरासातून ही अंतर्धारा जोमाने प्रवाहित होईल असा त्यांना विश्वास होता. 'जातिभावनेच्या तीव्रतेची फलनिष्पत्ती अमानुषता असते हे खरे; मात्र प्रवृत्तीतील अमानुष भावनेच्या पोटी नव्हे तर धर्मभावनेवरील (आध्यात्मिकतेवरील) प्रगाढ श्रध्देपोटी हिंदू समाज जातभावना बाळगतो आणि पाळतो. म्हणूनच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची शिकवण रुजविणारी धर्मभावना प्रबळ केली पाहिजे...' असे मूलगामी मार्गदर्शन त्यांनी केले. (धर्मांतर करताना बौध्द धर्माची निवड करण्यामागे हीच निष्ठा होती.)

अशा अत्यंत मूलगामी, व्यापक आणि भविष्यवेधी समाजचिंतनानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तिमत्त्वाला महामानवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यांच्या या चिंतनाच्या सूक्ष्म पैलूंबाबत सहमती-असहमतीची चर्चा कोणी करू शकेल. मात्र त्यांच्याबाबतच्या किमान दोन ठळक बाबी कोणीच नाकारू शकणार नाही. एक म्हणजे त्यांच्या चिंतनाची व्याप्ती कृतिशूर आणि अतिमानवी होती आणि दुसरे म्हणजे समर्थ भारताच्या निर्मितीविषयीची त्यांची आस्था निखळ आणि उत्कट होती...!