‘‘बंधुभाव, समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न व्हावे’’ - मोहनजी भागवत

 विवेक मराठी  06-Dec-2017

‘‘हजारो वर्षांपासूनच्या विकृत आचरणाची सवय बदलण्याची आपल्याला सर्वात मोठी गरज आहे. मनुष्य सवयीने वागतो, तर्काने नाही. मागच्या काळात जे काही झाले, त्याचे परिमार्जन करून हिंदू धर्मातील भेदाभेदांचे समूळ उच्चाटन करून सर्वांबरोबर बंधुभावाचा धर्म आणि समता प्रस्थापित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. जालना येथे नुकतेच समरसता संगम या विशेष समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महंत रामगिरी महाराज यांची उपस्थिती होती.

नवीन जालन्यातील बाजार समितीच्या समोरच्या भागातील देऊळगावराजा ते भोकरदन वळण रस्त्याच्या राजूर चौफुलीजवळच्या वीस एकर परिसरात समरसता संगम सभेला अलोट गर्दी होती. अतिशय शिस्तबद्ध रचनेत पंचवीस हजार खुर्च्यांवर नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

सरसंघचालक पुढे म्हणाले, ‘‘हजारो वर्षे विषमतेचा मार झेललेल्यांबाबत शिवाशिवीची पापे घडली, त्याचे निराकरण झाले पाहिजे. सर्व भेदाभेदांना मूठमाती दिली, तरच देशाचा कायापालट होईल.’’ यासाठी संघाचे अग्रभागी राहून सक्रिय समर्थन आणि सहभाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

हिंदू म्हणून जगण्यासाठी काय आवश्यकता आहे? याचे विवेचन करताना सरसंघचालक म्हणाले की ‘‘हिंदू धर्मात आपण कोणती भाषा बोलता? कुठे आणि कसे राहता? कोणत्या देवाची उपासना करता? कोणत्या जातीचे आहात? आणि काय खाता व काय खात नाहीत? हे कुणी बघत नाही. अनेक परंपरा, पंथ-संप्रदाय व पूजापद्धती हिंदुत्वासोबत आहेत. आपल्या देशावर आक्रमणे झाली व त्यातून काही जणांनी आपली पूजापद्धती बदलली असली, तरी त्यांची मूळ ओळख बदलणार नाही. हिंदुत्व हे या सगळ्या विविधतांचा स्वीकार करणारे आहे. बंधुभावाचा धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत सांगितला आहे. शेकडो वर्षांपासून वेड्यासारखे वागणारे हिंदू आता त्यांच्यातल्या भेदाभेदांना मूठमाती देऊन एक झालेले आहेत असे जगाने बघितले, तरच आपण उन्नत आणि प्रगत होऊ  शकतो’’ असे त्यांनी सांगितले.

भारत हा स्वहिताबरोबर सर्व जगाचे हित बघणारा एकमेव देश आहे. आपल्या देशाने जगाला हे दाखवण्यासाठी केवळ तर्क करून चालणार नाही, तर शक्तीच्या उपासनेची गरज आहे. संघटित समाजातच शक्ती उत्पन्न होते. भारताची प्रतिष्ठा आता संपूर्ण जगात वाढली आहे, याचे कारण लोकांच्या सामूहिक विचारांचा उद्यम वाढल्याचे सरसंघचालकांनी लक्षात आणून दिले.

‘‘आपण एकच आणि एकमेकांचे आहोत, हेच खरे शाश्‍वत सत्य असून तेच आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे. जात, भाषा आणि पंथ ही हिंदूंची ओळख नाही. विविधतेत एकता हेच हिंदुत्व असून त्यासाठी समस्त हिंदू एकत्र येऊन जगाला आपली ताकद दाखवून द्यायची असून जातिभेदविरहित संघटित हिंदू समाजनिर्मिती हेच संघाचे उद्दिष्ट आहे’’ असे ते पुढे म्हणाले.

‘‘हिंसा ही दुख:द आहे. कोणत्याही मनुष्याला क्षुद्र म्हणून हिणवणे अतिशय दोषपूर्ण आहे. कोणत्याही परिस्थितीत हे मान्य होणार नाही. प्रत्येक मनुष्यात भगवान आहे’’ असे महंत रामगिरी महाराज म्हणाले.

जिल्हा संघचालक सुनील गोयल यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर संघाचे देवगिरी प्रांत संघचालक अ‍ॅड. गंगाधरराव पवारही उपस्थित होते. संघाचे जिल्हा कार्यवाह राजेंद्र कळकटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नितीन बागडी यांनी आभारप्रदर्शन केले.

 

भव्यदिव्य व्यासपीठाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समरसतेसाठी कार्य करणार्‍या ॠषी, मुनी, संतमहंत व समाजसुधारक यांची छायाचित्रे काढली होती. कार्यक्रमस्थळ पूर्णत: प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक होते. परिसर स्वच्छतेसाठी ठिकठिकाणी कचरा पेट्या ठेवण्यात आल्या होत्या.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली होती.

सुरेख रांगोळ्या, विविधतेत एकतेचा संदर्भ देणारे फलक जागोजागी लावण्यात आले होते.

मैदानावर सर्वत्र मोठ्या एलईडी पडद्यावर समारंभाची ताजी चलचित्रे दाखवण्यासाठी विशेष व्यवस्था उभारण्यात आली होती.

वाहनतळाची अतिशय शिस्तबद्ध व्यवस्था होती. श्रोत्यांच्या आसन व्यवस्थेसह वाहनतळासाठी स्वतंत्र वीस एकराचा परिसर राखीव ठेवण्यात आला होता.

सभेच्या संचालनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले. बौद्धिक वर्ग सभास्थळी कोणतीही गैरसोय होऊ नये, प्रत्येक श्रोत्याला सभास्थळी सुलभतेने पोहोचता यावे आणि आसन उपलब्ध व्हावे, याचीदेखील दक्षता घेतली. सभेला जमणारी गर्दी लक्षात घेऊन पार्किंग आणि पादचारी रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. श्रोत्यांना आपल्या आसनापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी विशेष पादचारी मार्ग तयार करण्यात आले होते.

याशिवाय सभेचे व्यासपीठ बैठकीच्या सुमारे पन्नास फुटांवर उंच करण्यात आले होते. अत्याधुुनिक ध्वनिव्यवस्था व विद्युतव्यवस्था उभारण्यात आली होती. वीस एकर परिसरात सर्वत्र प्रकाश असेल याची काळजी घेण्यात आली. सभेसाठी जिल्ह्यातील 200 विविध पंथांचे धर्माचार्य, संत-महंत यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते आणि ते उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील 997पैकी 600 गावांतून 3500 संघस्वयंसेवक संघाच्या गणवेशात उपस्थित होते, तर जालना शहरातील 3000 स्वयंसेवक गणवेशात उपस्थित होते. जिल्ह्यात या समरसता संगम सभेच्या यशासाठी 1000 स्वयंसेवकांनी संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन समरसतेचा जागर केला व नागरिकांना निमंत्रित केले.

9423731480